अहमदाबादचे ५४ वर्षीय शहा दंपती गरीबांना मोफत वाटतात हजारो टन भाजीपाला!

0

या देशात गरीबांची कमी नाही तशी त्या गरिबांच्या व्यथा स्वत: जाणून दूर करण्यासाठी स्वत:चे सारे काही झोकून देणारे दाते देखील काही कमी नाहीत. ‘जगात माणुसकी राहिली नाही’ असे म्हणतात, पण काही लोक असेही आहेत जे ती टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. देशात गरीबी आहे, गरीबांसाठी काहीतरी करायला हवे असे सगळेच म्हणतात पण फार थोडे जण त्यांची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. अशाच थोडक्या लोकांमध्ये समावेश होतो अहमदाबादचे मोहित शहा यांचा.

गेल्या अनेक वर्षांपासून अहमदाबादच्या रस्त्यावर रोज गरीबांसाठी मोफत भाजीपाला आणि फळे वाटप करतात. ५४ वर्षांचे शहा आपली पत्नी आणि दोन मुलांच्या मदतीने हजारो टन भाजी गरिबांना वाटतात. समाज माध्यमांवर त्यांचा एक फोटोही व्हायरल झाला आहे. शहा म्हणाले की, ही कल्पना त्यांना आपल्या पत्नीपासून मिळाली. दररोज शेकडो गरीब लोक पैसे नसल्यामुळे पोषक आहारापासून वंचित राहतात. म्हणून त्यांना सकस आहार मिळावा यासाठी शहा कुटुंब गरिबांना मोफत भाजी आणि फळे पुरवतात. रोज सकाळी आपल्या गाडीवर वेगवेगळ्या भाज्या लादून ते नवरंगपूरच्या रस्त्यावर भाज्यांचे वाटप करतात. सुरूवातीला आठवड्याला फक्त २०० किलो भाज्यांचे वाटप ते करायचे. आज दर आठवड्याला १५०० किलो भाज्यांचे वाटप ते करतात. मोहित शहांची सिमेंटची कंपनी आहे. आपल्या नफ्यातील काही हिस्सा ते अशा प्रकाराचे गरिबांसाठी खर्च करतात. यासाठी काम करताना त्यांना वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते असे ते सांगतात रोज काही किलो भाज्या खरेदी करायच्या आणि त्या गरजूंना वाटून टाकायच्या असा शहा दंपतीचा परिपाठ अनेक वर्षे सुरु आहे त्यामुळे सध्या ते समाज माध्यमातून प्रसिध्दी मिळवताना दिसत आहेत.