भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फूटबॉलपटू सध्या करतोय सुरक्षारक्षकाची नोकरी

0

भारतात ज्या प्रकारचा सन्मान क्रिकेटर्सना दिला जातो, त्या तुलनेत अन्य खेळाडूंना बाजूलाच सारले जाते जे दु:खद आहे. जे. मोहन कुमार यांची देखील हीच व्यथा आहे. एकेकाळी फूटबॉलचे मैदान गाजविणारे या माजी भारतीय आंतरराष्ट्रीय भारतीय टेलीफोन इंडस्ट्रीज (आय टीआय) डिफेंडरला उदरनिर्वाहासाठी सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करावी लागत आहे.

माऊंट कार्मेल महाविद्यालय बेंगळूरूच्या प्रवेशद्वारावर सुरक्षा करणा-या मोहन यांना पाहिले की, या देशाच्या कुचकामी व्यवस्थेचा आणखी एक बळी गेल्याचे जाणवते. जेथे जेत्यांना विस्मृतीत टाकले जाते आणि त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात खडतर जीवन कंठावे लागते.


त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून मोहन यांनी आयटीआयसाठी १९७७ मध्ये फेडरेशन चषक जिंकला, आणि गार्डन सिटी महाविद्यालयात ते फूटबॉल प्रशिक्षक होते असे एका वृतात म्हटले आहे. मात्र चमूत झालेल्या काही अडथळ्यामुळे त्यांना वेगळे व्यवसाय करावे लागले आणि चरितार्थ चालवावा लागला. आणि त्यातूनच ते एमसीसीच्या दरवाजांवर सुरक्षारक्षक म्हणून बसू लागले.

बंगळुरूला येणे कसे झाले त्यावर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ हा व्यवसाय गरजेचा होता आणि घरात बसून करता आला नसता. माझे काही मित्र येथे चालकाची नोकरी करतात. मी त्यांना विचारणा केली की माझ्या लायक काही काम असेल तर सांगा, त्यांनी मला सुरक्षा रक्षकांची नोकरी देवू केली. त्यांनी मला हे देखील सांगितले की ते माझ्यासाठी हे करत आहेत कारण मी एक फूटबॉलर आहे ज्याने अनेक स्पर्धा जिकंल्या आहेत. मी त्यांना म्हणालो की माझे जगणे कठीण आहे जर मी काहीच केले नाही. येथे मी ओळखपत्र तपासतो आणि खात्री करून लोकांना आत किंवा बाहेर सोडतो. हे महिला महाविद्यालय असल्याने माझे कर्तव्य आहे की येथील महिला सुरक्षित  राहिल्या पाहिजेत. मी याकडे माझ्या दर्जापेक्षा खूप काहीतरी वेगळे म्हणून पाहत नाही. हे केवळ माझे काम आहे आणि मला ते करताना आनंद होतो.”

त्यांच्या इतर उपलब्धींमध्ये, मोहन आणि त्यांच्या संघाने १९८०मध्ये स्टॅफोर्ड चॅलेज कपच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यांच्यातील असामान्य चमक असल्याने त्याना कोरिया, अफगणिस्थान आणि मलेशियात जावून खेळण्याची संधी मिळाली होती.

ते पुढे सांगतात की, “ मी घरात राहून हतबल झालो होतो. मी काहीच करत नव्हतो, आणि एक पैसाही न कमाविता राहू शकत नव्हतो. मी काचकूच न करता ही नोकरी स्विकारली आहे कारण यातून मला माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करता येतो. काही गोष्टी नव्याने सुरू होत असतात. मी येथे येणा-यांना स्मितहास्य करून स्वागत करतो.”

खरंच दुर्दैव आहे,  अनेक खेळाडू आहेत ज्यांनी देशाचा गौरव वाढविला जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात जगण्याचा संघर्ष करत आहेत.