बापूंचा बीपीओ! सलोनी मल्होत्रांच्या ‘चेन्नई एक्सप्रेस’कडून स्वप्नपूर्ती महात्म्याची… खेड्यातील युवकांना मिळाला खेड्यातच रोजगार!

बापूंचा बीपीओ! सलोनी मल्होत्रांच्या 
‘चेन्नई एक्सप्रेस’कडून स्वप्नपूर्ती महात्म्याची… खेड्यातील युवकांना मिळाला खेड्यातच रोजगार!

Monday October 05, 2015,

4 min Read

बापू म्हणत ‘खेड्याकडे चला.’ स्वातंत्र्यानंतर दशके उलटली, पण खेडीच शहरांकडे अक्षरश: धावत आहेत. अशात थेट राजधानीतून… दिल्लीतून एक युवती दूर दक्षिणेकडे एका खेड्यात बीपीओ सुरू करते, जिथली भाषाही तिला येत नाही. खेड्यांतील युवकांना त्यांच्याच खेड्यात रोजगार उपलब्ध करून देते. ‘देशी क्रू…’ हे तिच्या बीपीओचे नाव… देशातील हा पहिला ग्रामीण बीपीओ… एका अर्थाने खरंतर हा बीपीओ म्हणजे प्रत्यक्ष बापूच… आणि तिची जिद्द, तिचे कष्ट, तिचा ध्यास, तिची आशा… हीच तिची भाषा!

गावखेड्यांतून विकासाची वजाबाकी

शिक्षण आटोपले की रोजगारासाठी शहरांकडे आशाळभूतपणे पाहणे, ही ग्रामीण भागातील युवकांच्या दृष्टीने एक सामान्य बाब. म्हणजे त्यात वेगळे असे काहीच नाही. स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजी म्हणत ‘खेड्यांकडे चला,’ पण स्वातंत्र्याला आता सहा दशके उलटली तरीही खेड्यांतून रोजगाराच्याच काय तर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यातही सर्वच पातळ्यांवर सपशेल पिछाडी आहे. गावखेड्यांतून शहरांच्या दिशेने युवकांचे लोंढे सुरूच आहेत. शहरांची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतेच आहे. विकासाची प्रक्रिया शहरकेंद्रीत झालेली आहे आणि गावखेड्यांतून विकास हा वजाच होत चाललेला आहे. म्हणजेच गावखेड्यांतून आहे, ती स्थितीही दिवसागणिक बिघडत चाललेली आहे.


image


सलोनी मल्होत्रा

दिल्लीहून सलोनी...चेन्नई एक्सप्रेस

साहजिकच शहरातून खेड्याकडे जायला कुणीही तयार नाही, अशा स्थितीत थेट देशाची राजधानी… दिल्ली सोडून एखाद्या गावगल्लीत जाणे कुणालाही धक्कादायक वाटेल. वेब डिझायनर सलोनी मल्होत्रा यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी हे धक्कादायक धाडस केले. सलोनी यांचा हा उलटा प्रवासही आणखी आगळा यासाठी, की त्यांनी प्रस्थान ठेवले ते थेट दिल्लीतून दक्षिणेकडे! तामिळनाडूतील एका खेड्यात त्यांनी ‘देशी क्रू’ या नावाने एक बीपीओ सुरू केले. थोड्यांच वर्षांत हे बीपीओ यशस्वीही ठरले. बीपीओच्या माध्यमातून त्यांनीग्रामीण भागातील युवकांना समोर आणले आणि या युवकांनी आपल्या गावातच राहून स्वत:साठी उत्तम करिअरच्या वाटा निर्माण केल्या.


भारती विद्यापीठातून इंजिनिअरिंग

सलोनी बारावीपर्यंत दिल्लीतील एका कॉन्व्हेंट शाळेत शिकल्या. पुढे पुण्यातील भारती विद्यापीठातून इंजिनिअरिंग केले. इथे महाविद्यालायांतर्गत जवळपास सर्वच स्पर्धांतून सलोनी सहभाग घेत. स्पोर्टस् ग्रुप, डिबेटिंग ग्रुप अशा अनेक मंडळांचे सभासदत्व सलोनीकडे होते. एका ग्रुपची तर ती प्रेसिडेंटही होती. इथेच ग्रामीण विकास या विषयालाही सलोनीने हात घातला. मग अन्य गोष्टी जरा मागे पडत गेल्या. ग्रामीण विकासाला वाहिलेल्या ग्रुपमध्ये त्या रमल्या. खूप काम केले. अगदी झोकून. सलोनी यांनी ठरवून टाकले, की पुढेही आपल्याला गांधीजींचा ‘खेड्याकडे चला’ हाच मंत्र जपायचाय आणि जगायचाय. आता प्रश्न होता खेड्यात जाऊन असे काय करता येईल, ज्याचा त्या खेड्यातील तरुणाईलाही दृश्य स्वरूपात होऊ शकेल. मग दिल्लीतीलच एक इंटरॅक्टिव्ह स्वरूप असलेली एजंसी ‘वेब चटनी’ सलोनीने जॉइन केली. ग्रामीण विकासाचा मूळ उद्देश कायम असला तरी या जॉइनिंगमागचा मुख्य उद्देश होता कंपनी व्यवस्थापनाचे तंत्र आत्मसात करण्याचा.


