मुंबईमध्ये मेट्रो, मोनो, उपनगरीय लोकल व बेस्ट बस या सर्व सेवा एकमेकांशी जोडण्यात येणार 

0

वाढते शहरीकरण हे आव्हान असून या शहरीकरणामध्ये शहरांच्या शाश्वत विकासासाठी सांडपाणी प्रक्रिया,मजबूत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यासाठी राज्य शासन प्रयत्न करत असून मुंबईमध्ये यासाठी मेट्रो, मोनो, बेस्ट व लोकल रेल्वे सेवा या सेवांसाठी एकच प्लटफॉर्म निर्माण करत आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.


द इकॉनॉमिक्स टाईम्सच्या वतीने आयोजित लँड समिट मध्ये मुख्यमंत्री  फडणवीस बोलत होते. यावेळी टाइम्स ग्रुपचे मयांक गांधी, दिपक लांबा, आमदार राज पुरोहित आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगात शहरीकरणाचे प्रमाण ६० टक्के झाले असून भारतात हेच प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. कोणत्याही शासनासमोर शहरीकरण हे मोठे आव्हान असून आहे. भारतातील महाराष्ट्र, तामिळनाडू अशा मोठ्या राज्यांसमोर हे आव्हान उभे ठाकले आहे. शहरीकरण होत असताना सांडपाण्याचे, सार्वजनिक वाहतुकीचे कोणतेही नियोजन यापूर्वी योग्यप्रकारे झाले नाही. त्यामुळे शहरांचा दीर्घकालीन अथवा शाश्वत विकास म्हणावा तसा झाला नाही. देशाच्या उत्पन्नात सर्वात जास्त उत्पन्न हे शहरांमधून येत आहे. सेवा व वस्तू उत्पादनाद्वारे उत्पन्न देणाऱ्या या शहरांचा विकास योग्य रितीने व्हावा, यामध्ये सांडपाणी प्रक्रिया व सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करणे आवश्यक आहे. या सर्वांचा विचार करून शहरांच्या दीर्घकालीन शाश्वत विकासासाठी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी, अमृत मिशन सारख्या योजना आखल्या आहेत.


जमिनीच्या योग्य वापरासाठी शहरांचा दीर्घकालीन नियोजन होणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात पावले उचलली आहेत. या कालावधीत शासनाने 17 हून अधिक शहरांचा विकास आराखडा मंजूर केला आहे. मुंबई शहराचाही विकास आराखडा अंतिम झाला की त्याला मंजुरी देण्यात येईल. सध्या मुंबईतील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. परंतु येत्या तीन ते चार वर्षात मुंबईतील सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया केली जाईल. शहरांच्या विकासात सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व मोठे आहे. यासाठी मुंबईमध्ये मेट्रो, मोनो, उपनगरीय लोकल व बेस्ट बस या सर्व सेवा एकमेकांशी जोडण्यात येणार आहेत. प्रवाशांना या सर्व सेवांची माहिती एका ॲपद्वारे मिळेल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबईप्रमाणेच नागपूर, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांमध्येही अशी व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे, असेही  फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी महानगरामध्ये मेट्रोचे काम वेगाने सुरू केले असून 2022 पर्यंत त्याचे काम पूर्ण होईल, असे नियोजन केले आहे. तसेच एलिव्हेटेड कॉरिडॉर, कोस्टल रोड सारखे प्रकल्प हाती घेऊन पुढील काळात या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे सुमारे एक करोड नागरिक प्रवास करू शकतील अशी क्षमता निर्माण होणार आहे.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या रेनेसान्स कंपनी, मानप्लो, नागपूर शहर, भारतीय तटरक्षक दल, अजय चौधरी व निरंजन हिरानंदानी आदींचा गौरव मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तटरक्षक दलाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला.