‘लेडी यु आर नॉट ए मॅनः अपुर्वा पुरोहित यांचा महिलांना परखड सल्ला...

0

२०१३ मार्चमध्ये फेसबुकच्या सीओओ शेरिल सॅंडबर्ग यांचे ‘लीन इन’ हे पुस्तक प्रकाशित झाले आणि लवकरच बेस्टसेलरच्या यादीत जाऊन बसले. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे २१ व्या शतकातील महिलांच्या कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीलाही या पुस्तकाने वाचा फोडली. काहीशी अशीच घटना त्यावर्षी भारतातही घडली. २०१३ च्या जुलै महिन्यात एफएम नेटवर्क रेडीयो सिटी ९१.१ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपुर्वा पुरोहित यांचे ‘लेडी यु आर नॉट ए मॅन – ऍडवेंचर्स ऑफ ए वुमन एट वर्क’ हे पुस्तक प्रकाशित झाले आणि राष्ट्रीय स्तरावरील बेस्टसेलर ठरले. अतिशय महत्वाच्या विषयावरील ही दोन पुस्तके एकापाठोपाठ एक प्रकाशित होणे, हा मात्र केवळ योगायोग होता. सॅंडबर्ग यांचे पुस्तक अतिशय मौल्यवान असले, तरी भारतीय स्त्रियांना मात्र पुरोहीत यांचेच पुस्तक अधिक जवळचे वाटले. कारण सहाजिकच त्यांच्या रोजच्या प्रश्नांविषयी किंवा लढ्य़ांविषयीचे यामध्ये असलेले संदर्भ....

या पुस्तकाइतकीच पुस्तकाच्या लेखिकेबद्दलही उत्सुकता निर्माण होणे सहाजिकच होते. माध्यम क्षेत्रात तेदेखील सर्वोच्च स्थानावर प्रदीर्घ कारकिर्द असलेल्या अपुर्वा पुरोहीत या पुस्तकाच्या लेखिका.... एक अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व.... स्त्रियांच्या प्रश्नांवर जिव्हाळ्याने बोलणाऱ्या अपुर्वा यांना स्त्रीवादी म्हणवून घ्यायला मात्र मुळीच आवडत नाही, कारण अशा प्रकारच्या लेबलचा त्यांना मनस्वी तिटकारा आहे. “ लेबल प्रतिबंधात्मक असतात आणि त्यामुळे तुम्ही काय साध्य करु शकता, याबाबतच्या तुमच्या कल्पनांवर मर्यादा येतात,” त्या स्पष्ट करतात. मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच त्या स्त्री-पुरुष समानतेसाठी सातत्याने लढत आहेत. तसेच केवळ माध्यम क्षेत्रातच नाही तर देशांतही अगदी मोजक्या स्त्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापर्यंत पोहचल्या असून, त्यापैकी अपुर्वा एक आहेत. अपुर्वा यांच्या कारकिर्दीची जडणघडण, त्यांना आलेले अनुभव, पुस्तक लिहिण्याचा निर्णय आणि एकूणच आजच्या स्त्रियांना त्यांना काय सांगावेसे वाटते, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.


दैवाने चालून आलेल्या संधी आणि नातेसंबंध यांना अपूर्वा यांच्या आयुष्यात खूपच महत्वाचे स्थान आहे. त्यांची कारकिर्द घडविण्यातही या गोष्टींचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास हे सिद्ध करतो.

भौतिकशास्त्र विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या अपुर्वा यांनी आईच्या आग्रहाखातर व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरविले. “ व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याने माझ्या एका नातेवाईकाला सिटी बॅंकेत चांगली नोकरी मिळाल्याचे माझ्या आईने ऐकले होते आणि ती माझ्यासाठीही तेच स्वप्न पहायला लागली. माझ्या आईने मानसशास्त्र विषयात पीएचडी मिळवली होती आणि ती एक शिक्षिकाही होती. तिचा आम्हाला खूपच धाक होता. मुख्य म्हणजे तिने माझ्या भावापेक्षा मला कधीच वेगळ्या पद्धतीने वागविले नाही. त्यामुळे स्त्री असणे हे काही वेगळे आहे, असे म्हणूनच मला कधीच जाणविले नाही. आम्ही सगळी फक्त मुलं होतो आणि आयुष्यात काही तरी खूप चांगले करायचे आहे, ही महत्वाकांक्षा ठेवून आम्ही मोठे झालो. तसेच यासाठी शिक्षण हाच योग्य मार्ग आहे, हे देखील आम्हाला माहित होते,” अपुर्वा सांगतात.

