विवाह करताना जातीपातीपलीकडे अनुरुपतेला प्राधान्य - अरुंधती बालचंद्रन, संस्थापक अर्बन ट्रिस्ट

विवाह करताना जातीपातीपलीकडे अनुरुपतेला प्राधान्य - अरुंधती बालचंद्रन, संस्थापक अर्बन ट्रिस्ट

Friday October 16, 2015,

6 min Read

आपल्या देशात विवाहसंस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अनेक तरुण-तरुणी आजही ठरवून लग्न करण्याच्या पर्यायाला पसंती देतात. यासाठी पारंपारिक वधु-वर सूचक मंडळांबरोबरच सध्या त्यांच्या समोर असलेला एक प्रमुख पर्याय म्हणजे मॅट्रीमोनियल वेबसाईटस् अर्थात ऑनलाईन वधु-वर सूचक संकेतस्थळे... या संकेतस्थळावर नोंदणी करुन प्रोफाईल अर्थात माहिती नोंदविता येते, ज्यावर आधारीत स्थळे तुमच्याकडे चालून येतात. म्हटले तर अगदी साधा-सरळ सोपा पर्याय... मात्र तरीही अनेकांना सुयोग्य जोडीदार मिळणे कठीणच जाते. काय कारणे असतील यामागे? आणि एखादा चांगला पर्याय नाही का निर्माण करता येणार? हे प्रश्न अनेकांना पडतात.. मात्र प्रत्यक्ष या अनुभवांमधून गेलेल्या आणि संकेतस्थळांच्या उणीवांची जाणीव झालेल्या अरुधंती बालचंद्रन मात्र केवळ हे प्रश्न विचारुन थांबल्या नाहीत... तर त्यावर त्यांनी एक सक्षम पर्याय निर्माण केला... हा पर्याय म्हणजे अर्बन ट्रिस्ट... आजच्या तरुणाईसाठी एक आगळे वेगळे संकेतस्थळ..

चैनईमध्ये जन्मलेल्या आणि तेथेच लहानाच्या मोठ्या झालेल्या अरुंधती अमेरीकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात आपल्या पदव्युत्तर शिक्षणासाठी गेल्या. त्यानंतर त्यांनी नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या डेटा ऍनॅलिटिक्स या विषयातही एसएएस च्या सह्योगाने पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचे तर अरुंधती या एक मोकळ्याढाकळ्या स्वभावाच्या आणि आनंदी व्यक्ती आहेत.

स्वतःबद्दल अधिक माहिती देताना त्या सांगतात, “मी खूपच उत्साही आणि चंचल आहे. मला प्रवास करायला आणि वेगवेगळ्या गोष्टी करुन बघायला खूप आवडते. डेलाॅईट कन्सल्टिंगमध्ये काम करत असताना माझे नेटवर्कींगचे कौशल्य तर अधिक धारदार झालेच पण त्याचबरोबर अमेरिकेतील ३५ राज्यांमध्ये प्रवास करण्याचीही संधी मिळाली. अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षण आणि त्या देशाच्या विविध भागात केलेल्या प्रवासाच्या अनुभवातून माझे व्यक्तिमत्व घडले.”

अशा प्रकारे दोन पदव्युत्तर पदव्या मिळविलेल्या अरुंधती २०११ ला भारतात परतल्या त्या स्वतःचे काही तरी सुरु करण्याचा संकल्प मनात धरुनच... मात्र नोकरी ते स्वतंत्र व्यवसाय हा त्यांचा प्रवास क्रमाक्रमानेच झाला. त्याबाबत त्या सांगतात, “ चेन्नई हे माझे जन्मगाव.... मात्र मी तेथे केवळ काही काळ शिकले होते. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या रुढी आणि संस्कृती समजून घेणे अधिक चांगले ठरेल, असा विचार मी केला.”

त्यामुळेच अर्बन ट्रिस्ट सुरु करण्यापूर्वी काही वर्षे अरुधंती यांनी चेन्नईमध्ये कॉग्निझंट आणि लेटन्ट व्ह्यू या कंपन्यांमध्ये काम केले. भारतात नोकरी करताना आलेल्या अनुभवाबाबत त्या म्हणतात, “ अमेरिकेपेक्षा येथील कामाचे वातावरण खूपच वेगळे आहे. विशेषतः स्त्री-पुरुष भेदभाव जेवढा येथे मला तीव्रतेने जाणवला तेवढा अमेरिकेत कधीच जाणवला नाही. भारतात, लग्न आणि मुले गृहीत धरुन तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जात नाही. तसेच जर तुम्हाला बढती किंवा पगारवाढ मिळाली, तर ती तुमच्या कामामुळे नाही तर तुम्ही स्त्री आहात या एकमेव गुणामुळे मिळाली, असेही मानले जाते. सुदैवाने गेल्या काही वर्षात यामध्ये बदल होताना दिसत आहे आणि भविष्यात आणखीही बदल होईल.”

