एका रिक्षावाल्याचा स्तुत्य उपक्रम, स्त्रियांसाठी मोफत प्रवास सेवा

0

सतवीरसिंह हे वर्षातून ५ दिवस स्त्रियांना मोफत प्रवास सेवा उपलब्ध करून आपल्या प्रयत्नांनी समाजात एक आदर्श निर्माण करत आहे. गेल्या १५ वर्षां पासून दिल्ली स्थित सतवीरसिंह हे रिक्षा चालवत आहे. २०१३ पासून स्त्रियांसाठी विशिष्ट दिवशी ते मोफत प्रवास सेवा देतात.

स्त्री ही समृद्ध आणि संपन्न समाजाचा भक्कम आधारस्तंभ आहे. ज्या समाजात महिलांना आदर आणि समान दर्जा मिळतो त्या समाजाचा पुढे जाऊन सर्वांगीण विकास होतो, हे देशाच्या प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. ज्या समाजात आणि देशात स्त्रियांना आदर नाही तो समाज कुंठीत राहतो. आजमितीला भारतात स्त्रिया असुरक्षित आहे. अनेक प्रकारच्या जन जागृती नंतर पण त्यांच्यावर अत्याचार होत आहे. सरकारकडून कडक कायदे करुनही त्यांना समाजाच्या विकृतीला सामोरे जावे लागते आहे.


दिल्लीतल्या रिक्षा ड्राईवर सतवीर सिंह यांनी विचार केला की, आपल्या प्रयत्नांनी जनजागृती करून, एक सृजनशील समाज आणि देश निर्माण होण्यास मदत मिळेल. दिल्लीत १५ वर्ष पासून रिक्षा चालवणाऱ्या सतवीर यांची २०१२ मध्ये झालेल्या निर्भया प्रकाराने झोप उडवली. त्या नंतर त्यांनी निर्णय घेतला की समाजातील स्त्रियांसाठी आणि अपराधाला आळा घालण्यासाठी स्वतः प्रयत्न करून खारीचा वाटा उचलून समाजाला एक सकारात्मक संदेश द्यावा.


सतवीर यांचे मानणे आहे की सरकार आपल्या परीने प्रयत्नशील आहे, पण ह्या कृतींना जम बसविण्यासाठी भाषणं करणे पुरेसे नाही तर महिलां संदर्भातले नियम जास्तीत जास्त कडक करून अपराधकर्त्याच्या मनात भीती बसली पाहिजे, तसेच समाजात अजून जागरूकता मोहीम राबवली गेली पाहिजे.

सतवीर सिंह यांनी वर्षातले ५ दिवस, इंदिरा गांधी पुण्यतिथी, राखी पौर्णिमा, भाऊबीज, आणि १६ डिसेंबर या दिवशी महिलांना मोफत प्रवास सेवा देण्याचा निश्चय करून समाजाला एक संदेश देऊन जागरूकता निर्माण केली आहे.

सतवीर सांगतात की , "बऱ्याचवेळा त्यांच्या रिक्षात लाचार आणि निराधार असल्यामुळे वाम मार्गाला लागलेल्या स्त्रिया पण प्रवास करतात. अशा स्त्रियांना निश्चित दिशा दाखून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सतवीर स्वतः अशा स्त्रियांना समजावण्याच्या प्रयत्नात असतात. सतविर यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना वाटते की त्यांच्या मुलांनी उच्चशिक्षण घेऊन समाजातल्या या कुप्रथेच्या विरोधात भविष्यात लढा द्यावा.


महिलांसाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी सुरवात ही आपल्या घरातल्या स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊन, भेदभाव न करता केली पाहिजे.

पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला सक्षम करून मानाचे स्थान देण्यासाठी समाजाने एकजूट झाले पाहिजे. अपराध्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. भक्कम स्त्री ही समाजाचा पाया आहे. ती एक जननी, एक गुरु आहे. प्रगतीपथाच्या भविष्यातल्या वाटचाली साठी स्त्री सन्मान गरजेचा आहे.


लेखक : आशुतोष खंतवाल

अनुवाद : किरण ठाकरे