वयाच्या ६५व्यावर्षी एकटेपणा आणि नैराश्यावर मात करून आशा-अरुणा यांनी बनारसमध्ये सुरू केले ‘होमस्टे’ स्टार्टअप!

0

ही कहाणी बनारसच्या त्या दोन बहिणींची आहे, ज्यांच्यासाठी वयाचे बंधन महत्वाचे नाही. मनौधैर्य आणि हिमतीपुढे त्यांच्या वाढत्या वयाने देखील हात टेकले. त्यांच्या या जिद्दीपुढे एकटेपणा देखील टिकत नाही. आयुष्य जगण्याची पद्धत अशी आहे की, आता या दोन बहिणी उदाहरण बनल्या आहेत. वाढत्या वयात उंच शिखर गाठणा-या या दोन बहिणींचे नाव अरुणा आणि आशा आहे. पंतप्रधानांचा संसदीय भाग असलेल्या बनारसमध्ये या दोन बहिणी प्रसिद्ध आहेत, हे सांगण्यापूर्वी अरुणा आणि आशा यांचे वय जाणून घ्या. आशा यांचे वय ६८असून, अरुणा यांचे वय ६५वर्षे आहे. दोघी बहिणी वयाला मागे सोडून आयुष्याला नवी दिशा देण्यात धडपडत आहेत. वयाच्या ज्या टप्प्यावर दुस-यांच्या मदतीची गरज असते, त्या टप्प्यात या बहिणी यशाचे नवे शिखर गाठत आहेत. दुस-यांवर ओझे न बनता या बहिणी हजारो लोकांच्या ओठांवर हास्य खुलवत आहेत, हे सर्व काही आशा आणि अरुणा यांच्या ‘ग्रैनीज इन’च्या बळावर... 

नव्या पिढीला आरसा दाखवत, या दोन बहिणींनी वयाच्या अखेरच्या टप्प्यावर ‘होम स्टे’चा व्यवसाय सुरु करून दुस-यांसाठी एक उत्तम उदाहरण सादर केले आहे. काही दिवसातच हा व्यवसाय चांगला चालू लागला आहे. ‘होमस्टे’चा व्यवसाय त्यांची आजीविका आहे, पाहुण्यांच्या रुपात कुटुंबातील आनंददेखील त्यांच्या वाट्याला आहे. त्यांनी आपल्या होम स्टे व्यवसायाला ‘ग्रैनीज इन’ म्हणजेच आजीचे घरटे म्हटले आहे. ऐकण्यास हे थोडे विचित्रच वाटत असेल, मात्र जेव्हा तुम्ही या घरट्यात याल तेव्हा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता जाणवेल. यात आपलेपणा आहे, येथे या बहिणींना पाहून एक उर्जा मिळेल, ‘युवर स्टोरी’सोबत संवाद साधताना आशा सांगतात की, “आमच्यासाठी वय महत्वाचे नाही. आम्ही एकटेपणा आणि वृद्धत्वाच्या नैराश्याला स्वतःवर स्वार होऊ दिले नाही. आम्हाला खूप विश्वास आहे आणि जो व्यवसाय सुरु केला आहे, त्याला एका उंच शिखरावर नक्कीच घेऊन जाऊ” 

झाले असे की, बनारसमध्ये प्रत्येक दिवशी हजारोच्या संख्येने पर्यटक पोहोचतात. त्यातील काही लोक हॉटेल मध्ये थांबतात. काही धर्मशाळा तर, काही गेस्ट हाउसमध्ये थांबतात. मात्र या जागांवर पर्यटकांना ती शांतता मिळत नाही, ज्याच्या शोधात ते बनारसमध्ये येतात. या दोन्ही बहिणींनी पर्यटकांच्या या समस्येला समजले आणि ‘होमस्टे’ व्यवसायाची सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या घराला ‘ग्रैनीज इन’ नाव दिले आणि आपल्या घराचे दरवाजे अतिथी लोकांसाठी उघडले. याचे एक संकेतस्थळ देखील बनविण्यात आले आहे. त्याच्यामार्फतच बुकिंग केली जाते. अतिथींना आपल्या विश्रामगृहात थांबण्याची आणि जेवणाची वगैरे सर्व सुविधा पुरवितात. ते देखील आपल्या घरासारख्या वातावरणात. तो पर्यटक भारतीय असो किंवा विदेशी असो. त्याला घरासारखेच वातावरण मिळते. इंटीरीयर आणि अन्य सुविधा देखील घरासारखीच आहे. 

