स्टार्टअप इंडिया मोहिमेने प्रेरीत बालउद्योजक बंधूंकडून पायाभरणी स्मार्टअप इंडियाची...

0

तुम्ही कधी अशा एखाद्या कंपनीबद्दल ऐकले आहे का, की जिचा सीईओ अवघ्या दहा वर्षांचा आहे तर सीटीओचे वय आहे केवळ बारा? काहीसा आश्चर्यकारक प्रश्न आहे ना? पण अशी एक कंपनी खरोखरच आहे... केरळमध्ये जन्मलेल्या अभिजीत प्रेमजी (१०) आणि अमरजीत प्रेमजी (१२) या दोन भावांनी हे खरे करुन दाखविले आहे आणि एवढ्या कोवळ्या वयातच उद्योग जगतातील आपल्या प्रवासाला सुरुवातही केली आहे. विशेष म्हणजे या जोडगोळीची राष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली असून त्यांना दिल्ली येथे झालेल्या स्टार्टअप इंडिया कार्यक्रमासाठी खास आमंत्रितही केले गेले होते.

जाणून घेऊ या त्यांची रंजक कहाणी...

या प्रवासाला सुरुवात झाली ती २०१५ मध्ये, जेंव्हा या दोन भावांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्टार्टअप इंडियाविषयी बोलताना ऐकले. त्याबाबत उत्सुकता वाटल्याने, या मुलांनी त्यांचे वडील प्रेमजीत प्रभाकरन यांना ‘स्टार्टअप’ चा अर्थ विचारला. त्यावर उत्तर देताना वडिलांनी सांगितले, “ की एक अशी कल्पना जिचे रुपांतर व्यावसायिक संधीत करता येऊ शकेल आणि जी गुंतवणूकदारांसमोर मांडता येईल, जेणेकरुन ते त्यांचे पैसे त्यामध्ये गुंतवतील.”

त्यानंतर स्वतःची व्यवसाय योजना घेऊन येण्यास या मुलांना मुळीच वेळ लागला नाही – ही योजना होती खेळण्यांसाठी स्टार्टअप... याबाबत त्यांनी जेंव्हा त्यांच्या पालकांना सांगितले तेंव्हा ते सहाजिकच आश्चर्यचकीत झाले आणि त्यातूनच पुढे पायाभरणी झाली इंडियन होममेड टॉईज (आयएचटी) (Indian Homemade Toys) ची... हो, त्यांनी प्रामुख्याने आग्रह धरला की ते चीनी खेळणी विकणार नाहीत तर केवळ भारतात बनलेली खेळणीच विकतील.

२०२२ पर्यंत भारतातील ४०० मिलियन भारतीय तरुणांना – ज्यापैकी अर्धे शालेय विद्यार्थी असतील – विविध कौशल्यांनी सज्ज करणे आणि हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून सुरु केलेले विविध उपक्रम जसे की मेक इन इंडीया, डिजिटल इंडीया, ग्लोबल इंडीया, क्लिन इंडीया, स्कील इंडीया, ड्रीम इंडीया आणि डिजाईन इंडीया यांना एका छत्रीखाली आणून स्मार्टअप इंडियाच्या मार्गावर जाण्याचे, भारत सरकारचे स्वप्न मनात ठेवूनच ही कंपनी काम करत आहे.

या बाल उद्योजकांच्या या स्वप्नाला त्यांच्या पालकांनी खंबीर पाठींबा दिला. प्रेमजीत यांच्या म्हणण्यानुसार भारतात खेळण्यांची प्रचंड प्रमाणात आयात होते – सुमारे दोन बिलियन डॉलर्स फॉरेक्स यावर खर्च होतो. यापैकी प्रामुख्याने आयात होणारी खेळणी ही चीनी असतात आणि बऱ्याचदा मुलांसाठी घातकही असतात. ही आयात कमी करण्यासाठी आयएचटी नक्कीच मदत करेल, असा विश्वास प्रेमजीत यांना वाटतो. प्रेमजीत हे मेकॅनिकल अभियंता असून डीजिटल इंडिया मोहिमेमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना गौरवले आहे. प्रत्येक मुलाकडे काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची क्षमता असते आणि आजचे खेळणी निर्माते हे उद्याचे तंत्रज्ञान निर्माते असतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.

