प्रेमळ प्राणी करतात ‘AAT’द्वारे रुग्णांवर प्रभावी उपचार

प्रेमळ प्राणी करतात ‘AAT’द्वारे रुग्णांवर प्रभावी उपचार

Saturday November 21, 2015,

5 min Read

फ्लूडोची दिनचर्या नेहमीप्रमाणेच या आठवड्यातही अतिशय व्यस्त आहे. त्याला मुंबईच्या एका शाळेत जायचे आहे आणि तिथे मुलांबरोबर गप्पा मारायच्या आहेत. त्याचबरोबर त्यांचे मनोरंजनही करायचे आहे. फ्लूडोचे हे काम एका उपचार पद्धतीचा भाग आहे. ज्याद्वारे तो मुलांना भावनिक आणि व्यावहारिक समस्यांशी लढण्यास मदत करतो.

१२ वर्षांच्या एका लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीला त्या आघातातून बाहेर काढणे हे त्याच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे. या दुर्घटनेनंतर ती मुलगी खूप शांत शांत राहू लागली होती. कुणाशी बोलायची नाही आणि आपला उजवा हात नेहमी आपल्या छातीवर जोरात दाबून धरायची, ज्यामुळे ती काही लिहू सुद्धा शकत नव्हती. एक वर्ष उपचार घेऊन आणि फ्लूडोबरोबर बोलून ती आपल्या या अवस्थेतून बाहेर येऊ शकली आणि आता ती एक आनंदी मुलगी आहे. आता ती हसते, बोलते आणि फ्लूडोला आपल्या हाताने आंजारते गोंजारतेही. फ्लूडो हा एक लाब्राडोर जातीचा कुत्रा आहे. जो या उपचार पद्धतीचे महत्त्वाचे साधन आहे. या उपचार पद्धतीला ‘पशु सहाय्याने केलेली उपचार पद्धती’ (Animal Assisted Therapy (AAT)) असे म्हणतात. वैद्यकीय जगतात हे एक नव्याने विकसित होणारे क्षेत्र आहे. यामध्ये कुत्रे किंवा इतर प्रशिक्षित प्राण्यांचा उपयोग लहान मुले, वयस्कर आणि वृद्धांना अनेक शारीरिक अथवा मानसिक समस्यांमधून बाहेर पडण्यास मदत करण्यासाठी केला जातो.

image


फ्लूडो ‘ऍनिमल एंन्जल्स फाऊंडेशन’ संस्थेच्या टीमचा एक सदस्य आहे. या विषयावर काम करणारी ही देशातील पहिली संस्था आहे. ‘ऍनिमल एंन्जल्स फाऊंडेशन’ची स्थापना निदानिक मानसोपचारतज्ज्ञ आणि Animal Assisted Therapy (AAT) प्रमाणित डॉ रोहिणी फर्नांडिस आणि राधिका नायर यांनी २००५ साली केली. सुरुवातीला यामध्ये फक्त रोहिणी यांचा एक लाब्राडोर सहभागी होता. आता या संस्थेबरोबर २० पाळीव प्राणी जोडले गेले आहेत.

रोहिणी पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना त्यांच्या मनात लोकांना उपचारामध्ये कुत्र्यांच्या माध्यमातून मदत करण्याचा विचार आला. घरामध्ये प्राणी पाळणे आवडत नसलेल्या एका कुटुंबाला भेटून परतत असताना एखादा कुत्रा पाळून, त्याला प्रशिक्षित करुन आपल्या ग्राहकांच्या साथीने Animal Assisted Therapy (AAT) वर संशोधन करुन त्यात प्राविण्य मिळविण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि सर्वात आधी त्यांनी आपल्या एंजेल नावाच्या लाब्राडोरला प्रशिक्षित केले. त्याच्याच नावाने या संस्थेची स्थापना करण्यात आली.

सर्व प्रकारच्या कुत्र्यांचा वापर या कामासाठी करणे शक्य नसते. या उपचार पद्धती दरम्यान रुग्णांबरोबर आणि विशेष करुन मुलांबरोबर काम करताना या कुत्र्यांना खूप तणावपूर्ण स्थितीमधून जावे लागते. या दरम्यान कुत्र्यांची वर्तणूक सहज, सुरक्षित आणि अपेक्षित पद्धतीची असणे आवश्यक असते.

‘ऍनिमल एंजेल्स फाऊंडेशन’मध्ये कुत्र्यांची निवड त्यांच्या स्वभावातील चांगूलपणा, मैत्रीपूर्ण व्यवहार, शारीरिक योग्यता, चांगले आरोग्य आणि त्यांची प्रशिक्षित होण्यासाठी आवश्यक आकलन शक्ती या बाबी लक्षात घेऊन केली जाते. या सर्वासाठी त्यांना एका कसोटीतून जावे लागते आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांची नोंदणी केली जाते. “या कुत्र्यांना सज्जनाप्रमाणे वागणे शिकविले जाते. जर कोणी त्यांच्या तोंडातून काही खेचून घेतले किंवा एखाद्या मुलाने जर त्यांची शेपटी ओढली तरी ते आक्रमक होणार नाहीत. जर त्यांचा रुग्ण त्यांना न आवडणारी एखादी गोष्ट करत असेल तर त्यांना त्यांच्या अंगावर गुरगुरण्या किंवा भुंकण्याऐवजी तिथून बाजूला व्हायला शिकविले जाते,” असं रोहिणी सांगतात. ‘ऍनिमल एंजल्स फाऊंडेशन’च्या टीममध्ये चार प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञ आहेत, जे मुंबई, हैदराबाद आणि नाशिकमधील १० पेक्षा जास्त शाळा, मानसिक स्वास्थ्य केंद्र आणि इतर संस्थांमध्ये उपचार देण्याकरिता जातात. या उपचार पद्धतीचा चांगला परिणाम दिसत असूनही सुरुवातीला ‘ऍनिमल एंजल्स फाऊंडेशन’ला या पद्धतीच्या स्विकारार्हतेला घेऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कारण आपल्या देशात या उपचार पद्धतीविषयी लोकांना माहिती नव्हती. “लोकांच्या मनात याविषयी संशय होता. ते विचार करायचे की कुत्रे घाणेरडे असतात किंवा इतर काही घटना घडू शकते,” रोहिणी सांगतात. त्यांना प्राण्यांना घेऊन संपूर्ण मुंबईत फिरताना खूप असुविधांचा सामना करावा लागायचा. ‘ऍनिमल एंजल्स फाऊंडेशन’चे स्वतःचे असे कुठले पशुकेंद्रही नव्हते. आता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कुत्र्यांची एक पूर्ण प्रणाली शहराच्या विविध भागात उपलब्ध आहे आणि याद्वारे रोहिणी व राधिका आपल्या रुग्ण किंवा ग्राहकाच्या जवळच्या भागातील कुत्र्याला घेऊन आपले काम करु शकतात.

image


“पशु सहाय्याने केलेल्या उपचार पद्धतीचा लाभ असा आहे की लहान मुलांना कुत्रे मित्राप्रमाणे आणि मोठ्या माणसांना लहान मुलांप्रमाणे वाटतात,” असं रोहिणी सांगतात. हे नाते विश्वास निर्माण करते आणि त्यानंतर ते सल्लागारासमोर अधिक सहजपणे आणि मोकळेपणाने आपल्या मनातील गोष्टी उघड करतात. “ऑटिजम किंवा आत्मकेंद्रीत मुलांमध्ये या प्रकारे विविध सामाजिक कौशल्य जसे दुसऱ्यांशी बोलणे, आपल्या भावना प्रकट करु शकणे इत्यादींचा विकास करणे शक्य होते. त्याचबरोबर ज्या मुलांचा योग्य विकास होऊ शकला नाही अशांना खाण्यासाठी, खेळण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी हे कुत्रे सहाय्य करतात,” असं इथले एक मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. ही पद्धत त्यांच्या व्यवहारात परिवर्तन आणू शकते, त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण करते. एवढेच नाही तर त्यांना आसपास घडणाऱ्या घडामोडींमध्ये सहभागी होण्यायोग्य बनवते. ज्यामुळे ते चिन्हांकित ध्येय आणि उद्देश प्राप्त करण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतील. मुलांचा प्राण्यावर लवकर विश्वास बसतो आणि ते त्यांच्याबरोबर मैत्री करतात. त्यांचे हे विशेष या उपचार पद्धतीला प्रभावी ठरविण्यात सहाय्यकारी सिद्ध होते.

याचप्रकारे द्विध्रुवी विकार, गँग्रीन किंवा पार्किन्सनने पीडित मोठ्या माणसांची अस्वस्थता आणि दुखणं प्राण्यांबरोबरच्या ऍक्टीविटीजच्या माध्यमातून कमी केले जाऊ शकते. त्याचबरोबर त्यांची हालचाल, त्यांच्यामधील शक्ति, सहनशीलता, संतुलन आणि संवेदनशीलता यामध्ये अधिक सुधारणा आणणे शक्य होऊ शकते. ही प्रक्रिया डीप्रेशनच्या लक्षणांनाही कमी करते. प्राण्यांच्या बरोबर राहिल्याने एंड्रोफीनचा स्तर वाढतो. ज्यामुळे आत्मसन्मान आणि प्रेरणा हे भाव वाढीस लागतात. त्याचबरोबर एकटेपणाची भावना दूर होते. ज्यांना कुणाचा स्पर्श झालेलाही सहन होत नाही अशा शारीरिक किंवा लैंगिक छळ झालेल्या पीडित व्यक्तींसाठी ही उपचार पद्धती एक चांगला पर्याय आहे.

प्राण्यांच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या या उपचार पद्धतीमध्ये कुत्र्यांचाच सर्वात जास्त उपयोग केला जातो. कारण त्यांना प्रशिक्षित करणे सोपे असते. रॉटवीलरसारख्या काही प्रजातींमध्ये अतिशय आत्मविश्वास आणि प्राविण्य असते. घोड्यांचा वापर ब्रेन हॅमरेज तसेच डाउन सिंड्रोमने प्रभावित मुलांसाठी केला जातो. तर मांजरी वृद्धांसाठी जास्त अनुकूल असतात. अतिसक्रिय व्यक्तींसाठी माशांचा वापर केला जातो. याच प्रकारे ससा, हरिण आणि पक्ष्यांचाही उपयोग या उपचार पद्धतीमध्ये केला जातो.

प्राण्यांच्या सहाय्याने उपचार करण्याची ही पद्धत आणि संकल्पनेचा देशभरात विस्तार करण्याचे रोहिणी यांचे स्वप्न आहे. त्या या पद्धतीने लोकांवर उपचार करण्याकरिता देशातील इतर शहरांमध्ये अनेक दवाखाने सुरु करु इच्छितात आणि यासाठी त्यांना आणखी डॉक्टर्सना प्रशिक्षित करायचे आहे.

‘ऍनिमल एंजेल्स फाऊंडेशन’ नेहमीच मुंबईमधील पाळीव कुत्र्यांच्या शोधात असते. जेणेकरुन या कुत्र्यांना प्रशिक्षित करुन या कामामध्ये त्यांच्या सेवेचा उपयोग करुन घेता येईल. जर तुमचा पाळीव प्राणी या संस्थेचे निकष पूर्ण करीत असेल आणि तो सहा महिन्यांपेक्षा मोठा असेल तर तुम्ही अर्ज करुन पुढच्या फेरीतील स्वभाव परीक्षणासाठी (Temperament Testing) प्रतिक्षा करु शकता.


लेखक : मारियान हेिनिश्च

अनुवाद : अनुज्ञा निकम