लोकहित आणि पर्यावरण संरक्षणासाठी बहुमोल योगदान देणारे पुरुषोत्तम रेड्डी 

0

ही घटना १९९६ सालची आहे. विभाजनपूर्व आंध्रप्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील एका गावात शेतकऱ्यांची बैठक सुरू होती. शेतकरी आणि गावातील इतर लोक फ्लोरोसिसच्या समस्येपासून मुक्त होण्याकरिता उपाय शोधण्यात गुंतले होते. त्या दिवसांमध्ये नलगोंडा जिल्ह्यातील अनेक गावांमधील पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण जास्त असल्याने, ते पाणी पिण्यास योग्य राहिले नव्हते. एका अर्थाने पाणी विषाप्रमाणे झाले होते. तेथील लोकांकडे पिण्यासाठीच्या पाण्याचे इतर स्त्रोत नसल्याने, त्यांचा नाईलाज होत होता. याचा परिणाम असा झाला की, नलगोंडा जिल्ह्यातील अनेक ग्रामस्थ फ्लोरोसिसचे शिकार झाले होते. मुले, वृद्ध, महिला तसेच तरुण वर्गातील अनेकांना फ्लोरोसिसने ग्रासले होते. फ्लोरोसिसमुळे अनेकांचे दात पिवळे पडले होते, अनेकांच्या हातापायाची हाडे वाकडी झाली होती आणि त्यांना अपंगत्व आले होते. तर अनेक लोकांना सांधेदुखीच्या त्रासाने ग्रासल्याने ते कोणतेही काम करु शकण्यास सक्षम नव्हते. फ्लोराईडयुक्त पाणी पिल्याने हजारो लोक हाडे, मांसपेशी, यकृत आणि पोटासंबंधीच्या अनेक आजारांच्या तावडीत सापडले होते. गर्भवती महिलांवरदेखील या आजाराचा दुष्परिणाम झाला होता. दूषित पाणी पिल्याने अनेक महिलांचा गर्भपातदेखील झाला होता. सिंचनाकरिता उपयोगी पाणी न मिळल्याने लाखो एकर जमीन पडीक झाली होती.

फ्लोरोसिसने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते, त्यांना भीती वाटायला लागली होती. राज्य सरकारकडे अनेकदा अपील केल्यानंतरही त्यांना कोणतीच मदत मिळत नव्हती तसेच जिल्हा प्रशासनानेदेखील मौन धारण केले होते. जवळपास सर्व जिल्हा सरकारी उपेक्षेचा लक्ष्य झाला होता. सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्याने नलगोंडा जिल्ह्यातील अनेक लोकांना अपंगत्व येत होते तर अनेकांना नपुंसकत्व. सरकार, ग्रामस्थ, अधिकारी सर्वांना या समस्येची माहिती होती. तसेच त्या समस्येवरील उपायाचीदेखील त्यांना कल्पना होती. या समस्येवर एकच तोडगा होता, तो म्हणजे या गावांमध्ये पिण्याकरिता सुरक्षित पाणी उपलब्ध करुन देणे. मात्र राज्यसरकारने याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. ग्रामस्थांनी सरकारवर दबाव आणण्याच्या हेतूने काही आंदोलनेदेखील केली. या आंदोलनाचा सरकारवर काहीच परिणाम झाला नाही. उलट ते कायम या आंदोलनांकडे कानाडोळा करत राहिले.

आता शेतकरी आणि इतर ग्रामस्थांनी सरकारविरोधात मोठे आंदोलन उभारण्याचे निश्चित केले होते. या आंदोलनाची रुपरेषा तयार करण्याच्या हेतूनेच गावामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शेतकऱ्यांची मदत करण्याकरिता राज्यशास्त्रातील तज्ज्ञदेखील उपस्थित राहिले होते. या बैठकीत अनेक लोकांनी विविध मते मांडली. सरकारविरोधात मोठे आंदोलन उभे करायचे, हे मात्र नक्की होते. कसे आणि केव्हा, याचा निर्णय होणे फक्त शिल्लक होते. अधिकतम शेतकऱ्यांच्या मते, जे लोक या संकटामुळे प्रभावित झाले होते, त्यांना एकत्र आणून निषेध करण्याच्या पक्षात होते. मात्र बैठकीत सहभागी झालेल्या एका व्यक्तिची विचार करण्याची पद्धत काहीशी वेगळी होती. त्यांचा दृष्टीकोन वेगळा होता. बैठकीत उपस्थित असलेल्या राज्यशास्त्रातील तज्ज्ञांना त्यांनी आपल्या सल्ल्याने चकित करुन सोडले. त्यांना अशाप्रकारच्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची जाणीव किंवा अंदाज नव्हता.

राज्यशास्त्रातील तज्ज्ञाने शेतकऱ्यांना सांगितले की, लोकसभा भंग करण्यात आली आहे. निवडणूका पुन्हा होणार आहेत. अशा परिस्थितीत फक्त राज्यचं नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष नलगोंडा जिल्ह्याच्या समस्येकडे वेधून घेण्याचा एक उपाय त्यांच्याकडे आहे. त्या तज्ज्ञाने उपाय सूचविला की, नलगोंडा लोकसभा जागेकरिता होणाऱ्या निवडणूकीत फ्लोरोसिसने पिडित असलेले अनेक शेतकरी उमेदवार म्हणून उभे राहतील. अधिकाधिक उमेदवार निवडणूकीत उभे राहिल्याची बातमी देशभर पसरेल. शेतकऱ्यांनी तज्ज्ञाचा सल्ला मानला आणि अनेक उमेदवार निवडणूकीत उभे राहिले. नामांकन पत्रांची तपासणी केल्यानंतर त्यातील ५४० नामांकने योग्य असल्याचे समजले. ती १९९६च्या लोकसभा निवडणूकीत कोणत्याही निर्वाचन क्षेत्रातून दाखल झालेली सर्वात जास्त नामांकने होती. यापूर्वी कोणत्याही लोकसभा जागेकरिता एवढी जास्त नामांकने आली नव्हती. सहाजिकच संपूर्ण देशाचे लक्ष नलगोंडाकडे लागले. नलगोंडातील शेतकरी फ्लोरोसिसने ग्रस्त आहेत आणि त्यांनी दुनियाभराचे लक्ष सरकारच्या नाकर्तेपणाकडे आकर्षित करण्याच्या हेतून ही नामांकने दाखल केली आहेत, हे संपूर्ण देशभर समजले होते. याचा परिणाम हादेखील झाला की, निवडणूक आयोगाकडे सर्व उमेदवारांना देण्याकरिता निवडणूक चिन्ह नव्हते आणि त्यामुळे निवडणूक स्थगित करावी लागली होती. नलगोंडा येथे निवडणूका स्थगित होण्यामागील कारण काय आहे, हे संपूर्ण देशाला समजले होते. अनेक लोकांना समजले की, नलगोंडा येथील स्थानिक फ्लोरोसिसमुळे सर्वात जास्त त्रासलेले आहेत. राज्य सरकारचादेखील यात पराभव झाल्यासारखे होते. बदनामीमुळे तिळपापड झालेल्या राज्य सरकारला तीन लाख एकर जमिनीला सिंचनाकरिता पाणी आणि ५०० गावांना पिण्याकरिता सुरक्षित पाणी उपलब्ध करण्याकरिता उपाययोजना करावी लागली.

शेतकऱ्यांनी अनेक वर्षे आंदोलने केली होती, मात्र त्यातून काहीच हाती लागत नव्हते. समस्या सुटत नसे तसेच त्यातून काही फायदादेखील होत नसे. मात्र राज्यशास्त्र तज्ज्ञाच्या सल्ल्याने अवघ्या काही दिवसांमध्ये अनेक वर्षांपूर्वीच्या समस्येचे निराकरण झाले होते. सर्व शेतकरी राज्यशास्त्राच्या या तज्ज्ञाचे कौतुक करत होते. राज्यशास्त्रातील हे विद्वान कोणी दुसरे तिसरे नसून, सर्वज्ञात शिक्षणवादी, पर्यावरणवादी, समाज-शास्त्री प्रोफेसर पुरुषोत्तम रेड्डी होते. तेच प्रोफेसर पुरुषोत्तम रेड्डी ज्यांनी एक नाही तर अनेक जनआंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केले. पुरुषोत्तम रेड्डी यांनी अनेकदा आंदोलनात थेट सहभाग घेतला नसेल, मात्र आपल्या प्रयोगात्मक आणि व्यावहारिक सुचनांनी ती आंदोलने यशस्वी करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुरुषोत्तम रेड्डी हे अनेक जनआंदोलनाचे प्रणेते आहेत. त्यांनी आपल्या सूज्ञ, राजनीतिक ज्ञान, विवेक आणि अनुभवाच्या मदतीने अनेक जनआंदोलने यशस्वी केली आहेत.

एका विशेष मुलाखतीत पुरुषोत्तम रेड्डी यांनी नलगोंडा येथील फ्लोरोसिस पीडित  शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आठवणी ताज्या करताना सांगितले की, 'त्याकाळी अविभाजित आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन स्वतःचे अधिक मूल्यमापन करत होते. त्यांना वाटायचे की, त्यांच्यासमोर कोणीही टिकाव धरू शकत नाही. मात्र जनता आणि लोकशाहीच्या ताकदीसमोर त्यांना झुकावे लागले. शेषन निवडणूक घेऊ शकले नाहीत आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना लाजेखातर  आणि नाईलाजास्तव नलगोंडाच्या जनतेला सुरक्षित पेयजल उपलब्ध करुन द्यावे लागले.' पुरुषोत्तम रेड्डी म्हणाले की, 'नलगोंडाच्या लोकांचा विश्वास राजकिय पक्ष आणि नेत्यांवरुन उडाला होता. जेव्हा मी त्यांना लोकसभा निवडणूकीत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करुन देश आणि जगभराचे लक्ष आकर्षित करण्याचा सल्ला दिला, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि काहीसे अजबदेखील वाटले. मात्र त्यांनी जवळपास प्रत्येक पारंपारीक आंदोलन करुन पाहिले होते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या नव्या पद्धतीने विरोध दाखवायचा आणि आंदोलन करायचा माझा सल्ला मानला. मला आनंद तर झाला मात्र माझ्या मनात एक शंका होती. शेतकरी बांधव ५०० रुपये खर्च करुन उमेदवारी अर्ज दाखल करतील का? सर्वांना माहित होते की, निवडणूक जिंकता येणार नाही उलट अनामत रक्कम जप्त होणार होती. मात्र त्यावेळेस मला आनंद झाला जेव्हा शेतकरी बांधवांनी मला सांगितले की, ५०० रुपये भरुन त्यांना लोकसभा निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यात कोणतीही अडचण नाही. त्यांनी मला सांगितले की, अनेकदा आम्ही खताचा वापर करुनही पीक मिळत नाही, ते नष्ट होते. जर यावेळेस काही निकाल लागला नाही, तर आम्ही समजू की खत फुकट गेले.'

त्या आंदोलनाच्या यशाची आठवण झाल्यानंतर पुरुषोत्तम रेड्डी यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तरीही या आंदोलनाच्या यशाला ते आपल्या आंदोलनाच्या जीवनातील सर्वात मोठे यश मानत नाहीत. एका प्रश्नाचे उत्तर देताना प्रोफेसर रेड्डी सांगतात की, राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या कालावधीत नागार्जुन सागर धरणाजवळील प्रस्तावित अणूभट्टी (न्यूक्लियर रिएक्टक) बनण्यापासून रोखणे, हे त्यांचे आजवरचे सर्वात मोठे यश आहे. पुरुषोत्तम रेड्डी यांच्या मते, 'कृष्णा नदीवर बांधण्यात आलेले नागार्जुन सागर धरण ही सर्वात मोठी आणि महत्वपूर्ण योजना आहे. केंद्र सरकारने या धरणावर एक अणूभट्टी बनवण्याचा निर्णय घेतला होता. प्रकल्पाकरिता जमीनदेखील देण्यात आली होती. काम सुरू झाले होते. जेव्हा मला याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा मी स्वतःच निर्णय घेतला की, मी माझी संपूर्ण ताकद पणाला लावून या अणूभट्टीला विरोध करेन. मला वाटले की, पर्यावरण आणि लोकहिताच्या दृष्टीकोनातून हे हानिकारक आहे. मी या गोष्टीला विरोध करण्याचा निर्णय घेतला होता. मी अणूभट्टीच्या प्रस्तावित जागी गेलो आणि त्या जागेची तपासणी केली. मला खात्री झाली की, जर धरणाजवळ अणूभट्टी उभारण्यात आली तर अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो.'

