‘प्रोजेक्ट स्टारफिश’ लाखो अंधांसाठी नव्या आयुष्याचे नाव

 ‘प्रोजेक्ट स्टारफिश’ लाखो अंधांसाठी नव्या आयुष्याचे नाव

Friday November 27, 2015,

9 min Read

प्रोजेक्ट स्टारफीशचे संस्थापक, संरक्षक आणि प्रशिक्षक शुभाशीष आचार्य जुन्या आठवणींना उजाळा देत सांगतात, “दोन वर्षांपूर्वी बोस्टनमधील एका हुडहुडी भरविणाऱ्या सकाळी मला आणि माझ्या पत्नीला अंधांना नोकरी मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित एका कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी बोलावले होते.”

image


शुभाशीष पुढे सांगतात, “एक भारतीय असण्याच्या नात्याने मला इतर अंध व्यक्तींसाठी या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायची इच्छा होती, जेणेकरुन त्यांना या उपस्थित लोकांची प्रगती पाहण्याची संधी मिळून एक नवा अनुभव घेता यावा. या उत्सुक प्रोफेशनल्सचे हातात बायोडाटा घेऊन नियोक्त्यांच्या समोर रांगेत उभे रहाणे आणि संधी मिळताच आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणे माझ्यासाठी एक रोमांचक क्षण होता. मात्र शेवटी मला हे समजल्यावर मी हैराण झालो की दिवसाच्या शेवटी या १५० सक्षम आणि शिक्षित व्यक्तींमधून कुणालाच नोकरी मिळाली नाही. आणि बस हाच माझ्या आयुष्यात परिवर्तन आणणारा क्षण होता. कारण इथेच मी अपंगत्वाच्या झळा सोसणाऱ्या या लोकांच्या समस्या जाणू लागलो.”

तुम्ही एका अशा व्यासपीठाची कल्पना करा जे अंध व्यक्तींना व्यावहारिक अनुभव देऊ करेल आणि त्यानंतर त्यांची अशा नियोक्त्यांशी भेट घालून देईल जे त्यांच्या या अनुभवातून प्राप्त केलेल्या कौशल्याचा योग्य उपयोग करुन घेण्यास सक्षम असतील. कल्पना करा एका पूर्णपणे नवीन, अद्वितिय मॉडेलची जे पूर्णपणे ग्लोबल आणि आत्मनिर्भर होण्याबरोबरच नियोक्ता आणि कर्मचारी दोघांनाही समान महत्त्व देते. दान आणि सहानुभूतीवर आधारित परोपकारांवर चालणाऱ्या मॉडेल्सच्या विरुद्ध हे मॉडेल उपयोगकर्त्यांचे कौशल्य आणि प्रतिभेच्या जोरावर कार्यरत राहण्यास सक्षम आहे आणि हीच ‘प्रोजेक्ट स्टारफीश’ची संकल्पना आहे.

image


सध्या कामाच्या शोधात निघालेल्या कुठल्याही व्यक्तिच्या समोर सर्वात मोठे आव्हान असते ते कामाच्या अनुभवाचे आणि विशेषकरुन अंधांसाठी तर ही खूप मोठी समस्या असते. म्हणूनच अनेकदा त्यांना नोकरी मिळणे कठीण होते. याशिवाय गतीशिलता त्यांच्यासाठी आणखी एक समस्या ठरते. यामुळे ते शिकलेले असूनही नोकरी देणारे त्यांना नोकरी देऊ इच्छित नाही. दृष्टीदोषांनी पीडितांची संख्या जवळपास २५० दशलक्ष आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

अमेरिकेमध्ये जवळपास ८० टक्के अंध प्रोफेशनल्स सामाजिक सुरक्षा प्रशासनाकडून प्राप्त अत्यल्प अनुदानावर निर्भर असतात आणि जर आपण जगभरातील परिस्थितीवर नजर टाकली तर दिसते की अनेक लोकांच्या नशीबात एवढेही नसते. त्यांना लोकांकडून मिळणारे दान आणि सहानुभूतीच्या आधारावरच आपले जीवन व्यतित करावे लागते. याशिवाय जगामध्ये अशा विकलांग व्यक्तिंचे असे अनेक समूह आहेत जे संधीच्या अभावामुळे आर्थिकदृष्ट्या पारतंत्र्यामध्ये आहेत. आपण त्यांच्या प्रती दया किंवा सहानुभूती तर दाखवू शकतो, मात्र जोपर्यंत आपण त्यांच्यासाठी असे प्लॅटफॉर्म तयार करित नाही जे त्यांना आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे घेऊन जात समान संधी प्राप्त करुन देतील आणि एका प्रोफेशनलच्या रुपात आयुष्याची नवी सुरुवात करण्याची संधी उपलब्ध करुन देतील, तोपर्यंत काहीच बदलणार नाही. गेल्या अनेक शतकांमध्ये या कामासाठी अनेक अब्ज डॉलर खर्च केले गेले आहेत. मात्र काहीच बदललेले नाही.

अनेक अंध प्रोफेशनल्स शिक्षित होण्याबरोबरच स्मार्ट आणि बुद्धिमानही आहेत आणि त्यांना आयटी क्षेत्राची चांगली माहितीही आहे. ते कॉम्प्युटर स्क्रीनवर दाखविल्या जाणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी स्क्रीन रीडरचा वापर करतात. सध्याच्या काळात स्मार्ट फोन सहज उपलब्ध आहे आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने हे लोक ते सर्व काही करु शकतात जे सामान्य माणूस करु शकतो. फक्त त्यांची काम करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. अनेकदा तर ते हे काम सामान्य प्रोफेशनल्सच्या तुलनेत कमी वेळात पूर्ण करतात.

उदयोन्मुख व्यापाऱ्यांमध्ये सफलतेचे प्रमाण खूप कमी आहे. काही जण तर पहिल्या पाच वर्षातच हार मानतात. कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा ६० ते ७० टक्के भाग यांच्यावर अवलंबून असतो आणि जागतिक स्तरावर तर यांची संख्या करोडोवर जाते. तर मग हे अयशस्वी का होतात? उत्तर खूप सोपे आहे. हे पैशाला कार्यान्वीत आणि व्युत्पन्न करण्यामध्ये अयशस्वी होतात. एखादा व्यवसाय शून्यापासून सुरु करुन त्यामध्ये जम बसवायला खूप कष्ट करावे लागतात. हे एखाद्या विमानाप्रमाणे असते, ज्याला जमिनीवरुन वर उठण्यासाठी जास्तीत जास्त उर्जेची आवश्यकता भासते. दुर्देवाने छोट्या व्यवसायांबरोबर असे होत नाही. कारण त्यांच्याकडे जमिनीवरुन लवकरात लवकर उठण्यासाठी पुरेशी साधनसंपत्ति उपलब्ध नसते.

सध्याच्या काळात माहिती तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे बाजारातील वस्तू किंवा सेवांच्या क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर झाल्या आहेत. कोणीही कुठेही बसून जगभरात आपला व्यवसाय कार्यान्वित करु शकतो. मग अशा वेळी संपूर्ण जगच एक व्यासपीठ म्हणून उपलब्ध असताना व्यवसायात अपयश का येते? याचे उत्तर लपले आहे ग्राहकांच्या एखाद्या गोष्टीशी जोडले जाण्याच्या आणि तिला स्वीकारण्याच्या गतीमध्ये.

आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून एवढी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे की अनेकदा उपलब्ध पर्यायांमधून एखादी गोष्ट निवडणे हे खूप कठीण जाते. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या गोष्टीशी जोडले जायला ग्राहकांना वेळच मिळत नाही आणि हेच डिजीटल अर्थव्यवस्थेसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे. डाटा किंवा माहिती ही एक नवीन गोष्ट आहे. मात्र यामध्ये खूप वेळ खर्च होतो. आजचे युग ज्ञानाच्या अर्थव्यवस्थेचे आहे. जिथे तुमची गतीच तुमचे सर्वात मोठे हत्यार आहे. आता मोठ्या माशाने छोट्या माशाला खाण्याचा काळ गेला. आता जलद मासा धीम्या माशाला खातो.

शुभाशीष सांगतात, “स्टारफीशचे व्यासपीठ पूर्णपणे निःशुल्क आहे आणि हे आम्ही ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्यांसाठी नेहमीच मोफत राहील. आम्ही एक विशेष संरचित कार्यक्रम तयार केला आहे, जो आमच्या सदस्यांच्या कौशल्याला काही आठवड्यातच आणखी वाढवितो. आम्ही कुठल्याही प्रकारची देणगी अथवा अनुदान घेत नाही. आम्ही ‘माश्याला खायला घालायला शिकवायच्या’ ऐवजी ‘माश्याला कसे पकडतात’ या संकल्पनेवर काम करतो आणि ही आजच्या काळाची गरज आहे. कुठल्याही अर्थसहाय्याशिवाय आम्ही एक आंतरराष्ट्रीय संघटना उभी करण्यात यशस्वी झालो आहोत. जगाच्या इतिहासात असे करणारे हे एकमेव स्टार्टअप असेल.”

आम्ही हे जाणून हैराण झालो की शुभाशीष यांच्या टीममध्ये त्यांच्याव्यतिरिक्त इतर सर्व सदस्य अंध आहेत. ते पुढे सांगतात, “आमच्या टीममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सदस्य आहेत. काही अगदीच अशिक्षित आहेत तर काहीजण विविध क्षेत्रामध्ये मास्टर्स डिग्री घेतलेले आहेत. तर काही जण पीएचडी आणि एमबीए केलेलेही आहेत. हे सर्व एका व्यावसायिक संस्कृती असलेल्या वातावरणात एकत्र काम करतात आणि आपल्यासाठी उत्तमोत्तम संधी शोधून काढतात. मला आता हे समजू लागलं आहे की यश हे तुमच्या वृत्ती आणि मनोदृष्टीमध्ये असते. कौशल्य तर शिकता येऊ शकतं. आम्ही एखादी गोष्ट करण्याच्या वेडाने झपाटलेल्या लोकांना आमच्याशी जोडतो आणि त्यांचे कौशल्य विकसित करतो. कामच आमची पूजा आहे. ‘प्रोजेक्ट स्टारफीश’ आता एक मिशन बनले आहे. एक नवी शक्यता, एक नवी आघाडी. बदल अनिवार्य आणि स्थिर आहे आणि आम्ही बदल आणण्यात यशस्वी होत आहोत.”

पाच वर्षात एक हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे ‘प्रोजेक्ट स्टारफीश’चे उद्देश्य आहे. त्यांना त्यांचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी बाजाराची गरज खूप बारकाईने जाणून घ्यावी लागेल. हे फक्त गती कायम ठेऊन आणि उपभोक्त्यांना स्वतःबरोबर जोडून ठेवल्यानेच शक्य होऊ शकेल.

एक मानव डाटा मशीन तयार करणे – ज्ञानाच्या क्षेत्रात विस्तृत संशोधन काळाची गरज आहे. विक्रीचे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सुरुवातीला डाटा एकत्र करावा, उपभोक्त्यांचा अभ्यास करावा, त्यांना समजून घ्यावे आणि नंतर त्यांच्याशी जोडले जावे. ‘प्रोजेक्ट स्टारफीश’ मोठया कॉर्पोरेट्सच्या सेल्स टीमबरोबर मिळून मागणीवर शोधकर्ते तयार करु इच्छिते. मोठ्या बाजाराशी संबंधित संशोधन प्रकल्पांना छोट्या छोट्या भागांमध्ये विभागले जाते आणि त्यानंतर अंमलबजावणीसाठी ‘प्रोजेक्ट स्टारफीश’च्या जगभरातील अंध सदस्यांकडे पाठविले जाते, ज्यांना शेवटी एक प्रोजेक्ट मॅनेजर एकत्र करतो. एका वितरित प्रक्रियेला मालिका प्रक्रियेत परिवर्तीत केले जाते, ज्याची वर्षाचे ३६५ दिवस अंमलबजावणी केली जाते आणि माहिती एकत्र केली जाते. तेही कमी वेळात आणि कमी खर्चात. याचे व्यापार मूल्य अगदी वास्तविक आहे.

लेखन आणि प्रूफ रिडिंगला सेवेच्या रुपात प्रचलित करणे – व्यावसायिक रुपात केल्या गेलेल्या कुठल्याही लिखाणाला प्रूफ रिडींग आणि लेखनातील सूक्ष्म बदलावांची आवश्यकता असते आणि ते एक खूप वेळखाऊ काम असते. स्क्रीन रीडरचा वापर करण्यात पारंगत असलेले अंध प्रोफेशनल्स या कागदपत्रांच्या प्रूफ रिडींगचे वेळखाऊ काम खूप चांगल्या पद्धतीने करु शकतात.

जगातील ९० टक्के बोअरहोल डाटा वाचणे – हे सत्य आहे. बोअरहोल जमिनीतील विविध खडकांच्या स्तरांविषयी जाणून घेण्यास मदत करुन खोदकाम सोपे करण्यास मदत करते. त्यामध्ये ‘सोनिफिकेशन’ हे सॉफ्टवेअर खडकांच्या व्याख्या करण्याचे काम सोपे बनविते. ताऱ्यांचा डाटा प्रवाह जाणून घेण्यासाठीही जवळपास हीच पद्धत वापरली जाते. अंध प्रोफेशनल्स हे काम करु शकतात. त्यांना हे काम करण्यासाठी चांगला मोबदलाही दिला जातो.

भर्ती आणि सोर्सिंगला एका सेवेच्या रुपात आणणे – सध्या अशा अनेक भर्ती एजन्सीज्, नियोक्ता आणि विविध स्रोत आहेत जे आपला ८० टक्के वेळ केवळ माहिती गोळा करण्यासाठी खर्च करतात. कल्पना करा की एक अंध व्यक्ती सोर्सिंग, शोध आणि नियुक्तीचे काम स्वतः करु शकतो. ज्यामुळे नियोक्ताही आपले काम दुप्पट वेगाने आणि लवकरात लवकर पूर्ण करु शकतो. ‘प्रोजेक्ट स्टारफीश’ने या दिशेने एका प्रारंभिक योजनेच्या क्रियान्वयनाला सुरुवात केली आहे.

ते पुढे सांगतात, “आम्ही अपयशी झालो, परीक्षण केले, पुन्हा उठलो आणि काय काम करायचे आणि काय नाही याचा शोध घेतला. आम्ही खूप लवकर अपयशी झालो. मात्र आम्ही आमचा धडा शिकलो आणि लगेचच आमचा रस्ता बदलला. असं करणं कुठल्याही स्टार्टअपसाठी खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही फक्त तुमचे धडे घेत रहा आणि अपयशाकडे दुर्लक्ष करा. फक्त धडा लवकर शिका. आपल्या मनात धैर्य ठेवून परिस्थितीला स्वीकारायला शिका.”

त्यांच्यासाठी सुरुवात तितकी सोपी नव्हती. त्यांच्या या नव्या संकल्पनेला एक संधी द्यायला कोणीही तयार नव्हते. हा एक खूप चांगला प्रकल्प असूनही लोक याला स्वीकारण्यासाठी पुढे येत नव्हते. शुभाशीष सकाळी आपल्या कामावर जायचे आणि त्यानंतर रोज संध्याकाळी सहा ते सात तास लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी काढायचे. शेवटी त्यांनी अमेरिकेत वेग पकडला. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात ते दोन गोष्टी शिकले ज्या त्यांनी आम्हाला सांगितल्या, “पहिलं म्हणजे फक्त लोक आणि विश्वासच दुनियेतील दोन विश्वासाची चलनं आहेत. त्यांना विकसित करा. दुसरी ही की ट्रेनचा वेग तोच असतो जो इंजिनाचा असतो. हे सर्व पुढे येऊन नेतृत्व करण्याविषयी आहे. जेव्हा तुम्ही पुढे येऊन नेतृत्व करता आणि आपल्या कामावर विश्वास ठेवता तेव्हाच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात.”

