शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्यांना परत आणणारा १३ वर्षांचा ‘अमन’

शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्यांना परत आणणारा १३ वर्षांचा ‘अमन’

Wednesday November 04, 2015,

4 min Read

शिक्षणाच्या प्रवाहापासून लांब राहिलेल्या मुलांना शिकण्याची सोय व्हावी यासाठी मुंबईत एक लर्निंग सर्कल सुरू आहे आणि हे लर्निंग सर्कल सुरू करण्याची संकल्पना ज्याच्या डोक्यात आली तो आहे फक्त १३ वर्षांचा मुलगा...आश्चर्य वाटलं ना? हो पण हे खरं आहे. मुंबई महापालिकेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पहिल्या १० विद्यार्थ्यांमध्ये आलेल्या अमन सिंह याने हे लर्निंग सर्कल सुरू केलंय. शाळा सुटल्यानंतर अमन लर्निंग सर्कलचं आयोजन करतो. यात अनेक कारणांमुळे शाळेत न जाणाऱ्या मुलांना शिकवलं जातं.

या लर्निंग सर्कलच्या संकल्पनेची प्रेरणा आपल्या शिक्षिका मोहिनी पांडे यांच्यामुळे मिळाल्याचं अमन सांगतो. मोहिनी पांडे यांनी टीच फॉर इंडियामधून नुकतीच आपली फेलोशीप पूर्ण केली आहे. बोरीवलीच्या एकसार तलाव महापालिका शाळेत त्या अमन आणि इतर मुलांना शिकवतात. या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं मोहिनी याना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी मुलांना तयार करण्यास सुरूवात केली.

एईएसआर (ऍन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट) च्या २०१४ च्या अहवालानुसार शाळेत प्रवेश घेणाऱ्या ६ते १४ वर्ष वयोगटातील मुलांची संख्या गेल्या ६ वर्षात वाढली आहे. पण २०१०आणि २०१२ चा अपवाद वगळता सरकारी शाळा आणि खासगी शाळांमधील शिक्षणाच्या दर्जात खूप अंतर असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे यात बदल घडवण्याची आवश्यकता आहे, असं मोहिनी पांडे सांगतात.


image


शिक्षणाच्या दर्जातील हेच अंतर अमन आणि त्याच्या मित्रांनाही जाणवलं. त्यांच्याच वर्गातल्या काही विद्यार्थ्यांनाही तो अभ्यास कठीण वाटत होता. त्यामुळे अनेक दिवसांच्या चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेलं एक लर्निंग सर्कल सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचं मोहिनी सांगतात. इतर प्रशासकीय कामं असल्यानं शिक्षकांना सर्वच विद्यार्थ्यांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदतीची गरज असते. मोहिनी ताईने आम्हाला अशा दैनंदिन जीवनातील आव्हानांचा सामना कसा करायचा ते शिकवलं. त्यामुळेच मी या मित्रांना मदत करण्याचा निर्णय घेतल्याचं अमन सांगतो. अमन बोरिवलीत त्याच्या वडिलांसोबत राहतो. त्याची आई इतर कुटुंबीयांसाठी गावी राहत असल्याने त्याची आणि आईची वर्षातून फक्त दोनदा भेट होते.

image


या लर्निंग सर्कलचा पहिला प्रयोग आपण एका वर्गात केल्याचं मोहिनी सांगतात. दोन वर्षांपासून त्या या शाळेत शिकवत असल्यानं विद्यार्थ्यांसोबत त्यांची मैत्री झालीये. त्या शिकवत असलेल्या वर्गात त्यांनी सगळ्यात आधी हा प्रयोग केला. यात काही दिवसातच विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या मदतीनं इंग्रजी बोलू लागले. नंतर मग इतर विषयातही या विद्यार्थ्यांनी ०.५ टक्क्यांपर्यंत प्रगती केली. यामुळे त्यांच्या टीमचा उत्साह वाढला आणि त्यांनी शाळेच्या बाहेरही या लर्निंग सर्कलचा विस्तार करण्याची योजना तयार केली. यात त्यांनी शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करुन घेण्याचा निर्णय घेतला.

