स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा मार्ग दाखवणारा दिपस्तंभ – किरण नाकती

0

 

‘आपण ग्लॅमरच्या पाठी धावायचं नसतं तर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ग्लॅमरच आपल्या पाठी धावत आलं पाहिजे’; असं समजणारा अवलिया रंगकर्मी म्हणजे किरण नाकती...कट्टा म्हंटलं की चार मित्र एकत्र येऊन टवाळक्या करण्याचं ठिकाण असा सरळसोट समज पांढरपेशा समाजात आहे...मात्र शिस्त, संयोजन, सातत्यपूर्ण परिश्रम करण्याची तयारी असेल तर माणूस आयुष्यात काहीही करू शकतो ही तत्त्व डोळ्यांसमोर ठेवून गेली पाच वर्ष किरण अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून अनेक मुलांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं कामही करतोय...सलग २६९ रविवार ३००० हून अधिक तरूण कलावंतांनी कोणताही खंड न पडू देता अभिनय कट्ट्यावर वेगवेगळे नाट्यप्रयोग सादर करून ७००० हून अधिक पात्र लोकांपुढे जिवंत केलीत....ठाण्याच्या जिजाऊ उद्यानातून सुरू झालेला अभिनय कट्टा या उपक्रमाची आज साता समुद्रापार मलेशियातही दखल घेतली गेलीय...किरणचा हा प्रयत्न जितका कौतुकास्पद आहे तेवढाच धाडसीही आहे...ज्याची सुरूवात एका एकांकिका स्पर्धेपासून झाली...

सुरूवातीच्या काळात किरण स्वतःच मित्रांसोबत पैसे उभे करून वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेत असे...मात्र त्यावेळी वर्षभर चालणाऱ्या या निरनिराळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये एकच पात्र वर्षभर सादर करावं लागत असे...त्यात तोचतोचपणा जाणवायचा...त्यातही एकांकिका पहिल्या तीन क्रमांकात आली तर थोडाकाळ त्याची चर्चा व्हायची...नाही तर ती ही नाही...अशावेळी किरण यांच्यातला कलाकार काहीसा अस्वस्थ झाला... आपल्याला स्वतःला वेगवेगळी पात्र रंगवायची आहेत, काहीतरी नवीन, वेगळं करायचं आहे. दुसरीकडे जगातही दररोज काहीतरी वेगळं घडतंय असं असतानाही आपण तेच तेच काम वारंवार का करावं ही गोष्ट त्याला पटत नव्हती...मनात हे द्वंद्व सुरू असतानाच त्याला समजलं की इंडस्ट्रीत त्याच्यासारखेच काम करण्याची प्रचंड इच्छा असलेले अनेक तरूण तरूणी आहेत...ज्यांना काम देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळले जातायत...काम देण्याचं आश्वासन देऊन प्रत्यक्षात त्यांच्या स्वप्नांशी खेळ केला जातोय...अशा मुलांची अवस्था केविलवाणी झाल्याने ती नैराश्याने पुरती ग्रासलेली दिसतात...यावर उपाय शोधण्यासाठी त्याने स्वतःचा मार्ग शोधायचा निर्णय घेतला...आणि त्यातूनच अभिनय कट्ट्याची कल्पना त्याला सुचली...


कट्टा सुरू करायचा निर्णय घेतला तेंव्हा किरण मराठी इंडस्ट्रीत बऱ्यापैकी स्थिरस्थावर झालेला होता...स्वतः एक उत्तम नट आणि दिग्दर्शक असलेल्या किरणने ‘अवघाची संसार’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘क्राईम डायरी’ यासारख्या मालिकांमधून अभिनयही केला होता...याशिवाय ‘अरे नाटक नाटक’ या नाटकासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिकही मिळालेलं होतं...स्वतःच एवढं सगळं सुरळीत सुरू असतानाच कट्याची कल्पना त्याला स्वस्थ बसू देत नव्हती...खरं तर फारच कमी लोकं अशावेळी स्वतःचा सोडून दुसऱ्याचा विचार करतात...पण किरण त्याही बाबतीत इतरांपेक्षा वेगळा ठरला आणि कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय या क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या मुला मुलींसाठी त्याने २७ फेब्रुवारी २०११ साली ठाण्याच्या जिजाऊ मैदानात अभिनय कट्ट्याची स्थापना केली...

सुरूवातीला केवळ ठाणे ते कर्जत या पट्ट्यातील मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभिनय कट्ट्याला अल्पावधितच चांगला प्रतिसाद मिळाला...वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्यांमुळे अभिनय कट्ट्याची ख्याती सर्वदूर पसरायला लागली...हळूहळू पुणे, नाशिक, लातूर, औरंगाबाद येथील मुलंही त्यांची कला सादर करण्यासाठी ठाण्याच्या अभिनय कट्ट्यावर यायला लागली...कट्ट्याची व्याप्ती वाढत असतानाच येणाऱ्या मुलांमध्ये शिस्त यावी यासाठी किरणने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं...या प्रतिज्ञापत्रात लिहिलेले नियम आणि अटी मान्य असलेल्या मुलांनाच या चळवळीत सहभागी करून घेण्यात येत असे...सुरूवातीला अभिनय कट्ट्यावरचे प्रयोग पहाण्यासाठी २०-२५ प्रेक्षक येत असत...पण हळूहळू ही संख्याही वाढायला लागली...२०११ पासून ‘गोष्ट प्रेमाची’, ‘दारवेशी’,’नोकरी मिळाली रे..’,यासारखी कट्ट्यावरील मुलांनी लिहिलेली आणि स्वतः बसवलेली नाटकं,एकांकिका, एकपात्री, द्विपात्री, पथनाट्य असे अनेक नाट्यप्रकार अभिनय कट्ट्यावर सादर करण्यात आले...कट्ट्यावरील अनेक मुलं आज आघाडीच्या मराठी मालिकांमध्ये काम करतायत...

एक प्रगल्भ कलाकार तयार करायचा तर फक्त अभिनय शिकवून चालत नाही तर उत्तम भाषा, वाचन आणि नृत्यनिपुणतेची जोडही त्याला लागते...याशिवाय हजरजबाबीपणा,प्रसंगावधानता यासारखे गुणही मुलांनी आत्मसात करायला हवेत असं किरणला वाटलं...त्यासाठी त्याने संस्कार शास्त्राची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला...या अंतर्गत मुलांसाठी वर्षभराचा अभ्यासक्रम तयार करण्यात आला. दर महिन्याला अभिनय कट्यावरील मुलांना एक कवी, एक साहित्यिक, एक पुस्तक अभ्यासण्यासाठी देण्यात यायला लागलं...ते वाचून दर महिन्याला त्यांची लेखी आणि तोंडी परिक्षाही घेतली जाऊ लागली...जेणेकरून उत्तम साहित्य, लेखक, कवी यांच्याशी त्यांची तोंडओखळ व्हावी...अभिनय करतानाच मुलांची त्यांच्या अभ्यासात कितपत प्रगती होत आहे याकडेही किरणचं बारिक लक्ष असतं...कट्ट्यावर आलेल्या मुलांमध्ये हळूहळू बदल व्हायला लागल्याने त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढायला लागते...आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होताना दिसून येतो...मुलांत झालेला हा सकारात्मक बदल पाहून त्यांचे पालकही कमालीचे खुश होतात...

 अभिनय कट्ट्याची किर्ती आणि व्याप्ती हळूहळू वाढायला लागलीये...त्यामुळेच मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील अनेक मान्यवरांनी या कट्ट्याला आवर्जून भेट दिलीय...कट्ट्याला भेट देऊन त्यांनी किरणच्या या प्रयत्नाचं विशेष कौतुकही केलंय...असं असलं तरीही किरण आजही जमिनीशी बांधलेला आहे...आजही कुणाकडूनही कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने ती ही चळवळ चालवतायत...काहीही करून कलाकाराचा मान कायम रहावा ही त्यामागची त्यांची तळमळ आहे...बाहेर किरण ही जबाबदारी नेटाने पार पाडत असतानाच घरातील अर्थकारण सांभाळण्यासाठी त्याची पत्नी कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेऊन संसाराचा गाडा पुढे ओढायला मदत करते...

पैशाच्या अडचणीपायी मनाविरूद्ध जाऊन एकदा हा कट्टा बंद करण्याचा निर्णय किरण घेणार होता...मात्र त्याने हा निर्णय़ घेतल्यानंतर मुलं आणि त्यांच्या पालकांनी त्याच्या घरी रिघच लागली...काहीही करून त्याने ही चळवळ चालू ठेवावी अशी कळकळीची विनंती प्रत्येकजण त्याला करू लागला...कारण ही चळवळ थांबली तर त्याच्यासारखा या मुलांच्या पाठिशी खंबीरपणे उभा रहाणारा, मुलांसाठी अहोरात्र धडपडणारा, आणि त्यांचं बोट धरून त्यांची स्वप्न सत्यात उतरवणारा दुसरा कुणीही नव्हता...किरण यांना ही गोष्ट पटली त्यामुळे त्यांनी आपला निर्णय़ मागे घेत हा कट्टा पुढे सुरूच ठेवण्याचा निर्णय़ घेतला...

कट्ट्याचं काम पुढे सुरू असताना किरणला अनेक ऑफर्स येत असूनही त्या करता येणं शक्य होत नव्हतं....अशातच त्याचा मित्र अतुल जोशीने त्याला तुला काय करावसं वाटतंय ते कर असा सल्ला दिला...त्यातूनच ‘सिंड्रेला’ हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा निर्णय किरणने घेतला...एका अनाथ बहिण भावाची हृदयस्पर्शी कहाणी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न किरणने या सिनेमातून केला...या सिनेमात अभिनय कट्ट्यावरील अनेक कलाकार चमकले...कोणताही मोठा कलाकार सिनेमात नसूनही या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला...मोठमोठ्या कलाकारांनी या सिनेमाचं कौतुक केलंच पण त्यासोबतच अमेरिकेतील साऊथ कोरोलिना फिल्म फेस्टीव्हलमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला...या सिनेमासाठी किरणला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही मिळाला...

कट्ट्यावरील मुलांची दखल जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी हा किरणचा ध्यास आहे...त्यासाठीच आता त्याने अभिनय कट्टा प्रॉडक्शन्सची सुरूवात केलीये...या प्रॉडक्शन अंतर्गत अभिनय क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलांना पोर्टफोलियो बनवणे,लूक टेस्ट, कास्टींग टेस्ट कशी द्यावी त्यासाठी आपल्या कामाची प्रोफाईल नक्की कशी बनवावी याबाबत मदत करण्यात येईल...फक्त मुलांना अभिनय शिकवणं हे आपलं काम नसून या क्षेत्रात त्यांना पुढे आणणं ही देखील माझीच जबाबदारी असल्याचं किरण यांचं म्हणणं आहे...त्यासाठीच हा प्रयत्न करायला त्यांनी सुरूवात केलीये...

किरणकडे पाहिलं की हा माणूस जे बोलतो ते करण्यासाठी सर्वस्व झुगारून देत कामाला लागतो असं प्रकर्षाने जाणवतं...प्रयत्नात सातत्य ठेवा, कष्ट करा जिद्द सोडू नका...लगेच यश मिळालं नाही तरी हार मानू नका...असं तो कट्यावरील मुलांना वारंवार बजावत असतो...त्याच्या याच गुणामुळे फक्त मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर कट्टयावरची मुलं पालक आणि सातासमुद्रापारही त्याच्याबद्दल लोकांच्या मनात आदराची भावना आहे...आपल्या या भगीरथ प्रयत्नांमधून अभिनय कट्ट्याला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा ध्यास त्याने घेतलाय..त्यासाठी अजून फार मोठा पल्ला त्याला गाठायचाय...त्याच्याच शब्दात सांगायचं तर एक ना एक दिवस त्याला शोधत यश आणि ग्लॅमर त्याच्याकडे नक्कीच येईल....

वेबसाईट : http://abhinaykatta.org/

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

वाजीद खान – विश्वविक्रमांना गवसणी घालणारा प्रयोगशील कलाकार

वडिलांनी आणि समाजाने रोखले, तरीही जिवंत ठेवली कलेची जिद्द, आज मुलांचे आयुष्य साकार करत आहेत, शारदा सिंह!

बियॉन्ड ऑस्ट्रेलिया – भारतीय डॉक्युमेन्ट्रीच्या शोधात


Related Stories

Stories by Sarita Patil-Mulay