आता आम्ही तुम्हाला १८ महिने पुढे घेऊन जातो. ‘प्रोजेक्ट स्टारफीश’ने नऊ देशांमध्ये दृष्टीदोष आणि इतर अंपगत्वाशी झुंज देणाऱ्या जवळपास एक हजार प्रोफेशनल्सना प्रशिक्षित करण्याचे काम केलेले आहे. याशिवाय त्यांनी ४५ हून अधिक स्टार्टअप्सबरोबर काम केलेले आहे, जे आठ देशातील उदयोन्मुख व्यावसायिक आहेत. त्याचबरोबर त्यांनी वर्षानुवर्षे बेरोजगारीचे जीवन जगणाऱ्या लोकांना आपल्यासोबत घेत कुठल्याही प्रकारची देणगी न घेता एक लाख डॉलरहून अधिक रक्कम जमा केली आहे. ७० टक्क्याहून अधिक सदस्य काम करुन पैसा कमवित आहेत. त्यांनी आशेचे दरवाजे उघडत नवीन आयुष्य मिळविले आहे. अनेक लोक अजूनही पूर्णवेळ किंवा अर्धवेळ नोकरी करित आहेत.

शुभाशीष आपल्या नोकरीचे तास पकडून एकूण १८ तास काम करतात. मात्र या उद्योगातून स्वतःसाठी एक पैसाही कमवत नाहीत (या उद्योगातून आलेला पैसा थेट सदस्यांना जातो), प्रशिक्षण आणि संरक्षण देत जागतिक स्तरावर पोहचण्याचे स्वप्न बघतात. त्यांच्या प्रेरणेविषयी विचारल्यावर ते सांगतात, “याचे उत्तर खूप सरळ मात्र समजण्यास खूप कठीण आहे. आमच्याबरोबर जोडले गेलेले प्रोफेशनल्स जे अंधत्व किंवा इतर अपंगत्वाचे शिकार आहेत, मला नेहमी प्रेरित करतात. त्यांना प्रत्येक ठिकाणी विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. जसे की ते त्यांच्या प्रियजनांना पाहू शकत नाही किंवा ते सिनेमे पाहू शकत नाहीत जे त्यांचे मित्र पाहू शकतात किंवा कार चालवू शकत नाहीत. ते निसर्गाच्या सौंदर्यापासूनही अनभिज्ञ असतात. ते आकाशात येणाऱ्या इंद्रधनुष्याचे रंग पाहू शकत नाहीत. ते लोक सुट्ट्याही नाही घेऊ शकत. आणखीही अनेक अशी कामे आहेत जी आपल्यासाठी सामान्य आहेत मात्र त्यांच्यासाठी अशक्य असतात.”

‘प्रोजेक्ट स्टारफीश’ची टीम रोज आपले काम करण्यासाठी मैदानात उतरते. एकत्र काम करताना, आपल्या संस्थेला पुढे घेऊन जात आणि आपल्या अपंगत्वाबद्दल कोणतीही तक्रार न करता उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील असते. शुभाशीष सांगतात, “मी करत असलेले कार्य पहाल तर तुम्हीसुद्धा प्रभावित आणि प्रेरित व्हाल. त्यांच्यासाठी वैयक्तिक आणि व्यावसायिक रुपात स्वत:ला स्थापित करणे माझ्यासाठी सर्वात मोठे बक्षिस आहे, मी समाजातील एका साधारण कार्यकर्त्यापासून एक मूल्यवर्धित नेता बनलो आहे.”

थोडक्यात सांगायचे तर ‘प्रोजेक्ट स्टारफीश’ एक अशी योजना आहे जी दूरदर्शी असण्याबरोबरच एक असे रचनात्मक व्यापार मॉडेल आहे जे व्यापारातील उत्पन्नाबरोबरच एक सामाजिक प्रभावही निर्माण करते. शेवटी शुभाशीष सांगतात, “ लोक म्हणतात की वास्तविक शोध नवीन उत्पादन, जमीन किंवा आविष्कारात नाही आहे तर एकाच गोष्टीला वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्यात आहे. मी दर दिवशी नवीन शक्यतांना पहातो आणि लाखो लोकांसाठी एका सोनेरी भविष्याची कल्पना करतो.”


लेखक : निशांत गोयल

अनुवाद : अनुज्ञा निकम

    Share on
    close