‘स्टार्टअप्स’च्या मदतीसाठी सुरू झाले आहे ‘स्टार्टअप’! ‘शॉपो’!!

2

नव उद्योजकतेला (स्टार्टअप) प्रोत्साहन देण्यासाठी सध्या विविध स्तरावर वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरू झाल्याचे पहायला मिळते. त्यात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या व्यतिरिक्त व्यावसायिकांच्या चेंबर्स सारख्या संस्थाच्या संघटना, आणि सेवाभावी संस्था देखील मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचे पहायला मिळते. मात्र नव्याने उद्योगात येणा-यांना व्यवसाय करताना काय अडचणी-समस्या येतात त्यांचा अभ्यास करून त्या दूर करणारे स्टार्टअप कुणी सुरू केल्याचे तुमच्या ऐकीवात नसेल ना?

परंतू ‘युवर स्टोरी मराठी’ तुम्हाला अशा आगळ्या वेगळ्या स्टार्टअप ची माहिती देणार आहे जे ‘नव उद्योजकांच्या मदतीसाठी वेबसाईटद्वारे मदत करते ! असे करताना नव्या खाद्य किंवा उत्पादन उद्योगाला लागणारा कच्चा माल खरेदीचा (रॉ मटेरियल परचेस) तसेच त्यांच्या उत्पादीत मालाच्या मार्केटींग आणि डिस्ट्रीब्यूशनचा मुख्य प्रश्न या स्टार्टअपने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. आहे की नाही जगावेगळे? स्टार्टअपला मदत करणारे स्टार्टअप? त्याचे नाव आहे शॉपो ‘shopho’. गोविंद मोघेकर यांनी या वेबसाईटद्वारे चालणा-या स्टार्टअपची संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेबाबत सांगताना ते म्हणाले की,


“ शॉपो सुरु करण्याच्या पूर्वी मी स्थानिक फूड सेक्टर मधल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची भेट घेतली. त्यांच्याशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या ज्याला स्टार्टअप च्या भाषेत ‘कस्टमर व्हॅलिडेशन’ ग्राहक मुल्यांकन म्हणतात.”

हे सर्वेक्षण करत असताना त्यांना दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात आल्या. पहिली म्हणजे त्यांना जो कच्चा माल लागतो तो त्यांना नेहमीच रास्त भावात आणि योग्य दर्जाचा मिळेल याची शाश्वती नसते. ज्यामुळे त्यांना त्यांच्या खाद्य पदार्थांच्या दर्जात ‘फूड क्वालिटी’ मध्ये फरक येतो आणि असे करणे त्यांना त्रासदायक होते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ‘रॉ मटेरियल’ खरेदी करण्यासाठी स्थानिक विक्रेते हाच एकमेव पर्याय असल्यामुळे दर वेळेस खरेदीची किंमत बदलत असते, म्हणजे  खेळते भांडवल गुंतवणूकीचा मुद्दा येतो जो सहन करणे त्यांना अवघड जाते. कारण त्यांच्या प्रत्येक वेळच्या खरेदीत त्यांचे जास्तीचे पैसे गुंतून जातात आणि त्यांच्याकडे बेताची आर्थिक स्थिती असते.


नव्या उद्योजकाला सर्वच बाजूने व्यवसायाची आव्हाने असतात त्यामुळे त्याला भांबावून जायला होते आणि अनेकदा स्टार्टअपना या समस्यांमध्ये गुंतून पडावे लागल्याने त्यांचा विकास रोडावतो. गोविंद मोघेकर म्हणाले की, “दुसऱ्या बाजूला आम्ही खाद्यक्षेत्रातील ‘फूड सेक्टर’ मधील काही स्थानिक ब्रँड, नवीन ब्रँड ना भेट दिली त्यांच्या सोबत चर्चा केल्यावर अजून काही बाबी समजल्या”.

ते म्हणाले की, ‘नवीन ब्रँड चांगले असतात तरीही त्यांची किंमत रास्त असूनही, दर्जा  उत्तम असूनही त्यांना बाजारपेठ मिळण्यात अडचणी येत असतात. याचे कारण शोधताना लक्षात आले की त्यांचा मार्केटिंग करण्याचा प्रयत्न अनेकदा अपूरा किंवा कमी पडतो.’

