प्रस्थापित कल्पनांना छेद देणाऱ्या ‘कॉलेज ड्रॉप आऊट’ आणि तरुण उद्योजक आनंद नाईक यांची यशोगाथा

0

“ माझे वय आणि महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडण्याचा माझा निर्णय पहाता, मी जे काही होण्याचे ठरविले होते ते कोणालाच पटणे शक्य नव्हते. पण मला नक्की काय करायचे आहे ते मला चांगलेच माहित होते. मी कष्टाने या दिशेन मार्गक्रमण सुरु केले!” यशस्वी होण्यासाठीच्या प्रस्थापित कल्पनांना छेद देऊन नवा विचार करणारे तरुण यशस्वी उद्योजक आनंद नाईक यांचे हे शब्द....

कर्नाटकातील हुबळी येथे जन्मलेले आनंद, हे कोटा येथे आपल्या आयआयटी प्रवेश परिक्षेची तयारी करत होते. अतिशय हुशार असल्याने ते उत्तम विद्यालयांमध्ये शिकणार आणि अभियंता बनून साधारणपणे ज्या आयुष्याला ‘चांगले, आनंदी आयुष्य’ म्हणतात, असे आयुष्य व्यतीत करणार, अशीच अपेक्षा होती. पण त्यांनी मात्र त्यांच्याकडून जे अपेक्षित नव्हते नेमके तेच केले. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावरच सोडले आणि त्याहीपुढे जात त्याहीपेक्षाही वाईट असे काही तरी केले. ते त्यांच्या मूळ गावी परत आले आणि वयाच्या १८ व्या वर्षी स्वतःचे स्वतंत्र काम हाती घेतले.


पुढच्या काळात अनेक पुरस्कार आणि प्रशंसा मिळविणारे आनंद हे आज उत्तर कर्नाटक प्रदेशातील सर्वाधिक मागणी असलेले उद्योजक आहेत. मात्र एकाच ठिकाणी अडकून न रहाण्याची वृत्ती असलेले आनंद यांनी विद्यार्थ्यांना व्यवसायासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने एका नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यांनी पंचवीस शहरांमधून दहा हजार किलोमीटरच प्रवास केला करुन तीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तरुण वयातच व्यावसायात प्रयोग करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

या तरुण उद्योजकाशी साधलेल्या संवादा दरम्यान, त्यांच्या उद्योजक होण्यामागची भूमिका, त्यांना मिळत असलेली लोकप्रियता, इत्यादी विविध विषयांवर चर्चा केली.

किशोर वयातच झालेली सुरुवात

“ भारतातील सर्वात मोठ्या अभियांत्रिकी विद्यालयात शिकण्याची माझी संधी अवघ्या काही गुणांनी हुकली. जरी त्यावेळी माझ्यासमोर इतर अनेक चांगले पर्याय असले, तरी मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकला आणि घरी परत गेलो,” आनंद सांगतात. माझ्या निर्णयाने चकीत झालेले माझे पालक आणि आसपासच्या लोकांकडून होणाऱ्या लांच्छनास्पद टीप्पण्या, यामध्येच आनंद यांनी हुबळी येथे बोअर्डबीज टेक सोल्युशन्स (BoredBees Tech Solutions) ला सुरुवात केली. हुबळी हे कर्नाटकातील एक व्यवसायाचे केंद्र होते. “ कामाच्या सुरुवातीच्या काळात, मी करत असलेल्या या कामाबाबत लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे ही माझ्यासमोरील सर्वात मोठा अडचण होती. तसेच मला कसलीच तांत्रिक पार्श्वभूमी नव्हती,” ते पुढे सांगतात. मग अशा वेळी हुबळीसारख्या शहरात तंत्रज्ञान क्षेत्रात काही सुरु करण्याचा निर्णय त्यांनी कसा काय घेतला? “ त्या विशिष्ट काळात बाजारपेठेत असे खेळाडू कमी असल्याचे मला दिसून आले. त्याचबरोबर त्या संपूर्ण प्रदेशातही बोअर्डबीज ही पहिल्या काही टेक स्टार्टअप्सपैकी एक होती,” आनंद सांगतात.

