एकट्यानेच सुरुवात करून शिक्षणाचे सखोल ज्ञान वाटण्याच्या प्रयत्नात ‘विद्या’!

0

“आम्हाला एकट्यानेच सुरु करावे लागते. आम्हाला माहित आहे की, पैशांची व्यवस्था करणे खूपच मोठी समस्या आहे. मात्र भारताच्या झोपडपट्टी भागात एक व्यावसायिक म्हणून काम करणे सर्वात अशक्य काम आहे.

वर्ष १९८५मध्ये एकदा जेव्हा रश्मी मिश्रा यांना आयआयटीच्या आवारातील टोकावर पाच मुली चिखलात खेळताना दिसल्या, तेव्हा त्या भारतीय शिक्षण पद्धतीत व्याप्त अंतर पाहून स्तब्ध राहिल्या. भारताच्या सर्वात प्रसिद्ध मानल्या जाणा-या शिक्षण संस्थेच्या अगदी बाजूलाच राहणा-या त्या मुलींकडे साधे शिक्षण घेण्याची कोणती संधी देखील नव्हती. रश्मी यांनी त्याचवेळी आयुष्यातील असा निर्णय घेतला, जो मुलांमध्ये बदल आणू शकेल आणि त्यांच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे उघडेल. रश्मी यांच्या या लहानशा उचललेल्या पावलाने स्वतःचाच विस्तार करत आतापर्यंत दिल्ली, मुंबई आणि बंगळूरूची जवळपास दोन लाख मुले, तरुण आणि महिलांच्या आयुष्याला थोडा दिलासा मिळाला आहे.

दिल्ली विद्यापीठातील के लेडी श्रीराम महाविद्यालयाच्या पदवीधर, नृत्याच्या शौकीन, दोन मुलांची आई आणि एकाच्या आजी रश्मी मिश्रा यांना तरुणांच्या आणि प्रौढांच्या एकात्मिक विकासासाठी स्थापित ‘विद्या’ नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या संस्थापक आणि अध्यक्ष म्हणून अधिक ओळखले जाते. पाच मुलांच्या सोबतीने याची सुरुवात करणा-या रश्मी यांनी नंतर काही स्वयंसेवकांच्या मदतीने स्थानिक झोपडपट्टीच्या मुलांसाठी अनौपचारिक वर्ग सुरु केले आणि नंतर वर्ष २०१० मध्ये ‘विद्या’ची पहिली शाळा उघडली. दिल्लीच्या जवळच गुडगाव मध्ये ५एकर क्षेत्रात विस्तारलेल्या या शाळेत १००० विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी व्यवस्था करण्यात आली आहे आणि ते कमीतकमी खर्चात गरीब आणि वंचित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करत आहेत.

परिवर्तनात ‘विद्या’ ची सक्रीय भागीदारी

२८वर्षाच्या आपल्या अस्तित्वात ‘विद्या’ ही स्वयंसेवी संस्था विभिन्न कार्यक्रमामार्फत अल्पसुविधा प्राप्त मुलांना शिक्षित आणि समर्थ बनविण्याच्या दिशेने प्रयत्न करत राहिली आहे. हे कार्यक्रम मुख्यरित्या शिक्षणाशी संबंधित असतात, मात्र शिक्षणापर्यंतच सिमीत नसून मुलांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी पुढे जाऊन आयुष्यात आपली कारकीर्द निवडण्यासाठी संधी देखील देतात. ‘विद्या’ ही स्वयंसेवी संस्था इंग्रजी आणि संगणकाद्वारे मुलभूत साक्षरता कार्यक्रम आणि दक्षता प्रशिक्षण कार्यक्रम चालवत महिलांच्या स्वास्थ्य, महिला अधिकार, पर्यावरण इत्यादी विषयांसोबत संलग्न करण्यावर जोर देतात आणि सोबतच प्रौढांच्या साक्षरतेसंबंधी कार्यक्रम देखील चालवितात. स्वयंसेवी संस्थेमार्फत सुरु करण्यात आलेल्या युवा व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत शिक्षण अर्धवट सोडलेल्या तरुणांसाठी संगणकीय ज्ञान, इंग्रजी बोलणे आणि जीवन कौशल्यावर आधारित विशेष वर्गाचे आयोजन देखील करण्यात येते. ज्या मुलांना ८वी,१०वी आणि १२वी ची परीक्षा द्यायची आहे, त्या मुलांची देखील मदत केली जाते.

महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यात त्यांची मदत करून ‘विद्या’ ही संस्था त्यांना समर्थ तर बनवते, सोबतच गरजू महिलांना कुशल प्रशिक्षण, अल्पपतपुरवठा आणि सुक्ष्मकर्ज या सुविधा देऊन याप्रकारे प्रशिक्षण देतात, जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. ही स्वयंसेवी संस्था सामाजिक उद्योगाला प्रोत्साहन देताना त्यांना आपल्या हस्तकला बनविण्याचे प्रशिक्षण देखील देतात आणि त्यांच्यामार्फत तयार वस्तूंच्या विक्रीची व्यवस्था देखील करतात. त्या मुंबईत एक उपहारगृह देखील चालवतात आणि किरकोळ आणि कंपन्यांच्या कर्मचा-यांसाठी जेवणाची व्यवस्था करतात.