मोघेकर यांनी नव उद्योजकांशी चर्चा करताना विचारले तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की ते स्थानिक भागात ‘लोकल सप्लाय’ पुरवठा स्वतः करू शकतात परंतू त्यांना ‘मार्केटिंग’ अभावी मागे रहावे लागत आहे. त्यानंतर मोघेकर यांच्या चमूने नव उद्योजकांच्या या समस्यांवर शास्त्रीय पध्दतीने विचार केला आणि ठरवले की या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी एक ‘प्लॅटफॉर्म’ बनवायचा जो या दोन्ही समस्या सोडवू शकेल. आणि त्यांनी ‘शॉपो’ च्या प्लॅटफॉर्मची सुरुवात केली.

हा प्लॅटफॉर्म कसा काम करतो त्यावर सांगताना ते म्हणाले की, “फार सोप्या पद्धतीने हा मंच काम करतो, उदाहरणार्थ - एखाद्या रेस्टॉरंटला  कच्चा माल हवा आहे तर त्याने सरळ शॉपो वेबसाईटवर लॉग..इन करावे, ज्यामध्ये एक अर्ज भरायचा आहे, त्यात जे हवे असलेले ‘रॉ मटेरियल’ असेल त्यांचे नाव टाकल्यावर त्यांचे बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे ब्रँड आणि सोबत त्याच्या किमती दिसतील, जे ब्रँड हवे ते  निवडायचे आणि ते भरून त्यासोबत लागणारी संख्या (quantity) टाकून अर्ज सबमिट करायचा... झाले ! तुमचा ‘मटेरियल पार्टनर’ तयार झाला जो तुम्हाला तुम्ही सांगितलेल्या दर्जाच्या कच्च्या मालाची किफायतशीर हमी देणार जे तुमच्या आर्थिक नियोजनानुसार असेल, मुख्य म्हणजे तुमच्या उत्पादनाचा दर्जा कायम ठेवणारे आणि आर्थिक खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण करणारे नसेल. म्हणजे दोन्ही समस्यांचे समाधान झाले नाही का?!


‘Shopho’ च्या वेबसाईटवर दुसरा भाग म्हणजे ‘Shopho’ नवीन ब्रँडसाठी ‘ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग पार्टनर म्हणून काम करते. त्यांना बाजारपेठेमध्ये व्हिसिबिलीटी  मिळवून देण्यासाठी काम करते. कारण नवे उत्पादन बाजारात अनेकदा स्पर्धा असल्याने दिसूच दिले जात नाही. ‘Shopho’ सध्या ‘प्रॉडक्ट ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग’ साठी एक ‘डिजिटल टूल’ तयार करत आहे.

‘Shopho’ प्रायोगिक तत्वावर सुरु होऊन दोन महिने झाले. सुरुवातीच्या काळात थोड्याफार अडचणी आल्या पण हळूहळू लोकांना या मागची ‘आयडिया’ समजली आणि लोक वापरू लागले, असे मोघेकर म्हणाले. आतापर्यंत ‘Shopho’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जवळपास ४ लाखपेक्षा जास्त किमतीचे ‘रॉ मटेरियल’ विकले आहे, ५० पेक्षा जास्त ग्राहक या प्लॅटफॉर्म व्दारे त्यांचा कच्चा माल  घेत आहेत. ४० पेक्षा जास्त नवीन, स्थानिक ब्रँड ‘Shopho’च्या माध्यमातून त्यांचे ‘प्रॉडक्ट’ विकत आहेत.

शॉपोच्या या नव्या उद्योजकांना मदत करणा-या नवउद्योगात नागपूरच्या शशिकांत चौधरी  या एंजल इन्व्हेस्टर्सने गुंतवणूक केली आहे, त्यामुळे आणखी काही शहरातून शॉपोची संकेतस्थळाव्दारे सुरूवात करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

वेबसाईट : www.shopho.in