कचरा टाका आणि पाणी मिळवा... ट्रेस्टरचा अनोखा उपक्रम

0

भविष्यात सर्वात मोठी कुठली समस्या असेल ती म्हणजे कचरा. कचऱ्याचे दुरगामी परिणाम भोगावे लागतील अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. या समस्या आतापासूनच जाणवू लागल्यात. मुंबईत देवनार कचरा डेपोला लागलेली आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती पाहता कचरा हीच भविष्यातली मोठी समस्या असणार हे स्पष्ट आहे. पण त्यापेक्षा मोठं आव्हान आहे ते लोकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न करण्याची सवय लावणं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केलं आहे. या अभियानातून लोकांना कचराकुंडीत कचरा टाकण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाता आहेत, जेणेकरुन आपला भारत देश स्वच्छ होऊ शकेल. आता चंडिगडच्या ट्रेस्टर या कंपनीनं या स्वच्छ भारतासाठी स्वच्छ मशीन आणली आहे. जी कचरा टाकल्यानंतर पाणी देईन. कल्पना थोडी वेगळी आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ही मशिन लाँच करण्यात आली. म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल्स आणि कॅन या मशिनमध्ये टाका आणि ३०० मिलिलीटर पाणी मिऴवा अशी ही स्वच्छ मशिनची खासियत आहे.

आयआयटी मुंबईच्या अनुराग मीना आणि सत्येंद्र मीना या विद्यार्थ्यांनी ही मशिन बनवली आहे. यासाठी त्यांना सहाय्य मिळालं ते चंडीगढच्या ट्रेस्टर या स्टार्टअप कंपनीचं. अशी मशिन बाजारात आणावी असं ट्रेस्टर कंपनीला वाटत होतं. त्यादरम्यान आयआयटी मुंबईत अनुराग आणि सत्येंद्र अशीच मशिन बनवत असल्याचं त्यांना समजलं. “स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात होऊन एक वर्ष झालं खरं पण त्यातून काहाही साध्य झालेलं नाही, असं दिसतंय. यामुळे लोकांना कचरापेटीची सवय लावण्यासाठी त्यांना त्या बदल्यात काही तरी देण्याच्या कल्पनेतून स्वच्छ मशिन विकसित झाली. त्यातून कचऱ्याच्या बदल्यात पाणी देण्याची कल्पना आली.” अनुराग सांगत होता. 

ट्रेस्टर ही स्टार्टअप कंपनी सामाजिक सलोख्यावर विश्वास ठेवणारी आहे. स्वच्छ मशिन ही याचाच भाग आहे. स्वच्छ मशिनबद्दल ट्रेस्टरचे संस्थापक कुणाल दीक्षित सांगतात “ स्वच्छ मशिनद्वारे मुंबईतल्या लोकांना स्वच्छतेची सवय लावणे हे आमचे उद्दीष्ट आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी मिळणं, तेही कचऱ्याच्या बदल्यात हे विशेष आहे. आज स्वच्छ पाण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागलात. ३०० मिली पाण्यासाठी १०रुपयांपेक्षाही जास्त पैसे मोजावे लागतात. पण जर कचऱ्याच्या बदल्यात असं स्वच्छ पाणी मिळाल्यास लोकांना ते आवडेल आणि त्याद्वारे त्याना स्वच्छतेची सवयही लागेल असा विश्वास आम्हाला वाटतोय.” 

कसं काम करतं स्वच्छ मशीन?
स्वच्छ मशीनची कार्यपध्दती अगदी सोपी आहे. एखाद्याने या मशीनमध्ये एखादी रिकामी प्लास्टीकची बाटली किंवा मग कॅन टाकला की मशीनमधून एक बारकोड येईल. या बारकोडच्या आधारे या व्यक्तीला त्यावेळी पाणी हवे असल्यास ३०० मिली पाणी मिळेल. जर त्यावेळी नको असल्यास पुढच्यावेळी कधीही कुपन मशीनसमोर ठेवून ३०० मिली पाणी मिळवता येईल अशी सोय करण्यात आली.

मुंबईच्या आयआयटी कॅम्पसमध्ये ही स्वच्छ मशीन प्रायोगिक तत्वावर ठेवण्यात आली होती. यावेळी आठवड्याला १०  किलो कचरा कमी झाल्याचं लक्षात आलं. यामुळे शहरात ही मशीन बसवल्यास त्याचा चांगला फायदा कचरा मुक्ततेसाठी होईल असा विश्वास अनुराग आणि सत्येंद्रला वाटतो आहे.

सध्या स्वच्छ मशीन संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारशी ट्रेस्टरचे बोलणी सुरु आहेत. राज्यातल्या विविध महानगरपालिकांमध्ये ही स्वच्छ मशीन बसवल्यास कचऱ्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शिवाय लोकांना कचरापेटीचा वापर करण्याची सवय ही लागेल. असं ट्रेस्टरला वाटतंय.