गरीबीमुळे ज्यांनी सोडले शिक्षण, आज ते सांभाळतात २००पेक्षा जास्त मुलांचे भविष्य

गरीबीमुळे ज्यांनी सोडले शिक्षण, आज ते सांभाळतात २००पेक्षा जास्त मुलांचे भविष्य

Friday November 27, 2015,

4 min Read

एक अशी शाळा जिचे काही नाव नाही, परंतू इथे शिकतात दोनशेपेक्षा जास्त मुले. या शाळेची कोणतीही इमारत नसली तरी ती दिल्ली मेट्रोच्या एका पुलाखाली भरते. ही शाळा दोन सत्रात भरते, पण इथे शिकवले जाते मोफत. दिल्लीच्या यमुना बँक मेट्रो स्टेशन जवळ चालणा-या या शाळेची सुरूवात २००६ मध्ये झाली तेंव्हापासून ती अविरत सुरूच आहे. हे काम करत आहेत राजेशकुमार शर्मा ज्यांचे शिकरपूर येथे किराणाचे दुकान आहे. मुलांच्या शिक्षणाचे हे काम मिशन म्हणून करतात कुणाच्याही मदतीशिवाय.

image


राजेश शर्मा यांनी मुलाना शिकवण्याचे काम सन २००६मध्ये त्यावेळी सुरू केले ज्यावेळी ते या स्टेशनवर सहज फिरत आले होते. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की दिल्ली मेट्रो कश्याप्रकारे माती खणते. त्यावेळी त्यांची नजर आजूबाजूच्या मुलांवर गेली जी मातीत खेळत होती. ही मुले कचरा गोळा करणाऱ्यांचीआणि मजुरांची होती. त्यावेळी राजेश यांनी तेथे उपस्थित काही मुलांच्या आई-वडिलांना ही मुले शाळेत का जात नाहीत असा प्रश्न केला. या ठिकाणापासून शाळा खूप दूर असल्याचे त्यांना सांगण्यात आले, शाळेत जायला चांगला रस्ताही नसल्याचे त्यांना समजले.

image


या मुलांची ही स्थिती पाहून राजेश यांनी त्यांच्यासाठी काही करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी या मुलांना चॉकलेट घेऊन दिली आणि त्यांना जाणवले की, हा या मुलांसाठी काही क्षणांचा आनंद आहे यांची समस्या तर अशीच राहणार आहे. ही मुले अशीच उन्हात मातीत खेळत राहतील. त्यावेळी राजेश यांनी यांचे जीवन बदलायचे ठरवले. त्यानंतर त्यांनी या मुलांना शिकवायचे आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्याचा निर्णय घेतला. राजेश म्हणतात, “मला वाटले की जर ही मुले शाळेत जाऊ लागली तर जीवनात काही करू शकतात अन्यथा त्यांचे जीवन असेच वाया जाईल”

राजेश यांना आपली ही कल्पना रुचली, त्यांनी मुलांना म्हटले की ते रोज तासभर शिकवायला येतील. दुस-या दिवशी ते गेले तेंव्हा दोन मुले आली ज्यांना शिकायचे होते. त्यानंतर आजुबाजूची आणखी मुलेही त्यांच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागली. अशा प्रकारे तेंव्हापासून मुलांना शिकवण्याची ही धडपड अजून सुरू आहे. आज त्यांच्या शाळेत दोनशे पेक्षा जास्त मुले शिकायला येतात. यात मोठ्या प्रमाणात मुली आहेत.

image


हे काम राजेश यांनी भलेही एकट्यानेच सुरू केले असो, पण आज त्यांच्यासोबत आणखी काही लोक या कामी मदत करत आहेत जे वेळ काढून या मुलांना शिकवायला येतात. राजेश म्हणतात की, “ या मुलांना शिकवण्यासाठी महाविद्यालयातील मुलांपासून शिक्षकांपर्यंत सारेच येतात. मी कुणालाही हे चांगले काम करण्यापासून थांबवत नाही.” विशेष म्हणजे या शाळेत शिकणा-या मुलांचे वय पाच ते सोळा वर्षापर्यंत आहे जी येथे मोफत शिक्षण घेतात. राजेश यांच्या या कामात मेट्रोचे कामगारही हस्तक्षेप करत नाहीत, कारण त्यांनाही हे सामाजिक काम असल्याची जाणिव आहे.

इथे शिकणा-या अनेक मुलांना राजेश यांनी जवळच्या सरकारी शाळेत प्रवेश मिळवून दिला आहे. अलिकडेच त्यांनी सर्व शिक्षा अभियानात सतरा मुलींना दिल्ली महापालिका शाळेत दाखल केले. त्यानंतरही जी मुले शाळेत जातात ती देखील येथे शिकायला येतात. राजेश यांची ही शाळा दिवसातून दोनदा असते. सकाळी ९ ते साडे अकरा ज्यात मुले शिकायला येतात तर दुपारी दोन ते चार दुस-या पाळीत मुलींना शिकवले जाते. रविवारी सुट्टी दिली जाते. आज त्यांनी शिकवलेली मुले अकरावी-बारावी पर्यंत पोहोचली आहेत.

image


आज राजेश यांना त्यांच्या या कामाने आजूबाजूच्या लोकांत ओळख मिळाली आहे. त्यामुळे इथे शिकणा-या गरीबांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणे सोपे झाले आहे. त्याशिवाय मुलांना इतकी वर्ष शिकवल्याने त्यांनाही अनुभव आला आहे की त्याच्याशी कसे बोलले पाहिजे. कोण शिक्षणात रमेल, आणि कोण नाही किंवा कुणाला कसे शिकवावे लागेल हे त्यांना समजू लागले आहे. राजेश यांच्या मदतीसाठी आजूबाजूच्या अनेकांनी पुढाकार घेतला असला तरी राजेश त्यांच्याकडून पैसे घेत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की, “ मी लोकांना सांगतो की, जर त्यांना मदत करायची असेल तर या मुलांना करा, त्यांना खायला-प्यायला देवून. याशिवाय काही लोक आम्हाला नियमितपणाने स्टेशनरीदेखील उपलब्ध करतात. मला वाटते की लोक असे त्यासाठीही करतात कारण आता ते पूर्वीपेक्षा जास्त जागृत झाले आहेत.”

राजेश उत्तरप्रदेशच्या अलीगढ येथे राहणारे आहेत, त्यांचे शिक्षण तेथेच एका सरकारी शाळेत झाले. शिक्षणात हुशार असलेल्या राजेश यांना बीएससीचे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले, कारण भावंडात सर्वात मोठ्या राजेश यांचा परिवार गरीब होता. त्यानंतर ते दिल्लीत आले आणि सुरूवातीला अनेक लहान-मोठी कामे केली. आज शिकारपूरमध्ये त्यांचे किराणाचे दुकान आहे. राजेश यांनी आजही शिकणे सुरूच ठेवले आहे त्यामुळेच आज मुलांना शिकवणे आणि दुकान सांभाळणे यानंतर ज्यावेळी राजेश यांना वेळ मिळतो ते वाचनात गुंतून जातात.

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे