राजू सैनी यांच्या मोफत प्रशिक्षणाने एक हजारपेक्षा जास्त मुलांना सरकारी नोकरी

0

‘इच्छा तिथे मार्ग’ या उक्तीची प्रचिती त्यांना येते ज्यांना मनापासून कामाची ओढ असेल मग कितीही अडचणी आल्या तरी मार्ग सापडतो. बऱ्याचवेळा म्हटले जाते की चांगल्या साधनांच्या कमतरतेमुळे कार्याला अपेक्षित दर्जा मिळत नाही पण इंदोरच्या राजू सैनी यांच्या व्यक्तिमत्वाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपला विश्वास बसतो की बस मनात दृढ इच्छा पाहिजे, जीवन आणि काळ रस्ता स्वतः बनवत असतात.


इंदोरच्या नेहरू पार्क मध्ये मागच्या १३ वर्षापासून स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक विशेष खासगी वर्ग ‘राजू सैनी’ सर चालवीत आहे. जिथे छपराच्या नावाखाली आकाश आणि बसायला जमीन आहे. अभ्यासाच्या गरजेला हेरून गरजेच्या साधनांच्या नावावर राजू सैनी सरांचा हा वर्ग शून्य आहे पण या कमतरतेच्या व्यतिरिक्त विशेष म्हणजे निशुल्क सेवा देवून विद्यार्थ्यांना १००% यशाची खात्री आहे. अभ्यास पूर्णपणे मोफत आहे. आज सरांच्या प्रशिक्षणामुळे एक हजार विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचा फायदा झाला आहे. यामध्ये असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना राजू सैनी यांची साथ नसती मिळाली तर त्यांनी गुन्हेगारी विश्वात आपले ठाण मांडले असते.


राजू सैनी यांच्या जिद्दीची कहाणी समजण्यासाठी आपण त्यांचे लहानपण जाणून घेऊ या. इंदोरच्या मालवा मिल भागातील चार गरीब वसाहती पंचम की फेल, गोमा की फेल, लाला का बगीचा, कुलकर्णी भट्टा अपराधासाठी पूर्ण शहरात प्रसिद्ध होते. रात्रीची वेळ सोडा पण दिवसासुद्धा इथे कोणी बाहेर पडू शकत नव्हते. पंचम की फेल मध्ये राहून काही मुलांबरोबर अभ्यास करणारे राजू यांच्या जवळपास दिवसरात्र फक्त गुन्हेगारी वातावरणच होते. राजूच्या घराची परिस्थिती जरा बेताचीच होती. वडील रिक्षा चालक होते. उदरनिर्वाह त्यावरच चालायचा. राजूच्या इतर मित्रांनी शाळा सोडून दिली पण परिस्थितीवर मात करून राजू आठवीपर्यंत शाळा शिकले.


राजूने युअर स्टोरीला सांगितले की,

‘एक वेळ अशी आली होती की आजूबाजूला भांडणांचा आवाज, पोलिसांचा दबाव या गोंधळात अभ्यास करणे कठीण होते म्हणून मी शाळेतून सरळ सरकारी नेहरू उद्यानात जाऊन अभ्यास सुरु केला. अंधार पडेपर्यंत मी तिथेच अभ्यास करून रात्री घरी जात असे. पदवीपर्यंत नेहरू पार्क मध्येच अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. याचदरम्यान राजूने वस्तीच्या काही मुलांना बरोबर घेऊन नेहरू पार्क मध्ये शिकवायला सुरुवात केली व त्याचबरोबर स्वतःच्या सरकारी नोकरीच्या परीक्षेच्या तयारी सुरु ठेवली. २००२ मध्ये राजूने स्पर्धा परीक्षेच्या तयारीचे मोफत प्रशिक्षण वर्ग सुरु केले. एवढेच नाही तर त्या भागातील वस्त्यांमध्ये जाऊन अशा मुलांचा शोध घेऊन त्यांना समजावून त्यांच्या पुढच्या शिक्षणाची सुरुवात केली. तसेच पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणाची तयारी केली. २००२ च्या पहिल्या बॅच मध्ये फक्त पाच विद्यार्थी आले त्यामुळे वस्तीमध्ये राजू सैनी हे मजेचे पात्र ठरले की स्वतः तर बेरोजगार आहे मग दुसऱ्यांना काय नोकरी लावणार. वस्तीच्या गरिबीमुळे तिथल्या मुलांना शिकणे कठीण होते. तरीही पाच विद्यार्थ्यांवर घेतलेल्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले, पाचपैकी चार विद्यार्थ्यांची पहिल्या फेरीतच निवड झाली. एक विद्यार्थी अजय जारवाल यांची परीक्षेत निवड होऊन सिकंदराबाद मध्ये रेल्वे गुड्स गार्डच्या नोकरीत रुजू झाला, दुसरा अखिलेश यादव मध्यप्रदेश पोलिसात, तिसरा हेमराज गुरसनिया आरपीएफ मध्ये, चौथा लोकेश सहाय्यक प्राचार्याच्या पदावर नियुक्त झाले. या चौघांचे वस्तीमध्ये मोठ्या धुमधडाक्यात ढोलताशाच्या गजरात स्वागत झाले. ही गोष्ट वा-यासारखी सगळीकडे पसरली व यानंतर वस्तीच्या लोकांच्या विचारसरणीमध्ये बदल घडून आला. त्यांना जाणवले की अपराध आणि मजुरीच्या या निर्धन जीवनात करण्यासारखे बरेच काही आहे. मग काय, राजू यांना शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. २००३ च्या बॅच मध्ये आठवीपासून पदवी पर्यंतचे ४० मुले आपल्या उज्वल भविष्यासाठी राजू सरांच्या वर्गात आले होते. हळूहळू तांडा वाढू लागला. मागच्या १३ वर्षात राजू सरांच्या प्रशिक्षणाने एक हजारपेक्षा जास्त मुलांनी सरकारी नोकरीत आपले स्थान प्रस्थापित केले होते.

२००४ मध्ये राजू यांची रेल्वे मध्ये स्टेशन मास्तर म्हणून निवड झाली. इंदोर मधील देवास येथे राजू यांची नेमणूक झाली. तेव्हापासून राजू आपल्या नोकरीवरून सरळ घरी न जाता नेहरू पार्कला पोहोचतात. जिथे त्यांचे विद्यार्थी त्यांची वाट बघत असतात. राजू सैनी सांगतात की, त्यांच्या नोकरीनंतर वातावरणात बराच फरक पडू लागला आहे. जे लोक नोकरी नसल्यामुळे त्यांची उपेक्षा करीत होते त्यांनीच आता आपल्या मुलांना त्यांच्याकडे सुपूर्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या भागातील चित्र आता बरेच बदलले आहे. १९९० पर्यंत या भागाला अपराधाच्या नावाने ओळखले जायचे. तिथे प्रत्येक घरात एक अपराधी होता किंवा गरिबीत उदरनिर्वाह करणारे कुटुंब होते. पण आता या वस्तीमध्ये ५०० पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी आहेत जे पुढच्या पिढीसाठी एक उदाहरण कायम झाले आहे. इथल्या मुली चांगल्या सरकारी पदावर कार्यरत आहेत. राजू मागच्या १५ वर्षापासून १२ जानेवारीला युवा दिवस साजरा करतात ज्यात ते घरोघरी जाऊन शिक्षणासाठी गरीब कुटुंबाला जागृत करतात. प्रशिक्षणासाठी राजू यांच्या मदतीला त्यांचे जुने विद्यार्थी शिक्षकाची भूमिका निभावत आहे.


राजू यांनी युअर स्टोरीला सांगितले की, "अनेक लोक त्यांना प्रश्न विचारतात की सरकारी नोकरीला लाच ही द्यावीच लागते पण मला वाटते की पैसा सगळीकडे चालत नाही, फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. योग्य मार्गदर्शनाने मुलांना प्रशिक्षण दिले तर ते झेंडा रोवूनच दाखवतील. आज राजू यांच्याकडे इंदोरच्या व्यतिरिक्त जवळपासच्या जिल्ह्यातून सुद्धा गरीब मुले अभ्यासासाठी येतात. अनेक विद्यार्थ्यांना वाटते की राजू सर जर नसते तर ते एखाद्या दुकानात लहानसहान नोकरी करीत असते किंवा पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले गेले असते. ३८ वर्षीय राजू यांनी दुसऱ्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी अजूनपर्यंत लग्न केले नाही.

लेखक - सचिन शर्मा

अनुवाद - किरण ठाकरे