मासिक पाळीदरम्यान वाळू, राख आणि पानांचा वापर टाळून, 'सुखीभव'चा स्वस्तात पॅड पुरवठा

मासिक पाळीदरम्यानच्या आरोग्य काळजीचा वसा

0

वाळू, राख, प्लॅस्टिक, जुनी वृत्तपत्र आणि चिंध्या हे सर्व आपण कचऱ्यातलं सामान समजतो. पण एका संशोधनानुसार अतिशय गंभीर बाब समोर आली आहे. भारतातल्या ४ कोटी ५० लाख महिलांपैकी ८८ टक्के महिलांकरता हा कचरा नसून उपयुक्त साधन आहे. आश्चर्य वाटतयं ना! ग्रामीण आणि शहरी भागातील अल्प उत्पन्न गटातील महिला मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव शोषून घेण्याकरता वाळू, राख, वृत्तपत्र आणि प्लॅस्टिकचा वापर करतात. आरोग्याविषयी जागरुकतेचा अभाव आणि आर्थिक कारणांमुळे या गोष्टींचा वापर होत आहे. 

शैक्षणिक आणि आर्थिक बाजूंसोबतच या धक्कादायक गोष्टीला अंधश्रद्धा, विचित्र समजूती खतपाणी घालतात. विकसनशील देशांमध्ये मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव शोषून घेण्याकरता नैसर्गिक गोष्टींचाच वापर करावा अशी काही समुदायांमध्ये समजूत आहे.

सुखीभव

दिलीप पट्टुबाला यांचं बिझनेस मॅनेजमेंट शिक्षण सुरू असताना ते रक्तदान शिबीर आणि झोपडपट्टी सुधारणा शिबीरांचं आयोजन करायचे. त्यावेळी सामाजिक विकास कार्यात रस असल्याचं त्यांना जाणवलं.

दिलीप यांनी मग केंब्रिजच्या एंजलिया रस्किन विद्यापीठातून मास्टर्स इन सोशल सायन्स आणि सोशल पॉलिसी विषयांचं शिक्षण घेतलं. लंडनच्या रेड क्रॉस सोसायटीमध्ये काही काळ काम केल्यावर ते बेेंगळुरूत परतले. बेंगळुरूत ते ऑस्ट्रेलियन स्टार्टअप पोलिनेट एनर्जीसोबत काम करू लागले. झोपडपट्ट्यांमधील लोकांच्या विकासाकरता, त्यांचं दारिद्र्य कमी करण्याकरता ही संस्था काम करते. दिलीप सांगतात, "एक दिवस फिल्डवर काम करत असताना माझ्या ऑस्ट्रेलियन सहकाऱ्याने हळुवारपणे मला विचारलं, शहरी भागातल्या झोपड्यांमधील स्त्रिया मासिक पाळीत स्वतःची काळजी कशा घेतात? मी जरा गांगरलो. बहुतांश पुरुषांप्रमाणे मलाही त्याबद्दल काही माहीत नव्हतं. किंबहुना हे जाणून घ्यायचा मी कधी प्रयत्नही केला नव्हता. त्यामुळे माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं".

सहाना भट आणि दिलीप पट्टुबाला
सहाना भट आणि दिलीप पट्टुबाला


आणि मग याबाबत माहिती घेण्याकरता दिलीपने नेटवर संशोधन सुरू केलं. त्याला अतिशय धक्कादायक माहिती मिळाली. दिलीप सांगतो, "हे सर्व वाचताना माझ्या अंगावर शहारे येत होते. मी शहरी झोपडपट्ट्यांमध्ये काम करत होतो. पण या महिलांच्या आरोग्याबाबत मिळालेली ही माहिती धक्कादायक होती. ४ कोटी ५० लाख महिलांपैकी केवळ १२ टक्के महिलांच मासिक पाळीदरम्यान आरोग्याची योग्य काळजी घेतात. रक्तस्त्राव शोषण्याकरता योग्य साधनं वापरतात. खोलात जाऊन माहिती घेतल्यावर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या".

दिलीपने त्याची जुनी मैत्रिण सहानाची मदत घ्यायचं ठरवलं. माध्यम आणि कायदा विषयात सहानाने मास्टर्स केलं आहे.  ती त्यावेळी जनाग्रहमध्ये काम करत होती. दिलीप आणि सहाना या दोघांनी त्यांच्या तत्कालीन कामांमधून उसंत घेतली.  आणि दोघांनीही या समस्येतून मार्ग काढण्याकरता प्रयत्न करण्याचे ठरवलं. दारिद्र्य रेषेखालील अडिचशे महिला मासिक पाळीत स्वतःची काळजी कशा घेतात याबाबत   त्यांनी एक सर्व्हे केला. सर्व्हेनंतर या दोघांना अत्यंत धक्कादायक माहिती समजली. सहाना सांगते,  "आम्ही सर्व्हे केलेल्या महिलांमधील ८२ टक्के महिला मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव शोषण्याकरता आरोग्यास अत्यंत धोकादायक असणाऱ्या वाळू, राख, प्लॅस्टिक, वृत्तपत्र, चिंध्या आणि पानांचाही वापर करतात".

या माहितीमुळे हादरून गेलेल्या सहाना आणि दिलीप यांना याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना करायला हव्यात हे तळमळीने जाणवलं. विशीच्या घरातल्या या दोघांनाही मग २०१३ मध्ये सुखीभव ही संस्था स्थापन केली. जून २०१४ पासून संस्थेच्या कामाला सुरूवात झाली.