काही काळ नोकरी केल्यानंतर २०१४ च्या सुमारास स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्याची योग्य वेळ आल्याची जाणीव अरुंधती यांना झाली. या काळात रुढी परंपरांमध्ये होत असलेला बदलही त्यांना कुठेतरी दिसत होताच. तसेच लैगिंक भेदभावही थोडा कमी होताना दिसत होता. या पार्श्वभूमीवर सारासार विचार करुन १४ मे २०१४ रोजी त्यांनी अर्बन ट्रिस्टची स्थापना केली.

वधु-वर सुचक संकेतस्थळांचा त्यांना स्वतःला अनुभव होता. सहाजिकच त्यातील त्रुटीही त्यांना जाणवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सुयोग्य व्यासपीठ पुरवण्याच्या कल्पनेतून अर्बन ट्रिस्टचा जन्म झाला. “ ऑनलाईन वधु-वर सूचक संकेतस्थळांमधील उणीवांची वैयक्तीकरित्या जाणीव झाल्यानंतरच अर्बन ट्रिस्टची संकल्पना जन्मला आली. या संकेतस्थळांवरील बहुतेक प्रोफाईल्स ही पालकांनीच बनविलेली असल्याने मुलांच्या खऱ्या व्यक्तीमत्वापासून कोसो दूर असतात,” अरुंधती सांगतात. त्याबाबत स्वतःचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, “बहुतेक सर्व ऑनलाईन संकेतस्थळांप्रमाणेच माझ्याही आईवडीलांनीच माझे प्रोफाईल तयार केले होते आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वैगेरे त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या बाबींवर आधारीत ही माहिती होती. सहाजिकच त्याला अनुसरुनच मला प्रतिसाद मिळत होता. पण त्यापैकी कोणीच माझ्या पसंतीस उतरत नसे. तसेच बहुतेक मुलेही त्यांच्या प्रोफाईलपेक्षा प्रत्यक्षात वेगळीच होती आणि ही गोष्टही माझ्यासाठी खूप त्रासदायक ठरत होती. लग्नासारख्या अतिशय महत्वाच्या आणि तुमचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या गोष्टीची सुरुवात तुम्ही जे खरे नाही त्यापासूनच कशी करु शकता? आणि हे फक्त माझ्याच बाबतीत घडत नव्हते तर माझ्या मित्रमैत्रिणींनाही असेच अनुभव येत होते.”

सुरुवातीला जेंव्हा अरुंधतीने अर्बन ट्रिस्टची कल्पना सर्वांसमोर मांडली तेंव्हा तिला तिच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी विरोधच केला. चांगली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्यामागचे कारणच त्यांना समजत नव्हते. “ एकूणच जोड्या जमविण्याबाबत किंवा विवाहाबाबत मला स्वतःला कितपत माहिती आहे, हा प्रश्न मला सतत विचारला जायचा. त्यावर माझे उत्तर ठरलेले होते, ते म्हणजे, मी कशामधून गेले आहे ते मला माहित आहे आणि लोकांना काय हवे आहे तेदेखील मला माहित आहे. मी लोकांबरोबर चांगले जुळवून घेऊ शकते आणि मी हे करु शकते,” त्यावेळच्या आठवणींना उजाळा देताना अरुंधती सांगतात. “सुदैवाने माझे पती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने अर्बन ट्रिस्टची स्थापना करणे माझ्यासाठी सुलभ झाले,” त्या पुढे सांगतात.

image


सुरुवातीचे ग्राहक हे मित्रमैत्रिणी आणि या मित्रांच्या मित्रमैत्रिणी यांच्यामधूनच मिळत गेले. “ लाईव्ह जाण्यापूर्वी सहा-सात महिने या संकल्पनेवर काम सुरु होते. लोकांना अशा संकेतस्थळांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी मी एक सर्वेक्षण केले आणि सुरुवात करण्यापूर्वी सुमारे शंभर जणांची माहीती गोळा केली.” अरुंधती सांगतात.

सामाजिक निकषांवर आधारीत जोडीदारापेक्षा अनुरुप जोडीदार या पिढीसाठी जास्त गरजेचा असल्याचे यावेळी अरुंधती यांना स्पष्टपणे दिसून आले. “ तुमच्याच समाजातून अनुरुप जोडीदार मिळविणे नक्कीच शक्य आहे, मात्र लोकांनी आपली क्षितिजे रुंदावून यापलीकडेही पहावे, यासाठी आम्ही आग्रही असतो. समाजापेक्षाही अनुरुपता हाच लग्नासाठी निकष असणे गरजेचे आहे,” त्या सांगतात.

विवाह जमविताना प्रामाणिकपणा आणि व्यक्तीगत गरजा समजून घेण्याच्या गरजेतूनच अर्बन ट्रिस्टची निर्मिती झाली आहे. अर्बन ट्रिस्टच्या माध्यमातून विवाह जमविण्याची प्रक्रिया ही ऑफलाईन असते. इतर संकेतस्थळांपेक्षा अर्बन ट्रिस्ट याबाबतीत अगदी वेगळी आहे. एखाद्याने ऑनलाईन नोंदणी किंवा साईन अप केले, की त्या व्यक्तीला अर्बन ट्रिस्टमधील लग्न जुळविणाऱ्या कर्मचाऱ्याकडून फोन केला जातो आणि त्यानंतर ग्राहकाबरोबरच्या प्रदीर्घ संवादातून त्या व्यक्तीच्या गरजा समजून घेतल्या जातात. त्यानुसार ही लग्न जुळविणारी व्यक्ती सुयोग्य अशा प्रोफाईल्सची यादी बनविते. या सर्व गोष्टी अर्बन ट्रीस्टचे कर्मचारी ऑफलाईन करतात. सर्वाधिक अनुरुप वाटणाऱ्या व्यक्तीबरोबर तुमची भेट घडवून देण्याचे कामही या अंतर्गत केले जाते.

image


“ अनुरुप जोडीदारांचा शोध घेणे हीच यामागची मुख्य कल्पना आहे. आमच्याकडील विवाह जुळविणारेदेखील आमच्या ग्राहकांच्याच वयोगटातील आहेत. प्रत्येक व्यक्तीला नेमके काय हवे आहे, ते जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि त्यानुसारच आमचे काम चालते. माझ्या नवऱ्याशी माझी ओळख माझ्या मित्रमैत्रिणींच्याच माध्यमातून झाली, ज्यांना मी काय शोधत आहे ते माहित होते आणि माझ्या नवऱ्याला काय हवे आहे तेदेखील माहित होते. मला आवडू शकेल अशी व्यक्ती ते म्हणूनच शोधू शकले. अर्बन ट्रिस्ट याच गोष्टीवर आधारीत आहे. तुमच्या वयोगटातील, तुम्हाला समजुन घेऊ शकेल अशी व्यक्तीच तुमच्या इच्छेप्रमाणे किंवा गरजांप्रमाणे सुयोग्य व्यक्तीचा शोध घेऊ शकते,” त्या सांगतात.

ही संपूर्ण कार्यपद्धती अधिक विस्ताराने सांगताना त्या म्हणतात, “जरी या संपूर्ण प्रक्रियेत कुटुंबालाही सहभागी करुन घेण्यास आम्ही सांगत असलो, तरी मुलगा किंवा मुलीने स्वतः स्वतःचा प्रोफाईल बनवला आहे, याची आम्ही खात्री करुन घेतो. त्याचबरोबर त्यांची माहिती त्यांनी प्रामाणिकपणे दिली आहे, हेदेखील आम्ही पहातो. अनेक पालक आम्हाला फोन करुन नोंदणी करण्याबाबत विचारणा करत असतात, पण त्यांच्या मुला-मुलीने नोंदणी करणे अधिक चांगले ठरु शकेल, असे आम्ही त्यांना आवर्जून सांगतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मुला-मुलीनेच आमच्या लग्न जुळविणाऱ्या व्यक्तीशी बोलावे असेही आम्ही सांगतो. कारण लग्न शेवटी त्यांना करायचे असते.”

केवळ उच्च शिक्षितच नाहीत, तर अनेक गोष्टींची आवड असणाऱ्या, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पहाणाऱ्या बहुआयामी व्यक्तिमत्वांसाठी अर्बन ट्रिस्टची निर्मिती करण्यात आली आहे. आज जरी अर्बन ट्रिस्टचे ५०-६० टक्के ग्राहक चेन्नई आणि बंगलोरचे असले, तरी दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकात्तासारख्या देशाच्या इतर भागातील तसेच अमेरिका आणि ब्रिटनमधील ग्राहकांची संख्याही हळूहळू वाढत आहे.

देशाच्या इतरही भागांमध्ये अर्बन ट्रिस्टचा विस्तार करण्याचा अरुंधती यांचा मानस आहे. त्याचप्रमाणे विविध शहरांतील रुढी-परंपरा आणि मानसिकता ओळखून त्याप्रमाणे लग्न जुळविणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचीही त्यांची इच्छा आहे. जेणेकरुन आजच्या पिढीतील तरुणांना साजेसा आणि अनुरुप जोडीदार मिळू शकेल.