सुलभ शौचालय..समाजाला एका शापापासून मुक्त करण्याची चळवळ...

एक मूलभूत समस्या...न सांगितलेली..पण ‘त्यांनी’ ओळखलेली !

0

महात्मा गांधींचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांनी अवघ्या मानवजातीसाठी दिलेलं देणं सगळ्या जगाला माहीत आहे. खुद्द इतिहासानं ज्यांची दखल घेतली अशा कित्येक महान व्यक्तींना गांधीजींच्या विचारांनी प्रेरित केलंय. आणि त्यातलंच एक नाव म्हणजे डॉ. बिंदेश्वर पाठक. सुलभ इंटरनॅशनलचे बिंदेश्वर पाठक महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित झाले होते. आधी भारत स्वच्छ करु, स्वातंत्र्य आपण नंतर मिळवू हे गांधीजींचं वचन बिंदेश्वर पाठक यांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आणि त्यांनी गांधीजींच्या स्वच्छता मिशनला स्वत:ला वाहून घेतलं. या क्षेत्रात अमूलाग्र काम केलं. अनेक आविष्कार घडवले. आणि त्यातलाच एक आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे तब्बल 44 वर्षांपूर्वी पूर्णपणे स्वदेशी आणि अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने बनवण्यात आलेलं सुलभ शौचालय.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडींच्या विचारांचाही बिंदेश्वर पाठक यांच्यावर प्रभाव आहे. एकदा केनेडी म्हणाले होते, “हे विचारु नका की देशानं तुमच्यासाठी काय केलं, हे विचारा की तुम्ही देशासाठी काय केलं.” भारतात उघड्यावर शौचासाठी जाणं आजही खूप मोठी समस्या आहे. मग जेव्हा बिंदेश्वर पाठक यांनी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा ही समस्या किती कठीण असेल याचा अंदाज सहज लावता येईल.

बिंदेश्वर पाठक..एका मूलभूत समस्येला हरवणारा अवलिया...
बिंदेश्वर पाठक..एका मूलभूत समस्येला हरवणारा अवलिया...

आज बिंदेश्वर पाठक हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे. पद्मभूषणसारखा केंद्र सरकारचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालाय. पण आत्तापर्यंतचा हा प्रवास त्यांच्यासाठी फारच कठीण होता. कारण पाठक यांनी काम सुरु केलं, त्या काळात जातिव्यवस्थेनं भारतीय समाजात आपली पाळंमुळं अतिशय घट्ट रोवली होती. आणि अशा परिस्थितीत एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या बिंदेश्वर पाठक यांच्यासाठी फक्त घरातून बाहेर पडून दुसरं काहीतरी काम करणंच मोठं कठीण काम होतं. पण त्याचसोबत ज्या क्षेत्रात त्यांनी काम करायचं ठरवलंय ते काम भविष्यात मोठा अमूलाग्र बदल घडवून आणणार आहे हे घरातल्या इतर मंडळींना समजावून सांगणंही त्यांच्यासाठी तितकंच कठीण होतं.

बिंदेश्वर पाठक यांचा जन्म बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातल्या रामपूर या छोट्याशा गावात झाला. त्यांचे आजोबा मोठे प्रसिद्ध शास्त्री होते. आणि त्यांचे वडील आयुर्वेदाचे डॉक्टर होते. तसं पहायला गेलं तर एक समृद्ध कुटुंब. नऊ खोल्यांचं मोठं घर, घराच्या अंगणात स्वत:ची स्वतंत्र विहीर. पण त्या मोठ्या घरात शौचालय नव्हतं. शौचासाठी घरातल्या सगळ्यांनाच बाहेर जावं लागत होतं. घरातल्या सगळ्या महिलांना पहाटे चार वाजता अगदी सूर्योदय होण्याआधी बाहेर जाऊन प्रातर्विधी उरकावे लागत होते. दिवसभर लघुशंकेसाठी न गेल्यामुळे घरातल्या सगळ्याच महिलांना पूर्णवेळ डोकं दुखण्याची तक्रार असायची. कारण दिवसाउजेडी उघड्यावर जाणं शक्य नव्हतं. याच सर्व प्रकारामुळे अगदी लहानपणापासूनच गावात पक्कं शौचालय नसल्यामुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो हे त्यांनी पाहिलं होतं.

याशिवाय त्या काळात जातीव्यवस्थेचा इतका पगडा होता, की समाज एक असूनही वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला गेला होता. एकदा तर चुकून बिंदेश्वर पाठक यांनी एका दलित व्यक्तीला स्पर्श केला, तर त्यांच्या आजीने त्यांच्या तोंडात गायीचं शेण, गोमुत्र आणि गंगाजल टाकून शुद्धी केली होती. या घटनेमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला आणि प्रस्थापित जातिव्यवस्थेमुळे ते व्यथित झाले. त्या वेळी अगदी लहान असलेल्या बिंदेश्वर पाठक यांना याची अजिबातच कल्पना नव्हती की याच समस्येवर ते पुढे मोठे झाल्यावर एक समर्थ तोडगा काढून देशासमोर ठेवणार आहेत.

दुस-या कोणत्याही तरुणाप्रमाणेच बिंदेश्वर पाठक यांच्याही मनात अनेक प्रकारचे विचार, पर्याय त्यांच्या मनात घर करत होते. मात्र एक गोष्ट नक्की होती, की त्यांना काहीतरी असं करायचं होते, की ज्याला समाजात मानाचं स्थान असेल. त्यामुळेच त्यांनी प्राध्यापक अर्थात लेक्चरर होण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी समाजशास्त्र विषयात बी.ए. परीक्षा उत्तीर्ण केली आणि अपराधशास्त्र या विषयात एम.ए.ची पदवी घेतली. त्यांना याच विषयात स्पेशलायजेशन करुन अधिक अभ्यास करायचा होता. पण परीक्षेत प्रथम श्रेणी अर्थात फर्स्ट क्लास मिळू शकला नाही आणि या विषयात संशोधन करण्याचं त्यांचं स्वप्नं पूर्ण होऊ शकलं नाही. पण हाच त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. आता त्यांच्या आयुष्यात एकामागोमाग अनेक गोष्टी घडायला लागल्या, त्यामुळे आता पुढे काय होईल याचा त्यांना स्वत:लाही अंदाज लागेनासा झाला. याचदरम्यान त्यांनी मुलांना शिकवण्याचं कामही केलं आणि आयुर्वेदिक औषधंही विकली. मग त्यांना वाटलं की आपण एखादा व्यवसाय सुरु करून उद्योगपती व्हावं. पण त्यावेळी व्यवसायिकांचं आत्ताइतकं प्रस्थ नव्हतं. व्यावसायिकांना समाजात फार काही मानमरातब मिळत नव्हता. आणि बिंदेश्वर पाठक यांना तर असं काम करायचं होतं, की ज्यात पैसाही मिळावा आणि त्यासोबतच समाजात मान-सन्मानही मिळावा. मग काय, त्यांनी व्यवसाय सोडून दिला. मग त्यांनी आपलं पूर्वीचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आणि अपराधशात्रमध्ये पुढचं शिक्षण घेण्यासाठी सागर युनिव्हर्सिटीमध्ये अर्ज केला. या अभ्यासक्रमासाठी त्यांची निवडही झाली, पण म्हणतात ना की नशीबात लिहिलेलं असतं तसंच घडतं. अगदी तसंच घडलं. बिंदेश्वर पाठक यांचं नशीब त्यांना थेट पाटण्याला घेऊन आलं, जिथे त्यांनी ‘गांधी संदेश प्रचार समिती’ नावाच्या एका समितीसोबत काम केलं. काही दिवसांनी त्यांची बदली स्वच्छता विभागात झाली, जिथे महात्मा गांधीजींचं स्वप्न पूर्ण करण्याच्या कामी त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. त्यावेळी शौचालयासाठी बकेट टॉयलेटचा वापर केला जायचा जे नंतर हाताने स्वच्छ करावं लागायचं. बकेट टॉयलेटसाठी पर्याय शोधणं गरजेचं होतं. हे काम करताना ज्या ब्राह्मण वर्गातून बिंदेश्वर पाठक आले होते, त्या वर्गातूनही त्यांना कडाडून विरोध झाला. आणि फक्त समाजच नाही तर त्यांच्या स्वत:च्या घरातूनही त्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागला.

पण अशा विपरित परिस्थितीतही ते अजिबात ढळले नाहीत. मागे हटले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की जरी आज समाजाने त्यांना, त्यांच्या कामाला विरोध केला असेल, तरी ते या कामात यशस्वी झाल्यानंतर ते समाजासाठी क्रांतिकारी ठरेल. त्यामुळेच त्यांनी समाजाकडून वारंवार मारल्या जाणा-या टोमण्यांकडे साफ दुर्लक्ष केलं आणि बकेट टॉयलेटसाठी चांगला पर्याय शोधू लागले. यासाठी त्यांना सर्वप्रथम त्या समाजाशी, लोकांशी संबंध ठेवायचे होते, त्यांच्यात जाऊन रहायचं होतं, त्यांचं काम समजावून घ्यायचं होतं, जो समाज मैला साफ करण्याचं काम करत होता. कारण त्यामुळेच त्यांच्या समस्यांच्या मूळाशी पाठक यांना जाता येणार होतं. त्यांनी त्याच वस्तीमध्ये एक छोटीशी खोली घेतली आणि तिथेच काम सुरु केलं.

याचदरम्यान त्यांनी डब्ल्यूएचओ अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रकाशित केलेलं एक्सक्रिटा डिस्पोजल इन रूरल एरिया अँड स्मॉल कम्युनिटीज हे पुस्तक वाचलं. यासोबतच राजेंद्रलाल दास यांनी उत्तम शौचालय पद्धतीवर लिहिलेलं पुस्तकही वाचलं. या दोन पुस्तकांमुळे बिंदेश्वर पाठक यांच्या डोक्यात सुरु असलेला गोंधळ बराच कमी केला. बिंदेश्वर पाठक यांना अशी पद्धत शोधून काढायची होती, ज्यामध्ये पैसा आणि पाणी या दोन्ही गोष्टी कमी लागाव्यात. त्याचसोबत कमी वेळात आणि कुठेही बनवता यायला हवं.

यातूनच पुढे सुलभ शौचालय पद्धतीचा उगम झाला. हे शौचालय झाकण लावलेल्या दोन खड्ड्यांनी बनलेलं आहे. एक खड्डा भरल्यानंतर मैला दुस-या खड्ड्यात जमा होतो. पहिल्या खड्ड्यातल्या मैलाचं कालांतराने खत तयार होतं. शिवाय त्याची रचना अशा प्रकारे केली आहे की शौचालयाचं भांडं हातानं साफ करण्याची आवश्यकताच भासत नाही. एक तांब्याभर पाण्याने हे शौचालय स्वच्छ होऊ शकतं. त्यासाठी कोणत्याही ड्रेनेजलाईनची किंवा मैला/गाळ वाहून नेणा-या पाईपची गरज नाही. यात दुर्गंधीही येत नाही आणि किडे किंवा इतर विषाणूंचा फैलाव होण्याचीही शक्यता नाही.

सुरुवातीच्या काळात ही पूर्ण रचना तयार करायला बिंदेश्वर पाठक यांना दोन ते तीन वर्ष लागली. पण त्यानंतर जसजसा वेळ गेला, तसतसं ते आपल्या या रचनेमध्ये बदल करत गेले. त्यात अधिक सुधारणा करत गेले.

जेव्हा बिंदेश्वर पाठक आपली ही योजना, हे संशोधन सरकारसमोर घेऊन गेले, तेव्हा कुणालाही हे पटलं नाही की हा असला काहीतरी प्रकार यशस्वी होऊ शकतो. हे नवं डिजाईन सगळ्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागली. बिंदेश्वर इंजिनिअर नाहीत, असं कारण देत त्यांनी सांगितलेल्या योजनांना अनेक इंजिनिअर्सनी अजिबात गांभीर्यानं घेतलं नाही. पण शेवटी बिंदेश्वर पाठक यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि 1970मध्ये बिहारमध्ये सुलभ शौचालय बनवण्यासाठी परवानगी मिळाली. यानंतर बिंदेश्वर पाठक यांनी सुलभ नावाने आपली एक संस्थाही सुरु केली. त्यांची कल्पना यशस्वी ठरली होती. पुढे सरकारनेही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत देऊ केली.

पण फक्त डिजाईन बनवून ते थांबले नाहीत, तर त्यासोबतच त्यांनी तशा प्रकारच्या सुलभ शौचालयांची निर्मिती करणंही सुरु केलं. पण शासकीय निधीसाठी त्यांना खूप वाट पहावी लागत होती. शिवाय जेवढा निधी मागितला आहे, त्यापेक्षा कमीच मिळायचा. त्यामुळे ज्या वेगाने काम होणं अपेक्षित होतं, त्या वेगाने काम होत नव्हतं. मग तिथले आयएएस अधिकारी रामेश्वर नाथ यांनी बिंदेश्वर पाठक यांना एक सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की तुम्ही निधीसाठी सरकारवर अवलंबून न रहाता जे काम करत आहात त्यातूनच निधी उभा करा. हा सल्ला बिंदेश्वर पाठक यांनाही पटला आणि त्यांनी शौचालय बांधून देताना प्रतिशौचालय पैसे आकारायला सुरुवात केली. तसंच या शौचालयांची देखभाल करण्यासाठीही वापरणा-यांकडून ते माफक शुल्क आकारु लागले. याचा परिणाम असा झाला की आता सुलभ स्वत:च्या पायावर उभं होतं. आर्थिक पाठिंब्यासाठी त्यांना कुणाचीही आवश्यकता राहिली नाही.

या जगावेगळ्या पण यशस्वी प्रयोगाच्या जोरावर आज सुलभ इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय ख्यातीची संस्था आहे. शौचालयं बांधणं ही आजही एक मोठी समस्या आहे. यासाठी सरकारतर्फे स्वच्छता अभियानही राबवलं जात आहे. लोकांमध्ये घरात शौचालय बांधण्यासाठी आणि वापरण्यासाठी जनजागृतीही केली जात आहे. बिंदेश्वर पाठक गेल्या कित्येक वर्षांपासून हेच काम करत आले आहेत. पाठक यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक नावाजलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये एनर्जी ग्लोब पुरस्कार, प्रियदर्शिनी पुरस्कार, दुबई आंतरराष्ट्रीय पुरस्कार, अक्षय ऊर्जा पुरस्कार आणि भारत सरकारचा मानाचा पद्मभूषण पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

Related Stories

Stories by Pravin M.