तीन वर्षांत तीन स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तेहतीस वर्षिय अर्पिता खद्रीया म्हणतात ‘ही तर केवळ सुरुवात’….

तीन वर्षांत तीन स्टार्टअप्स सुरु करणाऱ्या तेहतीस वर्षिय अर्पिता खद्रीया म्हणतात ‘ही तर केवळ सुरुवात’….

Wednesday February 17, 2016,

6 min Read

अवघ्या चार वर्षांपूर्वी अर्पिता खद्रीया एका आघाडीच्या कंपनीसाठी ब्रॅंड मॅनेजर म्हणून काम करत होत्या. टीएपीएमआयमधून एमबीए पूर्ण केलेल्या आणि फास्टट्रॅक आणि टायटनसारख्या बड्या ब्रॅंडशी संबंधित असलेल्या अर्पिता, या कॉर्पोरेट दुनियेत यशाची शिडी चढण्यासाठी सज्ज होत्या. आज वयाच्या तेहतीसाव्या वर्षी त्या तीन वेगवेगळ्या स्टार्टअप्सच्या संस्थापक आहेत. “ आयुष्य हे गमतीदार असते. जेंव्हा तुम्ही प्रवासाला सुरुवात करता, तेंव्हा तुम्ही कोठे जाऊन पोहचणार आहात याविषयीचे भाकीत करताच येत नाही,” अर्पिता सांगतात. मोबाईल प्रिमियर अॅवॉर्डसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी साईनटीस्ट (Signtist) या त्यांच्या ऍपला मिळाल्याने त्या सध्या चांगल्याच खुशीत आहेत. जागतिक स्तरावरील ऍप शोकेस प्लॅटफॉर्म ऍपसर्कस (Appcircus) द्वारा आयोजित आणि इंटेल पुरस्कृत या स्पर्धेत साईनटीस्टने इतर स्पर्धकांवर मात करत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी जिंकली असून, या महिन्याच्या अखेरीस बार्सिलोना येथे हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

image


साईनटीस्ट

साईनटीस्ट, अर्पिता यांच्या गेम आणि ऍप डेवलपमेंट कंपनी बेझर्क (Bezzerk) ने विकसित केलेला हा गेम लॉजिकल रिजनिंग अर्थात तर्कशुद्ध कारणांवर आधारीत आहे. त्यांचा जुना टी9 फोन वापरत असताना त्यांना अचानक साईनटीस्टची कल्पना सुचली. त्यामध्ये योग्य ते अक्षर येण्यासाठी किपॅड अनेकवेळा दाबावे लागत असल्याने, त्यांनी विचार केला की जर का त्याउलट केले तर – म्हणजे 'की' च्या पॅटर्नवरुन शब्द ओळखणे हा एक गेम होऊ शकतो. त्यांनी १३५ देशांमध्ये कॉपीराईटस् साठी अर्ज दाखल केले आणि हे प्रत्यक्षात आल्यावर त्या अतिशय आनंदीत झाल्या.

एप्रिल २०१५ च्या सुरुवातीला त्यांनी फ्लिपकार्टवर एक पझल बुक्स या स्वरुपात हा गेम बाजारात आणला. या पझल बुक्सना तुफान प्रतिसाद मिळाला आणि कोणत्याही मार्केटींग किंवा जाहीरातींशिवायही त्या दीड लाख रुपयांची पुस्तके विकण्यात यशस्वी ठरल्या. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त उभारलेल्या स्टॉल्समधूनही सरासरी ८० टक्के विक्री झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

image


डिसेंबर, २०१५ मध्ये या ऍपचे ऍंड्रोईड व्हर्जन सुरु करण्यात आले तर आयओएस व्हर्जन (iOS Vesrion) हे जानेवारी, २०१६ मध्ये सुरु झाले. अर्पिता सांगतात, “ या गेमचा दुसरा वापर विद्यार्थ्यांसाठी लॉजिकल एप्टीट्यूड चाचण्यांचा भाग म्हणूनही होऊ शकतो. त्यामध्ये अमर्याद शक्यता आहेत.” वर्तमानपत्रामध्ये एक शब्दकोडे म्हणूनही या खेळाचा समावेश करण्याच्या दृष्टीने त्यांची विविध वर्तमानपत्रांबरोबर बोलणी सुरु आहेत आणि साईनटीस्टची निवड फेसबुकच्या स्टार्ट बुटस्ट्रॅप ट्रॅक प्रोग्रॅमसाठी झाल्याबद्दलही त्या विशेष उत्साही आहेत. या प्रोग्रॅमच्या विजेत्याला ३०,००० डॉलर्स किंमतीचे पर्क्स आणि मार्गदर्शनही मिळणार आहे.