त्यानुसार पुढे त्यांनी सीएटी अर्थात कॅट ही परिक्षा दिली. त्यामधील लेखी परिक्षेनुसार जरी त्या सर्व आयआयएमसाठी पात्र ठरल्या असल्या तरी मुलाखतीनंतर मात्र त्यांना केवळ आयआयएम बंगलोरमध्येच प्रवेश मिळू शकला. त्यांच्यासारख्या अतिशय हुशार विद्यार्थिनीसाठी आपण सगळेच काही करु शकत नसल्याची जाणीव चांगलीच धक्कादायक होती.

मात्र बंगलोरमधील ती दोन वर्षे भुर्रकन उडून गेली. त्या दिवसांबद्दल सांगताना अपुर्वा म्हणतात, “ आम्ही त्यावेळी आजच्या इतके पुढारलेले नव्हतो. त्यावेळी काही इंटरनेट नव्हते. त्यामुळे कारकिर्दीविषयीचे पर्याय निवडताना निरनिराळ्या लोकांशी बोलणे एवढाच मार्ग आमच्यापुढे असे, अशाच एका चर्चेत मला एकांकडून ते एचटीए (त्यावेळची देशातील सर्वात मोठ्या जाहिरात संस्थापैकी एक) मध्ये काम करत असल्याचे समजले. मला ते ऐकून आनंद झालाआणि त्यामुळे मी तेथे उन्हाळी प्रशिक्षणासाठी गेले. माझे ते दोन महिने खूप आनंदात तर गेलेच पण त्याचबरोबर ब्रॅंडस्, सर्जनशीलता आणि गोष्टी सांगणे या विषयांबद्दलच्या माझ्या आवडींची मला जाणीवही झाली.

प्लेसमेंटला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांना एचटीएकडून विचारणा झाली. तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर तेथील प्रमुख एचटीए सोडून रेडीफ्युजनमध्ये गेले. त्यांनी अपुर्वा यांनाही बरोबर येण्याविषयी विचारले आणि त्या तिथे गेल्या. तर काही काळानंतर त्यांच्या आधीच्या एका वरीष्ठांनी त्यांना झी टीव्हीमध्ये येण्याविषयी विचारले. “माझ्यासाठी तो एक छान बदल होता – जाहिरात क्षेत्र ते निर्मिती व्यवसायाचे व्यवस्थापन... झी नंतर माझ्या एका माजी सहकाऱ्याने मला टाईम्स ऑफ इंडियाचा टेलिव्हिजन विभाग चालविण्यासाठी बोलाविले. त्यावेळी ती एक स्टार्टअप कंपनी होती,” अपुर्वा सांगतात.

“ तर जेंव्हा रेडीयो सिटी एका खासगी इक्विटी फंडने घेतले, तेंव्हा माझ्या ओळखीच्या एकाने मला तेथे एक कार्यक्रम करण्यासाठी बोलविले. ही एक उद्योजकाची भूमिका होती आणि हे काम स्विकारण्यासाठी याच गोष्टीने मला प्रेरीत केले. खरे तर माझे आयुष्य एक आनंदी अपघातांची मालिका राहीले आहे. मी आयुष्यात कधीच माझा सीव्ही किंवा रेझ्युमे बनविला नाही. मला ओळखणाऱ्या लोकांनी मला एखाद्आ कामासाठी बोलावल्यामुळेच मला नोकऱ्या मिळत गेल्या. मला वाटते यामध्ये आपल्या सगळ्यांसाठीच एक धडा आहे,”अपुर्वा सांगतात.

अपुर्वा यांच्या मते जरी आपल्यापैकी कोणीही आयुष्याची आखणी करु शकत नसले (आपल्याला ध्येय निश्चित हवे आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्नही करायला हवेत मात्र आयुष्य पुढे काय वळण घेईल, हे आपण सांगु शकत नाही) तरी आपण रोज हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण स्वतःसाठी प्रतिष्ठा निर्माण करत आहोत. “ ज्यांनी मला जाहीरात क्षेत्रातून झी टीव्हीची अध्यक्ष म्हणून नेमले, त्यांनी खूप मोठा धोका पत्करला होता. पण त्यांनी माझी कामाची पद्धत बघितली असल्यानेच हा धोका पत्करला. तुम्ही आजवर केलेली तयारी आणि संधी एकत्र येणे, हे सुदैव आहे. एक दिवस मी झी ची अध्यक्ष बनेन, म्हणून मी खूप कष्ट केले, असे मुळीच नाही. पण एक गोष्ट मला माहीत होती की, मी प्रामाणिकपणे कष्ट केले तर त्याचे फळ मला नक्कीच मिळेल आणि ते मिळाले. त्यामुळे आपण सातत्याने काम केले पाहिजे, कारण संधी कधी येईल, हे सांगता येत नाही,” त्या सांगतात.

तसेच कारकिर्दीबाबत निर्णय घेताना आपण कशात चांगले आहोत, केवळ याच आधारावर निर्णय घेऊ नयेत, असा मोलाचा सल्लाही त्या देतात. कारण त्यांच्या मते आपण कशात चांगले आहोत, हे कळण्यासाठी वेळ लागतो, खास करुन आयुष्याच्या आणि कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात.... “बऱ्याचदा शैक्षणिक यश, बरोबरीच्या लोकांचा दबाव, चांगल्या पगाराची अपेक्षा किंवा आदर्शवाद या गोष्टी कारकिर्दीविषयीचे निर्णय घेताना महत्वाची भूमिका निभावतात. या गोष्टी महत्वाच्या असतातच... पण आपण आयुष्यात जसजसे पुढे जातो – नविन संधी आणि कल्पनांचा शोध घेतो – तसतशी आपल्याला आपली खरी आवड कळू लागते. एकदा तुम्ही तुमची आवड निश्चित करुन त्याचाच ध्यास घेतलात तर तुम्ही इतर संधी त्याबाबतचा विचार न करताच नाकारता, त्यादेखील अशा संधी ज्या तुम्हाला एका वेगळ्याच मार्गावर घेऊन गेल्या असत्या आणि हे मी अनेकांबरोबर होताना पाहिले आहे,” त्या सांगतात.

एवढी मोठी कारकिर्द असलेल्या अपुर्वा यांच्या मनात कुठेतरी पुस्तकाचा विषय घोळत असणारच होता. मग अशी कोणती घटना होती ज्याने हा विचार प्रत्यक्षात उतरविण्यास चालना दिली, हा प्रश्न सहाजिकच आपल्याला पडतो. त्यावर अपुर्वा म्हणतात, “ माझ्या सहकाऱ्यांबरोबर माझी काम करण्याची, शिकविण्याची किंवा विचारमंथनाची पद्धत ही गोष्ट सांगण्याचीच आहे. एक प्रमुख या नात्याने गोष्टी या माझ्या कामाचा अविभाज्य भाग आहेत,” त्या सांगतात. यासंदर्भात त्यांचा एक अनुभव तर विशेष उल्लेखनीय आहे. त्या सांगतात, “ या पुस्तकासाठीच्या एका मुलाखतीत जेंव्हा मी सांगितले की, हे पुस्तक मी तीन महिन्याच्या कालावधीत लिहिले आहे, तेंव्हा प्रेक्षकात बसलेल्या माझ्या एका सहकाऱ्याने ओरडून म्हटले, ‘तिला हे करण्यासाठी तीन महिने लागलेले नाहीत. ती गेले पंधरा वर्षे आम्हाला या गोष्टी सांगत आहे’ .”


त्यांच्या मते कधीकधी आपल्याला संधी दिसू शकत नाही. जसे की बंगलोरला गेल्यावर त्यांच्याबाबत झाले. कामानिमित्त त्यांचे पती बंगलोरला गेल्याने त्यांनाही काहीशा नाखुषीनेच तेथे जावे लागले. त्यांचे ऑफीस मुंबईत असल्याने त्या आठवड्यातून दोन-तीन वेळा मुंबईत असत तर उरलेला वेळ बंगलोरला घालवत. त्यावेळी सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खूपच कंटाळवाणा होता आणि त्या आपला वेळ अधिक चांगल्या पद्धतीने घालविण्याबाबत त्या सतत विचार करत असत. “ तेंव्हा मी माझा ब्लॉग सुरु केला - ‘वुमेन ऍट वर्क’… काही जवळच्या मैत्रिणींना डोक्यात ठेवून मी हे सुरु केले. पण लोकांना तो आवडू लागला. हळूहळू त्याला खूपच प्रतिसाद मिळू लागला आणि शेवटी प्रकाशकांनाही त्यामध्ये रस वाटला. मात्र जेंव्हा मला प्रकाशकांकडून विचारणा झाली त्यावेळी मला आनंद झाला असला तरी पुस्तक लिहिण्याची कल्पना काही रुजत नव्हती. तेंव्हा मी त्यांना ब्लॉगच पुस्तक रुपात छापण्यास सांगितले. मात्र असे होत नसल्याचे मला स्पष्टपणे सांगण्यात आले. मला बसून प्रकरणे लिहावी लागणार होती. एकदा मी बसल्यावर मात्र गोष्टी सुचू लागल्या आणि तीन महिन्यात पुस्तक पूर्ण झाले. ते प्रकाशित झाले... बेस्टसेलर झाले आणि आता ते इतर प्रादेशिक भाषांत भाषांतरीतही होत आहे,” त्या सांगतात.