रश्मी यांची जीवन-कथा

जेव्हा रश्मी यांना जाणवले की, मुलांना शिक्षणाची आवड तर आहे, मात्र त्यांना शिक्षणाच्या संधी आणि साधने उपलब्ध होऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांनी ऑस्ट्रियन दूतावासाची आपली चांगली नोकरी सोडली आणि विद्यादानला आपले लक्ष्य बनवून ‘विद्या’ या स्वयंसेवी संस्थेची सुरुवात केली. त्या झोपडपट्टी भागात गेल्या आणि तेथे राहणा-या मुलांना शोधून आपल्या प्रकल्पात सामील केले आणि त्यांना शिक्षित करण्याचे काम केले. आपल्या प्रवासात त्या समान विचारांचे लोक आणि स्वयंसेवकांना स्वतःसोबत सामील करण्यात यशस्वी झाल्या आणि आज त्यांच्या संस्थेत ३५० पेक्षा अधिक नियमित कर्मचारी आहेत आणि ५००० पेक्षा अधिक स्वयंसेवक देखील आहेत.

‘विद्या’ आणि समाजसेवेच्या या प्रवासाच्या विषयात नामु किणी यांच्यासोबत झालेल्या संवादात त्यांनी सांगितले की, “पैसे जमविणे सर्वात मोठे आव्हान होते. सुरुवातीस जेव्हा लोक नकार द्यायचे, तेव्हा मला खूप लाजल्यासारखे वाटायचे. कुणाकडून पैसे मागणेदेखील एक कला आहे. अखेर तुम्ही स्वतःसाठी मागत नसता, दुस-यांसाठी मागता.” त्या मदर तेरेसा यांची कहाणी सांगताना सांगतात की, कशा त्या चेन्नईच्या एका श्रीमंत व्यावसायिकाकडे गेल्या आणि एक तास त्यांच्या येण्याची त्यांनी वाट पाहिली आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांच्यावर थुंकले. मात्र, हिम्मत न हारता त्यांनी व्यावसायिकाला सांगितले की, हे माझ्यासाठी होते, आता माझ्या मुलांसाठी देखील काहीतरी द्या. रश्मी त्यांच्यामुळे खूप प्रेरित झाल्या आणि जेव्हा ‘विद्या’साठी पैसे जमा करण्यात त्यांना समस्या आल्यावर त्या, याच कहाणीची आठवण काढतात.

‘विद्या’ या संस्थेच्या मदतीमुळे जीवनात यश प्राप्त करणा-या लोकांची कहाणी सांगताना त्यांना, खूपच गौरवान्वित झाल्यासारखे वाटते आणि याचे श्रेय त्या आपला गट आणि स्वयंसेवकांना देतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीची कहाणी सांगताना त्यांचे डोळे चमकतात आणि तेव्हा तुम्हाला माहित पडते की, त्या लोकांसोबत आणि ‘विद्या’ च्या कामात कुठल्या टोकापर्यंत सामील आहेत.

जेव्हा नीलम यांच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्यावर ३ मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी होती. ‘विद्या’च्या मदतीने त्यांनी शिक्षण घेतले, शिल्पकला शिकली आणि ३०००रुपयांच्या अल्प कर्जात स्वतःचा शिल्पकलेचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्या मुलांनी महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले आणि आज नीलम आपल्या लहानशा व्यवसायामार्फत ३००मुलींना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. त्याचा उद्देश भविष्यात अधिकाधिक महिलांना समर्थ बनविण्याचे आहे, ज्याने त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील.

काही वर्षापूर्वी हिमाचलप्रदेशातील किन्नौर जिल्ह्यातील एका गावातील एक मुलगा पाचव्या इयत्तेत शिकत होता, घरातून पळून त्यांच्याकडे आला आणि म्हणाला की, तुम्ही मला अभियंता बनवू शकाल का? मी पाचवी पास आहे.’ रश्मी त्या कहाणीची आठवण काढत सांगतात की, त्याचे नाव बद्र्सेन नेगी (भद्रसेन नेगी) आहे आणि अभियंता बनून आज तो लॉसएंजिलीसमध्ये नोकरी करत आहे. तो देखील ‘विद्या’ च्या मदतीने काहीसे दडपून, आजही ‘विद्या’च्या स्वप्नाला हृदयात सांभाळत या दिशेने सक्रीयरित्या प्रयत्नशील आहे की, किन्नौरच्या प्रत्येक मुलाने शिक्षण घ्यावे.

त्याचप्रकारे ‘विद्या’ने वत्सला यांच्या जीवनाची दिशा बदलण्यात सक्रीय भूमिका साकारली. एका क्षणी त्या दहा-दहा घरातील भांडी घासण्याचे काम करायच्या, मात्र ‘विद्या’च्या बंगळूरू केंद्राद्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या इंग्रजी शिक्षणामुळे आज त्या रुग्णालयात स्वागतिका आहेत. अजून एक मुलगी ममता, जी पोलीयोग्रस्त होती आणि आपल्या झोपडपट्टीत तिरस्काराच्या दृष्टीने पाहिली जात होती, ‘विद्या’च्या मदतीने शिक्षण घेण्यात यशस्वी झाली आणि तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला, जी आज केवळ आर्थिक रूपानेच आत्मनिर्भर झाली नाही तर, स्वतःचे सायबर कॅफे चालवत आहे. ही काहीच उदाहरणे आहेत, जी ‘विद्या’च्या यशाची गाथा सांगतात आणि त्यांची देखील, जी ‘विद्या’च्या मदतीने आपल्या आयुष्यात परिवर्तनाची सुरुवात करू शकतील. भारतात व्यापाराच्या स्थितीबाबत चर्चांना पूर्णविराम देत, रश्मी सांगतात की, “ आम्हाला एकट्यानेच सुरु करावे लागते. आम्हाला माहित आहे की, पैशांची व्यवस्था करणे खूपच मोठी समस्या आहे. मात्र भारताच्या झोपडपट्टीत एक व्यावसायिक म्हणून काम करणे सर्वात अशक्य काम आहे.”

लेखक: अजित हर्षे.

अनुवाद : किशोर आपटे.