देशद्रोह्यांविरुध्द लढणारा जीवनाची चव चाखणारा सामान्य तरूण, तुषार देशमुख यांच्या असामान्य “फ्लेवर्स”च्या जीवन संघर्षांची कहाणी

0

मुंबईत १९९३च्या स्फोटात आपली जन्मदात्री गमावलेला एक मुलगा बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमन याला फाशीच द्या अशी मागणी घेऊन ठामपणाने भारत सरकारला नागरिकांची स्वाक्षरी मोहीम घेऊन सामोरा जातो. आयुष्याच्या संघर्षात आई-वडिलांना पारखा झालेला, मित्राच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या प्रेमाने भारावलेला, उद्योगात धडपडताना वाहतूकीचा व्यवसाय टक्केटोणपे खात यशस्वी करणारा, स्वत:ची स्वयंपाकाची आवड जोपासताना कोणतेही शिक्षण न घेताही उत्तम बल्लवाचार्य असणारा आणि त्यातूनच यशस्वीपणे हॉटेलचा व्यवसाय करणारा हा मराठमोळा तरुण आहे,तुषार देशमुख. दादरच्या पोर्तुगीज चर्च जवळ त्याच्या ‘फ्लेवर्स’ या हॉटेलमध्ये त्याच्या या जीवनातील वळणांची माहिती घेण्यासाठी ‘युवर स्टोरी’ने संपर्क केला. अत्यंत नम्रतेने आणि अमोघपणाने त्याने एका दमात आपली कहाणी ऐकविली. ‘जीवनात संकटे नेहमी संधी म्हणून येतात त्यातील वाईटाचा विचार करत हारून न जाता त्यातील संधीचा फायदा घेतला तर जीवनात वाईट काळसुध्दा चांगला ठरु शकतो’, असे सांगणारा हा कोणी वयोवृध्द नव्हे. एक सळसळत्या रक्ताचा मराठी तरूण उद्योजक आहे; हे पाहिल्यावर लक्षात येते.

  • तुषार यांनी सांगितले की, पुण्यात असताना बालपण मजेत गेले व्यावसायिक असलेल्या वडिलांना आर्थिक फटका बसला आणि ते निराश झाले, त्यानंतर त्यांच्या कुटूंबाने जीवनात अनेक चढाव-उतार पाहिले. मुंबईतआजोबांच्या सोबत रहायला आल्यावर त्यांचे शिक्षण सुरू झाले आणि घरची स्थिती सावरायला लागली असे वाटले होते, त्या काळात त्यांच्या आईने अपार कष्ट केले अगदी घरकामांपासून शिवणकामापर्यंत सारेकाही करून मुलांच्या शिक्षणासाठी तिचा आटापिटा सुरु होता, पण नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी होते. सन १९९३च्या मुंबई स्फोटात आईचे छत्र हरपले, वडिलांनी दुसरे लग्न केले आणि सावत्र आईसोबत पटले नाही, त्यावेळी तुषार यांना शालांत परिक्षा आणि पुढील शिक्षणासाठी आधार ठरले योगेश म्हात्रे आणि त्याचे कुटुंबीय. त्यांच्याच घरात त्याना आश्रय मिळाला आणि त्यांच्या सोबतीने जीवनाच्या, व्यवसायाच्या मार्गावर तुषार यांनी धाडस, मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या बळावर वाहतूकक्षेत्रात आणि नंतर हॉटेल व्यवसायात जम बसवला आहे. जीवनाकडे आव्हान म्हणून पाहताना त्यांनी कधीही कुणालाही न दुखावता आपला मार्ग कसा काढता येईल याकडे लक्ष दिले.

