ओल्या कच-याच्या समस्येसाठी: जयंत जोशी यांची पर्यावरण स्नेही कचरा खाणारी बास्केट!

ओल्या कच-याच्या समस्येसाठी: जयंत जोशी यांची पर्यावरण स्नेही कचरा खाणारी बास्केट!

Sunday September 10, 2017,

4 min Read

वाढत्या नागरीकरणाच्या आजच्या काळात शहरे आणि महानगरे लोकसंख्येने फुगताना दिसत आहेत, त्याच सोबत पायाभूत सोयी सुविधांच्या बाबतीत मात्र आनंदी आनंदच दिसतो आहे. अगदी मुंबै पुण्यासारख्या शहरातून रोज निर्माण होणा-या हजारो टन ओल्या आणि सुक्या कच-याचे काय करावे या प्रश्नावर केवळ हजारो कोटींच्या योजना हा उपाय असल्याच्या गैरसमजातून आपण अजून बाहेर पडलो नाही, जर हे असेच सुरू राहिले तर येत्या वीस पंचवीस वर्षात येणा-या काळात पर्यावरणाच्या गंभीर परिणामांचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. मात्र हे वेळीच टाळता देखील येईल कसे? जयंत जोशी यांच्या सारखे द्रष्टे लोक आपल्यासोबत आहेत आणि अगदी सहाशे रूपयांत कचरा खाणारी बास्केट ते देतात त्यांच्या या प्रयोगातून तुमच्या घरातून कचरा बाहेर फेकण्याचे कामच बंद होते. त्यामुळेच तर तुम्ही पर्यावरणाच्या हानीपासून त:ला आणि या देशाला वाचविण्याचे केवढे मोठे देश कार्य कराल याची कल्पना केलेली बरी. घरच्या घरी कंपोस्ट तयार करा ही स्वच्छ भारत मिशनची जाहिरात आपण ऐकत असतो, त्यालाच पूरक हा प्रयोग म्हणता येईल. नुसत्या घोषणा आणि जाहिराती देवून ते होणार नाही. काय आहे ही सोपी संकल्पना आणि त्याचे फायदे हे जाणून घेण्यासाठी युवर स्टोरी मराठी ने जयंत जोशी यांच्याशी संपर्क केला ते म्हणाले की, “ठाणे येथे ग्लॅस्को कंपनीत अनेक वर्ष सुक्ष्मजीवशास्त्र या विषयाचे तज्ज्ञ म्हणून काम केले, मुळात कच-याची विल्हेवाट हा जैवशास्त्रीय विषय आहे” असे त्यांनी सांगितले. त्यामुळेच महापालिकांच्या रसायनशास्त्रात पारंगत अधिका-यांना या प्रश्नाचे नेमके समाधान शोधता आले नसल्याचा दावा देखील त्यांनी केला. कच-याच्या गंभीर समस्येवर आपण बारा वर्षापासून काम करत असताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या असा ध्यास घेतल्याचे जोशी सांगतात. ते म्हणाले की, “सन दोन हजार मध्ये कायदा करून प्रक्रिया न करता कचरा तसाच टाकण्यावर कायद्याने बंदी आली तरी आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कायद्याला गंभीरपणे घ्यायला हवे असे दुर्दैवाने झाले नाही.”


