सेंद्रीय शेतीमाल शेतातून थेट तुमच्या दारात : 'वुई से ऑरगॅनिक' !

सेंद्रीय शेतीमाल  शेतातून थेट  तुमच्या दारात : 'वुई से ऑरगॅनिक' !

Tuesday November 03, 2015,

2 min Read

सध्या जमाना हा ऑरगॅनिकचा आहे. म्हणजे आपण जे काही खातोय ते योग्य ना? हे वारंवार तपासून घेतलं जातंय. रोजच्या भाज्या आणि फळांच्या बाबतीत जरा जास्तच काळजी घेतली जातेय. कारण आहे शेती आणि फळबागांमध्ये होणारा रासायनिक खतांचा वापर. या खतांमुळं आरोग्यावर घातक परिणाम होतोय. अनेकदा कॅन्सरसारखे रोगही होतात. त्यामुळं ही काळजी घेणं सहाजिकच आलं. यातूनच मग सेंद्रीय पध्दतीनं शेती करण्यावर जास्त भर देण्यात येतोय. सध्या या सेंद्रीय भाज्या आणि फळांची मागणी वाढलेय.

image


पुण्याच्या सुरेश पाटील यांनी सेंद्रीय शेती करणारे शेतकरी आणि तो शेतमाल खरेदी करणारे ग्राहक अशा दोघांना एकत्र आणण्याची मोहिम उघडलीय. या मोहीमेला नाव देण्यात आलंय. 'वुई से ऑरगॅनिक'. वुई से ऑरगॅनिकच्या माध्यमातून हा सेंद्रीय शेतीमाल शेतातून थेट तुमच्या घरी पोचवण्याची सोय करण्यात येणारेय. येत्या जानेवारी महिन्यापासून ही सेवा पुण्यात सुरु होणारेय. यासाठी सध्या सदस्य नोंदणीचं काम मोठ्या धडाक्यात सुरु झालंय. गेल्या दोन महिन्यात सुरेश पाटील यांनी दीड हजाराहून अधिक सदस्य नोंदणी केलीय. जे शेतकरी सेंद्रीय शेती करतात त्यांनाही नोंदणी करावी लागणारेय. त्यानुसार आपण आपल्या शेतात नक्की कोणती भाजी किंवा मग फळं घेतो याची यादीच द्यावी तयार करण्यात आलीय. रोजच्या स्वयंपाकात लागणा-या भाज्या फळं यांचा यात समावेश आहे. वुई से ऑरगॅनिकच्या माध्यमातून आठवड्यातून एकदा हा माल घरपोच दिला जाणारेय. यासाठी वुई से ऑरगॅनिक युजर्स क्लबची स्थापना करण्यात आलीय. या क्लबद्वारे सेंद्रीय पिकं आणि फळभाज्या खाणे आरोग्याला फायदेशीर कसं आहे याचा प्रचारही केला जाणार आहे.

image


सुरेश पाटील म्हणतात "बहुतांश आजार हे दुषित पाणी आणि अन्नाद्वारेच होत असतात. बहुतेक घरात पाणी शुध्द करण्यासाठी वॉटर फिल्टर वॉटर प्युरिफायरचा दररोज वापर केला जातो. प्यायला शुध्द पाणी हवं मग खायला शुध्द फळभाज्या, पालेभाज्या आणि फळे का नको? रासायनिक खतांचा वापर केल्यानं लिव्हर, किडनी आणि कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात यासाठीच वुई से ऑरगॅनिकची सुरुवात करण्यात आलीय. सेंद्रीय पध्दतीनं पिकवलेल्या वस्तूच आम्ही ग्राहकांपर्यत पोचवणार आहोत.

image


सध्या पुण्यात हा उपक्रम राबवण्यात येणारेय. शहरातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन सर्वेक्षण करण्यात आलं.त्यानंतर ज्यांना अशा पध्दतीच्या शुध्द भाज्या हव्यात त्यांना सदस्य करुन घेतलं जाणारेय. सर्वसाधारणपणे आठवड्याभराच्या भाज्या सुरुवातीच्या काळात देण्यात येणार आहेत. ग्राहकांची संख्या वाढताच ही सेवा दररोज ही देण्यावर विचार सुरु आहे. वुई से ऑरगॅनिकचे कार्यकर्ते घरपोच ही सेवा पुरवतील. पुण्यातला प्रयोग यशस्वी झाल्यास नाशिक आणि मुंबई सारख्या शहरात ही वुई से ऑरगॅनिक युजर्स क्लब सुरु करण्याचा सुरेश पाटील यांचा मानस आहे.