इंदोरमधल्या कंपनीनं तयार केली ४०० ऍप्स, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही बनल्या ग्राहक

इंदोरमधल्या कंपनीनं तयार केली ४००  ऍप्स, गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्याही बनल्या ग्राहक

Thursday November 26, 2015,

3 min Read

विविध शैक्षणिक मोबाईल ऍपची निर्मिती करुन क्लिष्ट विषय विद्यार्थ्यांना समजतील अशा स्वरुपात मांडण्याचं काम वॅगमोब कंपनी करत आहे. कल्पित आणि कविता जैन यांनी ही कंपनी सुरू केली आहे. हे दोघंही मायक्रोसॉफ्टचे माजी कर्मचारी आहेत. 2010मध्ये त्यांनी मोबाईलच्या जगात काम करायला सुरूवात केली. साध्या आणि सोप्या अशा वॅगमोब बॅनरखाली त्यांनी ‘लर्न ऍड्रॉइड, प्रोग्रामिंग, प्रकल्प व्यवस्थापन, लर्न ग्रीक असे ऍप तयार केले. अशा विविधांगी विषयांचे ऍप घ्यायला लोक तयार असल्यानं ते निर्माण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. ही सर्व ऍप्लिकेशन्स शुल्क देऊन वापरता येतात.


image


उदा. फिजिक्स ऍप हे एक इ बुक आणि ऍपसाठीचं व्यासपीठ आहे ज्यातून शिकणं, शिकवणं आणि प्रशिक्षण या सेवा यातून पुरवल्या गेल्या आहेत. शिकणं सोपं होण्यासाठी छोटी छोटी प्रकरणं तयार करण्यात आली आहेत. महत्त्वाच्या संकल्पना चित्र आणि माहिती स्वरुपात देण्यात आल्यानं त्या लवकर समजतात. तसंच स्वयंपरीक्षणासाठी साधे आणि सोपे प्रश्न देण्यात आले आहेत.

हे ऍप डाऊनलोड करण्यासाठी ११५ रुपये शुल्क आहे. आतापर्यंत हे ऍप ५ हजार जणांनी डाऊनलोड केलं आहे. सध्या त्यांची ४०० ऍप्स अस्तित्वात आहे. अनेक ऍप्स विनाशुल्क असल्यानं ग्राहक ते डाऊनलोड करुन त्यांची शिकण्याची गरज पूर्ण होत आहे का हे तपासू शकतात. पण वॅगमोबनं लोकांना नेमकी कुठं मदतीची गरज आहे हे ओळखून ऍप तयार केले आहेत, त्यामुळे तर ते इतर ऍपपेक्षा वेगळे ठरतात.

शैक्षणिक ऍपचं मोठं क्षेत्र आणि त्यातील अनुभव याचा विचार करुन या दोन्ही सहसंस्थापकांनी इतर संधी शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यात त्यांना यश मिळालं ते विक्री प्रशिक्षण गुरू स्कीप मिलर यांच्या भेटीनंतर...या भेटीतच त्यांना व्यवसाय ते व्यवसाय (B-2-B) या क्षेत्रात संधी असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या सेल्स टीमला प्रशिक्षण देता येईल असे मोबाईल ऍप्स विकसित केले. गोसेल्सट्रेन(Gosalestrain) हे असं एक प्रशिक्षण मॉड्युल आहे जे सामाजिक, फिरतं आणि विक्री प्रशिक्षण गटाला जोडलेलं आहे. यातील काही फायदे असे आहेत...

1. मजकूर तयार करण्याची जबाबदारी वॅगमॉगवर नाही.

2. विक्री प्रशिक्षणावर भर असल्यानं वापरकर्त्याला त्यावर लक्ष केंद्रित करता येतं.

3. विक्रीसाठीचं मॉड्युल एकदा तयार झालं की मग याच दृष्टीकोनातून इतर क्षेत्रांमध्येही विस्तार करता येतो.


image


स्कीप यांनी वॅगमोबला गुगलसारखा ग्राहकही मिळवून दिला. गुगलच्या अडीचशे कर्मचाऱ्यांना त्यांनी मोबाईलवर प्रशिक्षण दिलं. वॅगमोबच्या ग्राहकांच्या यादीत मायक्रोसॉफ्ट, सॅमसंग आणि सोनीसारख्या कंपन्या आहेत. वापरकर्त्याला दर महिन्याला ३० अमेरिकन डॉलर शुल्क कंपनी आकारते. यामुळे वॅगमोबला भरपूर फायदा तर झालाच पण व्यवसाय ते व्यवसाय क्षेत्रात काम केल्यामुळे या क्षेत्रात वेगळा ठसा उमटवण्याची संधीही मिळाली आहे.

वॅगमोबचं आणखी एक आगळंवेगळं वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीची नोंदणी अमेरिकेत झाली असली तरी कंपनीच्या ६० कर्मचाऱ्यांची टीम भारतात इंदोरमधून काम करतेय. कंपनीचं काम इंदोरमधून चालवल्यानं खर्च खूप कमी लागतो आणि शहरात आयआयटी, आयआयएम आणि इतर चांगल्या संस्था असल्यानं कुशल मनुष्यबळही उपलब्ध होतं असं कविता स्पष्ट करतात. गर्दीपासून दूर असल्यानं वॅगमोबला शांतपणे कामही करता येतं.

वॅगमोबचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे स्टार्टअप सुरू करण्यात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग आहे. कविता, कल्पित आणि त्यांचा मुलगा या कामात पूर्णपणे व्यस्त असतात. त्यांनी नवी सुरुवात केली आहे केला आहे आणि नफाही मिळवला आहे. पण आता विक्री आणि विपणन वाढवण्यासाठी त्यांना आणखी भांडवल उभारायचं आहे. ‘टेकस्पार्क्स 2014’ प्रदर्शनातही कंपनीनं आपलं उत्पादन प्रदर्शनासाठी मांडलं होतं. भारतातून चालणारी तंत्रज्ञानविषयक एक प्रस्थापित कंपनी म्हणून कंपनीनं आता ओळख निर्माण केली आहे.

कंपनीची वेबसाईट- WAGmob

लेखक- जुबीन मेहता

अनुवाद – सचिन जोशी