image


त्यामुळेच या बेफिकीरीचा वाईट परिणाम म्हणून देवनार सारख्या १६५फूट उंचीच्या उकीरड्यांची निर्मिती होत आहे असे परखड मत ते व्यक्त करतात. “दुर्दैवाने आपल्या कडे कचरा कुंडीत कचरा साठवून पालिकेच्या गाडीत टाकला की जबाबदारी संपली ही वृत्ती आहे त्यामुळे या समस्येला सामान्य नागरिक देखील तितकेच जबाबदार आहेत”, असे ते म्हणाले. हजारो टन कच-यापासून खत निर्मितीसाठी कोट्यावधीचे प्रकल्प बंद पडले कारण त्यात नेमक्या समस्येला हात घातला नाही असे निरिक्षण ते नोंदवितात. मग ओला आणि सुका कचरा वेगळा द्यावा अशी बंधने घातली तरी कुणी त्यावर फारसे लक्ष देत नाही यासाठी जाणिव जागृती करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. यावर उपाय म्हणजे कच-याचे विलगीकरण न करता विकेंद्रीकरण करणे. म्हणजे जागच्या जागी कच-याला संपवून टाकणे. मग त्यांनी या पर्यावरण स्नेही कचरा कुंडीची निर्मिती केली. केवळ सहाशे रुपये खर्च करून आपण कायमसाठी ओल्या कच-यापासून मुक्ती मिळवू शकता असे ते म्हणतात.


image


ते म्हणाले की, “प्लास्टिकच्या बास्केटमध्ये नायलॉन जाळी लावण्यात आली आहे, त्यात खास प्रकारचे बायो कल्चर जसे की दह्यासाठी विरजण असते तसे टाकण्यात आले आहे, त्यात आपण आपल्या घरात रोज तयार होणारा ओला कचरा जसे की, शिळे अन्न, फळे, भाज्या यांच्या साली किंवा काड्या बारीक करून टाकाव्या, पाच ते सात दिवसांत प्रक्रिया पूर्ण होते आणि दोन ते तीन किलो सेंद्रीय खत तयार होते. ज्याचा उपयोग आपण कुंडीत करू शकतो किंवा त्याला बाहेर विकता देखील येते.”

“ही प्रक्रिया करताना कोणतीही दुर्गंधी येत नाही, पाणी सुटत नाही किंवा अळ्या, गांडूळे यात होत नाही. त्यामुळे ही स्वयंपाक घरात ठेवायची पर्यावरणस्नेही कचरा खाणारी बास्केट आहे” असे जोशी म्हणाले. ते म्हणाले की, “यासाठी रोज तुम्हाला फार वेळही द्यावा लागत नाही दिवसांतून केवळ चार मिनीटे हा कचरा एकदा ढवळावा लागतो बस”.


image


मुंबई पुण्यात या बास्केटला सध्या चांगली मागणी आहे, त्यातून घन आनि द्रव कचरा वेगळा करून देण्याच्या रोजच्या प्रश्नाचे नेमके सोपे उत्तर मिळाले आहे. या सा-या प्रयोगाचे वैशिष्ट्य असे की ही बास्केट घेतल्यावर दोन महिने वापरल्यानंतर जर कुणाला वाटले की तिचा काही उपयोग नाही तर त्यांना ती परत देवून सहाशे रूपये परत देण्याची हमी सुध्दा जोशी देतात! ते म्हणतात की अशा प्रकारच्या हमीमुळे तरी लोक या कच-याच्या समस्येवर गंभीरपणे कृती करायला सरसावतील आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि आश्चर्य म्हणजे कुणी नंतर कचराकुंडी परत करत नाहीत.

सध्याच्या राजकीय नेत्याना मात्र या समस्येचे गांभिर्यच समजले नाही याची खंत जोशी व्यक्त करतात, मात्र अगदी चांगल्या सुजाण नागरीकांच्या समाजात या पर्यावरण स्नेही कचरा कुंड्या सध्या कार्यरत झाल्या आहेत याचे त्यांना समाधान आहे. जयंत जोशी यांच्या या कचराकुंड्याच्या मागणीसाठी संपर्क करायचा असेल तर त्यांच्या ९९६९६३४१८२ या भ्रमणध्वनीवर संपर्क करता येतो. युवर स्टोरी मराठीच्या वतीने यासाठी सर्वाना शुभेच्छा या सारेजण स्वच्छ पर्यावरणाच्या या उपक्रमात सहभागी होवू या!