जगातील देशांच्या संयुक्त लष्करी सरावाचे नेतृत्व करणारी पहिली महिला लष्करी अधिकारी 'सोफिया कुरेशी' यांना जागतिक महिला दिनानिम्मित युवर स्टोरीचा सलाम  

0

अमेरिकेतील ९/११ चा हल्ला, फ्रान्समध्ये अलिकडेच झालेला अतिरेकी हल्ला किंवा मागील महिन्यात भारतीय लष्कराच्या तळावर झालेला हल्ला या साऱ्यातून जगासमोर दहशतवादाचा बिकट प्रश्न दिवसेंदिवस उग्र स्वरूप घेत असल्याचे दिसून आले आहे. जगासमोरील दहशतवादाच्या या आव्हानाला जगातील साऱ्या महत्वाच्या देशांनी एकत्र मिळून सर्व शक्तीनिशी सामोरी गेले पाहिजे याची जाणीव आता दृढ झाली आहे. अलकायदा, आयसीस आणि तालिबान या सर्व दहशतवादी संघटना दुर्दैवाने इस्लामी देशातून वाढीस लागल्या असल्याचे दिसून आले आहे. इस्लाम धर्मातील महिलांना या दहशतवादी विचारसरणीने तर आणखी काही युगे मागे ढकलून जनावरांपेक्षा हीन वागणूक दिल्याचे दिसून आले आहे. अशा वेळी जगातील पुढारलेल्या देशांच्या सैन्य तुकड्यांसह एकत्रितपणे लष्करी सराव करणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या तुकडीचे नेतृत्व एक अल्पसंख्यांक समाजातील तरुणी करते हे जगातील इस्लामीकरणाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने महिलांचा अवमान करणाऱ्या प्रवृतींचे नाक ठेचण्यासारखेच आहे. भारतीय सैन्य दलाच्या तुकडीच्या प्रमुख सोफिया कुरेशी यांना त्यासाठी युवर स्टोरीचा सॅल्युट.

जगभरात होत असलेल्या अतिरेकी कारवायामुळे सगळेच त्रस्त झाले आहेत. जगात शांतात प्रस्थापित होण्यासाठी विविध देशांचे अनेक उपक्रम सुरु आहेत. याच शांतात प्रक्रियेचा एक भाग म्हणून भारतीय लष्करातर्फे Exercise FORCE 18 या लष्करी सरावाचं पुण्यात आयोजन केलं आहे. या सरावाचं उद्घाटन मागील बुधवारी पुण्यात झालं. इतक्या मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव भारतात पहिल्यांदाच होत आहे. यामध्ये अमेरिका, चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस आदी १८ देश सहभागी झाले आहेत. या सरावात लक्ष वेधून घेतलं ते भारतीय लष्कराच्या महिला अधिकाऱ्याने. भारतीय लष्कराची ४० जवानांची तुकडी या सरावामध्ये सहभागी झाली असून, याचं वैशिष्ट्य म्हणजे लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी या महिला अधिकारी या तुकडीचं नेतृत्व करत आहेत. अशा प्रकारच्या संयुक्त सरावांमध्ये भारतीय तुकडीच नेतृत्व करणारी सोफिया या पहिल्याच महिला अधिकारी आहेत. भारतीय राज्यघटनेने मिळवून दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संदेशाला तिरंग्या झेंड्यासमोर जगातील बलाढ्य देशाच्या बरोबरीने उंचावण्याचे काम सोफिया कुरेशी यांनी केले आहे.

सोफिया कुरेशी या १९९९ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाल्या. सोफिया यांचे आजोबा आणि वडील हे पण भारतीय लष्करात होते. त्यांचा वारसा चालवत सोफिया पण सैन्यात दाखल झाल्या. भारताच्या शांतता प्रक्रियेचा भाग म्हणून २००६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या प्रकल्पावर त्यांची कांगो मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. शांतता प्रस्थापित करणे आणि शस्त्रसंधी या सारख्या गोष्टींचं निरीक्षण करणे हे काम त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या नियुक्ती दरम्यान केलं. या त्यांच्या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर Exercise FORCE 18 या संयुक्त कवायतींमध्ये सोफिया भारतीय तुकडीचं नेतृत्व करत आहेत.

इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या लष्करी सरावामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळणे ही अतिशय गर्वाची बाब आहे असं सोफिया सांगतात. महिलांनी संरक्षण दलात सहभागी होण्याचं आवाहन सोफिया या निमित्ताने करतात. त्या सांगतात महिलांनी सैन्यात दाखल होऊन देशाचं संरक्षण करणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी सैन्यात सहभागी होणं गरजेचं आहे. महिला सगळ्या जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पडतात त्याप्रमाणे देशाच्या रक्षणाची जबाबदारीही उत्कृष्टपणे पार पडतील असा विश्वास त्या व्यक्त करतात.

परस्परांच्या लष्करातील सर्वोत्तम कार्यपद्धतीची माहिती घेणं आणि सराव करणं आणि या माध्यमातून जगात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणं हा या संयुक्त सरावाचा मुळ उद्धेश आहे. सोफिया कुरेशी यांच्या नेतृत्वामुळे स्त्री पुरुष समानतेचाही संदेश जगभर जाणार आहे. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आणखी संबंधित कहाण्या :

देशाच्या हवाई प्रदक्षिणेच्या माध्यमातून जवानांना मानवंदना