उत्तरपूर्व भारतातील मावल्यान्नॉंग आशियात आणि देशात सर्वात स्वच्छ गांव!

0

मावल्यान्नॉंग जे मेघालय राज्यात वसले आहे, देशातील सर्वात स्वच्छ गांव ठरले आहे! येथे स्वच्छता नैसर्गिकपणे येते अगदी अबालवृध्दांपर्यंत!


Image Source: Amazing India Blog
Image Source: Amazing India Blog

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात स्वच्छतेच्या मुद्याला प्राधान्य दिले आहे, २०१५मध्ये आकाशवाणीवरील भाषणातून त्यानी मावल्यान्नॉंगला आदर्श स्वच्छ गाव म्हणून जाहीर केले.

शिलॉंगपासून शंभर किलोमिटर दूर असलेल्या या गावात संपूर्णत: वापरात असलेले शौचालय २००७पासूनच घरोघरी आहे, प्रत्येक घराबाहेर बांबूच्या कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत आणि अगदी झाडांची खाली पडणारी पाने देखील त्यात जमा केली जातात. धुम्रपान तसेच प्लास्टिकचा वापर यावर गावात सक्तीने मनाई करण्यात आली आहे. गावात तयार करण्यात आलेले नियम सर्वांना सारखेच लागू आहेत, आणि त्यात कसूर करणा-यांना दंड केला जातो. शौचालयातून निघणा-या मैल्याचा खत म्हणून वापर केला जातो. गावक-यांनी त्याची केवळ घरेच नाहीतर पदपथ आणि झाडेझुडपे देखील स्वच्छ ठेवली आहेत.

अबालवृध्द मिळून ही स्वच्छता दररोज करतात आणि शनिवारी गावाचे प्रमुख त्यांना विशेष कामगिरी देखील देतात जी आवश्यक असेल. हे जास्तीचे काम सा-या समाजाच्या भल्याचे असते आणि त्यामध्ये गावची शाळा स्वच्छ करणे आणि अश्याच प्रकारची कामे असतात. या गावांत स्वच्छतेचे महत्व गावक-याना त्यांच्या बालपणापासून मनावर बिंबविण्यात आले आहे.

विशेषत: या गावात खासी जमातीचे लोक राहतात, मावल्यान्नॉंग ही सुशिक्षित जमात आहे जे शंभर टक्के साक्षर आहेत. सुमारे सहाशेपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मावल्यान्नॉंग या गावाला २००३मध्येच आशियातील सर्वात स्वच्छ गांव म्हणून गौरविण्यात आले आणि त्यानंतर २००५मध्ये संपूर्ण भारतातील स्वच्छ गावाचा बहुमान देण्यात आला असे याबाबतच्या वृत्तात म्हटले आहे. स्वच्छतेप्रमाणेच या गावात शंभर टक्के साक्षरता, महिला सबलीकरण, ज्या गोष्टी आपण केवळ भविष्याची स्वप्ने म्हणून सांगतो त्या गोष्टी या गावाने प्रत्यक्षात आणल्या आहेत त्यामुळे हे गांव परमेश्वराचा बगीचा असल्याचा भास झाल्याशिवाय राहात नाही!