त्यानंतर त्यांनी नावाजलेल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या आपल्या शाळेतील वरीष्ठांनाच आपल्यासह काम करण्याबाबत विचारणा केली आणि त्यांनीही ते मान्य केले. अशा प्रकारे अनुभवी अभियंत्यांनी कंपनीमध्ये येणे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कल्पनेवर विश्वास दाखविणे, हे आनंद यांना नक्कीच सुखावणारे होते, पण त्याचवेळी या सर्वांना आपल्याबरोबरच कायम ठेवण्याची अवघड कामगिरीही त्यांच्यावर होती. “ त्यांना धरुन ठेवण्याचा खर्च भरुन काढण्यासाठी मी आयसीएआय आणि इतर संस्थांमध्ये शिकविण्यास सुरुवात केली. महसूल मिळविण्यासाठी आयटी प्रशिक्षण करण्याचा करार मी शैक्षणिक संस्थांबरोबर केला,” ते सांगतात. सुरुवातीच्या काळात उत्पादनातील चिंतांसाठी बोअर्डबीजने ऑऊटसोअर्सिंग केले आणि हळूहळू या प्रदेशात भरभराटीला आलेल्या उत्पादन उद्योगासाठी एक संपूर्ण वाढ झालेली ईआरपी सोल्युशन्स कंपनी बनण्याकडे वाटचाल केली. त्याशिवाय कंपनीकडे १५० मोबाईल ऍप्सचे पोर्टफोलियो आहेत, ज्याचे तीन लाखांपेक्षा जास्त डाऊनलोडस् झाले आहेत.

हुबळी आणि टीमबाबत बोलताना...

उत्तर कर्नाटक प्रांतात केंद्रस्थानी वसलेले हुबळी ओळखले जाते ते ‘छोटा बॉम्बे’ म्हणून... एक गजबजलेला व्यापारी जिल्हा अशी या शहराची ओळख आहे. पण पारंपारिक व्यवसायांची मक्तेदारी असलेल्या या शहरात आयटी सोल्युशन्स कंपनी सुरु करणे हा एक आंबटगोड अनुभव होता. आनंद यांनी आपल्या या जन्मगावाची निवड करण्यामागे मोठे कारण होते, ते म्हणजे तुलनेने फारशी न वापरली गेलेली बाजारपेठ आणि त्याचबरोबर कमी स्पर्धा... मात्र तरीही पारंपारिक व्यवसायांना तंत्रज्ञानाची ताकद समजावून देणे हे सहज नक्कीच नव्हते. “ कित्येक महिने आमचे पैसे दिले जायचे नाहीत. आपले वजन वापरुन व्यापारी वस्तुविनिमय सौदे मिळविण्याचा प्रयत्न करत,” त्या दिवसांबाबत बोलताना आनंद सांगतात. पण गोष्टी हळूहळू बदलत गेल्या, नविन खेळाडू बाजारपेठेत आले आणि बोअर्डबीज ही सुरुवातीच्या काही कंपन्यांपैकी एक असल्याने तिला त्याचा निश्चितच अधिक फायदा मिळाला.

आज आनंद यांच्याकडे साठ अनुभवी लोकांचे पाठबळ आहे, ज्यांच्यापैकी बहुतेक जण हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत. पण बॉसी किंवा अधिकारयुक्त न भासू देता, एवढ्या लहान वयात या टीमबरोबर योग्य संवाद साधणे कसे जमते? “ जेंव्हा जेंव्हा मी नविन व्यक्ती घेतो, तेंव्हा तेंव्हा त्या व्यक्तीबरोबर आम्ही प्रत्यक्ष संवाद साधतोच. जेणे करुन येणाऱ्या नविन व्यक्तीच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा आदर इतरांकडून केला जाईल. माझ्याकडील सर्वात वयस्कर कर्मचारी असेलेली व्यक्ती ६२ वर्षांची आहे. शेवटी हे सगळे योग्य मुल्ये पोहचवण्याबाबतच आहे,” ते सांगतात.


