प्रयत्नांपुढे आकाश ठेंगणे...

वेंकट मरोजू : तेलंगणातल्या गावापासून ते मल्टीनॅशनल कंपनीपर्यंतचा अद्भुत प्रवास

0

अपुरी संपर्क यंत्रणा आणि दळणवळणाच्या साधनांची कमतरता ही कोणत्याही दुर्गम भागातील मोठी समस्या असते. मात्र ‘सोर्सट्रेस’ची ‘ई सर्विस एव्हरीव्हेअर’ अर्थात ‘ईएसई’ ही सेवा साध्या मोबाईल तंत्रज्ञानाच्या मदतीने या अशा दुर्गम भागांपर्यंत अगदी सहज पोहोचते. शेती, अर्थविषयक सेवा आणि त्याची बाजारपेठ याची इत्थंभूत माहिती ‘ईएसई’द्वारे दिली जाते. अगदी दूरवरच्या भागातही. यासाठी अल्पभूधारक आणि लहान शेतक-यांसोबत काम करणा-या सहकारी संस्था, एनजीओ अर्थात स्वयंसेवी संस्था आणि काही सरकारी एजन्सीची मदत घेतली जाते.

वेंकट मरोजू..एक अद्भुत प्रवास
वेंकट मरोजू..एक अद्भुत प्रवास

आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका अशा तीन खंडांत ‘सोर्सट्रेस’ सध्या कार्यरत आहे. या खंडांमधल्या भारत, अमेरिका, कोस्टा रिका आणि बांग्लादेश या देशांमध्ये कंपनीची कार्यालयं आहेत. आणि इथे कुशल तंत्रज्ञ आणि शेती क्षेत्रातील जाणकार मिळून शेतीच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं प्रत्यक्षात उतरवण्याचं काम करत असतात. अविरतपणे. “आजच्या मोबाईल अॅप्लीकेशनच्या जमान्यात या तंत्रज्ञानाचं सखोल ज्ञान असलेलं कुशल मनुष्यबळ आमच्याकडे आहे. ज्याची सुरुवात तुमचे अॅपल आणि अँड्रॉईड फोन बाजारात येण्याच्या खूप पूर्वीच झाली होती”, कंपनीचे सीईओ अर्थात मुख्य कार्याधिकारी वेंकट मरोजू सांगतात.

शेतक-यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करायचाय
शेतक-यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करायचाय

पण कंपनीचं हे यश काही एका रात्रीत झालेली किमया नव्हती. अगदी एक एक पाऊल टाकत कंपनीचा हा यशस्वी प्रवास इथवर येऊन पोहोचलाय. अगदी कंपनीच्या सीईओंप्रमाणेच. जणूकाही त्यांच्याच प्रत्येक पावलासोबत कंपनीचंही यशाकडे मार्गक्रमण सुरु होतं.

‘सोर्सट्रेस’ कंपनीची स्थापना एमआयटी आणि बार्कले विद्यापीठाच्या काही माजी विद्यार्थ्यांनी केली होती. पण वेंकट मरोजू जेव्हा कंपनीत रुजू झाले, तेव्हा मात्र कंपनीची परिस्थिती काही फारशी चांगली नव्हती. “लाखो डॉलर्स आणि तब्बल पाच वर्ष खर्ची घातल्यानंतरही कंपनीच्या प्रगतीचा आलेख कमकुवतच राहिला होता. तेव्हा कंपनीत सर्वाधिक गुंतवणूक असणा-या ‘ग्रे घोस्ट व्हेन्चर्स’ कंपनीने माझ्याकडे सल्ला मागितला. अर्थात, मी या कंपनीचा सल्लागार म्हणून काम करत होतो म्हणून. अर्थविषयक अनेक सेवांपेक्षा शेतीविषयक सेवांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला मी त्यांना दिला. त्यांना माझा सल्ला मनापासून आवडला आणि त्यांनी माझ्यासमोर कंपनीच्या सीईओपदाचा प्रस्ताव ठेवला.” जवळपास अडीच वर्ष कंपनीच्या प्रमुखदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळणारे वेंकट मरोजू भरभरून सांगत होते.

अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर

पण वेंकट मरोजूंना मिळालेली संधी फक्त नशीबानेच मिळत नाही. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात तेलंगणातल्या ग्रामीण भागात मरोजूंचं बालपण गेलं. “त्या दिवसांमध्ये जेव्हा गावात जोरदार पाऊस व्हायचा, तेव्हा शाळेला सुट्टी दिली जायची.”, मरोजू बोलत होते, “माझं शिक्षण गावातल्या अशा सरकारी शाळेत झालं आणि अगदी १२ वीपर्यंत मी तेलगुतूनच शिकलो. त्यामुळेच जेव्हा राज्यस्तरीय प्रवेश परिक्षेतून उत्तीर्ण होऊन मला ओस्मानिया युनिव्हर्सिटी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, तेव्हा माझा स्वत:वरच विश्वास बसत नव्हता. थोडंफार नशीब आणि नेहमीच पाळलेल्या सकारात्मक दृष्टीकोणामुळे असेल कदाचित; पण मला अॅडमिशन मिळालं होतं.”

“अॅडमिशन मिळाल्यानंतर तर माझ्या गावामध्ये मला एखाद्या सिनेमातल्या हिरो किंवा बड्या नेत्याप्रमाणेच वागणूक मिळत होती. पण ज्या क्षणी मी विद्यापीठात पाय ठेवला, अगदी त्याच क्षणी मला याची जाणीव झाली की गावात जरी मी एखादा सेलिब्रिटी ठरलो असलो, तरी तिथे मात्र मी कुणीही नव्हतो. कारण माझ्या तीन अडचणी होत्या. एक, मी गावाकडून आलो होतो. दोन, माझं इंग्रजी कच्चं होतं. खरं सांगायचं तर कॉलेजात गेलो तेव्हा मला एक पूर्ण वाक्यसुद्धा इंग्रजीतून बोलता येत नव्हतं. आणि तिसरी अडचण म्हणजे मी रिझर्वेशन कोट्यातला विद्यार्थी होतो.

सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये आपण आपली डिग्री तरी पूर्ण करू शकू का याबद्दलच वेंकट मरोजूंना शंका होती. “एक चांगली सरकारी नोकरी मिळवण्याचं माझं ध्येय होतं, पण त्या क्षणी तरी मला स्वत:कडून कोणतीच आशा नव्हती.” मरोजू सांगत होते. पण मरोजूंच्या तल्लख बुद्धीनं त्यांच्या मनात उभ्या राहिलेल्या शंकेचं लवकरच समाधान केलं. आणि ते ज्या पद्धतीने केलं, ते निव्वळ अविश्वसनीय होतं. “माझ्या वर्गात मी अव्वल क्रमांक पटकावला. ‘गेट’मध्ये माझी कामगिरी सरस ठरली आणि मला थेट बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये अर्थात आयआयएससीमध्ये जाण्याची संधी मिळाली. इतकंच नाही, तर अमेरिकेत जाऊन पीएचडी करण्यासाठी मला पूर्ण स्कॉलरशीप मिळाली ”

वेंकट मरोजूंनी आपल्या करिअरची सुरुवात १९९४ मध्ये ऑटोमोटीव्ह कंपनीतील जॉबपासून केली. लवकरच त्यांनी मॅनेजमेंट सेक्टरमध्ये पाऊल ठेवलं. अशातच ग्लोबल ऑटोमोटीव्ह डिव्हिजनसाठी बोस कॉर्पोरेशन कंपनीमध्ये डिविजनल इन्फॉर्मेशन ऑफिसर म्हणून काम करत असताना त्यांना एक अनोखी संधी मिळाली. त्यांच्या कंपनीने एमआयटी स्लोन फेलोज प्रोग्रॅम अंतर्गत एमबीए करण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देऊ केलं. “गावातल्या त्या माझ्या शाळेत शिकताना मला असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की मी आयुष्यात कधीतरी एमआयटीमध्ये जाईन,” मरोजूंचे डोळे जणू भूतकाळात डोकावत होते. “तो प्रवास मोठा संघर्षपूर्ण होता. आणि मला वाटतं त्याच संघर्षाचं चीज माझ्या एमबीएच्या डिग्रीमध्ये झालं. पण ती तर फक्त सुरुवात होती.” त्यांच्या आवाजापेक्षा त्यांचे डोळेच जास्त बोलत होते.

तळागाळात काम करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती
तळागाळात काम करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती

पण वेंकट मरोजूंच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना कधीही त्यांच्या पूर्वायुष्याचा विसर पडला नाही. ते म्हणतात, “तेलंगणातल्या त्या दिवसांची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे. नेहमीच समाजात काहीतरी बदल घडवून आणण्याचा, तळागाळात जाऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला. १९९१ ते २००५ या १५ वर्षांमध्ये तेलंगणात झालेल्या शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण सर्वाधिक होतं. संपूर्ण जगात. आणि या गोष्टीमुळे मी मुळापासून हादरून गेलो होतो. शेतक-यांच्या समस्या मला स्वस्थ बसू देत नव्हत्या. मी २००० साली तेलंगणा चळवळीचा कार्यकर्ता झालो. मी तिथल्या शेतक-यांच्या अडचणी, त्यांचं दु:ख जवळून पाहिलं, जाणून घेतलं. शेतीव्यवसाय अधिक शाश्वत करण्यासाठी आणि छोट्या शेतक-यांना सक्षम बनवण्यासाठी काय करता येऊ शकेल याचाही अभ्यास केला. याचसाठी मी माझ्या एमबीए डिग्रीसाठीही भारतातील सूक्ष्म अर्थपुरवठा अर्थात मायक्रो फायनान्सवरच शोधप्रबंध सादर केला. ”

अगदी तेव्हापासूनच ग्रामीण भागाचा विकास करण्याची त्यांची इच्छा आणि त्यांचं करिअर या दोघांची सांगड घालण्याचं वेंकट मरोजूंनी ठरवलं. २००९ मध्ये त्यांनी आपल्या मल्टीनॅशनल कंपनीतली लठ्ठ पगाराची नोकरी सोडून दिली आणि थेट भारत गाठला. बळीराजाला सक्षम करण्यासाठी. त्याला ताकद देण्यासाठी. आणि शेतीक्षेत्रात स्वत:साठी नवी सुरुवात करण्यासाठी. “करीमनगर जिल्ह्यात कार्यरत असणा-या ‘मल्कानूर कोऑपरेटिव्ह’ या शेतक-यांच्या सहकारी संस्थेने याच क्षेत्रात अगदी यशस्वी कामगिरी बजावली होती. या संस्थेसारखीच एखादी नफाधारित सामाजिक संस्था सुरू करण्याचा माझा विचार होता.” वेंकट मरोजूंनी आठवणींना काहीसा उजाळा दिला, “मी सुरुवात केली ती बियाणांच्या व्यवसायापासून. पण मी हे मान्य केलंच पाहिजे की या व्यवसायात मला फारसं यश मिळालं नाही. ब-याच अडचणींचा मला सामना करावा लागला. अशा प्रकारचा व्यवसाय करण्याचा कोणता अनुभवच माझ्या गाठीशी नव्हता.”

२०१२ मध्ये वेंकट मरोजूंनी स्वत:चा व्यवसाय थांबवून ‘सोर्सट्रेस’मध्ये काम सुरु केलं आणि सुरु झाली एक न थांबणारी यशोगाथा. बोलताना मरोजूंच्या चेह-यावर समाधान दिसत होतं. “गेल्या अडीच वर्षात आम्ही केलेल्या कामगिरीच्या जोरावर १० देशांमधले कारगिल आणि ओलमसारखे तब्बल ३० ग्राहक कंपनीसोबत जोडले गेलो आहेत, आणि आमच्या सेवेबद्दल ते समाधानी आहेत.”

२ लाख शेतक-यांचा तयार डेटाबेस
२ लाख शेतक-यांचा तयार डेटाबेस

“पण हा प्रवास काही सहज सोपा नव्हता,” मरोजू म्हणाले, “मी ‘सोर्सट्रेस’मध्ये रुजू झाल्यानंतर दुस-याच वर्षी आमचा प्रगतीचा आलेख उलट्या दिशेने फिरू लागला होता. आम्हाला ज्या कॉन्ट्रॅक्ट्सची अगदी हमखास खात्री होती, त्यापैकी बहुतेक कॉन्ट्रॅक्ट्स अगदी शेवटच्या क्षणी दुस-या कंपनीला मिळाले. निराशा हळूहळू डोकं वर काढायला लागली होती आणि चिंता वाढत होत्या. पण त्या काळातही असे काही इन्व्हेस्टर्स होते, ज्यांना आमच्यावर आणि आमच्या कामावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या त्याच विश्वासाच्या जोरावर आम्ही पुन्हा उभे राहिलो. आणि सहाच महिन्यात आम्हाला काही मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळाले. पुन्हा एकदा आमची वाटचाल सुरु झाली.”

“आता आम्हाला आमचा व्यवसाय वाढवावा लागणार आहे. त्यातून बाजारपेठेत दमदार पाऊल ठेवावं लागणार आहे. दक्षिण आशिया आणि विशेषत: भारतात कंपनीचा चांगला जम बसलाय. इथे त्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ आणि पुरेशी साधनसामुग्रीही आहे. पण सध्या अडचण आहे ती आफ्रिकेतल्या देशांची. कारण तिथल्या कारभारामध्ये इथल्यासारखी सुसूत्रता नाहीये. त्यामुळे आम्हाला तिथे वेगाने वाटचाल करता येत नाहीये. पण तरीही परिस्थिती काही अगदीच विपरित नाहीये. आणि आम्हाला तिथले काही मोठे कॉन्ट्रॅक्ट्सही मिळाले आहेत.” एखाद्या समाजहिताच्या कामासाठी मोठी स्वप्नं पहाणं आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वस्व झोकून देणं हाच वेंकट मरोजूंच्या या अथक परिश्रमांचा मूलाधार आहे. “जगभरातल्या शेतक-यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करण्याचं आमचं ध्येय आहे,” मरोजू सांगतात, “आजघडीला आमच्याकडे तीन खंडांमधल्या दहा देशांमधल्या तब्बल २ लाख शेतक-यांचा डेटाबेस तयार आहे. २०१७ पर्यंत १ कोटी शेतक-यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

आणि मग वेंकट मरोजू अचानक हसतात, आणि म्हणतात, “तुम्हाला जर अपयशांमधूनही काहीतरी शिकायला मिळत असेल, तर कधीतरी येणारं अपयशही चांगलंच असतं. म्हणूनच तुम्हाला अपयश येतं तेव्हा यशाच्या दिशेनं तुम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं असतं. तुमच्या ध्येयासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, यश आपोआप तुमच्या मागोमाग येईल.”

Stories by Pravin M.