एवढ्या वर्षांच्या कारकिर्दीत एक स्त्री म्हणून काम करतानाचा काही वेगळा अनुभव किंवा अडचणी आल्या का, असे विचारताच त्या म्हणतात, “मी काही स्त्री विरुद्ध पुरुष असा विचार करत नाही. आयआयएममध्ये १२० मुले आणि ९ मुली होत्या, त्यावेळी मला ‘तुला चांगले गुण मिळाले कारण तू मुलगी आहे,’ अशी शेरेबाजी ऐकावी लागत असे. लिंगभेदावर आधारीत भेदभाव हा सुप्तपणे असतोच. मुंबईत मला सगळे माझ्या कामामुळे ओळखत. तर बंगलोरला गेल्यावर लोक माझ्या नवऱ्याच्या कामाबद्दल विचारणा करत तर मला मात्र चांगले नोकर मिळाले का, अशी विचारणा होत असे... जणू मी काम करते का, हे जाणून घेण्याची कोणाला गरजही वाटली नाही.”

त्यांच्या मते संस्था आता बदलत असून सर्वसमावेशक होत आहेत पण महिला मात्र पुढे येऊन त्यांच्यातील क्षमतेला तेवढा वाव देताना दिसत नाहीत, त्या त्यापासून दूर पळत आहेत आणि पुस्तक लिहिण्यामागे हेदेखील एक कारण आहे. “ हे पुस्तक मी लिहिले कारण मला स्त्रियांना सांगायचे आहे, की मुख्य कार्यकारी अधिकारी महिला असण्यात विशेष काहीच नाही. आम्ही अगदी तुमच्यासारख्या आहोत आणि इतर पुरुषांसारख्याही जे या क्षेत्रात संख्येने आमच्यापेक्षा खूप जास्त आहेत. फक्त आम्ही खूप जास्त कष्ट करतो आणि हार मानत नाही. त्यामुळे मला या स्त्रियांना प्रेरणा तर द्यायची होतीच पण आरसाही दाखवायचा होता. जर आताच तुम्ही खेळात उतरला नाहीत, तर दहा वर्षांनी कारकिर्द चांगली झाली नसल्याबद्दल रडू नका,” त्या स्पष्टपणे सांगतात.

जर एखाद्या पुरुषाने असे पुस्तक लिहिले असते, तर ते नेतृत्व गुणांविषयीचे ठरले असते. मात्र अपुर्वा यांचे पुस्तक हे केवळ महिलांसाठीचेच आहे, असा शिक्का त्यावर बसला आहे. त्यांना हे निश्चितच त्रासदायक वाटत असणार. “ माझ्या आयुष्यात मला जिंकता न येणाऱ्या लढायांकडे दुर्लक्ष करुनच मी आनंदी झाले आहे. हे वर्षानुवर्ष चालत आलेले पूर्वग्रह आहेत.. मी सगळ्यांशी तर भांडू शकत नाही. मी जर काही करु शकते तर अधिक अर्थपूर्ण बदल आणण्यासाठी माझे अनुभव सांगू शकते,” त्या म्हणतात.

मात्र अनेक सुधारणा झाल्यानंतरही पुढच्या पिढीसाठी सर्व काही सुकर झाल्याचे मात्र त्यांना वाटत नाही. त्यांच्या मते जरी आपण महत्वाच्या लढाया जिंकल्या आणि कागदोपत्री समता दिसत असली, तरी हे काही खरे नाही. लढाईचे स्वरुप आता बदलले आहे. महिलांना प्रचंड अपेक्षांना तोंड देतानाच वेगवेगळ्या भूमिकाही सक्षमपणे कराव्या लागत आहेत. तसेच महिलांना पुरुषांपेक्षा जास्त कष्ट करावे लागत आहेत. “ पत्नीच्या मोलाच्या मदतीशिवाय पुरुष कारकिर्दीत एवढे यश गाठू शकले नसते. मात्र स्त्रीला पत्नी, आई, बहिण, मुलगी, इत्यादी सगळ्याच भूमिका पार पाडाव्या लागतात. आणि त्यांचे आयुष्य त्यामुळे अधिक समृद्ध होते. पुरुष केवळ एकच भूमिका करत असतात,” त्या सांगतात.

“ त्यामुळे काही लढाया या तुम्ही लढू शकता तर काही पुढे कधीतरी लढण्यासाठी सोडू शकता. मात्र आपण सगळ्यांनीच स्वतःविषयी जागरुक व्हायला हवे,” त्या सांगतात आणि “तुम्ही स्त्री आहात, या गोष्टीचा आनंद घ्या,” असा सल्लाही देतात.