पुरुषोत्तम रेड्डी यांना माहित होते की, ते एकटे केंद्र सरकारच्या या मोठ्या योजनेविरोधात लढा देऊ शकत नव्हते. त्यांना आपल्या ताकदीची पूर्णपणे जाणीव होती. पुरुषोत्तम रेड्डी अणूभट्टीमुळे प्रभावित होणाऱ्या गावांमध्ये गेले आणि तेथील स्थानिकांना अणूभट्टीमुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती दिली. लोकांमध्ये जनजागृती केली. स्थानिक लोक आणि शेतकऱ्यांना त्याबद्दल जागरुक केले. असे करण्यासाठी पुरुषोत्तम रेड्डी यांना अनेक लोकांना भेटावे लागले. अनेक गावांची सफर करावी लागली. त्यांनी अनेक लहान मोठ्या सभा घेतल्या. हे सर्व तेथील जनता आनंदी राहावी तसेच त्यांच्यावरील अणूभट्टीच्या टांगत्या तलवारीचा धोका टाळावा याकरिता. पर्यावरण सुरक्षित रहावे, पाणी, जमीन तसेच अरण्ये आणि तेथील वनचर सुरक्षित रहावे, याकरिता ते हे सर्व करत होते.

निःस्वार्थ भावनेने लोकहिताकरिता पुरुषोत्तम रेड्डी यांनी अणूभट्टीविरोधात आंदोलन उभे केले. पुरुषोत्तम रेड्डी यांच्या मेहनतीचे चीज झाले. लोक सजग झाले, त्यांच्यावरील संकटाची त्यांना जाणीव झाली. ते समजून गेले की, अणूभट्टी त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. पुरुषोत्तम रेड्डी यांच्यापासून प्रेरणा घेऊन लोकांनी आपापल्या मार्गाने अणूभट्टीला विरोध करण्यास सुरुवात केली. जोपर्यंत अणूभट्टीचा प्रस्ताव मागे घेतला जात नाही, तोपर्यंत लढा देत राहणार, असे लोकांनी निश्चित केले होते. पुरुषोत्तम रेड्डी यांच्या संकल्पामुळे सुरू झालेले हे जनआंदोलन दिवसेंदिवस वाढत गेले. प्रोफेसर शिवाजी राव, गोवर्धन रेड्डी आणि डॉ. के बालगोपाल यांसारखे बडे जनआंदोलनकारीदेखील या लढाईत उतरले. अखेरीस सरकारला या आंदोलनासमोर झुकावे लागले. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी गोवर्धन रेड्डी यांना चिठ्ठी लिहून नागार्जुन सागरजवळील अणूभट्टीचा प्रस्ताव रद्द केल्याचे सांगितले.

चेहऱ्यावर स्मितहास्य करत पुरुषोत्तम रेड्डी यांनी सांगितले की, 'जेव्हा आम्ही सुरुवात केली होती, तेव्हा मागे वळून पाहिले नव्हते. हे मोठे आंदोलन होते आणि त्याचे यशदेखील तेवढेच मोठे होते.'

प्रोफेसर रेड्डी यांच्या मते, दुसऱ्या राज्यात लोक अणूभट्टी रोखू शकले नाहीत. कोटा, कैगा, कुडनकुलम यांसारख्या ठिकाणी लोकांनी आंदोलने केली मात्र ते यशस्वी झाले नाहीत.

