जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आर्थिक साम्राज्य उभारणाऱ्या शचिन भारद्वाज यांची प्रेरणादायी कहाणी

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आर्थिक साम्राज्य उभारणाऱ्या शचिन भारद्वाज यांची प्रेरणादायी कहाणी

Friday November 27, 2015,

3 min Read

राहण्यासाठी एक छोटीशी खोली आणि ऑफीसही तेवढंच...त्यामुळे बंगळुरूमधून आई-वडिलांना रहायला बोलावण्याचीही सोय नाही, ८ वर्षांपूर्वी पैशांच्या चणचणीमुळे स्वत:ची आवडती हीरो होंडा स्प्लेंडर गाडीही घरभाडं देण्यासाठी विकावी लागली..ही कहाणी आहे पुण्यात राहणाऱ्या शचिन भारद्वाज यांची...पण आज हेच शचिन भारद्वाज स्वत:च्या बीएमडब्लू कारमधून फिरत आहेत आणि लवकरच ते स्वत:चा आणखी एक व्यवसाय स्मिंक नावाने सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

८ वर्षांपूर्वी असलेल्या हलाखीच्या परिस्थितीमधून शचिन कसे बाहेर पडले याची कहाणी खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी पुणे शहरात टेस्टीखाना नावानं एक स्टार्ट्प सुरू केलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. गेल्या वर्षी फूडपांडाने टेस्टीखाना १२० कोटी रुपयांना खरेदी केलं. खरेदीच्या या व्यवहाराची बोलणी ऑगस्टमध्ये सुरू झाली आणि पापणी लवायच्या आतच हा व्यवहार पूर्णही झाला. बर्लिनमधील घरपोच अन्नसेवा देणाऱ्या डीलिव्हरी होंडा या स्टार्टअपनं २०११मध्ये ५० लाख अमेरिकन डॉलर देऊन टेस्टीखानामधील सर्वाधिक समभाग विकत घेऊन टाकले. त्याचबरोबर स्थानिक टीम कायम ठेवण्यासही त्यांनी मान्यता दिली. या डीलमुळे शचिन आणि शेल्डन यांना आधीच्या गुंतवणूकदारांना नफ्यासह पैसे परत देता आले आणि टेस्टीखानाच्या आधीच्या टीमनं घेतलेल्या मेहनीताचाही त्यांना चांगला परतावा देता आला. पण व्यवहार झाल्यानंतरच्या काही महिन्यात दोन्ही कंपन्यांमध्ये वाद होऊ लागले. दोघांच्या कामाच्या पद्धती वेगळ्या असल्याचं लक्षात आलं असंही शचिन स्पष्ट करतात. सात वर्षात टेस्टीखानाची १०० सदस्यांची टीम झाली होती असंही ते सांगतात. फूडपांडा कसा व्यवसाय चालवतात ते माहित नाही पण जो आमचा मार्ग होता तोच योग्य होता असंही शचिन इथं नमूद करतात.

शचिन आणि टेस्टिखानाच्या व्यवस्थापनातील काहींनी मार्चमध्ये फूडपांडाला सोडचिठ्ठी दिली. संस्थापक सदस्यांपैकी काहींनी तर फूडपांडामध्ये समभागांच्या स्वरुपात असलेले कोट्यवधी रुपयेही जाऊ दिले.

तत्वांशी तडजोड करुन आणि लाच देत गैरमार्गांना व्यवसाय चालवणं पसंत नसल्याचं सचिन सांगतात. त्यापेक्षा व्यवसाय हळूहळू वाढला तरी चालेल असंही ते सांगतात. फूडपांडामधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबतच्या काही कर्मचाऱ्यांना त्यांची राहिलेली हक्काची काही रक्कम शचिन आणि शेल्डन यांनी स्वत:च्या खिशातून दिली. ज्यांनी मोठं होण्यात मदत केली त्यांना मदत केली पाहिजे असं शचिन सांगतात.


शचिन (डावीकडून) त्यांच्या स्मिंक टीमसोबत

शचिन (डावीकडून) त्यांच्या स्मिंक टीमसोबत



फूडपांडासोबत वाद झाल्यानंतर शचिन दुसरं काहीतरी करण्याच्या विचारात होते. पण तेव्हाच त्यांची पत्नी गर्भवती असल्यानं त्यांना सोनोग्राफी आणि इतर चाचण्यांसाठी फिरावं लागलं. तासनतास रांगेत थांबून त्यांना डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायाची. त्यात उशीर झाला तर पुन्हा नंबर लावावा लागायचा. या त्रासातून सुटका करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर का केला जात नाही असा विचार त्यांनी केला. यातूनच मग शचिन यांनी टेस्टिखानाचे सह संस्थापक शेल्डन आणि मुख्य विक्री अधिकारी संतोष यांच्यासोबत पुण्यातील ८ रुग्णालयांशी करार केला.

स्मिंक हे असं एक मोबाईल ऍप आहे जे कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांचं व्यवस्थापन करण्यास मदत करतं. रांगा नियंत्रित करुन ग्राहकांना त्यांचा नंबर कधी येणार याची माहिती एसएमएसद्वारे देण्याचं काम हे ऍप करतं. तसंच काही ग्राहकांची उत्पादनं तयार झाली असतील तर त्याचीही माहिती या ऍपद्वारे देता येते. हे ऍप ग्राहकांना रांगेची सद्यस्थिती लाईव्ह दाखवण्याचं काम करतं. थोडक्यात ग्राहक लांबूनही रांगेत सहभागी होऊ शकतात. ज्या डॉक्टरांनी या ऍपसाठी कंपनीशी करार केला आहे त्यांच्याकडे या ऍपद्वारे महिन्याला जवळपास एक हजार बुकिंग होतात. त्याचबरोबर या ऍपद्वारे वॉक इन इंटरव्ह्यूबाबतही एका एचआर फर्मशी त्यांची बोलणी सुरू आहेत. शचिन यांच्यामते स्मिंक हे खूप उपयुक्त ऍप आहे. रुग्णालय, वॉक-इन-इंटरव्ह्यू, आरटीओ, पासपोर्ट कार्यालयांसारख्या सरकारी सेवा, कार आणि मोटरसायकल सेवा केंद्र या सर्व कामांसाठी या ऍपचा वापर करता येतो. विक्रेत्यांना या ऍपचा उपयोग ग्राहक व्यवस्थापन प्रकिया पूर्ण करण्यासाठी होतो. या ऍपसाठी महिन्याला २ हजार रुपये मोजावे लागतात. हे शुल्क ग्राहक संख्येवर अवलंबून असतं. अनेक स्टार्टअप्स रांगांचं व्यवस्थापन करण्याची सेवा देतात पण ते फक्त रुग्णालय, रेस्टॉरंट्समध्येच अशा मोजक्या सेवा देतात. स्मिंकशिवाय मायटाईम आणि क्यूलेस या दोनच कंपन्या अनेक व्यवसायांशी संबंधित सेवा देतात. टेस्टीखानाच्या यशानंतर स्मिंक यशस्वी करण्याचा निर्धार शचिन व्यक्त करतात.

वेबसाईट : sminq.com

लेखक – अपर्णा घोष

अनुवाद – सचिन जोशी