त्यांच्या मुलांनी आयुष्यातील पहिले खेळणे बनविले, त्या घटनेबाबत प्रेमजीत आवर्जुन बोलतात. “ दोन वर्षांपूर्वी अमरजीतने त्याचे मोडलेले खेळण्यातील विमान दुरुस्त करण्यासाठी मोटरचा वापर केला. अवघ्या दहा वर्षांच्या मुलाला मोटरचे खेळणे तयार करताना पाहून मी अतिशय आनंदित झालो,” ते अभिमानाने सांगतात.

सीईओ अभिजीतच्या मते आयएचटी हे केवळ ऑनलाईन स्टोअर नाही, तर मुलांसाठी सर्जनशीलतेचा एक स्त्रोतही आहे. तर अमरजीतच्या मते त्यांची कंपनी ही स्टार्टअप नाही तर स्मार्टअप आहे, कारण मुलांना संशोधक होण्यासाठी प्रोत्साहन देणे हे त्यांचे ध्येय आहे.

याबाबत सविस्तरपणे बोलताना प्रेमजीत सांगतात, मुलांना अशा प्रकारे नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यास प्रोत्साहन देणे ही या संकेतस्थळामागची खरी कल्पना आहे. सध्या तरी त्यांनी हा प्लॅटफॉर्म खेळण्यांच्या विक्रीसाठी खुला केलेला नाही. मात्र, याबाबत सातत्याने होत असलेल्या वाढत्या वितरणांनंतर, ते कदाचित याद्वारे खेळण्यांची विक्री करण्याबाबत विचार करुही शकतील.

त्यांच्या मते आयएचटी प्लॅस्टीक व्हील्स, इलेक्ट्रॉनिक सर्कीटस्, गिअर बॉक्सेस आणि कनेक्टर्स यांसारखे खेळण्यांचे घटक बनविण्याकडे एक व्यावसायिक संधी म्हणून पहाते आणि त्याचबरोबर मुलांसाठी आणि पर्यावरणासाठी सुयोग्य खेळणी बनविणाऱ्या सुमारे १००० स्टार्टअप्सचे उत्पादन क्लस्टर बनविण्याचीही त्यांची कल्पना आहे.

शैक्षणिक संस्थाही या प्रयासात मदत करु शकतात, असा अमरजीतला विश्वास आहे तर शाळेमध्ये इतर उपक्रमांमध्ये खेळणी-बनविणे या उपक्रमाचाही समावेश केला जाईल, अशी त्याच्या भावाला आशा आहे. तो पुढे असेही सांगतो, की जर खेळणी बनविण्याची कला शाळेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच शिकवली गेली, तर रोबोटीक्सचा वापर करुन विद्यार्थी आश्चर्यकारक तंत्रज्ञानाची निर्मिती करतील. तसेच आपल्या शाळेने आपल्या तंत्रज्ञान केंद्रीत दृष्टीकोनाला खूपच प्रोत्साहन दिल्याचेही तो आवर्जून सांगतो. त्याचबरोबर यातून मिळणाऱ्या नफ्याचा काही भाग आपल्या देशातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची प्रेमजीत आणि त्यांच्या मुलांची इच्छा आहे.

यासारख्या आणखी नाविन्यपूर्ण कथा वाचण्यासाठी  खालील लिंकवर क्लिक करा. आमच्या YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या.

‘वाय सेंटर’: भारतीय उद्योजक तरूणाच्या ‘धैर्य’ आणि परिश्रमाचे फळ.

गुगल गुरूचा ग्रेट प्रवास...

‘गाना.कॉम’चा स्पर्धक... ‘फ्लॅट.टू’चा पहिला सहकारी

लेखक – तौसिफ आलम

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन