ज्या एकेकाळी वारांगना होत्या, आज दुस-या वारांगनांना सांगत आहेत एचआयव्हीचे धोके

0

त्या एकेकाळी स्वतः वारांगना (सेक्स वर्कर) होत्या, मात्र आज त्या दुस-या वारांगनांना सबलीकरणाच्या कामात मदत करत आहेत. त्या कधी शिक्षण घेऊ शकल्या नाहीत, मात्र आज त्यांच्यामुळे दुस-या वारांगना साक्षर बनत आहेत. हे त्यांचेच प्रयत्न आहेत की, आज महाराष्ट्राच्या सांगली शहरात स्वरूप सिनेमागृहाजवळ असलेला रेडलाईट भाग दुस-या रेडलाईट भागापेक्षा अधिक स्वच्छ आणि सुंदर आहे. अमीरीबाई यांनी आपला व्यवसाय अनेक वर्षापासून सोडला असला तरी, आज त्या हे काम त्यांची संस्था ‘वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्र’ यांच्यामार्फत करतात. त्या येथे वारांगनांना एड्स सारख्या गंभीर आजाराबाबत केवळ जागरूकच करत नाहीत किंवा त्यांना सल्लाच देत नाहीत तर त्यांच्या उपचारावर देखील त्या लक्ष देतात. अमीरीबाई यांच्या कामात दीपक चौहान त्यांची मदत करतात. जे त्यांच्या संस्थेतील एक युवा सदस्य आहेत.

अमीरीबाई या मागासवर्गीय होत्या आणि अनेक वर्षापूर्वी फसवणुक झाल्याने त्या वेश्यावृत्ती व्यवसायात फसल्या, मात्र मागील १० वर्षापासून त्या या व्यवसायापासून लांब आहेत. त्यांनी आपल्या या कामाची सुरुवात हा विचार करून केली होती की, ज्या रेडलाईट भागात त्या राहतात, तेथे वारांगनांना खूप समस्या येतात. अशातच त्यांच्या समस्यांना सोडविण्यासाठी त्यांनी स्वतःहूनच पहिले पाउल उचलले पाहिजे. याच विचारासोबत त्यांनी सर्वात पहिले या रेडलाईट भागात एक शाळा उघडली. जेथे वारांगना शिक्षण घेण्यासाठी येऊ शकत होत्या, कारण येथे अनेक अशा वारांगना होत्या, ज्या अशिक्षित होत्या, ज्या आपले नाव देखील लिहू शकत नव्हत्या. त्याव्यतिरिक्त अमीरीबाई यांचा उद्देश होता की, असे एखादा मंच उभारला जावा जेथे सर्व वारांगना येतील आणि त्या त्यांना एड्ससारख्या गंभीर आजाराबाबत माहिती देऊ शकतील. त्या सोबतच गरज पडल्यास त्या वारांगनांना सल्ला देखील देऊ शकतील.

अमीरीबाई आणि त्यांचे सहयोगी दीपक चौहान यांच्या मते, महाराष्ट्रातील सांगली हा जिल्हा एड्स बाधित लोकांच्या संख्येत दुस-या स्थानावर आहे. सरकारी आकड्यांनुसार, अधिकाधिक एड्सबाधित रेडलाईट भागामुळे झाले. जेव्हा वर्ष २००५ मध्ये अमीरीबाई यांना याबाबतची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, त्या याला रोखण्यासाठी पाऊल उचलतील. सांगली शहरातील या रेडलाईट भागात जवळपास २०० वारांगना काम करतात. अमीरीबाई यांनी जेव्हा या कामाची सुरुवात केली तेव्हा, या भागात जवळपास १० टक्के महिला एड्स बाधित होत्या. त्यासाठी अमीरीबाई आणि त्यांच्या संस्थेत सचिव दीपक चौहान यांनी पहिले त्या वारांगनांना त्यांच्या व्यवसायातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना भाजी विकणे, चहाचा स्टॉल लावणे आणि दुसरे काम करण्यासाठी प्रोत्साहित केले, जेणेकरून त्यांचे घरदार चालू शकेल.

दीपक यांनी युअर स्टोरीला सांगितले की, “ ज्या वारांगना एड्स बाधित असतात, आम्ही त्यांची प्रत्येक तीन महिन्यात तपासणी करतो, गरज पडल्यास औषधांची व्यवस्था करतो, त्याव्यतिरिक्त वेळो- वेळी येथे डॉक्टर येतात, जे वारांगना महिलांची तपासणी करतात.”

वारांगनांसाठी उघडण्यात आलेल्या शाळेत या लोकांनी त्यांना केवळ शिक्षणच दिले नाही तर, त्यांना याची देखील माहिती दिली की, एड्स मुळे कुठल्या शहरात किती लोक मृत्युमुखी पडले आहेत. वारांगनांना या प्रकारची माहिती देण्याचा खूप फायदा देखील झाला. अमीरीबाई यांची इच्छा होती की, वारांगनांच्या मुलांना या कामापासून लांबच ठेवण्यात यावे आणि हे तेव्हा शक्य होऊ शकले असते, जेव्हा या भागात शाळेची व्यवस्था असती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारवर दबाव वाढविला, ज्यानंतर येथे पूर्व-प्राथमिक शाळेची स्थापना झाली. त्यानंतर जी मुले येथील रस्त्यावर नुसती फिरायची ती आता शाळेत जाऊ लागली आहेत. दीपक यांच्या मते, “जेव्हा ही मुले थोडी मोठी होतील, तेव्हा त्यांना त्यांच्या आईच्या मुळ गावी पाठविले जाईल. जेणेकरून, वारांगना यांची दुसरी पिढी या व्यवसायात येऊ शकणार नाही. विशेषकरून मुलींसाठी हे लोक जास्त काळजी घेतात, कारण त्यांनी आपले जीवन या अंधारमय भागात व्यतीत करू नये.”

स्वच्छता अभियान या रेडलाईट भागातील विशेष ‘युएसपी’ आहे. अमीराबाई यांचे ठाम मत आहे की, हा भाग देशातील दुस-या रेडलाईट भागापेक्षा सर्वात स्वच्छ आणि सुंदर आहे. या भागात राहणा-या सर्व वारांगनांनी आपल्या घराला गुलाबी रंगाने रंगविले आहे. येथे स्वच्छतेचे इतके लक्ष ठेवले जाते की, कुणीही जर थुंकण्याचा प्रयत्न करत असेल तर किंवा कचरा टाकत असेल तर, त्यांना तेथे उपस्थित असलेले लोक तसे करू देत नाहीत. त्या भागात स्वच्छता कायम रहावी म्हणून, प्रत्येक घराच्या दरवाज्यावर कचरा कुंडी बनविण्यात आली आहे, जेणेकरून लोकांनी इकडे तिकडे आपला कचरा टाकू नये. अमीरीबाई आपल्या संस्थेमार्फत सर्व सण साजरे करतात. जेथे येथील जवळपास सर्व वारांगना सामील होतात. मागील दहावर्षापासून वारांगनांसाठी काम करत असलेल्या अमीरीबाई आज केवळ एड्सशी संबंधित माहिती देत नाहीत तर, येथे राहणा-या महिलांना व्यावसायिक शिक्षण, रोजगार आणि दुस-या कामामुळे या कुप्रसिद्ध व्यवसायातून महिलांना बाहेर काढण्यासाठी त्या सतत प्रयत्नात आहेत.

लेखक : हरिश बिश्त

अनुवाद : किशोर आपटे.