बिहारच्या मुंगेर जिल्ह्याच्या राहणा-या आशा आणि अरुणा चुलत बहिणी आहेत. अरुणा आपल्या आई-वडिलांची एकुलती एक अपत्य आहे आणि रामपुरायेथील एका घरात त्या राहतात. पतीच्या निधनानंतर अरुणा यांनी कुटुंबाची जबाबदारी चांगल्या प्रकारे सांभाळली. अरुणा यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघेही दुस-या शहरात आपल्या कुटुंबासोबत राहतात. अशाच प्रकारे आशा यांची मुलगी आपल्या पतीसोबत गुडगाव मध्ये राहते. वयाच्या या टप्प्यावर दोन्ही बहिणी बनारसमध्ये आयुष्य व्यतीत करत होत्या. तेव्हा दोन वर्षापूर्वी पर्यटकांच्या समस्या बघून त्यांच्या डोक्यात होमस्टे व्यवसायाची कल्पना आली. त्यांच्या या कामात मदत केली आशा यांची मुलगी शिल्पी आणि जावई मनिष सिन्हा यांनी. आशा यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “ग्रैनीज इन मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत कुटुंबियांसारखेच संबंध बनतात. अतिथींना घरासारखे वातावरण मिळते आणि आम्हाला आमचे कुटुंब. वेळ कसा व्यतीत होतो, माहितच पडत नाही.” 

सहा खोल्या असलेल्या ग्रैनीज इनची लोकप्रियता इतकी आहे की, सप्टेंबर महिन्यापर्यंतची बुकिंग मार्चमध्येच झाली आहे. त्यात अधिकाधिक विदेशातून येणारे पर्यटक आहेत. होमस्टेच्या कर्त्याधर्त्या आशा यांच्या मते, जगातील काना-कोप-यातून येथे पर्यटक राहण्यासाठी येतात. त्यांच्या व्यवसायासाठी याहून मोठी बाब काय असु शकते. ग्रैनीज इनमध्ये पाच डबल बेडची खोली तर एक सिंगल बेडची खोली आहे. या खोल्यांचे भाडे दोन हजार पासून तीन हजार रुपयापर्यंत आहे. सकाळचा नाश्ता मोफत असतो. ग्रैनीज इनमध्ये पर्यटकांच्या प्रत्येक सुविधेचा विचार केला जातो. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य येथे मिळणारे जेवण आहे. जर जेवणाचा विचार केला तर, येथे प्रत्येक प्रकारचे जेवण मिळते. येथील जेवणाचा स्वाद पूर्णपणे घरासारखा असतो. 

सध्या एकूण पाच कर्मचारी ग्रेनीज इनमध्ये काम करत आहेत. वाराणसी व्यतिरिक्त अरुणा आणि आशा यांना होमस्टेच्या व्यवसायाला दुस-या शहरात पसरवण्याची इच्छा आहे. विशेषकरून ‘टी’ (टुरिस्ट)शहरे जेथे पर्यटक अधिक संख्येने येतात. पर्यटकांच्या सेवेसोबत होमस्टे व्यवसायामार्फत या बहिणींनी स्टार्टअप करून दाखविले आहे की, जर मनौधैर्य आणि हिम्मत असेल तर, कुठलेही काम अशक्य नसते.

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

वयाच्या सेकंड इनिंगमध्ये सुरु केलेली ‘मल्बेरी लाईफस्टाईल’ कंपनी !

शिक्षिका ते लेखिका : निवृत्तीनंतरही माधुरीबेन यांचा प्रेरणादायक प्रवास!

छोट्या कुटुंबातील महिलांच्या यशाच्या मोठ्या कथा

लेखक : आशुतोष सिंह
अनुवाद : किशोर आपटे