अव्यक्त मनातला संघर्ष माझ्या फिल्ममेकींगची प्रेरणा - दिग्दर्शक नागराज मंजुळे

0

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला फँड्री या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उत्तम व्यवसाय केलाच पण या सिनेमामुळे पहिल्यांदाच मराठीत एक अनोखी प्रेमकथा तेवढ्याच अनोख्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला गेला. ज्याचे श्रेय अर्थातच सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे याचे होते. नागराजचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला व्यवसायिक सिनेमा. पण दिग्दर्शनाचा त्याचा हा पहिलाच अनुभव नव्हता. कौतुकाची बाब म्हणजे फँड्री या सिनेमाला ६१ व्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेलेच पण त्यापूर्वी नागराजचेच लेखन दिग्दर्शन असलेल्या पिस्तुल्या या लघुपटालाही ५८ वा राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला होता.

नागराजच्या मते “येणारे पुरस्कार, मान-सन्मान किंवा प्रेक्षकांची पसंती ही कधीच कलाकारांच्या हातात नसते, त्याने फक्त स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत रहावे, मी ही तेच करत होतो आणि करत राहील. त्यामुळेच मला माझ्या कामाचे कधीच दडपण येत नाही. पण या सन्मानांमुळे प्रेक्षकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढतायत, याची मात्र मला पुरेपूर जाणीव आहे”

माझ्या कलाकृती प्रेक्षकांना आवडतात कारण त्या माझ्या आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यावरुन प्रेरित असतात, असे तो मानतो. “फँड्री ही खरेतर माझी स्वतःची कथा आहे, मी करमाळा तालुक्यातल्या जेऊर या एका छोट्याशा गावातनं आलोय, ग्रामीण भागातल्या जातिव्यवस्थेचे रखरखीत वास्तव मी अनुभवलेय. कदाचित त्यामुळेच फँड्री सिनेमातनं मी हा विषय प्रभावीपणे मांडू शकलो.

आजही आपल्या देशात आपल्या पहिल्या नावापेक्षा आडनावाला जास्त महत्व दिले जाते. धर्म, जातिव्यवस्थेवर आधारलेली आपल्या देशाची ही विचारप्रणाली बदलायला अजून खूप वेळ लागेल, फँड्री हा या बदलाच्या दिशेने मी उचललेले एक छोटे पाऊल असेल.”

“मला अनेकदा विचारले जाते की तू फिल्ममेकिंग शिकलाय का, तेव्हा मी त्यांना सांगतो की मी फिल्म जगलोय, आणि ते जगतानाचा संघर्ष मला या क्षेत्रात घेऊन आलाय. म्हणजे करमाळ्याच्या सागर थिएटरमध्ये अमिताभ, मिथुन यांचे सिनेमे पहाणे, पैसे असतील तर तिकीट काढून आणि पैसे नसतील तर चोरुन पण सिनेमा पहायचा, सिनेमातल्या एखाद्या भावूक सीनवर ढसाढसा रडणारा मी. अनेकदा सागर थिएटरच्या गार्डने आम्हाला तिकीट नाही म्हणून पकडलंय आणि तिकडच्या जनरेटर रुममध्ये डांबलंय. पण तिथेही अंधारात जनरेटच्या आवाजात आम्ही सिनेमा पहायला धडपडायचो.”

खूप कमी जणांना माहितीये की नागराज हा एक उत्तम कवी आहे. त्याच्यासाठी कविता हे त्याचं व्यक्त होण्याचं माध्यम आहे. कळत्या वयात जेव्हा मनात खूप काही साचलेलं असायचं, व्यक्त व्हावं वाटायचं तेव्हा तो स्वतःची दैनंदिनी लिहायचा, दैनंदिनी लिहिता लिहिता त्याच्याही नकळत तो चारोळ्या लिहायला लागला, या चारोळ्यांचं कवितेत रुपांतर झालं. खरेतर नागराजची ही अव्यक्त मनोवस्था त्याला सिनेमापर्यंत घेऊन आली. खूप बोलल्यानंतरही खूप काही बोलायचंय, पण ऐकायला किंवा ते समजून घ्यायला कोणी नाही अशावेळी सिनेमा हा त्याचे हक्काचे व्यासपीठ बनले.

पिस्तुल्या, फँड्री आणि आता सैराट ही याच व्यासपीठावरची माध्यमं आहेत असे तो सांगतो. नागराजची दिग्दर्शक म्हणून ही यशस्वी वाटचाल इथेच थांबत नाहीये, आता तर कुठे ती सुरु झाली आहे. लवकरच नवीन वर्षात सैराट ही आणखी एक ग्रामीण बाज असलेला वेगळ्या ढंगाची प्रेमकथा घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतीच सैराट या सिनेमाची निवड ६६ व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी करण्यात आली आणि नागराजच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.

“आत्तापर्यंतच्या आयुष्यात खूप चुका केल्या, अनेक जवळची माणसं मनाने आणि अगदी शरीरानेही दूर गेलेली पाहिलीत, अनेक गोष्टी नाकारल्या. पण आता म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वी माझी सिनेमा या माध्यमाशी ओळख झाली आणि कळलं की हेच ते, जे माझ्यासाठी बनलंय, माझ्या मनातला कोलाहल शांत करण्यासाठी सिनेमापेक्षा योग्य माध्यम नाही.”

रुपेरी पडद्यावर फँड्रीच्या निमित्ताने नागराजच्या या अव्यक्त भावना प्रेक्षकांना भावल्या, त्यांनी ती कलाकृती अक्षरशः डोक्यावर घेतली आणि आता वेळ आहे ती सैराटची. यातनं नागराजच्या आयुष्यातला कोणता अव्यक्त कोपरा समोर येणारे ते पहाणे उत्सुकतेचे ठरेल.