१९९३च्या बॉम्बस्फोटात अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले. बाबरी प्रकरणानंतर मुंबईत झालेल्या दंगली आणि सूडाच्या भावनेने करण्यात आलेले बॉम्बस्फोट असा तो काळ होता. जीवनाच्या संघर्षात झगडणारे अनेक मुंबईकर या स्फोटात कायमचे अपंग झाले अनेकांचे छत्र हरपले. या स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या व्यथा कधीच कुणाच्या ह्रदयात पोचल्या नाहीत. पण बॉम्बस्फोटाचा आरोपी आणि या स्फोटातील सक्रीय गुन्हेगार याकूब मेमन याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा देण्याची तारीख जवळ आली तरी समाजातील अनेक तथाकथित प्रतिष्ठित सेक्यूलरवाद्यांनी त्याला फाशी देऊ नका असा सरकारवर दबाव आणला होता. त्यासाठी पेज थ्रीवरच्या मान्यवरांनी स्वाक्षरी मोहिम करून राष्टपतींना निवेदन दिले होते. सरकारपुढे मोठा पेच होता कारण एका विशिष्ट समाजाचा आरोपी गुन्हेगार होता आणि उजव्या विचारांचे सरकार सत्तेवर होते. अल्पसंख्य समाजाच्या भावनांचा हे सरकार विचार करत नाही असा अपप्रचार सुरू होता. खरोखर एका निरपराध व्यक्तीला ती विशिष्ट समाजाची आहे म्हणून फाशी दिले जात आहे असा माहोल तयार केला जात होता आणि या स्फोटात ज्यांच्या जीवनाची राख रांगोळी झाली, ज्यांना कायमचे पंगू बनविले, ज्यांच्या जीवनात कायमचा अंधार झाला त्यांचा आवाज कुठेच नव्हता. जो होता तो क्षीण होता, त्याला न्यायाच्या दरबारात जागा नव्हती. तुषार यांनी यावेळी आपल्या आईला मृत्य़ूनंतर मुक्ती देण्याची तिच्यासारख्या असंख्य निष्पापांचा जीव घेणा-यांना शिक्षा देण्यासाठी ही धाडसी जबाबदारी स्वीकारली. नुसतेच देशभक्तीच्या चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करण्याची ही वेळ होती. त्यांनी शिवाजीपार्कच्या उच्चभ्रू वस्तीत टेबल मांडला आणि याकूबला फाशीच द्या या मागणीसाठी नागरीकांच्या स्वाक्षरी गोळा करण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान एका ९८ वर्षे वयाच्या आजोबांनी तेथे येऊन प्रेरणा दिली. तुषार सांगतात, “ ते म्हणाले आमच्या या भावना आहेत, की देशद्रोह्याला फाशीच व्हावी, पण स्वाक्षरी घेऊन या वयात आमची तुम्ही चेष्टा करु नका, या भावना योग्य त्या ठिकाणी पोचवा.” तुषार म्हणाले, त्यांच्या या शब्दांनी आम्हाला बळ मिळाले आम्ही या स्वाक्षरी राज्यपाल सी विद्यासागर राव यांना पोचविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही पूर्वकल्पना न देताना जाऊनही राजभवनात त्यांच्याशी राज्यपालांनी केवळ भेटच दिली नाहीतर त्यांच्या जीवनाचा संघर्ष समजावून घेतला. तुषार सांगतात की, “चाळीस मिनिटे राज्यपाल महोदय माझ्याशी बोलले आणि या कामात आता इथेच थांबू नका असा अजीजीचा सल्लाही त्यांनी दिला”. त्यांच्याच प्रेरणेने नंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटी घेतल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या नागरीकांच्या भावना केंद्र सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायलयापर्यंत त्यानंतर पोचविण्यात आल्या.

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालय मध्यरात्रीनंतर सुरू झाले आणि ऐतिहासिक निवाडा देण्यात आला. तुषार सांगतात त्या रात्री मनावर खूप ओझं होतं. ज्या जन्मदात्या आईच्या मरणाला कारणीभूत झालेले गुन्हेगार सुटावे यासाठी प्रतिष्ठीत व्यक्ती गुन्हेगारंच्या पाठिशी होत्या आणि दुसरीकडे सामान्य नागरीकांचा क्षीण आवाज होता. रात्री तीन वाजता केंद्रसरकारच्या एका मंत्री महोदयांचा फोन आला तुम्हाला न्याय मिळाला. याकूबची फाशी होणारच. असे ते म्हणाले.

तुषार सांगतात हे सारे होताना मला देशद्रोही लोकांचे फोनही आले. दुबईतून आलेल्या या धमक्या होत्या. ‘याकूबच्या फाशीच्या मोहिमेतून बाहेर नाही पडलात तर तुम्हालाही त्याच्यासोबत पाठवू’ असा त्या धमक्यांचा अर्थ होता. तुषार म्हणाले की, त्यावेळी कुठून तरी बळ मिळाले. त्यांना “तुम्हाला काय करायचे ते करा असे निडरपणाचे उत्तर मी दिले”. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांच्या मदतीने मग तुषार यांना पोलिस संरक्षण देण्यात आले तरी त्यांच्या निवासी भागात टोळक्यांनी काही विशिष्ट जमातीच्या गुन्हेगारांनी मध्यरात्रीनंतर येऊन दहशत निर्माण करण्याचे प्रकार होत राहिले. तुषार सा़ंगतात की, “हा लढा माझा एकट्याचा नव्हता या देशाच्या नागरीकांच्या न्यायाचा होता. जीवनाच्या अनेक वळणांवर लढताना माझ्या जन्मदात्या आईच्या कष्टाच्या जीवनाला ज्यांनी मध्येच नाहीसे केले त्यांच्या विरोधात न्यायासाठी दिेलेली ही हाक होती. तिला न्याय मिळाला याचे समाधान आहे.”

जीवनाच्या पुढच्या प्रवासाबद्दल सांगताना तुषार म्हणतात की, “रुचकर पदार्थ तयार करण्याची आवड असल्याने आणि वाहतूक व्यवसायाला पर्यायी काहीतरी व्यवसाय असावा यासाठी शेफ होण्याचा माझा प्रयत्न सुरू होता”. बल्लवाचार्य म्हणून ज्यांनी नाव मिळवले आहे त्या विष्णू मनोहरांसारख्यांनी कोणतेही व्यावसायिक शिक्षण नसताना केलेल्या पाककृतींचे कौतुक केले. त्यानंतर ‘फ्लेवर्स’ या उपहारगृहाची सुरूवात झाली. अनेक दूरचित्रवाहिन्यांसाठी खाद्यपदार्थाच्या माहिती देणा-या कार्यक्रमांसाठी एक बोलका शेफ त्यानंतर गवसला आहे. त्या दिशेने आता नव्याने प्रवास सुरू झाला आहे. माझ्या या जीवनाच्या संघर्षात माझा मित्र योगेश त्याचे आई-बाबा यांची मोलाची साथ मिळाली याचा उल्लेख ते वारंवार करतात.

आपल्या या धाडसी प्रवासाबाबत तुषार यांना कृतज्ञभाव व्यक्त करावेसे वाटतात, त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासात ज्यांनी त्याला साथ दिली त्या मित्रांना, नातेवाईकांना, सोबत करणाऱ्यांना ते धन्यवाद देतात. त्यांच्यातील उमदेपणा दिसून येतो. व्यवसाय हा भागीदारीतच असावा असे मत ते व्यक्त करतात, त्यामुळे अडचणीच्या काळात वेगळी दिशा देणारा आधार आपल्यासोबत असतो असा स्वत:चा अनुभवही ते सांगतात. नम्रपणाने आपला संघर्ष सांगताना त्यांच्या मनात या वाईट काळाचे ओरखडे जाणवतात, मात्र त्यातही एक संयमीपणा दिसतो. आपल्या आईची माया गमावलेला हा तरूण उद्योजक खाद्यानंदातून लोकांच्या आरोग्याची आणि जिभेची काळजी घेताना दिसतो. त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेताना मनात जुन्या मराठी सिनेमातील ओळी आपसूक येतात ‘मन शुध्द तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची,पृथ्वीमोलाची, तू चाल पुढे तुला रे गड्या भिती कुणाची? पर्वा बी कशाची?’

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte