नोटबंदी फसली, मोदी आणि त्यांच्या पक्षाने सामान्य जनतेच्या मनातील अपेक्षा आणि विश्वासही गमावला!

नोटबंदी फसली, मोदी आणि त्यांच्या पक्षाने सामान्य जनतेच्या मनातील अपेक्षा आणि विश्वासही गमावला!

Monday December 12, 2016,

7 min Read

८०पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, सामान्य माणसाला प्रचंड त्रास झाला. अर्थव्यवस्थेला धक्का लागला आहे, बँकींग प्रणाली कोसळून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अर्थतज्ज्ञ आणि जाणकार सांगतात की, भविष्य खूप अस्थिर आणि अनिश्चित झाले आहे, काळा पैसा सापडण्याची संभावना फारच कमी झाली आहे, मात्र तरीही पंतप्रधान मोदी यांच्या मनात अपराधीपणाची भावना दिसत नसून कोणत्याही स्थितीत ते या नोटबंदीचा फेरविचार न करण्याच्या मताचे दिसत आहेत. मोदी यांच्या कार्यकाळातील हा आता पर्यंतचा सर्वात वादग्रस्त निर्णय ठरण्याची शक्यता आहे. जर मूळ हेतू काळा पैसा बाहेर काढणे हा होता आणि जे काळ्या पैशाशी संबंधित होते त्यांना धडा शिकवणे हा होता तर ते काही अजूनतरी होताना दिसत नाही. या मध्ये हे देखील औत्सुक्याचे आहे की हे सारे करण्यासाठी त्यांनी हाच वेळ का निवडला? आणि कोणतीही पूर्वतयारी न करताच हे सारे का केले? अश्या प्रकारच्या धक्कादायक कल्पना राबविताना ज्या प्रकारचे नियोजन केले पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे ती घेतलीच नाही, जवळपास महिना उलटून गेला आहे आणि तरीही फार काही तयारी केली असल्याचे दिसून येत नाही त्यावरून हा सारा कारभार अनागोंदीचा असल्याचे दिसून आले आहे.

जी वेळ निवडण्यात आली त्याबाबत बाहेर ब-याच प्रकारच्या कारस्थानी बाबींच्या चर्चा होत आहेत, त्यापैकी एक चर्चा अशी सुरू आहे की, मोदी यांनी दोन मोठ्या घराण्यांचा फायदा व्हावा यासाठी हे सारे करण्यात आले ज्यांच्याकडून निवडणूकीत मोदी यांनी मोठ्या प्रमाणात पैसा घेतला आहे. हे असे काम आहे त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी निराश होतील आणि नामोहरम होतील. यात आणखी असे देखील सांगितले जाते की उत्तरप्रदेशच्या निवडणूकीत जेथे त्यांना लोकसभेत ७३ जागा मिळाल्या होत्या, तेथे त्यांची लोकप्रियता रसातळाला गेली आहे. जाणकाराच्या मते मोदी यांनाही हे माहिती आहे की त्यांनी दिलेली मोठमोठी आश्वासने ते पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे लोक नाराज झाले आहेत, निम्मा कार्यकाळ संपला आहे आणि हाती करुन दाखवले असे सांगता येणारे काही नाही त्यामुळे काहीतरी जबरदस्त प्रतिमा संवर्धनासाठी करणे आवश्यक आहे.

image


निवडणुकांच्या काळात त्यांनी काळापैसा बाहेर काढण्याबाबत आश्वासने दिली होती. मात्र मागील अडीच वर्षात त्याबाबत फारसे काही केले नाही, त्याच्या आश्वासनाच्या बाबतीत ते गंभीर नसल्याचे त्यात दिसून आले होते. दुसरी चर्चा अशी आहे की, त्यांच्या मनाप्रमाणे आर्थिक क्षेत्रात फारसे काही घडले नाही, त्यातून २०१९च्या निवडणुकांत फार काही प्रगती केली असे त्यांना दाखविता येणार नाही हे दिसू लागले आहे. ज्यावेळी ते दुस-यांदा प्रचारासाठी बाहेर पडतील त्यावेळी नोटबंदीमुळे त्यांना सार्वजनिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध होईल आणि मतदारांच्या त्या वर्गात हा पैसा सहजपणे फिरवता येईल ज्यातून लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्यासारखे वाटेल आणि ते पुन्हा मत देण्यास राजी होतील.

अजूनही नेमके कारण काय ते सांगता येत नाही, एक मात्र नक्कीच सांगता येईल की त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार हुकूमशाही वृत्तीने वाईट काळात श्रीमती इंदीरा गांधी यांनी जसे निर्णय घेतले होते तसे निर्णय घेण्याची स्वत:ची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. मोदी यांच्याप्रमाणे श्रीमती गांधी यासुध्दा स्वत:च्या निर्णयाबाबत ठाम, जिद्दी आणि महत्वाकांक्षी होत्या. ज्यावेळी प्रथम त्यांना कॉंग्रेस पक्षाच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवार म्हणून मान्यता मिळाली त्यावेळी त्यांना ‘गुंगी गुडिया’ (मूकी बाहूली)म्हणून संबोधित केले जात होते. केवळ विरोधी पक्षात असलेल्या राम मनोहर लोहिया सारख्या नेत्यांनीच नाही तर त्यांच्याच पक्षाचे काही ज्येष्ठ नेते आणि अधिकारी सुध्दा तसे संबोधित असत. एल. के. झा, पंतप्रधानांचे स्वीय सचीव यांनी त्यांबाबत नंतर एका ठिकाणी म्हटले आहे की, “सुरुवातीला श्रीमती गांधी खूपच वेगळ्या होत्या, खासदार म्हणून तर अगदीच अयोग्य होत्या.” त्यांना संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून निवडण्यात आले याचे कारण त्या नेहरूंच्या वारश्यातील होत्या म्हणून नाही तर त्यांच्यावर सिंडिकेट मधील नेत्यांना नियंत्रण ठेवणे सोपे जाणार होते म्हणून.

मोदी यांच्याबाबत अशी काही स्थिती नव्हती. ते त्यांच्या स्वत:च्या हिमतीवर नेते झाले, अगदी सुरुवातीला गुजरातचे मुख्यमंत्री झाले त्यावेळेपासून ते स्वत:ला पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून चालवित होते, त्यासाठी फारसे कुणाचे समर्थन नसताना नव्हे त्यांना रास्वसंघातून टोकाचा विरोध असतानाही. ते सर्वकाही होते आणि आहेत मात्र गुंगी गुडिया नाहीत. त्यांची प्रतिमा सुरुवातीपासून अशीच सांगण्यात येते की, मोदी हे सक्षम नेते आहेत. असे सांगतात की, त्याना प्रतिकूल स्थितीत काम करायला जास्त मजा येते, भारतीय राजकारणात एकेकाळी त्यांना खलनायक म्हणूनही रंगविण्यात आले होते, भारतीय राजकारणात कोणत्याही नेत्याला व्हिसा नाकारला गेला नव्हता, गुजरातमध्ये असे वातावरण होते की ते दुस-यांदा निवडून येतात की नाही याची शक्यता नव्हती, अगदी श्रीमती गांधी यांच्याप्रमाणेच त्यांच्याही बाबत साशंकता होतीच, मात्र कितीही त्रास असले तरी तो जुगाराचा डाव ते जिकंले होते.

६०च्या दशकात ज्यावेळी श्रीमती गांधी यांना वाटले की,निलम संजीव रेड्डी राष्ट्रपती झाले तर त्यांना पंतप्रधानपद मिळवणे सोपे ठरणार नाही, त्यांनी मोठा राजकीय जुगार खेळायची तयारी केली, त्यांनी पक्षातील नेत्याच्या विरोधात अपक्ष लढणारे व्हिव्ही गिरी यांना पाठिंबा जाहीर केला. ही श्रीमती गांधी यांनी स्वत:ची आणि पक्षातल्या नेत्यांची घेतलेली सत्वपरिक्षाच होती. ज्यावेळी पहिल्या फेरीत गिरी यांना अपेक्षित मते पडली नाहीत त्यावेळी सारे चिंतीत झाले मात्र त्या म्हणाल्या होत्या की, “काळजी करू नका याचा अर्थ ही लढत कठीण आहे पण मी तयार आहे”. शेवटी गिरी विजयी झाले, आणि त्यानंतर कॉंग्रेसमध्ये फूट पडली. त्यांना पंतप्रधानपदावरून दूर करण्याचेही प्रयत्न झाले मात्र त्यांनी पुन्हा केवळ स्थान मिळवले नाहीतर बहुमताचा जनाधार मिळवला आणि अविश्वास ठरावालाही समो-या गेल्या. त्यांनी त्या जश्या लोकांना वाटल्या होत्या त्यापेक्षा जास्त ताकदीने स्वत:ला सक्षमतेने सिध्द करून दाखवले होते.

