उर्दू भाषेच्या प्राधान्याने एका हिंदू गावातील १०० लोकांना सरकारी नोकरीचा योग

0

प्रामाणिकपणा आणि सचोटीचा मार्ग अनुसरून केलेले कोणतेही कार्य अनेकांचे जीवन बदलण्यास कारणीभूत ठरू शकते पण फक्त गरज आहे ती एक पाऊल पुढे टाकण्याची. जयपुरपासून १०० किलोमीटर दूर टोंक जिल्ह्यातील सेंदडा गावातील मीना समाजाच्या लोकांनी असेच एक पाऊल पुढे टाकले आहे आणि आज गावाचा कायापालट झाला असून १०० पेक्षा अधिक लोकांना सरकारी नोकरी मध्ये शाश्वत जागा मिळाली आहे.


टोंक जिल्ह्यातील सेंदडा गावातील सरकारी शाळेच्या ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नाहीत, पिण्यासाठी पाण्याची सोय नाही तरीही शाळेत मुलांची तोबा गर्दी असते याचे कारण आहे उर्दू शिक्षक. सरकारने या सरकारी शाळेत उर्दू शिक्षकाची नियुक्ती केली आहे आणि मुलांची गर्दी का नसेल उर्दू शिकणे ही रोजगार हमी उपलब्ध करून देणारी त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे लांबपर्यंत इथे अल्पसंख्याकांची वसाहत नाही पण तरीही पूर्ण गाव उर्दूच्या अभ्यासाच्या मागे आहे. परिणाम हा आहे की २००० लोकसंख्येच्या गावात उर्दू शिकण्यात मुलींची संख्या ही उत्साहजनक आहे. तसेच प्रत्येक घरात उर्दूच्या कृपेमुळे कोणी ना कोणी सरकारी नोकरीत रुजू झाले आहे. गावातील एक मुलगी सीमा यांनी युअर स्टोरीला सांगितले की, ‘आमच्या गावात उर्दू शिकून अनेकांना नोकरी मिळाली म्हणून आम्ही सुद्धा उर्दू शिकतो आहे म्हणजे आमच्या पण नोकरीची व्यवस्था होईल’.


या बदलावाचे जबाबदार गावातील काही लोक आहेत ज्यांची नजर उर्दू मार्फत अनुसूचित जाती आणि जमातीला मिळणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीवर पडली. मग काय लोकांनी आपल्या शाळेत उर्दू शिक्षकाच्या नियुक्तीसाठी सरकारकडे मागणी केली. लोकांच्या मागणीचा विचार करून सरकारने ११ वी पासून उर्दूच्या भाषेसाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली. या सरकारी शाळेत संस्कृत भाषा अभ्यासक्रमात होती पण उर्दू शिक्षकाच्या नियुक्तीनंतर गावातील मुलांनी पर्यायी विषय म्हणून संस्कृत ऐवजी उर्दूला पसंती दिली. उर्दूचे शिक्षक नियमित ६० किलोमीटर लांबून शिकवण्यासाठी येतात. मुलांमध्ये उर्दू शिकण्याची ओढ बघून त्यांना जास्तीचा वर्ग घ्यावा लागतो. परंतु उर्दूचे शिक्षण ११ वी व १२ वीला सुरु झाल्यामुळे शिक्षकांना जास्त मेहनत घ्यावी लागते. उर्दू शिकवणारे शिक्षक महमूद युअर स्टोरीला सांगतात की, ‘इथे प्राध्यापकाची जागा रिकामी आहे पण उर्दू साठी कोणीहीही प्राध्यापक न मिळाल्यामुळे ज्युनिअर शिक्षकांना नियुक्त केले आहे पण मुलांची उर्दू भाषा शिकण्याची आवड बघून आम्ही टोंकवरून जास्तीचा वर्ग घेण्यासाठी लवकर येतो’.

शाळेचे प्राचार्य नाथूलाल मीणा यांना समाधान आहे की मुलांच्या संख्येत नित्य वाढ होत आहे. ते सांगतात की, ‘शाळेत कोणत्याही सोयी नसतांना मुलांमध्ये उर्दू भाषेची इतकी ओढ आहे की उर्दूच्या प्रवेशामुळे गावातील उत्तीर्ण होणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. ही मुले उर्दूचा तास कधीही बुडवत नाही. तीन वर्षापूर्वी गावकऱ्यांच्या मागणीवरून संस्कृत काढून इथे उर्दू भाषा शिकवली जावू लागली याचे कारण पण तितकेच खास आहे. फक्त २००० लोकसंख्या असलेल्या सेंदडा गावाचे नशीब उर्दूमुळे बदलले कारण उर्दू शिकण्याने रोजगाराची संधी उपलब्ध होवून गावातील प्रत्येकाला उर्दूमुळे एक सरकारी नोकरी मिळत आहे. मनाला समाधान देणारी गोष्ट आहे की मुले आवडीने उर्दू शिकतात व यात मुलींची संख्या ही जास्त आहे.’


उर्दूमुळे नोकरी मिळणारे शिक्षक गोपाल मीणा सांगतात की,

‘आमच्या गावातील एकाने शहरात जावून उर्दू शिकून सरकारी नोकरी मिळवली तेव्हा आम्ही विचार केला की उर्दू मध्ये रोजागाराची संधी जास्त आहे तेव्हा आम्ही उर्दू भाषा शिकण्याचा निर्णय घेतला आणि माझी यावर्षी राजस्थान सरकार मध्ये उर्दूच्या शिक्षकाची नियुक्ती झाली. आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या गावातील १४ जणांना उर्दू शिक्षकाची नोकरी मिळाली आहे’.

परंतु बऱ्याच मुलांना उर्दू शिकण्याच्या दरम्यान येणाऱ्या अडचणींची चाहूल असते. ती मुले सांगतात की ११ वी पासून शिकल्यामुळे भाषा समजण्यास थोडी अडचण येते. त्यांचे मानणे आहे की जर पहिली पासून उर्दू पाठ्यक्रमात असल्यास त्याचा फायदाच होईल. पण काही मुलांचे मानणे आहे की थोडी अडचण येते पण चांगली गोष्ट म्हणजे या भाषेच्या शिकण्याने नोकरीची शाश्वती असते.

ज्या गावात एक पण अल्पसंख्यांक समाजाचा माणूस नाही तिथे मोठ्या आवडीने मुले उर्दू शिकतात म्हणजे इथे स्पष्ट होते की भाषेचा कोणताही धर्म नसतो आणि त्याच्यावर कुणाचाही एकाधिकार नाही. फक्त उर्दू भाषेमुळे गावात आतापर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांना आरोग्य, भाषा, शिक्षण, आणि समाज कल्याण विभागात नोकरी मिळाली आहे. गावातील मुले सांगतात की त्यांच्या गावातील लोक एकट्या उर्दूमुळे उर्वरित रिक्त जागांवर नोकरी मिळवू शकतील. एक गाव जिथे अगोदर गरिबी होती, सरकारी नोकरी दुरापास्त होती आज त्याच गावात एक उत्साह व खुशाली आहे आणि या खुशालीचे कारण फक्त उर्दू भाषा आहे.

लेखिका : रुबी सिंग

अनुवाद : किरण ठाकरे