नागार्जुन सागर आंदोलनाच्या यशाचे गमक उलगडताना पुरुषोत्तम रेड्डी यांनी सांगितले की, 'मी गावोगावी जायचो आणि अणूभट्टी जनजीवनाला कशाप्रकारे नुकसान पोहचवू शकते, याबद्दल स्थानिकांना समजवायचो. मी लोकांना समजावले की, अणूभट्टीत काही दुर्घटना घडल्यास प्राणघातक किरणांचे उत्सर्जन होते. त्यावेळेस अणूभट्टीपासून ५० ते १०० किमी परिसरात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याकरिता फक्त २४ तासांचा वेळ असतो. लाखो लोक प्रभावित होतात. याकाळात लोकांना जरी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तरी मग जनावरांचे काय होणार? नागार्जुन सागर धरणावर काम करण्याऱ्या कामगारांचे काय होणार? उत्सर्जनाच्या कालावधीत धरण योजनेत गोळा होणारे पाणी प्रदूषित होणार आणि पाण्याचे प्रदूषण होणे म्हणजे नुकसानच ना. मी लोकांना त्यांच्या भाषेत अणूभट्टीच्या धोक्यांची जाणीव करुन देत होतो. यामुळेच मी त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यात लवकर यशस्वी झालो.'

महत्वाची गोष्टी ही आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून, जवळपास पाच दशकांपासून प्रोफेसर पुरुषोत्तम रेड्डी पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागरुकता निर्माण करण्याचे आणि सरकारचे लक्ष वेधून घेण्याचे काम करत आहेत. समाजसेवा त्यांचा धर्म आहे. लोकहित आणि पर्यावरण संरक्षणासंबंधी कोणत्याही कामात आपले योगदान देण्यासाठी ते कधीच मागे हटत नाहीत. पुरुषोत्तम रेड्डी सांगतात की, लहानपणी जे संस्कार त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दिले, त्यामुळेच त्यांनी आपले आयुष्य समाज आणि पर्यावरणाला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

पुरुषोत्तम रेड्डी यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९४३ रोजी तेलंगणा येथील एका संपन्न आणि सधन शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. त्यांचे आईवडिल कौसल्या देवी आणि राजा रेड्डी दयाळू आणि लोकसेवेत समर्पित होते. त्यांचे आईवडिल आर्य समाजी होते. त्यांच्यावर दयानंद सरस्वती, आचार्य अरविंद आणि रविंद्रनाथ ठाकूर यांचा प्रभाव होता. त्यांचे कुटुंब तसेच घरातील वातावरणदेखील आध्यात्मिक, भारतीय संस्कृती आणि परंपरांनी संपन्न होते. आचार्य विनोबा भावे यांच्यापासून प्रभावित होऊन राजा रेड्डी यांनी एक हजार एकर जमीन भूदान आंदोलनात दान केली होती. त्यानंतर त्यांनी लोकांना मदत करण्यासाठी आणखी तीन हजार एकर जमीन दान केली होती. लहानपणाच्या आठवणी ताज्या करताना पुरुषोत्तम रेड्डी यांनी सांगितले की, 'आईवडिल आणि घरातील वातावरणाचा माझ्यावर सखोल प्रभाव पडला होता. माझ्या आईवडिलांनी खुप सुंदर आध्यात्मिक जीवनाचा अनुभव घेतला. त्यांचा सर्वसमावेशक, दयाळू स्वभाव, त्यांची समाजसेवा खरचं अजब होती. त्यांचे वैयक्तिक जीवन हे समाजाकरिता एक चांगले उदाहरण आहे.'

ते पुढे सांगतात की, 'माझ्या वडिलांनी एकदा मला सांगितले होते की, जमीन आणि मालमत्ता यांची काहीच किंमत राहणार नाही. शिक्षण घ्या आणि त्याचाच फायदा होणार आहे.' आपल्या वडिलांचा सल्ला मानताना पुरुषोत्तम रेड्डी यांनी शिक्षणावर लक्ष देण्यास सुरुवात केली. ते कायम एक उत्कृष्ट आणि हरहुन्नरी विद्यार्थी होते. त्यांना नेहमी अव्वल गुण मिळत असत. ते त्यांच्या गुरुजनांना कायम आपल्या गुणांनी आणि प्रतिभांनी प्रभावित करत असत. आपली मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर पुरुषोत्तम रेड्डी यांनी वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश घेतला. मेरीटच्या आधारावर त्यांना त्याकाळी प्रतिष्ठित शिक्षण संस्था उस्मानिया मेडिकल महाविद्यालयात एमबीबीएसच्या शिक्षणाकरिता प्रवेश मिळाला. दोन वर्ष भरपूर अभ्यास करुन ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होते. डॉक्टर बनण्यापासून ते फक्त दोन वर्षे दूर होते. दोन वर्षे वैद्यकिय क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर अचानक पुरुषोत्तम रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी वैद्यकिय शिक्षण सोडून समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याकरिता शैक्षणिक पात्रतादेखील आवश्यक होती. त्यामुळे त्यांनी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.

सर्वांना चकित करणाऱ्या त्या निर्णयाबद्दल विचारले असता पुरुषोत्तम रेड्डी सांगतात की, 'मला माहित नाही की मला असे का वाटत होते की, मी डॉक्टर बनून लोकांची योग्य पद्धतीने सेवा करू शकणार नाही. मला वाटले की, मी राज्यशास्त्रातील तज्ज्ञ बनून लोकांची अधिक मदत करू शकतो. डॉक्टरकीचे शिक्षण चांगले होते. एमबीबीएसचा अभ्यासक्रमदेखील शानदार होता. मात्र माझे मन राज्यशास्त्रावर आले. त्यामुळेच मी बी.ए. करिता प्रवेश घेतला आणि राज्यशास्त्र हा शिक्षणाकरिता मुख्य विषय बनवला.' पुरुषोत्तम रेड्डी यांनी त्यानंतर उस्मानिया विद्यापीठात जवळपास तीन दशकाहून अधिक काळ हजारो विद्यार्थ्यांना राज्यशास्त्राचे शिक्षण दिले. त्यापूर्वी बी.ए, एम.ए, एम फिल आणि पीएचडीच्या शिक्षणाकरिता त्यांचा मुख्य विषय हा राज्यशास्त्रच होता. अनेक वर्षे त्यांनी उस्मानिया विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे अध्यक्ष तसेच बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन म्हणूनदेखील काम पाहिले आहे. दोन सत्रांकरिता ते उस्मानिया विद्यापीठातील शिक्षक संघटनेचे अध्यक्षदेखील होते.

उस्मानिया विद्यापीठात व्याख्याते आणि प्रोफेसर म्हणून कार्यरत असतानादेखील पुरुषोत्तम रेड्डी समाजाच्या भल्याकरिता जनआंदोलनात सहभागी होत असत. ते शेतकऱ्यांचा आवाज आणि जनमानसाचे आंदोलनकर्ते, म्हणून ओळखले जाऊ लागले. अनेक समस्यांवर उपाय शोधण्याकरिता दूरुन लोक त्यांना भेटायला येत असत. विषयाची गंभीरता पाहून पुरुषोत्तम रेड्डी त्यांना त्या समस्येच्या निराकरणाकरिता करण्यात येणाऱ्या आंदोलनात कशा प्रकारची भूमिका पार पाडायची आहे, ते ठरवत असतं. ते कधी नायक बनत तर कधी सल्लागार. पुरुषोत्तम रेड्डी यांनी लोकहिताकरिता कायदेशीर लढायादेखील लढल्या आहेत. पर्यावरण संरक्षण आणि मानवकल्याणाकरिता पुरुषोत्तम रेड्डी यांनी अनेकदा विविध न्यायालयात आवाज उठवला आहे.

खास मुलाखतीदरम्यान आम्ही पुरुषोत्तम रेड्डी यांना प्रश्न विचारला की, त्यांनी अनेक वर्षे राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले, त्यानंतर अनेक काळ राज्यशास्त्राचे शिक्षण दिले, अखेरीस एक शिक्षणवादी आणि राज्यशास्त्रातील तज्ज्ञ यांपासून ते पर्यावरणवादी आणि जनआंदोलनाचे प्रणेते कशाप्रकारे बनले?

