रेल्वेतली पहिली महिला अधिकारी, पद्मश्री पुरस्कार प्राप्त नृत्यांगना आणि कॅन्सरसारख्या आजारावर विजय मिळवणारी 'ती '

रेल्वेतली पहिली महिला अधिकारी, पद्मश्री पुरस्कार प्राप्त नृत्यांगना आणि कॅन्सरसारख्या आजारावर विजय मिळवणारी 'ती '

Wednesday November 25, 2015,

8 min Read

ती अखंड तेवणारी ज्योत जिचं तेज वादळी रात्रही मंदावू शकली नाही! ती पराभूत सैन्यातला उर्वरित एकमेव शस्त्रधारी सैनिक, निराशा आणि स्वप्नांच्या चुराड्यातही फुलणारं तिचं हास्य! आनंदा शंकर जयंत. तिच्या आयुष्यातल्या भल्याबुऱ्या अनुभवानंतर पुन्हा ठाम उभं राहणं अगदी क्वचितच काही जणींना जमेल. नृत्यामुळे त्यांच्या मनाला मिळणारा आनंद, शंकर आणि दुर्गाने त्यांना करवून दिलेल्या त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आणि त्यांची शक्ती. त्यांचा आयुष्यभराचा जोडीदार जयंत, या साऱ्याच्या साथीनं त्यांचा हा ध्येय मिळवण्याचा आणि प्रकाशमान होण्याचा प्रवास अतिशय सुखकर झाला. त्याचं जग त्यांच्यापासून हिरावून घेतलं जाणार होतं, त्या अढळ आणि ठाम उभ्या राहिल्या जोवर या आच्छादीत ढगांची गर्दी कमी होत नाही तोवर आणि त्यातून तावून सलाखून त्या बाहेर आल्या प्रखर सूर्यासारख्या !

image


आनंदा यांच्या शब्दात सांगायचं झालं तर पहिली तीन दशकं त्यांच्या आयुष्याला अर्थ दिला तो नृत्यानं आणि नृत्यामुळे त्यांना मिळाला अखंड आनंद. या नृत्यानं त्यांना नृत्य क्षेत्रात अधिक काहीतरी मिळवण्याचा ध्यास दिला आणि त्यानंतर नृत्य बनलं त्यांच्या अविर्भावाचा एक भाग, एक ओळख , आणि जगण्याला अर्थ. तेही अशावेळी जेंव्हा त्या आयुष्यातल्या एका चौरस्त्यावर उभ्या होत्या. ४ वर्षांची असताना त्यांची नृत्याशी ओळख झाली आईच्या गुडघ्याएवढी पोर होती ती त्यावेळी! आईने सांगितलं प्रयत्न कर. एक अंधुकशी आठवण त्यांना आठवते. ती म्हणजे तो क्षण माझ्या जगण्याचा माझ्या अस्तित्वाचा अर्थ सांगणारा होता. त्या म्हणतात, " माझी आई आणि या कलाविष्काराने मला अगदी लहानपणीच झपाटलं. त्या मंदिरात , त्या क्षणी मात्र मला जाणवलं नाही की नृत्य हे माझ्या आयुष्यातील शाश्वत उलगडण्याचं एक साधन बनेल."

चेन्नई मधल्या प्रसिद्ध कलाक्षेत्र या संस्थेत तब्बल ६ वर्ष त्यांनी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. सहसा अनेक जण तीन ते चार वर्षात हा अभ्यासक्रम सोडून मोकळे होतात. कलाक्षेत्रात असताना आणि नंतरही आनंदा निव्वळ भरतनाट्यमच नाही तर कर्नाटकी संगित , विणा, नट्टुवंगम, तत्वज्ञान आदी अभ्यासातही पारंगत झाल्या. त्यांना कुचीपुडी शिकण्याचीही संधी मिळाली आणि तीसुद्धा या क्षेत्रातल्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या पासुमुर्ती रामलिंग शास्त्री या गुरूंच्या मार्गदर्शानाखाली.

" मी १८ वर्षांची होते, एक उदयोन्मुख नृत्यांगना ! भारत सरकारतर्फे मला शिष्यवृत्ती मिळाली होती, भरतनाट्यम शिकण्यासाठी आणि अजूनही माझा हा अभ्यास सुरूच आहे , मी या अभ्यासावरून कधीच लक्ष विचलित होऊ दिलं नाही." कलाक्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरु म्हणून सहा लहान मुलींना नृत्य शिकवायला सुरुवात केली. पण त्यांच्या भवितव्यासाठी एखादं औपचारिक शिक्षण अत्यंत गरजेच असणार आहे, हे त्यांना पक्क माहीत होतं. " लोक म्हणतात की , तुमच्या पेन्शनपेक्षा पॅशनला महत्त्व द्या. पण मला असं वाटत की तुम्ही तुमच्या पेन्शनची व्यवस्था आधी करावीत आणि जेणेकरून तुमच पॅशन म्हणजेच आवडीच काम करायला सवड मिळते."

image


आनंदा यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली , त्यानंतर , कला, इतिहास आणि संस्कृती या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. केंद्रीय प्रशासकीय लोकसेवा आयोगाची माहिती त्यांना याच वेळी मिळाली. त्यांच्या मैत्रिणीसुद्धा याच परीक्षेची तयारी करत होत्या. तेंव्हा आनंदा निव्वळ विद्यापीठातूनच अव्वल नाही आल्या तर लोकसेवा आयोगाची परिक्षाही उत्तीर्ण झाल्या आणि दक्षिण मध्य रेल्वेतल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांची निवडही झाली. "या बातमीने सर्वच खुश झाले,पण माझी आई मात्र घाबरली ती म्हणाली तू हे का करतेयस? तुझं नृत्य संपून जाईल या साऱ्या गदारोळात. मी हा जो त्याग तुझ्यासाठी केलाय तो तू नृत्य सोडून द्यावस म्हणून नाही, " आनंदा आपल्या आठवणी सांगत होत्या . त्यावर त्यांनी आईला नृत्य कधीच सोडणार नाही, अशी ग्वाही दिली आणि त्याचा नवा नित्यक्रम सुरु झाला .

त्यांचा दिवस सुरु होई तो संपूर्णपणे पुरूषांचं जग असणाऱ्या रेल्वेच्या जगात त्या तिथे एकमेव महिला अधिकारी होत्या, जिथे आजवर लोकांना फक्त पुरुष अधिकाऱ्यांना पाहायची सवय होती , तिथे त्यांना एका महिलेला पाहून आश्चर्य होत असे, पुरुषप्रधान कामं, जसे ट्रेनचं परीक्षण, अपघात झालेल्या जागांची माहिती घेणं, कंट्रोल रूम सांभाळणं आदी कामे एखादी महिला करू शकते यावरच विश्वास नव्हता. कंट्रोल रूम ज्याठिकाणी त्यांना तांत्रिक अडचणी सांगायला दूरध्वनी येत असत तिथे फोन करणाऱ्यांना तर चुकून आपण अधिकाऱ्याच्या घरी फोन लावला की काय अशी शंका येई, तर घटनास्थळी गेलेल्या आनंदा यांना अनेक जण एखाद्या अधिकाऱ्याची मुलगी समजायचे. आनंदा सांगतात, "मी तिथे पुरुषांच्या जगातली एक स्त्री म्हणून कधीच गेले नाही. माझं स्त्रीपद मी घरीच ठेवून कामावर जायचे."

image


त्या नर्तिका म्हणून निपुण झाल्या आणि नृत्यात आत्ममग्न होऊन रमताना त्या अंतर्मनाच्या खोलवर कुपीत दडलेल्या अदृश्य वागद्त्तास साद देत असत. " त्यानंतर सुरु झाल्या वाटाघाटी , मित्र -मैत्रिणी , परिवार तर कधी स्वत:शीच. थोडसं स्वत:ला अधिक कष्ट देत काम आणि नृत्यसाधना या दोहोंना योग्य न्याय देण्याची तगमग सुरु झाली. पण सर्वकाही जमून आलं. मी दररोज तीन तास साधना करीत असे आणि सुट्ट्यांच्या दिवशी उजळणी.”

" श्री कृष्णं वन्दे जगत गुरु, बुद्धं सरणं गच्छामि आणि त्यागराज रामायणम, ताल -पत्र या त्यांच्या साधनेत लोककलेसोबतच आध्यत्मिक सांगड आहे . श्रुंगार दर्पणम आणि श्री राम नामम -एंत रुचीरा या रचनांमध्ये पौराणिकतेची सांगड होती." त्यांच्या ''व्हॉट अबाऊट मी ? ' या रचनेत कलाकाराच्या दृष्टीतून स्त्री-पुरुष विषमता या समस्येवर भाष्य करण्यात आलं.

