पोर्टिया मेडिकलनं मेडिबीझफार्माचा ताबा घेतल्यानं रुग्णांना मिळणार अधिक सुविधा

0

रुग्णांची त्यांच्या घरी जाऊन काळजी घेण्यासाठी काम करणाऱ्या पोर्टिया मेडिकलने विशेष औषध वितरक मेडिबिझफार्मा ताब्यात घेतल्याची घोषणा केलीये. पण यातील आर्थिक व्यवहार गुप्त ठेवण्यात आला आहे. या व्यवहारातून दीर्घकालीन आजार असलेल्या भारतातील रुग्णांची जास्त काळजी घेण्याचा पोर्टिया कंपनीचा हेतू आहे.


मीना आणि गणेश कृष्णन यांनी जुलै २०१३ मध्ये झॅक्री जोन्स आणि करण अनेजा यांनी २०१२ मध्ये स्थापन केलेली पोर्टिया कंपनी विकत घेतली. पोर्टियाचं भारतातील २४ शहरांमध्ये सध्या काम सुरू आहे तर मलेशियातील चार शहरांमध्येही त्यांचं काम सुरू आहे. प्राथमिक आरोग्य निगा, रुग्णालयात दाखल केल्यानंतरची निगा, दीर्घकालीन आजार व्यवस्थापन आणि यांच्याशी संबंधित इतर सेवांवर कंपनीनं लक्ष केंद्रीत केलं आहे. कंपनीतर्फे डॉक्टर, नर्स, मदतनीस आणि फिजीओथेरपीस्ट यांच्या माध्यमातून थेट घरी येऊन सेवा पुरवली जाते. त्याचबरोबर लॅबसाठीच्या तपासणीचे नमुने घरी येऊन घेऊन जाण्याबरोबरच वैद्यकीय साधनं भाडेतत्वावर उपलब्ध करुन दिली जातात. सध्या संपूर्ण भारतातील २४ शहरांमध्ये दर महिन्याला ६० हजार रुग्णांना घरी जाऊन सेवा पुरवली जाते असा दावा कंपनी करतेय. नुकतच सप्टेंबर २०१५ मध्ये कंपनीला एस्सेल, आयएफसी, क्वॅलकॉम व्हेंचर्स आणि व्हेंचरिस्टतर्फे ३ कोटी ७५ लाख अमेरिकन डॉलरचा निधी मिळाला आहे.

भारतात दीर्घकालीन स्वरुपाच्या आजारांशी लढताना जागृती, निरीक्षण आणि व्यवस्थापन यासाठी एक निश्चित आराखडा महत्त्वाचा आहे असं पोर्टिया मेडिकलच्या एमडी आणि सीईओ मीना गणेश सांगतात. रुग्णालयात जशी रुग्णांची काळजी घेतली जाते तशीच काळजी घरी घेतली गेली तर लवकर फरक पडतो, असंही मीना सांगतात. दीर्घकालीन आणि तीव्र स्वरुपाच्या आजारांबाबत पोर्टियाचं काम आधीपासूनच सुरू आहे आणि आता मेडिबीझ ताब्यात घेतल्यानं रुग्णांना औषधोपचारातही व्यवस्थित मदत करता येईल असं मीना सांगतात.

२००९ मध्ये सुरू झालेली मेडिबीझफार्मा ही औषधनिर्माण लाभ व्यवस्थापक( PBM) म्हणजेच रुग्ण आणि आरोग्यव्यवस्थेतील कोणतीही यंत्रणा यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणारी अग्रणी कंपनी आहे. कंपनीनं सहा वर्षात दोन लाखांपेक्षाही जास्त रुग्णांना त्यांची औषधं, थेरपीसाठी मदत आणि सुपर स्पेशालिटी औषध उपलब्ध करुन देण्यात मदत केल्याचा दावा कंपनी करते. मेडिबीझचं मुख्य केंद्र बंगळुरूमध्ये असून त्यांचे २०० कर्मचारी आहेत. त्याचबरोबर भारतातील १९ राज्यांमधील २६ शहरांमध्ये कंपनीचं काम सुरू आहे. २०११ मध्ये रिलायन्स एडीए समूहानं ही कंपनी ताब्यात घेतली. औषधनिर्माण व्यवसायात काम करणारे आणि फायझर इंडिया कंपनीचे माजी एमडी केवल हांडा हे ३० वर्षांचे तरुण मेडिबीझचे अध्यक्ष आहेत.

आजार हे औषधाने बरे होत असले तरी रुग्ण हा काळजी घेतली गेली तर प्रतिसाद देतो आणि तीव्र स्वरुपाच्या आणि दीर्घकालीन आजारांच्या बाबतीत तर अनेक वर्ष अशी काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांना आणखी चांगली सेवा देण्यासाठी पोर्टियासोबत आल्यानं सकारात्मक परिणाम होतील असं केवल हांडा सांगतात.

इंडिया ब्रँड इक्विटीच्या अहवालानुसार भारतातील आरोग्य क्षेत्रातील उलाढालीचा अंदाज २०१२ -१३ मध्ये ७५ अब्ज अमेरिकन डॉलर होता आणि २०१७ पर्यंत हा आकडा १६० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतात विविध आजारांमुळे होणाऱ्या मृत्युंच्या प्रमाणात संसर्गजन्य नसलेल्या आजारांमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५३ टक्के आहे. पण एका अंदाजानुसार २०३० पर्यंत हा आकडा ६७ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. यात ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण संसर्गजन्य नसलेल्या आजारांच्या प्रमाणापैकी ५२ टक्के तर एकूण मृत्यूंपैकी २९ टक्के आहे.

मेडिबीझच्या सेवांमध्ये औषध कंपन्यांसाठी स्पेशालिटी फार्मा सपोर्ट अर्थात रुग्ण सहाय्य उपक्रम (PAP) आणि कर्मचाऱ्यांसाठीच्या उपक्रमात औषध लाभ व्यवस्थापन सेवा पुरवली जाते. मधुमेह, ह्रदयाचे आजार, आँकोलॉजी, ऑस्टिओआर्थीरिटीस, ऑस्टिओपोरोसिस,संधिवात, टीबी आणि मेंदूशी संबंधित आजार हे सर्वकाही कंपनीच्या सेवांच्या कक्षेत येतं.

तर दुसरीकडे पोर्टिया प्राथमिक आरोग्य निगा, रुग्णायलात दाखल केल्यानंतरची निगा, दीर्घकालीन आजारांचं व्यवस्थापन आणि त्याच्याशी संबंधित निदान आणि वैद्यकीय उपकरणांसारख्या सेवा पुरवते. त्याचबरोबर घरी जाऊन वैद्यकीय सेवा पुरवण्याबरोबरच कंपनी रुग्णालयं, विमा कंपन्या आणि वैयक्तिक पातळीवरही आरोग्य सेवा पुरवते.

भारतात प्राथमिक आरोग्याचं क्षेत्र असंघटित आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा घरी उपलब्ध करुन देण्याचं महत्त्वाचं काम पोर्टिया कंपनी करते आहे. कंपनीला सध्या हेल्थकेअर ऍट होम, इंडिया हेल्थकेअर यासारख्या कंपन्या स्पर्धक आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य सेवा देणारी पोर्टिया आणि विशेष औषधसेवा देणारी मेडिबीझफार्मा एकत्र आल्यामुळे भारतातील आरोग्यक्षेत्रात पोर्टिया मोठी भूमिका बजावू शकते.

वेबसाईट - www.portea.com

लेखक – हर्षित मल्ल्या

अनुवाद- सचिन जोशी