कोल्लुमंगुडीत मांडले बस्तान

दरम्यानच्या काळात चेन्नई आयआयटीतील प्राध्यापक अशोक झुनझुनवाला यांच्याशी सलोनीची ओळख झाली. झुनझुनवाला यांच्या मदतीने सलोनी यांनी २ फेब्रुवारी २००७ मध्ये ग्रामीण बीपीओ देशी क्रू सुरू केला. रोजगारासाठी शहराकडे आ वासून पाहणाऱ्या तोंडांना खेड्यातच सुखाचा घास मिळवून देण्याची संधी निर्माण करणे, हा या नव्या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. ‘देशी क्रू’ने युवकांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आव्हान पत्करले. चेन्नईला लागून असलेल्या कोल्लुमंगुडी गावात चार सहकाऱ्यांसह कार्यालयाची मुहूर्तमेढ केली.


तामिळ इल्ला...तरीही ‘वडक्कम...’

आयआयटी मद्रास विलिग्रो आणि एका अन्य गुंतवणूकदाराने सहाय्य केले. सलोनी यांना तामिळ भाषेतील त थ द ध काहीही कळत नव्हते. पुन्हा या भागात त्या नवख्याच. अडचणी आल्या, पण सलोनी यांच्या हिमतीपुढे सर्व अडचणींनी हात टेकले. देशी क्रूची यशाच्या दिशेने घोडदौड सुरू झाली… सलोनी यांच्या या चेन्नई एक्सप्रेसचे सर्वत्र ‘वडक्कम’ होऊ लागले!


आता देशी क्रूचे पाच सेंटर

तामिळनाडूत आता देशी क्रूचे पाच सेंटर आहेत. अनेक युवकांना या माध्यमातून रोजगार मिळालाय. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा अभाव ही सुरवातीच्या काळात क्लायंटला काहीही पटवून देण्यातील मुख्य अडचण होती. गावखेड्यांत इथं सगळेच तामिळ बोलणारे. इंग्रजी जाणणारे मोजकेच. म्हणूनही क्लायंट एकदम भरवसा टाकायला तयार नसत. सामान्यत: बीपीओमध्ये काम करणारे सगळेच प्रशिक्षित, अनुभवी आणि हुशार असतात. पण या सगळ्यांचा विश्वास जिंकण्यात सलोनी अखेर यशस्वी ठरल्या.

image


कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण

देशी क्रूमध्ये कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. जेणेकरून प्रत्येक परिस्थितीचा सामना या कर्मचाऱ्यांना करता यावा. देशी क्रू तामिळनाडू आणि कर्नाटकातील विविध कंपन्यांना सेवा पुरवते. शिवाय देशी क्रूसोबत देशातील काही अन्य कंपन्याही संलग्न आहेत. देशी क्रूचे कार्यक्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत चाललेले आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्याच्या क्षेत्रात अनेक बीपीओ कार्यरत आहेत, पण सलोनी यांच्या बीपीओचे वैशिष्ट्य असे, की त्यांनी आपले मुख्य कार्यालयही ग्रामीण भागात सुरू केलेले आहे आणि ग्रामीण युवकांचा तेथील रहिवास कायम ठेवून रोजगार उपलब्ध करून देत आहेत.


वय एवढेच, पण वलय केवढे...

सलोनी यांना त्यांच्या या आगळ्या कार्याबद्दल कितीतरी पुरस्कार आजअखेर मिळालेले आहेत. २०११ मध्ये टीआयई श्री शक्ती ॲवॉर्ड, २००८ मध्ये एमटीव्ही युथ आयकॉनसाठी त्यांना नामांकन मिळाले होते. २०१३ मध्ये ग्लोबल सोर्सिंग काउंसिल ३ एस ॲवॉर्डअंतर्गत सलोनी यांना दुसरे स्थान प्राप्त झाले. २००९ मध्ये फिक्की एफएलओ बेस्ट वुमन सोशल आंत्राप्युनर हा मानाचा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. इतक्या कमी वयात एवढे मोठे यश मिळवणे, हीच मुळात खूप मोठी गोष्ट आहे. सुरवात केल्यानंतर मोजक्याच वर्षांमध्ये देशी क्रूचा दहापट विकास अन् तेवढाच विस्तारही झालेला आहे, हे तर केवळ अपवादात्मक असेच उदाहरण… अन् म्हणूनच आदर्शही!