बेझर्ककडे चार सदस्यांची टीम असून त्यांच्याकडे इन-हाऊस डिजाईनर आहे. ऍंन्ड्रॉईडवर सध्या साईनटीस्टचे रेटींग ४.६ आहे आणि १२ देशांमध्ये ऍपलच्या सर्वोत्तम नवीन गेम्समध्ये त्याचा समावेश आहे. यापूर्वीच हा गेमचे पंचवीस हजार डाऊनलोडस् झाले आहेत. ‘दीमाग की बत्ती जला दे’ या मिळत्याजुळत्या टॅगलाईनमुळे साईनटीस्टला मेंटॉस इंडियाच्या रुपाने एक जाहीरातदारही मिळाला आहे. मॅककॅन एरिक्सन या आघाडीच्या ऍड एजन्सीबरोबर आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेल्या अर्पिता यांना जाहिरात आणि मार्केटींग हे अगदी नैसर्गिकरीत्या जमते.

‘बेअरफुट’ चालताना...

image


२०१२ मध्ये त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. फारसा पाठींबा न देणारे बॉस आणि कामाच्या ठिकाणचा तणाव या दोन गोष्टींमुळे त्यांनी हा निर्णय घेतला. जातीवंत मारवाडी असलेल्या अर्पिता यांच्या रक्तातच व्यवसाय होता आणि नवरा प्रोमित आणि मित्रांच्या पाठींब्यावर त्यांनी नवीन प्रवासाला जाण्याचा निर्णय घेतला. “ शेवटी, जेंव्हा तुम्ही अगदी तळाशी जाऊन पोहचता, तेंव्हा तुमच्याकडे असलेला एकमेव मार्ग म्हणजे वर येणे,” त्या हसून सांगतात. बेअरफुट (Barefoot) ची स्थापना सप्टेंबर २०१२ मध्ये झाली. हेच नाव निवडण्यामागेही खास कारण होते. या निमित्ताने त्या पुन्हा एकदा आपल्या मूळ तत्वाकडे वळल्याचे प्रतिक म्हणजेच हे नाव... त्यांच्या कारकिर्दीच्या रस्त्यावरील ही एक नवी सुरुवात होती. बेअरफुट ही स्टार्टअप्ससाठी एक ब्रॅंड कन्सल्टन्सी फर्म आहे. मोठमोठ्या ब्रॅंडस् ना मोठ्या एजन्सीजना काम देणे परवडते किंवा त्यांची स्वतःची मार्केटींग आणि ब्रॅंडींग टीमही ते ठेवू शकतात. पण ब्रॅंड लॉंचेस, मार्केट रिसर्च, यांसारख्या कामांमध्ये नवीन फर्मस् ना मात्र अडचणी येतात. बेअरफुट अगदी वाजवी दरात सेवा देऊ करते, जे स्वतःची टीम ठेवण्यापेक्षा किंवा मोठ्या एजन्सीजची नेमणूक करण्यापेक्षा स्वस्त ठरते. त्याचबरोबर ग्राहकांची संख्या मर्यादीत ठेवण्याबाबत अर्पिता अतिशय काटेकोर आहेत. त्या एकावेळी पाच ते सहा ग्राहकांसाठीच काम करतात, जेणेकरुन त्यांना कामाचे प्रचंड ओझे होत नाही आणि प्रत्येक ग्राहकाकडे विशेष लक्ष देणे त्यांना शक्य होते. त्यांच्याकडे आर्या फार्म, ऍसेटझ् ग्रुप किंवा लवट्रीट यांसारखे विविध प्रकारच्या उद्योगातील ग्राहक असून त्यांच्या उत्पादनाच्या विविध टप्प्यांवर बेअरफुटने त्यांची मदत केली आहे. बेअरफुटमध्ये त्यांची चार जणांची टीम असून गरजेनुसार डीजाईन करुन देणारे १५ फ्रिलान्सर्स आहेत.

फायद्याच्या पलीकडे

काम आणि आयुष्य यांचा तोल सांभाळणे अर्पिता यांच्यासाठी खूपच महत्वाचे असून त्याबाबत त्या अतिशय काटेकोर आहेत आणि म्हणूनच विकएन्डस् ना काम करण्यापासून त्या त्यांच्या टीमलाही परावृत्त करतात. त्यांना प्रवासाची आवड आहे आणि आपले हे अनुभव ते आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगवरुन व्यक्तही करत असतात. त्याचबरोबर त्यांनी जानेवारी, २०१६ मध्ये गिव फ्रीली (Give Freely) या नावाने एक ना नफा तत्वावरील स्टार्टअपही सुरु केली आहे. “ बऱ्याचदा एनजीओ’ज आणि धर्मादाय संस्था हे पैशाच्या स्वरुपात देणगी मागत असतात, पण या पैशाचा गैरवापर तर होणार नाही ना, याची काळजी दात्यांना वाटत असते,” अर्पिता सविस्तरपणे सांगतात. त्यामुळेच अर्पिता यांनी अशा एका व्यासपीठाची कल्पना मांडली, ज्याद्वारे एनजीओ’ज वस्तू रुपात आपल्या गरजा मांडतात, उदाहरणार्थ २० किलो तांदूळ आणि दाते या वस्तूरुपात मदत देऊ शकतात. या वेब व्यासपीठावर एनजीओ’ज चा समावेश करण्यापूर्वी त्या सर्वांची त्यांनी त्यांच्या टीमच्या मदतीने पडताळणी केली आहे. आपत्तीच्या प्रसंगी, जसे की चैनईमध्ये नुकताच आलेला पूर, अनेक गरजू लोक असतात आणि असेही अनेक जण असतात, ज्यांना मदत करण्याची इच्छा असते. या दोघांमधील दुवा बनण्याची गिव फ्रीला आशा आहे आणि अगदी कमी काळात, कमीत कमी अपव्ययासह गरजूंना मदत करण्याची इच्छा आहे. त्यांच्या वैयक्तिक बचतीमधून हे व्यासपीठ चालविले जाते आणि सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) चा एक भाग म्हणून मोठ्या कंपन्याही या स्टार्टअपशी जोडल्या जातील, अशी त्यांना आशा आहे.

यशाचा मंत्र

रिचर्ड ब्रॅन्सनची मोठी प्रशंसक असलेल्या अर्पिता यांच्या मते त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे आणि एक सिरियल आंत्रप्रुनर म्हणून नाव कमविण्याची त्यांची इच्छा आहे. ‘मोठा विचार करा, सुरुवात लहान करा आणि आताच कामाला लागा’ या तत्वज्ञानावर अर्पिता चालत आहेत. लहान प्रमाणात सुरुवात केल्याने आणि चिकाटी ठेवल्याने, भावनेच्या भरात केल्या जाणाऱ्या चुका टाळण्यात त्यांना यश आले आहे. त्यांच्या मते आर्थिक यश हे जरी महत्वाचे असले, तरी योग्य ते करणे हे आणखी महत्वाचे आहे. त्या नात्यांना अतिशय महत्व देतात, मग ते कर्मचाऱ्यांबरोबरचे असेल, किंवा ग्राहकांबरोबरचे आणि हे केल्यास यश हे आपोआप येतेच हेदेखील त्यांना दिसून आले आहे. अशाही वेळा आल्या जेंव्हा त्यांना मोठ्या संस्थांबरोबर जाण्याची तीव्र इच्छा झाली होती, पण त्यांना हे जाणवले की असे केल्यास स्टार्टअप्सबरोबर काम करण्याच्या आणि त्यांना मार्गदर्शन करण्याच्या बेअरफुटच्या मुल्यांपासून दूर गेल्यासारखे होईल. अर्पिता यांच्या मते स्वतःच्या मूल्यांशी प्रामाणिक रहाणे आणि शॉर्टकटस् चा मोह टाळणे हाच यशाचा मंत्र आहे.

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

कुठल्याही निधी उभारणीविना यशस्वी झालेले स्टार्टअप ‘दि टेस्टामेंट’

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग

१९ वर्षीय नितीन शर्मा भारतातील सगळ्यात मोठ्या ड्राईव्हर-ऑन-डिमांड मंचाचा निर्माता


लेखक – शारीका नायर

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन