सौरउर्जेतून गरिबांचे जीवन उजळून टाकणारी ‘बेअरफूट पॉवर’

0


बॉटम ऑफ दि इकॉनॉमिक पिरॅमिड (बीओपी) अर्थात एकूण लोकसंख्येपैकी असा वर्ग जो अत्यंत गरीब आहे, ज्याचं वार्षिक उत्पन्न अत्यंत कमी आहे. या लोकांकडे कमी पैसा असल्याने ते मूलभूत गरजांवरच खर्च करतात. अशाच वस्तू खरेदी करतात ज्या त्यांच्या गरजांशी संबंधित असतील. त्यामुळेच या वर्गाकडे बाजारपेठेचंही फारसं लक्ष नसतं. त्यामुळे गरीब वर्गासाठी उत्पादन करताना कंपन्या थोडं मागेपुढे पाहतात आणि त्यांचा या वर्गावर विश्वासही नसतो. या वर्गाची क्रयशक्ती कमी असते आणि हा वर्ग नवीन आणि चांगल्या वस्तूंवर खर्च करत नाही असंही मानलं जातं. त्यामुळे या वर्गाला ध्यानात घेऊन केलेलं उत्पादन खूप कमी असतं. त्यातच कंपन्या अशाच वस्तुंचं उत्पादन करतात ज्यांची मागणी आहे आणि त्या घेण्यासाठी लोकांकडे पैसा आहे.


बाजारपेठेत या गरीब वर्गाविषयी नकारात्मक भावना असताना बेअरफूट पॉवर या ऑस्ट्रेलियन कंपनीनं २००५ मध्ये याच वर्गाला डोळयासमोर ठेवून कामाला सुरूवात केली. कंपनीने गरिबांच्या घरांना प्रकाशमान करण्यासाठी सौर दिवे बनवले. अल्पावधीतच कंपनीने प्रचंड प्रगती केली. आज ही कंपनी ३३ देशांमध्ये कार्यरत आहे. बेअरफूट पॉवर कंपनीने २०१२मध्ये भारतात प्रवेश केला आणि वेगानं विकास केला.


बेअरफूट पॉवर कंपनी सौरऊर्जेवर चालणारे दिवे बनवण्याचे काम करते. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन प्रकाशमान झाले आहे. आधी जिथे दिवे लावण्यासाठी रॉकेल वापरायचे तिथे आता सौरऊर्जेवर चालणारे दिवे वापरले जात आहेत. रॉकेलवर चालणाऱ्या दिव्यांमुळे पर्यावरणाची हानी होत होती तसेच हे दिवे महागही पडत होते. आता बेअरफूट पॉवरने बाजारात आणलेले सौर दिवे या गरीब वर्गाला किफायतशीर वाटत आहेत. रॉकेलच्या दिव्यांना हा चांगला पर्याय असून तो पर्यावरणपूरकही आहे.

जगातील एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के म्हणजे ३.७ बिलियन लोकसंख्या निम्न  वर्गात (बॉटम ऑफ पिरॅमिड) येते. यातील सर्वाधिक गरीब वर्ग हा भारत आणि चीनमध्ये आहे. त्यामुळेच कंपनीला भारतात प्रवेश करताच झालेल्या नफ्याचं हेही एक कारण आहे. कंपनीला मात्र दोन वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा झालाय. बेअरफूट पॉवरच्या भारतातील व्यवस्थापकीय संचालकपदी वर्नी सानू हे कार्यरत आहेत. भारतातील १५ राज्यांमध्ये बेअरफूट पॉवरची उपकरणं विकली जातात. या उपकरणांची निर्मिती चीनमध्ये होते तर डिझाईनिंगचे काम ऑस्ट्रेलियामध्ये केले जाते.


बेअरफूट पॉवर कंपनीची पाच तत्व आहेत.

ग्राहकांच्या गरजा लक्षात घेणे

प्रकाश मिळवण्यासाठी रॉकेलच्या दिव्यासारखे अयोग्य पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून बेअरफूट पॉवर काम करते. उजेड मिळवण्यासाठी रॉकेलचे दिवे हा चांगला पर्याय नसून त्यामुळे प्रदुषण तर होतंच पण डोळ्यांनाही त्याचा त्रास होतो. अशाप्रकारे रॉकेलचे दिवे वापरणाऱ्या वर्गाला कंपनी आपलं उद्दिष्ट बनवते.

ग्राहकांची क्रयशक्ती वाढवणे

ग्राहकांना कंपनीची उत्पादनं खरेदी करता यावी यासाठी कंपनीतर्फे मासिक हप्ते, सरकारी बँकांतर्फे कर्ज उपलब्ध करुन देणे, अल्पकर्ज देणे अशा सुविधाही दिल्या जातात. त्यामुळे या गरिबांना कंपनीची उत्पादनं सहज विकत घेता येतात.

लघुउद्योजकांमार्फत विक्री करणे

ग्राहकांपर्यंत आपली उत्पादनं सहज पोहोचावीत यासाठी बेअरफूट लघुउद्योजकांमार्फत आपली उत्पादनं विकत असते. बेअरफूट पॉवरने केवायव्हीए या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या संस्थेशी करार केला आहे. ही संस्था छोट्या संस्थांना कर्ज पुरवठा करते.

एका चांगल्या वितरण व्यवस्थेची निर्मिती

बेअरफूट पॉवरची स्वत:ची लॉजिस्टिक कंपनी आहे जी ब्लू डार्टसारख्या एका लॉजिस्टिक कंपनीशी संलग्न आहे. कंपनीची ९० टक्के उत्पादनं अशा ग्रामीण भागात जातात जिथे दुसरी कंपनी उत्पादने घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे कंपनीला हे काम स्वत: करावं लागतं.

ग्राहकांच्या गरजा समजून घेणे

बेअरफूट पॉवर नेहमीच आपल्या ग्राहकांच्या गरजा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते, तसेच ग्राहकांना कंपनीकडून ज्या सुविधांची अपेक्षा असते त्या देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीचे ग्राहक आता कंपनीकडे सौर दिव्यांनंतर फोन चार्जर, पंखे आणि टीव्हीचीही मागणी करु लागले आहेत.

या सगळ्यामुळेच कंपनी चालवण्याचा खर्च खूप कमी आहे. कंपनीची फक्त ८ ते १० लोकांची एक छोटी टीम आहे. ग्रामीण भागातील लोकांना प्रशिक्षित करण्यावर कंपनीचा भर आहे. आपल्या दर्जेदार उत्पादनांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यातूनच कंपनीची आपोआप जाहिरात होते. कंपनी भागीदारीवर भर देते. ग्रामीण भागात ज्यांचं नाव आहे आणि ज्यांचे परिचय आहेत अशा लोकांना भागीदार म्हणून कंपनी प्राधान्य देते. यामुळे कंपनीचा विपणन खर्च एकदम कमी होतो आणि नफा आणखी वाढतो.

भारतात मिळालेल्या प्रचंड यशामुळे कंपनीचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे आणि लवकरच कंपनी नवीन उत्पादनं घेऊन येत आहे. तसेच आतापर्यंत कंपनी अल्प उत्पन्न गटावर लक्ष केंद्रीत करीत होती पण आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं यासाठी कंपनी मध्यमवर्गीयांसाठीही उपकरणांची निर्मिती करणार आहे.


आज कंपनीनं अपेक्षेपेक्षा तीनशे पटींनी प्रगती केली आहे, याचं मुख्य कारण फक्त उत्पादनाची गुणवत्ता नसून त्याचे सामाजिक संदर्भही या प्रगतीला कारणीभूत आहेत.