या प्रश्नाचे उत्तर देताना पुरुषोत्तम रेड्डी यांनी सांगितले की, दोन घटनांनी त्यांचे जीवन बदलले होते. या घटना अशा होत्या, ज्यामुळे ते पूर्णतः हादरुन गेले होते. त्यांना अतीव दुःख आणि त्रास झाला होता.

पहिली घटना भोपाळ वायूदुर्घटना, ज्यात अनेक लोकांचे प्राण गेले होते. दुसरी घटना त्यांच्या परिवारासंबंधी होती. पुरुषोत्तम रेड्डी यांचे भाऊ शेतकरी होते आणि ते जैविक शेती करत असत. त्यांच्या शेताला सरूरनगर सरोवरातून पाणी मिळत असे. मात्र आसपास बनलेल्या औद्योगिक कारखाने आणि फॅक्टऱ्यांमुळे त्या सरोवराला टाकाऊ घटक टाकण्याची जागा बनवली गेली होती. रासायनिक द्रव्ये त्या सरोवरात सोडली जात असतं. सरूरनगर सरोवर प्रदूषित झाले. त्या प्रदूषित पाण्यामुळे पुरुषोत्तम रेड्डी यांची शेतीदेखील नष्ट झाली. शेतजमीन खराब होऊ लागली होती. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या मिळकतीवर झाला होता. परिवाराचेदेखील मोठे नुकसान झाले होते. या नुकसानामुळे सर्वजण हादरुन गेले होते. या पारिवारिक  संकटाच्या वेळेस पुरुषोत्तम रेड्डी यांनी संकल्प केला की, ते पर्यावरण संरक्षणाकरिता आपले जीवन समर्पित करतील. त्यांनी तसेच केले. त्यांचे पहिले आंदोलन हे सरूरनगर सरोवरच्या पुनरुद्धाराकरिता होते. त्यांनी सरूरनगर सरोवर वाचवण्याकरिता आंदोलन केले. व्यवसायाने रेडियोलॉजिस्ट असलेले त्यांचे एक नातेवाईक गोवर्धन रेड्डी यांनी त्यांना या आंदोलनात मदत केली.

पुरुषोत्तम रेड्डी यांनी सरूरनगर सरोवर वाचवण्याकरिता संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याला काम करण्यास भाग पाडले. एक दिवसही ते गप्प बसले नाहीत. निरंतर काम करत राहिले. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे, त्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले आणि सरूरनगर सरोवर वाचले.

आपल्या पहिल्या आंदोलनात एवढे मोठे यश मिळाल्याने पुरुषोत्तम रेड्डी यांचा आत्मविश्वास दुणावला. आता त्यांनी पर्य़ावरणाला नुकसान ठरणाऱ्या उद्योग आणि कारखान्यांविरोधात रणशिंग फुंकले होते. आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील अनेक सरोवरांचा पुनरुद्धार करण्यात ते यशस्वी राहिले आहेत.

पुरुषोत्तम रेड्डी यांनी जनतेला मदत करण्याच्या हेतून पर्यावरणासंबंधी पुस्तके आणि शोधग्रंथ वाचण्यास सुरुवात केली. एमफिलमध्ये असताना त्यांनी आचार्य़ अरविंद यांच्या दर्शन शास्त्र, यावर संशोधन केले होते आणि पीएचडीकरितादेखील त्यांना हाच विषय हवा होता. मात्र सरूरनगर सरोवराच्या प्रदूषणामुळे त्यांच्या कुटुंबावर ओढावलेले संकट लक्षात घेता त्यांनी आपल्या संशोधनाचा विषय 'पर्य़ावरण निती' हा बनवला. पर्य़ावरण आणि त्यासंबंधी जोडलेल्या अनेक मुद्द्यांवर संशोधन तसेच अध्ययन करता करता पुरुषोत्तम रेड्डी त्या विषयातील विशेषज्ञ आणि विद्वान बनले आहेत. त्यांनी अर्जित केलेले ज्ञान लोकांमध्ये वाटण्याकरिता आणि लोकांमध्ये पर्य़ावरणाप्रति जागरुकता निर्माण करण्याकरिता आजही वयाच्या ७३व्या वर्षी ते एका युवकाप्रमाणे काम करत आहेत.