जागृती आणि लघु-उद्योजक

बेंगळुरूतल्या झोपडीपट्टीत राहणाऱ्या महिलांना मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबत सुखीभव मार्गदर्शन करते. त्यासोबतच स्थानिक महिलांना प्रशिक्षण देऊन लघुउद्योजक घडवून, किफायतशीर किंमतीत झोपडपट्टीतल्या महिलांना सॅनिटरी पॅडस् पुरवते.            

सर्व्हेतून हाती आलेल्या माहितीवरून ह्या टीमने मग चार महिने वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ प्रकारच्या सॅनिटरी पॅडस् ह्या महिलांना पुरवून एक पायलट प्रोजेक्ट केला. यामुळे कोणतं उत्पादन किफायतशीर आहे आणि ते कसं विकावं हे त्यांच्या लक्षात आलं.

कार्यप्रणाली

- २५ मिनिटांच्या एक संवादपूर्ण व्हिडीओच्या माध्यमातून जागरुकता वर्ग

-  किफायतशीर किंमतीत सॅनिटरी पॅड बनवून देणाऱ्या कंपनीशी टाय अप. ८ पॅडस् चं पाकिट सुखीभवला ४५ रुपयांऐवजी केवळ २५ रुपयांमध्ये  उपलब्ध होतं. लघुउद्योजक होण्याची क्षमता कोणत्या महिलांमध्ये आहे, हे सुखीभवची टीम हेरते. या महिलांना जागृती वर्ग कसे घ्यायचे आणि सॅनिटरी पॅडचं वितरण कसं करायचं याचं प्रशिक्षण दिलं जातं. या लघुउद्योजिकांच्या सोबत सुखीभवची टीम तीन महिने सतत राहून त्यांना नेटवर्क वाढवायचं कसं हे सांगते. त्यासोबतच त्यांचा व्यवसाय सुरू कसा राहील याकडेही लक्ष देते. प्रत्येक पॅडमागे ही लघुउद्योजिका पाच रुपये कमावते. 


दर महिन्याला सुखीभव ७,२०० महिलांपर्यंत किफायतशीर दरात पॅडस् पोहचवते. दक्षिण बेंगळुरूमधील ११ हजार ८०० महिलांना आतापर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिलं असून १८ महिलांना लघुउद्योजिका म्हणून घडवलं.

सुखीभवच्या या प्रयत्नांची दखल घेत युएन हॅबिटॅटच्या भारतीय युवा निधी, एक्युमन फेलोशीप, देशपांडे फांउडेशन, नासकॉम फांउडेशनच्या सामाजिक शोध पुरस्कार, टाटा सामाजिक उद्योजक आव्हान आणि आयआयएम बेंगळुरूचे अनसंग हिरोज यांनी त्यांचा गौरव केला.

महसूल, साथीदार आणि आव्हानं


दिलीप सांगतो की, एवढ्या कमी दरात सॅनिटरी पॅड विकत असल्यामुळे त्यांना यातून खूप कमी नफा मिळतो. त्यांना टिकाव धरायलाही खूप काळ लागतो. लघुउद्योजिकांची संख्या ५ वरून ८ वर न्यायला त्यांना ५-६ महिन्यांचा कालावधी लागला.  कोणत्याही सामाजिक संस्थेसोबत इतर संस्थांना जोडून घेणं हे महाकठिण काम असतं, असं सहाना म्हणते. सध्या त्यांच्यासोबत काही प्रकल्पांवर मितू फाउंडेशन, रझा एज्युकेशन सोसायटी,  पसंद, सरल डिझाइन्स आणि मंत्रा४चेंज या संस्था सहभागी आहेत. आव्हांनांबाबत बोलताना सहाना आणि दिलीप दोघेही म्हणतात, समाजात उघडपणे चर्चा न करता येणाऱ्या बाबींवर काम करणे हे खूप मुष्किलीचं काम आहे.

जबाबदाऱ्या खूप पण तरीही नवीन वाटांवर

यावर्षी दिलीपची एक्युमन फेलो म्हणून निवड करण्यात आली आहे. फेलोशीप आणि सुखीभवच्या कामांमध्ये तो आकंठ बुडालेला आहे. सहसंस्थापक सहानाही मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. करत आहे. व्यस्त वेळापत्रकांमधून वेळ काढत दोघेही सुखीभवची कमान नीटपणे सांभाळत आहेत. दिलीप सांगतो, "पुढील पाच वर्षांमध्ये दहा लाख महिलांसोबत काम करण्याचं आमचं उद्दीष्ट्य आहे".


या वर्षी अॉगस्टपर्यंत संपूर्ण बेंगळुरूमध्ये सुखीभव कार्यरत करण्याचं त्यांचं उद्दीष्ट्य आहे. पुढील काही महिन्यांत हुबळी आणि धारवाडमधील ग्रामीण भागात तसेच पुण्यातही हे काम सुरू करणार आहेत. तर जानेवारी २०१७ पर्यंत आणखी एका शहरापर्यंत पोहचण्याचा त्यांचा मानस आहे.

जाताजाता दिलीप त्याच्या आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत सांगतो, "प्रत्येक महिलेमध्ये मासिक पाळीदरम्यानची काळजी, जागरुकता आणि पॅडचा वापर तसेच सुखीभवची वाढ माझं स्वप्न आहे. पण हा काही अंत नाही. समाजात बोलणं टाळला जाणारा आणखी एक विषय म्हणजे कुटुंब नियोजन. आमचा पुढचा प्रकल्प आहे, कुटुंब नियोजन".

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

कुटुंबाचा बहिष्कार, समाजाचा तिरस्कार, तरीही सामाजिक क्रांतीसाठी एक नवा अविष्कार

महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी सरसावली 'रोशनी'

गरोदरपणातील तुमच्या प्रत्येक क्षणाचे सोबती

लेखिका - स्निग्धा सिन्हा
अनुवाद - साधना तिप्पनाकजे