अभिनेत्री स्मिता तांबेची नवी भरारी...

अभिनेत्री स्मिता तांबेची नवी भरारी...

Tuesday December 22, 2015,

3 min Read

सध्या हिंदी तसेच अन्य भाषिक कलाकार मराठी सिनेमामध्ये पदार्पण करत असतानाच मराठीतली एक अभिनेत्री हिंदी सिनेमामध्ये स्वतःचे पाय रोवण्याचा प्रयत्न करतेय. ही अभिनेत्री आहे स्मिता तांबे. कलाकाराच्या दिसण्यापेक्षा अभिनयाला महत्व देणारे आणि नवनवीन भूमिकांसाठी सतत आग्रही असणाऱ्या अशा प्रयोगशील सिनेमांमधल्या काही मोजक्या कलाकारांपैकी एक नाव म्हणजे स्मिता. स्मिता लवकरच आपल्याला दोन हिंदी सिनेमात दिसणार आहे. यापूर्वी तिने रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंगम रिटर्न्स या सिनेमातही छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारली होती.

“अननोन फेसेस या आगामी हिंदी सिनेमात मी पहिल्यांदाच मनोज बाजपेयी आणि कुमुद मिश्रांसारख्या मातब्बर कलाकारांसोबत काम करतेय, याशिवाय उमरिका या आणखी एका सिनेमात मी दिसेन, या सिनेमाची खासियत म्हणजे यात मी बुंदेलखंड भाषा बोलताना दिसणार आहे, यात माझ्यासोबत प्रतिक बब्बर, सुरज शर्मा, आदिल हुसेन नवाज सारखे कलाकारही दिसतील. मी यात प्रतिकच्या आईची भूमिका साकारतेय. या सिनेमाने नुकत्याच अमेरिकेत पार पडलेल्या सनडान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रेक्षक पसंतीचा पुरस्कार पटकावला.”

image


“मराठीच्या बाहेर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कलावर्तुळात मराठी कलाकारांकडे अत्यंत मानाने पाहीले जाते, या दोनही सिनेमांमध्ये काम करण्याचा अनुभव हा माझ्यासाठी खूप काही शिकवणारा होता, यांची आर्थिक गणितं, काम करण्याच्या पद्धती शिवाय सिनेमा बनल्यानंतर ते ज्या पद्धतीने सिनेमाला आणि यातल्या कलाकारांना प्रमोट करतात त्यामुळे आमच्यासारख्यांना संधीची नवनवी दालने खुली होऊ लागली आहेत. माझ्यासाठी तर मी आत्तापर्यंत केलेला प्रत्येक सिनेमा हा पुढच्या नव्या कामाची संधी निर्माण करुन देणारा ठरलाय. ”

सिनेमाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्मिताने काही वर्षांपूर्वी सोनियाचा उंबरा या मालिकेतनं मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते, पण स्मिताला खरी ओळख मिळाली ती जोगवा या सिनेमामुळे. तोपर्यंत खुदद् स्मिताही तिच्या कलाक्षेत्रातल्या या आवडीबद्दल अनभिज्ञ होती. उत्तम वक्तृत्व आणि स्टेजबद्दलची ओढ यामुळे योगायोगाने स्मिता श्रीमानयोगी या नाटकाशी जोडली गेली होती, तोपर्यंत तिच्या कुटुंबाला ती कॉलेज प्रोफेसर बनेल असेच वाटत होते. स्मिताने मात्र सुरुवातीला कुटुंबाच्या या इच्छेविरुद्ध अभिनयातनं स्वतःचे पॅशन शोधले. आणि आज ती एक गुणी अभिनेत्री म्हणून सर्वपरिचित आहे.

image


जोगवा या सिनेमातली तिची भूमिका ही तशी दुय्यम आणि लहानशी होती पण स्मिताच्या अभिनयाने त्याला चारचाँद लावले, यानंतर पांगिरा, इटस ब्रेकिंग न्युज, तुकाराम, देऊळ. कँडलमार्च सारख्या सिनेमातनं स्मिताने आपले अभिनय कौशल्य दाखवले. पण धूसर आणि अक्षय कुमारची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ७२ मैल सिनेमाने स्मिताला मुख्य अभिनेत्रीच्या यादीत बसवले.

“जोगवा, पांगिरा, ७२ मैल या सिनेमांचे दिवंगत दिग्दर्शक राजीव पाटील हे माझे या क्षेत्रातले पहिले मार्गदर्शक, कोणतेही पाठबळ नसताना त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सिनेमात अभिनयाची संधी दिली, यादरम्यान फक्त अभिनयच नाही तर मी त्यांच्यासोबत सिनेमाच्या स्क्रिप्टींग, कास्टींग, अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर सहभागी होते, ज्यामुळे सिनेमा कसा घडतो हे मला समजले. ”

image


“मी आत्तापर्यंत सिनेमातनं साकारलेल्या माझ्या प्रत्येक भूमिका या वास्तववादी आहेत कारण मला सिनेमा हे प्रबोधनाचे माध्यम वाटते, मनोरंजनाबरोबरच सामाजिक जागृतीही सिनेमातनं प्रभावीपणे करता येते, त्यामुळे भूमिका निवडताना मी त्याच्या सामाजिक बांधिलकीचाही विचार करते. नुकताच माझा परतु हा सिनेमा प्रदर्शित झाला, यात मी किशोर कदम यांच्यासोबत झळकलेय,”

हिंदीबरोबरच सध्या मराठी सिनेमाही खऱ्या अर्थाने जागतिक बनत चाललाय मग सिनेमाचा विषय असो त्याची मांडणी, त्यांचे प्रमोशनल फंडे या सगळ्याच स्तरावर मराठी सिनेमा अधिकाधिक प्रोगेसिव्ह बनतोय. सध्या स्मिता तिच्या या हिंदी सिनेमांमध्ये व्यस्त असली तरी तिने मराठीशी नाळ तोडली नाहीये. लवकरच गणवेश, अरुणा शानबाग या आगामी मराठी सिनेमातही ती महत्वाची भूमिका साकारताना दिसेल.