पुरुषोत्तम रेड्डी या दिवसांमध्ये युवांकडे विशेष लक्ष देत आहेत. त्यांच्या मते, देशातील युवावर्ग पर्यावरणासंबंधी समस्या समजेल आणि पर्यावरण संरक्षणाकरिता काम करेल, तर निकाल लवकर आणि चांगला येईल. याच कारणामुळे पुरुषोत्तम आजही गाव आणि शाळा-महाविद्यालयात जाऊन लोकांना खासकरुन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रति सजगता आणि जागरुकता आणण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न करतात. ते सांगतात की, 'माझ्या सर्व आशा युवावर्गावर टिकलेल्या आहेत. जर आपण पर्यावरण वाचवले तर देशाला वाचवू शकतो. दुष्काळ, पूर, वणवा या सर्व गोष्टी म्हणजे पर्य़ावरणाला नुकसान पोहोचवल्याचा परिणाम आहेत. पर्यावरणाला वाचवण्याकरिता दुसऱ्या स्वातंत्र्य़लढ्याची आवश्यकता आहे आणि ही लढाई युवावर्ग सुरू करुन त्यात यश मिळवू शकतो.'

पुरुषोत्तम रेड्डी यांना या गोष्टीचीदेखील तक्रार आहे की, आजपर्य़ंत देशात कोणत्याही सरकारने विकासाची परिभाषा निश्चित केलेली नाही. त्यांच्या मते, सर्व सरकारे उद्योग, कारखाने, रस्ते आणि भवनांच्या निर्मितीला विकास मानत आहेत, जे चूक आहे. पर्यावरणाला नुकसानकारक असलेले कोणतेही काम विकासाचे होऊ शकत नाही.

पुरुषोत्तम रेड्डी यांना जेव्हा विचारण्यात आले की, देशाच्या विविध भागांमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी अनेक आंदोलने का यशस्वी होत नाहीत. तेव्हा त्यांनी सांगितले की, 'समस्या आंदोलनकर्त्यांमुळे विशेषकरुन नायकामुळेच आहेत. आंदोलनाचे नेतृत्व करणारे लोक समस्या आणि मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवण्यात तेवढे लक्ष देत नाहीत, जेवढे आपले नाव कमावण्यात देत असतात. मी अनेक लोकांना पाहिले आहे की, ते मुद्दे उचलतात आणि जेव्हा त्यांचे नाव होते, तेव्हा ते मुद्दे विसरुन जातात आणि अशा मुद्द्यांचा शोध घेऊ लागतात, ज्यामुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळेल. या गोंधळातच आंदोलने यशस्वी होत नाहीत. आंदोलनकर्त्यांनी स्वतः प्रकाशझोतात येण्याऐवजी मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवायला हवेत.'

यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

स्वखर्चाने जनकल्याणाच्या-पर्यावरण रक्षण,पक्षी संवर्धनाचा ध्यास घेणारी कल्याणची ‘ईकोड्राइव्ह फाऊंडेशन’ची तरूण मंडळी!

भिंतीमध्ये वाढलेल्या देशी झाडांच्या पुनःरोपणातून जैवविविधतेचे रक्षण करणारी ‘ग्रीन अम्ब्रेला’

इंदूरच्या वानरसेनेची कमाल : शिट्टी वाजवून बंद पाडली उघड्यावर शौचालयास जाण्याची प्रथा !


Dr Arvind Yadav is Managing Editor (Indian Languages) in YourStory. He is a prolific writer and television editor. He is an avid traveler and also a crusader for freedom of press. In last 19 years he has travelled across India and covered important political and social activities. From 1999 to 2014 he has covered all assembly and Parliamentary elections in South India. Apart from double Masters Degree he did his doctorate in Modern Hindi criticism. He is also armed with PG Diploma in Media Laws and Psychological Counseling . Dr Yadav has work experience from AajTak/Headlines Today, IBN 7 to TV9 news network. He was instrumental in establishing India’s first end to end HD news channel – Sakshi TV.

Related Stories

Stories by ARVIND YADAV