image


लर्निंग सर्कलचं काम कसं चालतं हे अमन समजावून सांगतो. शाळा सुटल्यानंतर दररोज दीड तास हे लर्निंग सर्कल भरतं. यात विद्यार्थी त्यांच्या गटप्रमुखाच्या घरी जाऊन अभ्यास करतात. एखाद्या दिवशी गटप्रमुख नसेल तर त्यांच्यातील एका विद्यार्थ्याच्या घरी लर्निंग सर्कल आयोजित केलं जातं. सुरूवातीला सध्याच्या श्रेणीनुसार विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट तयार केले जातात. त्यानंतर त्या दिवशी काय काय करायचं हे ठरवल्यानंतर सर्वजण लर्निंग सर्कलमध्ये सहभागी होतात. संघभावना निर्माण होण्यासाठी ते सर्वजण त्यात सहभागी होतात. दररोज केलेल्या अभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना वर्कशीट दिली जाते. त्यानंतर सर्व गटप्रमुख मिळून परीक्षा पेपर तयार करतात आणि यातून कोणाची किती प्रगती आहे हे कळून येतं. त्याशिवाय यात सहभागी झालेले विद्यार्थी आपल्या गटप्रमुखाविषयीच्या प्रतिक्रियाही इथं व्यक्त करतात. या लर्निंग सर्कलमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि अपेक्षेपेक्षाही जास्त चांगलं करण्याची जिद्द निर्माण होते, असंही अमन सांगतो.

या अभ्यास सत्रात सहभागी होणाऱ्या मुलांना एकमेकांच्या क्षमता माहित असतात. त्यामुळे सोबत अभ्यास करतानाच इतरांच्या क्षमता वाढवण्याकडेही ते लक्ष देतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्यांना कसं तयार करायचं यासाठी मोहिनी ताईच्या सूचनांनुसार काम केलं जातं. आता तर प्रत्येक गटानं स्वत:च्या योजनाही तयार केल्याचं अमन सांगतो.

या संपूर्ण काळात विद्यार्थ्यांमध्ये धोका पत्करण्याचं धाडस निर्माण झाल्याचं मोहिनी सांगतात. आता ही मुलं इतरांबद्दलही विचार करतात. त्यामुळे मोठे झाल्यानंतर ते आपल्य़ा समाजाचं भविष्य कसं चागलं करता येईल याचा प्रयत्न करतील असा विश्वासही मोहिनी व्यक्त करतात.

अमनबद्दल तर त्या सांगतात की आता अमन एक विचारी आणि परिपक्व मुलगा झालाय. प्रत्येक गोष्टीला समजून घेऊनच तो प्रतिक्रिया देतो.

या लर्निंग सर्कलमुळे आपला आत्मविश्वास वाढल्याचं अमन सांगतो. अमनला मोठं होऊन राजकारणात यायचं आहे आणि देशाचा पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. त्याचं हे स्वप्न गमतीशीर वाटेल पण याबाबत अमन खूप गंभीर आहे. तो म्हणतो की पंतप्रधान नाही होऊ शकलो तरी चालेल पण तरीही राजकारणात राहून मी माझ्या भोवतालच्या लोकांची मानसिकता बदलण्याचे प्रयत्न करीत राहिन.

अमन त्याचं स्वप्न सत्यात उतरवतो की नाही ते तर काळच ठरवेल. पण या लर्निंग सर्कलच्या माध्यमातून नवीन पिढी इतरांचा विचार करत आहे आणि एवढंच नाही तर त्यांना कशी मदत करता येईल याचा विचार करत आहे आणि अमन याचं जिवंत उदाहरण आहे. त्यामुळे समाजात सगळीकडेच असे अमन निर्माण होण्याची गरज आहे.

    Share on
    close