सुडौल पाय, सरळ कणा , रेखीव शरीर, एका खुर्चीचे अनेक फायदे, आराधना आनंद यांच्या 'लीमोन' मधलं अनोखं फर्निचर

0

घर सजवणं त्यांना नेहमीच आवडायचं, अनेक मित्र मैत्रिणीना त्यांनी याबद्दल सल्ले दिले आणि त्यांच्या सर्वसाधारण घराचं रुपडं पालटवून टाकलं. या रंगसंगतीचीच आवड जोपासत, त्यांनी २०१५ मध्ये ' लीमोन ' हे दुकान थाटलं. सागरी क्षेत्रात तेल वाहतूक व्यापारी या पदावर काम करताना दुबई आणि सिंगापूरला सतत रहावं लागणं या सगळ्याला राम-राम करत त्यांनी चक्क आपल्या आवडीलाच व्यवसायाचं रूप द्यायचं ठरवलं.

तुम्हाला अजूनही जर आश्चर्य वाटत असेल की लीमोन नक्की काय आहे ? तर हे आहे विविध खुर्च्याचं प्रदर्शन! विविध घटकांची सुसंगती घडवत अनोख्या अश्या फ़र्निचरची निर्मिती इथे पाहायला मिळते.

आराधना यांचा मध्य पूर्वेकडील प्रवास :

आराधना यांनी त्यांच्या वडिलांसोबत तीन वर्षांच्या असेपर्यंत समुद्र प्रवास केला, १० वर्षापर्यंत त्या मध्य पूर्वेतच वाढल्या आणि त्यानंतर उच्च माध्यमिक शाळेपर्यंतचा अभ्यास त्यांनी दिल्ली इथे केला. आखाती युद्धामुळे त्यांना भारतात परतावं लागल होतं. त्यानंतर इग्लंडमधल्या वारविक बिझनेस स्कूलमधून त्यांनी पदवी मिळवली. २००१ ते २००४ सालापर्यंत त्यांनी एनालिस्ट म्हणून स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँकेत नोकरीही केली. २०१३ साली सिंगापूरहून त्या परतल्या. आराधना यांना आपली ‘लीमोन’ आता नोंदणीकृत करून सिंगापूरलाही किरकोळ विक्री सुरु करण्याचा मानस आहे.

खुर्च्याच का ?

आराधना म्हणतात की फर्निचर ठेवलेली जागा ही त्यांना नेहमीच अपरिपक्व असलेली जाणवायची. तर अनेक तयार उत्पादनांना हात ठेवण्यासाठी किंवा पाय ठेवण्यासाठी जागा नसते. " मला खरच नेहमी असं वाटायचं की या खुर्च्या अपूर्ण आहेत आणि इथे काहीतरी असायला हवं, माझा हा प्रकल्प सुरु होऊन अगधी काहीच आठवडे झालेत पण मला प्रतिसाद मात्र उत्तम मिळतो आहे " असं आराधना सांगतात. त्यांनी अगदी सुरुवातीपासून सुरुवात केली. खुर्च्यांना लागणाऱ्या साऱ्या गोष्टी घरातूनच तयार केल्या आणि एखादी खुर्ची कशी आरामदायी आणि अधिक टिकणारी असेल यावर त्यांचा भर राहिला .

उद्योजिका म्हणून वावरताना

उद्योजिका म्हणून काम सुरु झाल आणि आराधना अत्यंत व्यस्त झाल्या. सुट्ट्या नाहीत की अन्य कोणावर जबाबदारी सोडून थोड निवांत राहणं नाही . म्हणजे नवं काहीतरी सुरु करताना संपूर्णपणे झोकून देऊन काम करताना आराम विरंगुळा या सर्वाना तिलांजली देत उद्योजिका बनण्याचा त्यांचा प्रवास सुरूच राहील. आराधना आता त्यांच्या या अनोख्या खुर्च्यांचा नवा आणि दुसरा संग्रह घेऊन येताहेत . " मी आता क्रेडेन्झा आणि ओट्टोमन हे दोन नवे संग्रह सुरु करणार आहे आणि माझ्या स्टुडियोची जगही नव्याने बनवणार आहे . क्रेडेन्झा म्हणजे विश्वास आणि ओट्टोमन म्हणजे टर्किश राजवटीत वापरण्यात आलेल्या आरामदायी खुर्च्या." अशी माहिती त्यांनी दिली

आता या व्यवसायामुळे त्यांना स्वत:चा असा म्हणायला फारच कमी वेळ मिळतो. पण त्यांचा व्यवसाय, त्यांना हवाय त्या गतीने वाढत असल्याचा आनंद आहे . नुकतंच त्यांच्या या संग्रहाच प्रदर्शन दिल्ली इथंही झाल होतं. कोनाड्यातल्या या क्षेत्रातील वस्तूंसाठीही आता मागणी प्रचंड वाढू लागलीय त्यामुळे आराधना यांना अर्थात आनंद आहे आणि आपल्या या व्यवसायाचं आशादायी भवितव्य त्यांना दिसत आहे. या खुर्च्याच्या वाढत्या प्रतिसादाच श्रेय त्या एकसंध अशी रंगसंगती आणि आकाराची घडण याला देतात, ज्यामुळे या अनोख्या खुर्च्या आपल्या घराच्या कोणत्याही कोपऱ्याची शोभा अधिक वाढवतात .


लेखक : सास्वती मुखर्जी

अनुवाद : प्रेरणा भराडे