यशोगाथा

बोअर्डबीजला सुरुवात झाल्यापासून अवघ्या दोन वर्षांत, २०१३ च्या एका नेहमीसारख्याच दुपारी आनंद यांना एक फोन आला. तो एखाद्या ग्राहकाचाच फोन असल्याचे वाटून, आनंद यांनी त्यांना बोअर्डबीज च्या सर्व सेवांची सविस्तर माहिती दिली. फोन ठेवल्यानंतर आपण या ग्राहकाला पुरेसे संतुष्ट केले असेल, अशी मनातल्या मनात त्यांना आशा वाटत होती. मात्र हा संवाद आपले आयुष्य आणि त्यामुळे आपले भाग्यच बदलून टाकेल, अशी पुसटशीही कल्पना त्यांना त्यावेळी नव्हती. हे कळण्यापूर्वीच आनंद यांना आणखी एक फोन आला... ‘द बेस्ट यंग आन्त्रप्रुनर ऍवॉर्ड’ ( सर्वोत्तम तरुण व्यावसायिक पुरस्कार) मिळाल्याची माहिती देणारा हा फोन होता आणि हा पुरस्कार मिळणार होता रतन टाटा यांच्या हस्ते... “ या गोष्टीने माझे आयुष्यच बदलून टाकले. पुरस्कार आणि प्रशंसा प्राथमिकदृष्ट्या महत्वाचे असतात ते त्यामुळे मिळणाऱ्या तुम्हाला मिळणाऱ्या मान्यतेसाठी आणि तुमच्या झालेल्या स्विकारासाठी,” ते सांगतात.

यशाची चव चाखल्यानंतरही आणि खास करुन बोअर्डबीज हे या प्रदेशातील आता एक मान्यताप्राप्त नाव झाल्यानंतरही आनंद निवांत झालेले नाहीत. त्यांना त्यांचे हे अनुभव विद्यार्थ्यांना, खास करुन किशोरवयीन तरुणांना, सांगायचे आहेत आणि तरुण वयातच उद्योग सुरु करण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे. त्यासाठी ते देशभरात प्रवास करत असून विविघ महाविद्यालयांना भेटी देत आहेत. व्यावसायिक होण्यास उत्सुक असलेल्या तरुणांबरोबर संवाद साधणे हा या प्रवासाचा भाग आहे, ज्याला त्यांनी नाव दिले आहे ‘एटीन बट नॉट टीन’.... “ जेंव्हा मी सुरुवात केली, तेंव्हा मला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. मी जे काही करतो आहे, ते धोकादायक असल्याचे बोलले जायचे, हे मला आजही आठवते. त्यामुळे माझ्या अनुभवांचा फायदा तरुणांना मोठी स्वप्ने पहाताना व्हावा आणि त्याचबरोबर आयुष्यात सुरुवातीच्याच काळात अपयशाचा सामना करण्यासाठी त्यांची तयारी व्हावी, ही माझी इच्छा आहे,” ते सांगतात.

भविष्यातील वाटचाल

वय, हे या तरुण उद्योजकासाठी निश्चितच फायद्याची गोष्ट आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच यश आणि अपयश या दोन्हीचा सामना केल्याने आनंद हे पुढचा विचार करणारे उद्योजक बनले आहेत, ज्यांच्यामध्ये उर्जा आणि परिपक्वता यांचे योग्य मिश्रण दिसून येते. मग आता पुढे काय? “ प्रादेशिक सीमा ओलांडत, इतर शहरांमध्येही विस्तार करण्याची माझी इच्छा आहे आणि आता युवरस्टोरी वर माझी कथा आल्यानंतर तर माझ्या पालकांची मी करत असलेल्या कामाबाबत पुन्हा एकदा खात्री पटेल,” ते हसून सांगतात.

लेखक – प्रतिक्षा नायक

अनुवाद – सुप्रिया पटवर्धन