‘सेवा’ हेच व्यंकट तंत्र, सामाजिक उद्यमाचा मंत्र!

‘सेवा’ हेच व्यंकट तंत्र, सामाजिक उद्यमाचा मंत्र!

Thursday November 05, 2015,

4 min Read

समाजसेवेची इच्छा जेव्हा एखाद्याच्या दृष्टीने त्याच्या अभियानाचे, मोहिमेचे रूप घेते तेव्हा कितीतरी लोकांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हायला मदत होते. समाजावर त्याचा चांगला परिणाम होतो. गरजवंतांच्या मदतीला आम्ही सदैव तयार असले पाहिजे, हा सकारात्मक संदेशही यातून समाजात जातो.

व्यंकट स्वामी यापैकीच एक. स्वामी यांनी १९७६ मध्ये अरविंद आय केअर हॉस्पिटलला सुरवात केली आणि नेत्र रुग्णांची सेवा हेच आपल्या जिवनाचे ध्येय मानले.

जगभरात अंधांची संख्या ४५ दशलक्ष एवढी आहे. त्यात भारतीयांचे प्रमाण १२ दशलक्ष आहे. महत्त्वाचे म्हणजे ८० टक्के नेत्रसंबंधित समस्यांमध्ये उपाय शक्य आहे, पण नेमकी माहिती नसल्याने नेमक्या वेळेवर नेमका इलाज होत नाही आणि समस्या अधिक गुंतागुंतीची होते.

अरविंद आय केअर हॉस्पिटलमध्ये कमी खर्चात लोकांवर उपचार केला जातो. लोकांना नेत्रविकारांतून मुक्ती देणे, हेच या हॉस्पिटलचे मुख्य ध्येय आहे. नफा कमवणे, हा हेतू नाही. मूळ हेतू तर मुळीच नाही. हॉस्पिटल चालले पाहिजे, इतर नेत्ररुग्णांना अल्पदरात सेवा मिळत राहिली पाहिजे, असे. म्हणूनच या हॉस्पिटलमध्ये बहुतांशी गरिब लोकच इलाजासाठी येतात. इतरत्र त्यांना परवडत नाही.

तमीळनाडूतील मदुराई येथे सन १९७६ मध्ये ११ खाटांचे आय सेंटर सुरू केले तेव्हा व्यंकट स्वामी ५८ वर्षांचे होते. त्यांच्या या प्रयत्नाने आज लक्षावधी लोकांच्या आयुष्यात प्रकाशपर्व पसरलेले आहे.

व्यंकट स्वामी यांच्या वैकुंठवासाला १० वर्षे उलटलेली आहेत, पण आजही लोक त्यांच्या सेवाव्रताच्या स्मृती चाळवत असतात. देशातील सामाजिक उद्यमींच्या यादीत त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.

image


तुम्हालाही जर हक यशस्वी सामाजिक उद्यमी व्हायचे असेल तर निम्नलिखित बाबींवर नेहमी लक्ष ठेवत चला.

१) आकांक्षा ही साधनसामुग्रीपेक्षा महत्त्वाची

केवळ ११ खाटांच्या आय केअर सेंटरच्या बळावर व्यंकट स्वामी यांची ‘देशातला सर्वाधिक यशस्वी सामाजिक उद्यमी’ अशी ओळख प्रस्थापित झाली. ही गोष्ट खुप काही शिकवून जाणारी आहे. त्यांच्याकडे कुठलाही खजिना नव्हता. धंद्याचा प्लॅनही नव्हता. इतके पैसे जातील आणि इतके येतील, असे काहीही नियोजित नव्हते. दररोज ते शिकत गेले आणि दररोज आडाखे रचत गेले. एक चांगले आणि मोठे काम त्यांना उभे करायचे होते आणि माझ्याकडे त्यासाठी हे नाही, ते नाही म्हणून रडतही बसायचे नव्हते. जे आहे, त्यात भागवायचे होते आणि पुढे जायचे होते. ११ खाटांवरून एक एक अशी संख्या त्यांनी वाढवत नेली. जेव्हा खोल्या कमी पडू लागल्या, हळुहळू खोल्या वाढवत नेल्या. हॉस्पिटल छोटे पडू लागले तेव्हा नवे आणि भव्य असे हॉस्पिटल उभे केले. पुढे इतर देशांतूनही हॉस्पिटल सुरू केले. अर्थात या सगळ्या प्रवासात स्वामी यांनी सेवाव्रताशी तडजोड कधीही केली नाही.