श्रीमती गांधी यांनी त्यांच्या वरिष्ठांशी असलेल्या वादाला तत्वज्ञानाचा मुलामा दिला. सिंडिकेट मधील बहुतांश नेते उजव्या विचारसरणीचे होते. मोरारजी देसाई, एस निजलिंगप्पा, के कामराज, स.का पाटील, अतुल्य घोष यांच्यासारखे दिग्गज नेते त्यांच्या बाजूने होते मात्र तो भूतकाळ होता. श्रीमती गांधी यांनी वेगळी खेळी केली. त्यांना माहिती होते की नेहरुकन्या म्हणून त्यांना पक्षात सहानुभूती आणि झुकते माप होते. तो शितयुध्दाचा काळ होता. जगाची दोन भागात वर्गवारी झाली होती. डाव्याना सोविएत युनियन जवळची होती, आणि त्यांच्या शक्तिला भारतीय राजकारणात महत्व होते. त्यानी समाजवादाचा मार्ग निवडला. त्यांनी दोन मुद्यावर काम केले त्यातील एक बँकांचे राष्ट्रीयकरण होते, आणि दुसरे जुन्या प्रथा आणि परंपराचे उच्चाटन. आणि त्यानंतर ज्यावेळी त्यांच्या विरुध्दची कारस्थाने थांबली नाहीत त्यावेळी त्यांनी लोकसभा भंग केली आणि निवडणुकांना सामो-या गेल्या ज्यात त्या २/३ मतांनी विजयी झाल्या. त्यांची घोषणा होती ‘त्यांना मला घालवायचे होते पण मला मात्र गरीबी हटवायची होती’. (ते सांगतात इंदिराला हटवा पण मी सांगते की मला गरिबी हटवायची आहे.) आज त्या इतिहास बनल्या आहेत, तो काळ संपला आहे. त्या स्वत:च्या भाग्यविधात्या होत्या.

मोदी सुध्दा तीच क्लुप्ती चालवत आहेत. ते असे भासवत आहेत की ते काळ्यापैशा विरुध्द लढत आहेत, आणि विरोधक त्यांच्या विरोधात भांडत आहेत. ते भ्रष्टाचाराविरुध्द लढत आहेत पण विरोधकांना त्यांनाच घालवायचे आहे. श्रीमती गांधी यांच्यासारखेच मोदी नशिबवान आहेत कारण त्यांचा पक्ष सोबत आहे आणि त्यात त्यांच्या विरोधात कुणी बोलत नाही. नव्हे त्यांच्या बाजुने सारे आहे त्यांचा दबदबा आहे. नोटबंदीच्यावेळी जेंव्हा विरोधक रक्त जाळीत होते, आणि त्यांनी संसदेत आणि बाहेर गंभीर आरोप सुरु केले त्याच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचे समर्थन करताना दिसत होते. त्यामुळे त्यांच्यापासून त्यांना आता काही विरोध होणार नाही. पण काही गोष्टी अजूनही त्यांच्या मनासारख्या होताना दिसत नाहीत, ते म्हणाले होते की पन्नास दिवसांत सारेकाही सुरळीत होईल. त्यांनी देशाच्या नव्या पायाभरणीची सुरुवात केल्याचे लोकांना आवाहन केले होते. पन्नास दिवस फार होतात. सरकार त्याचे उद्देश आणि आदेश दोन्ही सातत्याने बदलताना दिसत आहे. आता ते कँशलेस सोसायटीबद्दल बोलू लागले आहेत. आता त्यांनी नवी स्वप्ने विकण्यास सुरुवात केली आहे.

यामध्ये जे समजले नाही ते असे की, स्वप्ने त्यावेळी विकली जातात ज्यावेळी त्यात खरोखर काही तथ्यांश असतो आणि प्रामाणिकपणे ती दाखवली जातात. नोटबंदी फसली आहे. यातून नवी समांतर व्यवस्था निर्माण झाली आहे. भ्रष्ट बँक अधिका-यांची मोठी फौज तयार झाली आहे ते मध्यस्थ आणि दलाल म्हणून काम करताना दिसत आहेत. भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे बगलबच्चे यांनी नव्याने काही जणांना पुढे केले आहे जे उघडपणे काळ्याचे पांढरे करून देत आहेत आणि सरकार हताशपणे सारे पहात आहे. मोदी यांना स्वत:ला भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ अशी प्रतिम तयार करायची आहे, पण दुर्दैवाने त्यांच्याच पक्षाने अद्याप पर्यंत ८०% निवडणूक निधी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देवूनही कसा मिळवला ते सांगण्यास नकार दिला आहे. त्यांना लोकपालची नियुक्ती करायची इच्छा नाही, आणि आता त्यावरही सर्वोच्च न्यायालय प्रश्न उपस्थित करत आहे. त्यांनी संसदेला सामोरे जाण्याचे धाडस दाखवले नाही, ते केवळ सदनाच्या बाहेर बोलत आहेत. त्यांचे समर्थक केवळ सामान्य माणसांना उपदेश देत आहेत, जे बँकेच्या रांगेत उभे तासंतास उभे आहेत. इंदिरा यांना यश मिळाले कारण त्यांनी सामान्य माणसांच्या विश्वासाला धक्का लावला नव्हता, पण दुर्देवाने मोदी यांनी तो पायदळी तुडवला आहे आणि त्यामुळे ते विश्वास गमावत चालले आहेत.


(वरिष्ठ पत्रकार आशुतोष हे आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. या लेखातील त्याच्या मतांशी यअर स्टोरीचे संपादक सहमत असतील असे नाही.)