या ६५वर्षीय ‘अम्मा’ ना भेटा; ज्या दिल्लीत कचरावेचक आहेत आणि चारशे भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात

0

दक्षिण दिल्लीतल्या साकेत भागात त्या एका टपरीवजा झोपड्यात राहतात आणि दिवसाला दोनशे रुपये कमावितात, त्यातील बहुतांश त्या आजुबाजूच्या कुत्र्यांवर खर्च करतात. ही कहाणी आहे ६५वर्षीय कचरावेचक प्रतिमादेवी यांची ज्या दररोज सुमारे चारशे भटक्या कुत्र्यांची काळजी घेतात.

तीस वर्षांपूर्वी दिल्लीत आल्यानंतर प्रतिमा यांनी कुक (स्वयंपाकी) म्हणून काही घरात काम सुरु केले. काही वर्षांतच त्यांनी पीव्हीआर अनुपम कॉम्प्लेक्स साकेत येथे सिगारेटचे दुकान सुरु केले, त्यावेळी त्यांनी आजुबाजूच्या कुत्र्यांची काळजी घेण्याची सुरुवात केली. ज्यावेळी त्यांचे दुकान पोलिस आणि दिल्ली महापालिका यानी तोडून टाकले, त्यांची वणवण सुरू झाली आणि उपासमार होवू लागल्यानंतर पैश्याची कमतरता असल्याने आसपासचा कचरा वेचून तो विकून पोट भरण्याची वेळ त्यांच्यावर आली. काही दिवसांतच त्यांनी काळजी घेतलेली कुत्री मोठी झाली होती, आणि त्या जवळपास चारशे कुत्र्यांची काळजी घेताना आणि भरवताना दिसू लागल्या.

भटक्या कुत्र्यांच्या तारणहार
भटक्या कुत्र्यांच्या तारणहार

बालवयातच लग्न झाल्याने प्रतिमा पश्चिम बंगाल मधील नंदीग्राम येथून नवी दिल्लीत आयुष्यात काहीतरी करण्याच्या हेतूने पळून आल्या. विचित्र माणसांच्या घरातून पळून आलेल्या आणि वैवाहिक जीवनाला मुकलेल्या प्रतिमा यांचा वेळ मग भटक्या कुत्र्यांच्या संगोपनात जावू लागला आणि माणसांपेक्षा जास्त लऴा त्यांनीच त्यांना लावला. अडचणीत असलेल्या मित्रांना मदत करणे त्यांच्या करिता काही कठीण नव्हते. अगदी पूर्वी त्यांच्या गावात देखील त्या काही भटक्या कुत्र्यांना खावू घालत आणि काळजी घेत असत. ही कुत्रीच त्यांचे कुटूंब झाले होते.


प्रतिमा कुत्र्यांच्या सा-या गरजा पूर्ण करण्याची काळजी घेत, त्यांना दिवसातून दोनदा खावू घालणे, सायंकाळी दूध देणे, त्यांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च करणे, अगदी लसीकरण आणि औषधोपचार देखील. आणिबाणीच्या वेळी प्रतिमा या कुत्र्यांना फ्रेंडीकोइज मध्ये नेतात, जी प्राणी रक्षक संस्था आहे. प्रतिमा यांना या संस्थेचा संपूर्ण पाठिंबा मिळतो. ब-याचदा त्या संस्थेत जातात जेंव्हा कुत्री जखमी होतात, आजारी पडतात, किंवा आरोग्याच्या काही समस्या असतात. फ्रेंडीकोइज प्रतिमा यांना कुत्र्याना लसीकरण आणि पोषक आहार मिळावा म्हणूनही मदत करते.


अनेकांची प्रेरणा

अम्माची कहाणी, भटक्या कुत्र्यांच्या तारणहार म्हणून सर्वदूर पसरली आहे. अनेक श्वानप्रेमी त्याना येवून भेटतात आणि मदत करतात. अम्मा त्यांच्याकडे येणा-यांना कुत्र्याची पिल्ले भेट म्हणून घेवून जाण्यास अनुमती देतात, त्यामुळे अनेक बेवारस भटक्या पिल्लांना नवे चांगले घर मिळाले आहे.


प्रतिमा यांच्या निस्वार्थ आणि भलेपणाच्या कामापासून प्रेरणा घेवून सुदेष्णा गुहा-राय, स्वतंत्र सिने निर्मात्या यांनी त्यांच्यावर लघुपट तयार करण्याचे ठरविले आहे. प्रतिमा त्यांना कशा भेटल्या याबद्दल सुदेष्णा सांगतात की, “ मी आणि माझ्या टीमने सामाजिक कहाणीच्या स्पर्धेत भाग घेतला होता, आणि अशाच एका विषयाच्या शोधात होतो त्यावेळी माझ्या आईने मला प्रतिमादेवी बद्दल सांगितले.” “ माझा चमू आणि मी आम्ही त्यांची भेट घेतली आणि पाहिले की त्या एकट्याने मोठ्या प्रेमाने सा-या कुत्र्यांची काळजी घेत होत्या. झोकून देवून आणि मनापासून. त्यांच्या व्यक्तिमत्वाने आम्ही इतके भारावून गेलो की त्यांच्यावरच लघुपट करण्याचा निर्णय घेतला”.

त्यांच्या कामापासून प्रेरणा घेत आम्ही या निर्धाराने निघालो की, अम्मा आणि त्यांच्या मुलांना मदत करायचीच. सुदेष्णा यांनी प्रतिमा यांची स्थिती सुधारावी यासाठी लोकवर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. “प्रतिमा दिवस-रात्र कठोर परिश्रम करतात. त्यांच्या जवळचा पैसा न पैसा त्या या भटक्या कुत्र्यांवर खर्च करतात. त्यांना जवळपास प्रत्येक सप्ताहात नवे पिलू सापडते. त्यामुळे मुलांची संख्या वाढत जाते आणि त्यांचा खर्च देखील”. सुदेष्णा म्हणाल्या.

लेखिका : हेमा वैष्णवी