२) जबाबदारी स्वीकारा आणि पार पाडा

जबाबदारी स्वीकारा आणि काम पार पाडा, हा यशस्वी सामाजिक उद्यमी होण्यासाठीचा एक मूलमंत्र आहे. जबाबदारी आधी घ्या, मग जे काही चुकीचे घडते आहे ते दुरुस्त करण्याचीही जबाबदारी घ्या. हे चुकीचे घडते आहे, असे निव्वळ म्हणून भागणार नाही, जे चुकीचे घडते आहे, ते दुरुस्त करावे लागेल. व्यंकट स्वामी यांनी असेच केले. हा करेल, तो करेल, असे कुणाच्याही भरवशावर ते राहिले नाही. रुग्णांच्या सोयी स्वत: बघितल्या. गैरसोयी स्वत: दूर केल्या. अंधांच्या जगात ते प्रकाशपर्व आणू इच्छित होते, एक नवे परिवर्तन घडवू इच्छित होते, त्यात त्यांनी यशही मिळवलेच.

३) मार्गदर्शकाची भूमिका चोख बजावणे गरजेचे

आपण काहीतरी चांगले करावे, अशी इच्छा अनेकांच्या मनात असते. पण ही इच्छा मनातच राहून जाते. प्रत्यक्षात येत नाही म्हणजे प्रत्यक्ष जगात येत नाही म्हणजेच अस्तित्वात येत नाही. तुम्हाला यशस्वी सामाजिक उद्यमी बनायचे असेल तर व्यंकट स्वामींप्रमाणे पुढाकार घ्यावा लागेल. नेतृत्व स्वीकारावे लागेल. इच्छा बाळगून चालणार नाही. अभियान चालवावे लागेल. असे पाउल टाकावे लागेल, की तुमच्या मागे पावलांची रांग लागली पाहिजे. यशस्वीरित्या पुढाकार घेणाराच जगात परिवर्तनाचे वारे आणतो, याला इतिहासही साक्षी आहे. दूरदृष्टी तर तुमच्यात असावीच लागेल. सोबतच इतर सर्वांनाच आपल्यासह घेऊन चालण्याचीही क्षमता असावी लागेल.

४) उत्कृष्ट ते सर्वश्रेष्ठ असा प्रवास आवश्यक

व्यंकट स्वामी यांनी उत्कृष्ट सुरवात केली. पहिल्या दिवसापासून उद्यमाचा दर्जा उत्कृष्ट ठेवला. नंतर त्यांची वाटचाल अशी राहिली, की अनेकांना ते मागे सोडत गेले. आज त्यांचा उपक्रम ते हयात नसतानाही आपल्या क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असा आहे. हे केवळ व्यंकट स्वामी यांची दृष्टी, चिकाटी, जिद्द आणि क्षमतेमुळेच शक्य झालेले आहे. तुम्हाला यशस्वी सामाजिक उद्यमी व्हायचे असेल तर चांगल्या व उत्कृष्ट अशा गोष्टींना सर्वश्रेष्ठ गोष्टींमध्ये बदलत न्यावे लागेल. तुमच्याकडे त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच साधनसामुग्री उपलब्ध असोत अगर नसोत. अभावांवर मात करत उणिवा भरून काढण्याचे कौशल्य तुम्हाला आत्मसात करावे लागेल. अर्थातच तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असणे त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे.

५) मूळ उद्दिष्ट असावे सेवा, पैसा... काय? येतोच!

पैशांच्या मागे न धावता लोकांच्या मदतीसाठी धावणे हे एका यशस्वी सामाजिक उद्यमीचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे. ते तुमच्यात असायला हवे. पैशांचे सोंग घेता येत नाही हे खरे आहे. सामाजिक उद्यमालाही पैसा लागतोच. पण सामाजिक उद्यमाच्या उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम ठरवताना सेवा ही प्राथमिक तर पैसा हा दुय्यम ठरतो, हे ध्यानी घ्यावे लागेल. व्यंकट स्वामी यांनी हेच केले. सेवेला त्यांनी पहिले महत्त्व दिले. रुग्ण दाखल झाला म्हणजे ते इलाज सुरू करत. रुग्णाकडे आपल्याला द्यायला पैसे आहेत, की नाही याचा साधा विचारही ते कधी करत नसत. रुग्णसेवेलाच त्यांनी स्वत:साठी धर्म म्हणून निवडलेले होते. रुग्णांमध्ये कशाच्याही आधारावर भेदभाव त्यांनी केला नाही. गरिब असो श्रीमंत असो सर्वांवर ते एकाच दृष्टीने इलाज करत, ती दृष्टी म्हणजे हा लवकर बरा झाला पाहिजे. या दृष्टीतूनच ते पैशाच्या मागे कधीही धावले नाही, पण पैसा मात्र आपसूकच त्यांच्या मागे धावत राहिला...