वृत्तपत्रात नाव छापून येणं, पुरस्कार मिळवणं ही एव्हाना त्यांच्यासाठी सरावाची गोष्ट झाली होती. कारण त्यांच्या कलेची दखल विविध वर्तुळांमध्ये घेतली जात होती. नृत्य ही साधना समजून कलेवर प्रेम करणाऱ्या या साध्वीला भारत सरकारतर्फे पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आल आयुष्य असं शिखरावर असतानाच ती बातमी त्यांना मिळाली ज्यामुळं त्यांच्यापासून हे सारं काही हिरावून घेतलं जाणार होत .

" मी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मला माझ्या स्तनात एक गाठ जाणवली. काहीश्या अनेच्छेनेच मी चाचण्या करवून घेतल्या. मॅमोग्राफी करवून घेतली जी मी टाळत होते." दोन आठवड्यांच्या त्या दौऱ्याला त्या निघून गेल्या. चाचणीचे अहवाल त्यांनी आपल्या पतीकडे डॉक्टरांना दाखवण्यासाठी ठेवले होते. त्या परतल्यावर , त्यांना त्यांचे पती मुंबई हवाई अड्ड्यावरच भेटले, जे खरंतर हैदराबाद हवाई अड्ड्यावर थांबणं अपेक्षित होत. " मी त्यांना विचारलं , लग्नानंतर १७ वर्षांनी अचानक तुम्हाला माझ्याबद्दल प्रेम उफाळून कसं आलं? पण कुठेतरी आत चलबिचल कायम होती की काहीतरी अघटीत घडलेलं आहे."

image


" माझ्या मॅमोग्राफीला बारकाईने बघायला हवं, अस सगळेच सौम्यपणे सांगत होते , ज्याचा खरा अर्थ असा होता की स्तनातली ती गाठ कॅन्सरची किंवा घातक असू शकते ."

त्यांनी त्यांच्या पतीला घट्ट मिठी मारली आणि विचारलं की, संपल का सारं? त्यावर ते म्हणाले , " तुला वाटत नाही तोवर काहीच संपलेले नाही "

मी त्यावेळी तीन गोष्टी स्वत:लाच बजावल्या आणि त्याही अगदी मोठ्याने जेणेकरून मला माझ्याच वचनातून मागे हटता येणार नाही.

"एक : कॅन्सर हे माझ्या आयुष्यातलं फक्त एक पान असेल, मी त्याला माझ्या आयुष्याचं पुस्तक बनू देणार नाही."

"दोन: मी त्यातून तरुन निघेन, त्या दुर्धर आजाराला माझ्यावर स्वार होऊ देणार नाही . "

तीन : मी कधीच विचारणार नाही, मीच का ? किंवा मलाच का ? 

उपचाराची दिशा ठरली आणि त्या कँसरशी लढताना येणाऱ्या प्रत्येक अनुभवला सामोर जायला सज्ज झाल्या. पण डॉक्टरांना त्यांनी जुमानलं नाही ते म्हणजे नृत्यापासून काही काळ फारकत घेणे, म्हणजे जोवर उपचार सुरु आहेत तोवर, फारकत घेण्यामागचं कारण म्हणजे , केमोथेरपी आणि रेडिओलोजी या उपचार पद्धतीत चांगल्या पेशीही नष्ट होतात. म्हणजेच अगदी शिड्या चढल्यानंतरही तुम्हाला श्वसनाचा त्रास जाणवू शकतो. तिथे नृत्याचा सराव तीन तास करणं हे तर अगदीच अकल्पित होतं.

पण आनंदा आपल्या निर्णयावर ठाम होत्या. " तुम्ही तुमची कलेची साधना सोडलीत , तिथेच तुमचा मृत्यू झाला आणि मला असं थांबायचं नव्हतं." त्या सांगत होत्या. " मी माझ्या डॉक्टरांना विचारायचे कधी कधी आज माझा कार्यक्रम आहे , आपण या चाचण्या उद्या करूयात का ? त्यांना वाटायचं, मला वेड लागलंय म्हणजे उपचाराऐवजी ही नृत्याला अधिक महत्त्व देतेय " त्या आठवणीत रमल्या होत्या.

जुलै ७, २००९, त्यांच्या शस्त्रक्रियेचा दिवस ," मी शस्त्रकियेलाही तशीच सामोरी गेले जशी मी एखाद्या नृत्याच्या सादरीकरणापुर्वी जाते. मी पार्लर मध्ये गेले , म्यनिक्युअर, प्यॅडीक्युअर आणि केशरचनाही केली. ते एक वेगळ प्रेक्षागृह असेल जिथे मी नृत्य करीन त्या चाचण्या झाल्यावर मी तयार झाले, टिकली, लिपस्टिक ही लावली आणि डॉक्टरांना विचारलं, माझं सादरीकरण कसं होत? योग्य होतं का?"

शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसात त्या पुन्हा कामाला लागल्या. कार्यक्रमांची आखणी करणे, विद्यार्थ्यांना शिकवणे, जगभरातल्या दौऱ्यांची आखणी करणे. नृत्य साधनेनं त्यांना अप्रिय विचारांपासून तर दूर ठेवलंच पण कॅन्सरभोवतीच त्याचं आयुष्य घुटमळत राहणार नाही, याची खातरजमा केली आणि आयुष्य हे दुसऱ्या अन्य गोष्टींसाठी सुद्धा असतं, हे जाणवून दिलं. पण तशातही काही दिवस असे यायचे जेंव्हा वास्तव त्यांच्यासमोर भयाण रूप घेऊन उभं राहायचं, आणि त्यांना त्यांच्या आनंदाच्या डोहातून बाहेर खेचत तुकडे करून बाजूला फेकून द्यायचं. "

" सगळेच दिवस काही चांगले नव्हते. कधी कधी तीन दिवस मी फक्त आराम करायचे, चौथ्या दिवशी माझे पती मला बाहेर काढायचे आणि तुझ्या कामाला लाग असा आदेशच द्यायचे, आणि त्या दुर्धर विचारांपासून मला दूर ठेवण्याची ही त्यांची युक्ती होती."

त्यांच्या पतीने त्यांना एक सुंदर तुलना सांगितली होती, केमोथेरपीविषयी ते म्हणाले , " केमो हे तुझं अमृत आहे असं समज . तुला काय वाटतं? त्या अमृताचेही काही दुष्परिणाम असतीलच की ते नुसतच गोड कसं असेल?" त्यांना यादरम्यान आणखी एक नवं साधर्म्य मिळालं जे त्यांना माहित होतं पण या विकारादरम्यान त्यांची इच्छाशक्ती ताडताना त्यांना त्याचा नव्याने अर्थ उमगला. " मी केमोला जात असताना , माझ्या मनात एक प्रतिमा उमटली .''दुर्गा ' आक्रमक , अनेक भुजा धारण करणारी. आम्ही नेहमी नृत्यातून दुर्गादेवीला पुजायचो .पण त्यादिवशी मात्र मला दुर्गेचं प्रतिमा काही वेगळंच सांगून गेली . मंचावर विराजमान मूर्ती नव्हे तर आपल्यातली दुर्गा , मला स्वत:ला १८ भुजा आहेत असा भास झाला आणि त्या भुजा म्हणजे , माझे डॉक्टर, केमोथेरपिस्ट, ऑनकोलोजिस्ट , रेडिओलोजीस्ट, माझं कुटुंब, माझे पती , माझा कुत्रा, माझे नृत्य … आणि सिंह ? सिंह म्हणजे तू स्वत: तुझी शक्ती, नाही का ? तुझी आंतरिक आनंदी वृत्ती, तुझ्या मुळ रुपाची ताकत म्हणजे सिंह हे प्रतिक आहे "

image


सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपल्यातली विनोद बुद्धी कायम ठेवली. " मी हसायचे ! माझ्या या परिस्थितीवर स्वत:च विनोद करायचे. कारण तुम्ही ओशाळलात, तर लोक तुम्हाला अधिक ओशाळवाणं वाटायला मदत करतात . त्यामुळे आनंदी राहायची गुरुकिल्ली ही परिस्थितीबद्दल बोलत राहण्यात आहे. एकदा मी माझ्या विग शिवायच बाहेर गेले, एका अधिकारयाने मला विचारलं , " तिरुपती ?' मी म्हटलं ," नाही, केमोथेरपी"

त्या त्यांच्या विकाराबद्दल बोलायच्या आणि अगदी सहज बोलायच्या. त्यांचा TED talk म्हणजेच कॅन्सरवर तयार करण्यात आलेला संदेशपर व्हिडिओ हा भारतातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण मानला जातो. लवकरच सर्वाना कळलं, की त्या कुणी बळी पडलेल्या किंवा आपत्तीतून वाचलेल्या अशा महिला नाहीत तर त्या विजेत्या आहेत . आज त्या कॅन्सरमुक्त जीवन जगताहेत, रेल्वेतल्या पुरुषी जगात मॅडम म्हणून वावरतायत आणि नृत्य ही साधना सुरूच आहे, त्यांच्या नृत्याचे भाव त्यांच्या आनंदी वृत्तीची आणि जीवनाची गाथा सांगून जातात.

लेखिका – बिंजल शहा

अनुवाद – प्रेरणा भराडे

    Share on
    close