गुरुकुल ते ऑनलाईन: शास्त्रीय संगीताचा प्रवास

गुरुकुल ते ऑनलाईन:  शास्त्रीय संगीताचा प्रवास

Friday December 04, 2015,

3 min Read

सकाळी अकरा वाजता कतारमधली मनिषा आणि मनस्वी, मग दुपारी दोन वाजता तिथलीच सानिया, संध्याकाळी पाच वाजता लंडनमधल्या मुक्ता आणि युषा शास्त्रीय संगीताचे ऑनलाइन धडे गिरवतात. गुरुकडून विविध राग, आरोह-अवरोह, आलापी शिकतात, अगदी त्यातील बारकाव्यांसकट. भारतातून त्यांच्यांपर्य़ंत हे सुरांचं ज्ञान पोहोचतं करते अरुणा गणपुले-शेवाळे. गेल्या तीन वर्षांपासून आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्काइपवरुन चालणारी ही ऑनलाईन संगीत शिकवणी परदेशातील भारतीय मुलांना आपल्या संगीताशी जोडून ठेवतेय. अरुणा गेली आठ वर्षे गाण्याचे क्लासेस चालवते. क्लासिकल, सेमी क्लासिकल आणि लाईट म्युझिकच्या माध्यमातून जवळपास 125 विद्यार्थी अरुणा टिचरकडे गाणं शिकताहेत किंवा शिकून गेलेत. एकाच कुटुंबातील आई आणि मुलगी माझ्याकडे गाणं शिकायला येत होत्या. त्यांचं कतारला जाण्याचं ठरलं आणि आता आपलं गाणं सुटणार या विचारानं आम्हा सगळ्यांनाचं वाईट वाटलं. त्या तिथे गेल्यावर काही काळ आम्ही फोनवरुन शिकवणी घेतली. मग व्हिडिओ कॉलिंग असे प्रयोग करता करता मग स्काइपपर्यंत येऊन पोहोचलो. सुरवातीला इंटरनेट कनेक्शन मध्येच तुटायचं...गाणं शिकायचं असल्यानं आवाजाची क्वालिटी चांगली असणं गरजेचं होतं. मग वायफाय कनेक्शन जोडून घेतलं. त्यामुऴे आता आवाज चांगला येतो, आवाजात डिले नसतो. हेडफोन्स लावले की आवाजातले बारकावेही कळतात. मी जेव्हा इथे गाणं शिकवते तेव्हा साथीला पेटी किंवा तानपुरा असतो. पण ऑनलाईन शिकवताना मी इथे वाजवून पलिकडच्या विद्यार्थ्याला ऐंकू जाईपर्यंत गाणं पुढे निघून जातं. त्यामुळे ऑनलाईन शिकताना तिथल्या विद्यार्थ्यांना पेटी किंवा कि बोर्डचं बेसिक ज्ञान अरणं गरजेचं आहे. सुरवातीला कि बोर्डवर ‘सारेगम’चे स्टिकर्स लावले. आवाजाची पट्टी ठरवून घेतली. असं करत करत शिकवणी सुरु राहिली. अरुणा सध्या कतार, दुबई आणि लंडनमधल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन संगीत शिकवतेय. अर्थात समोरासमोर बसून शिकण्याची सर ऑनलाईन शिकवणीला नाही. काही बारकावे सुटू शकतात, त्यासाठी खूप लक्ष देऊन शिकावावं लागतं. परदेशी गेल्यामुळे, तिथे सोयी नसल्यामुळे ज्यांचं गाणं बंद पडलं होतं त्यांच्यासाठी हे खूपच आनंदाचं आणि सोयीचं आहे.

image


आजची मुलं खूप व्यस्त असतात. शाळेव्यतिरिक्त त्यांना खूप व्याप असतात. गाण्याचा क्लास तर आठवड्यातून एकदाचं असतो, ऑनलाईन शिकवणीही आठवड्यातून एकदाचं असते. म्हणून मग आठवडाभर त्यांना पुरेल असा अभ्यास द्यावा लागतो. एखाद्या रागातील सरगम गीत, आलाप मी स्वतः गाऊन, रेकॉर्ड करुन ते विद्यार्थ्यांना व्हॉटस् ऍप करते. म्हणजे मग त्यांनाही प्रॅक्टिस करता येते. आपलं कुठं चुकतयं ते त्यांना कळतं. राग आणि त्याच्यावर आधारलेली गाणी तुम्हाला यु ट्यूबवर ऐंकता येतात पण बंदीशी या प्रत्येक गुरुच्या वेगवेगळ्या असतात. गुरु स्वतः बंदीशी बांधत असतो. त्यामुळे गाणं शिकणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांसाठी गुरुकडून मिळणाऱ्या बंदीशीचं मोल अधिक असतं. व्हॉटस् ऍपवरुन पाठवलेल्या सगळ्या ऑडियो क्लीपस् माझे विद्यार्थी कधीही ऐंकू शकतात. त्यामुळे गाणं सुधारण्यासाठी त्यांना मदत होते. हेच विद्यार्थी जेव्हा सुट्टीसाठी भारतात येतात तेव्हा त्यांच्याकडून गाण्याच्या परीक्षेसाठी तयारी करुन घेता येते, कतारमधली मुलं साधारणतः ऑगस्टमध्ये भारतात येतात. त्यांची तबलजी आणि इतर वाद्यांबरोबर प्रॅक्टीस होते, त्याचा नक्कीच फायदा मुलांना होतो.

परदेशात शिकणाऱ्या मुलांचं, त्यांच्या पालकांचं सोशल सर्कल चांगलं असेल तर तिथेही दिवाळी, दसऱ्याला गाण्याच्या मैफिली होतात. अशा कार्यक्रमात मुलांना गाण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. अनेक मुलांचे पालक सजग असतात. मुलांच्या प्रगतीकडे त्यांचं लक्ष असतं. पालकांच्या मदतीनं ही मुलं खूप चांगली प्रगती करतात. आजची मुलं खूप हुशार आहेत. शिवाय गाणं आपल्याला अनेक गोष्टी शिकवतं. वागावं-बोलावं कसं, चांगले विचार आणि आचार तुमचं गाणंही समृद्ध करतात. आताच्या मुलांना एक्पोजर जास्त मिळतं. त्यामुळे शिक्षक म्हणून माझी जबाबदारी अधिक आहे. माझ्या गुरु श्रीमती मधुरिका जोशी, ज्यांच्याकडे मी गायकी शिकले त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी होती. त्यांनी कधीचं वहीत नोटेशन्स लिहून दिली नाहीत. त्यांनी शिकवलेलं सगळं मनात भरुन आणि डोक्यात साठवून मी घरी परत येताना बसच्या तिकीटावर नोटेशन्स लिहायचे. पण आता या मुलांना नोटेशन्स मिळतात. शिकण्याची पद्धत सोपी झालीय. पण मेहनत मात्र तेव्हाही होती आणि आजही आहे. गाणं ही केवळ कला नाही. तर माणूस म्हणून तुमच्या जाणीवा समृद्ध करणारं आणि आत्मभान देणारं सात सुरांचं तेजोवलय आहे. तुम्ही जगात कुठेही रहा, तुम्ही गाणं शिकणं सोडलत तरीही गाणं मात्र तुम्हाला कधीच सोडत नाही. आयुष्यभर ते तुमच्यासोबत असतं.

image