घर आणि ऑफिस सजवण्याकरता फर्निचर भाड्याने देणारे 'सिटी फर्निश'

घर आणि ऑफिस सजवण्याकरता फर्निचर भाड्याने देणारे 'सिटी फर्निश'

Wednesday February 24, 2016,

4 min Read


एकाच ठिकाणी निवृत्त होईपर्यंत नोकरी करणं पर्यायी एकाच शहरात अथवा घरात राहणं, हे अगदी सर्वसाधारण होतं. पण आता बदलत्या काळानुसार, शिक्षणाच्या वेगळ्या आयामानुसार नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होत आहे. नोकरी, शिक्षण किंवा आणखीही कारणांमुळे हल्ली आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरतं स्थलांतरीत व्हावं लागतं. कधीकधी हा काळ २-३ महिने असाही असतो. अशा वेळी आपण आपल्याला आवश्यक कपडे आणि वस्तू घेऊन जातो पण फर्निचरचं काय? आपण ज्या घरात राहणार असू तिथं कपाट किंवा टेबल, खुर्ची, पलंग अस काहीच नसेल तर... आपण ते विकत घ्यायच्या फंदात पडत नाही. पण आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भाड्याने मिळू शकतात. आश्चर्य वाटतयं ना! सिटी फर्निश (CityFurnish) ही स्टार्टअप वैयक्तिक किंवा कॉर्पोरेटसना, घर आणि ऑफिस सजवण्याकरता फर्निचर आणि उपकरणं भाड्यानं देते. यामुळे या वस्तू विकत घेण्याचा आपला खर्च आणि त्रासही वाचतो.

नीरव जैन दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांना त्यांच्या शैक्षणिक काळापुरताच काही फर्निचर दिल्लीत आणायचं होतं. आणि तिथून बाहेर पडताना ते मूळ जागी परत आणून ठेवायचं होतं. फर्निचरच्या हलवाहलवी दरम्यान त्यांना सिटीफर्निशची आयडीया क्लिक झाली. नीरव आपल्या कल्पनेबाबत सांगतात, “मी सप्टेंबर २०१५ मध्ये सिटीफर्निशच्या कल्पनेवर काम करायला सुरूवात केली आणि सप्टेंबर अखेरीला आम्ही बाजारात उतरलो होतो. सुरूवातीलाच आम्ही ५० जणांना भाड्याने फर्निचर पुरवलं”. आणि अवघ्या २२ व्या वर्षी नीरवच्या व्यवसायाची यशस्वी मुहूर्तमेढ झाली. सिटीफर्निश सुरू करायच्या आधी नीरवनी पेपरफ्रायमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलं. फर्निचरचा बाजार आणि त्याच्या किंमती, व्यवसायातले चढउतार समजून घ्यायला याचा फायदा झाला.

image


नीरव आणि त्याचा मित्र सौरभ गुप्ता या दोघांनी मिळून गुडगावमधल्या त्यांच्या फ्लॅटमधून कामाला सुरूवात केली. नीरव त्यांची टीम वाढवताना लोकांना या कल्पनेच्या जमेच्या बाजू सतत सांगायचे. लोकांना त्यांच्या कल्पनेचं आकर्षण निर्माण झालं आणि लोकं त्यांच्याकडे वळू लागले. त्यांच्या टीमचा पहिला सदस्य विकास पेपरफ्रायमध्ये कामाला होता. सध्या दिल्ली आणि बेंगळुरूत मिळून त्यांची अकरा जणांची टीम आहे.

पायाभरणी

आपल्याला जम बसवण्याकरता चांगली मशागत करावी लागणार असल्याचं त्यांना माहीत होतं. त्यामुळेचं त्यांनी नीरवच्या कौटुंबिक व्यवसायाचा आधार घ्यायचं ठरवलं. जोधपूरमध्ये नीरवच्या कुटुंबियांच्या फर्निचर निर्मितीचा व्यवसाय आहे. फर्निचरचं डिझाईन आणि निर्मिती करण्यात या कौटुंबिक व्यवसायाचा चांगला फायदा झाला. किमान तीन महिन्याच्या काळाकरता आपल्याला सिटीफर्निशकडून मासिक भाडेतत्वावर फर्निचर घेता येतं. नोंदणीची रक्कम देऊन आपलं भाडं रोख, चेक किंवा कार्डाद्वारे देता येतं.

सिटीफर्निशच्या वेबसाईटवरून ग्राहकाला फर्निचर आणि पॅकेजची निवड करता येते. किती काळाकरता फर्निचर भाड्याने हवं आहे, नोंदणीची रक्कम या सर्व बाबी ऑनलाईनच करता येतात. नोंदणी झाल्यावर ग्राहकाच्या पत्त्यावर टीम फर्निचर घेऊन येऊन, त्याची जोडणीही लगेचच करून देते. ग्राहकाने मागणी केल्यास मोफत देखभालही (मेंटेनन्स) करून दिली जाते. नीरव आपल्या पॅकेजबाबत सांगतात, “आमच्या बेसिक 2बीएचके पॅकेजमध्ये मजबूत लाकडी फर्निचर आणि उपकरणं आहेत. याची किंमत आहे मासिक रुपये 5,600/-”.

गोदाम आणि वाढ

फर्निचर बनवण्याकरता त्यांच्याकडे जागा आहेच. पण त्वरित प्रतिसाद आणि व्यवसायवाढीकरता वेगवेगळ्या ठिकाणी गोदाम असण्याची आवश्यकता त्यांच्या लक्षात आली. त्यांनी अग्रवाल पॅकर्स आणि मुवर्ससोबत हातमिळवणी करत आपल्या गोदामांच जाळं विणलयं. व्यवसाय आणखी वाढल्यावर, जास्त प्रमाणात मागण्या येऊ लागल्यावर स्वतःच्या मालकीचे गोदाम घेण्याचा त्यांचा विचार आहे.

त्यांच्याकडे सध्या असणाऱ्या गोदाम जंतुविरहीत करण्याकरता ते युव्ही तंत्रज्ञान वापरतात. गाद्या, सोफे आणि इतर वस्तूंच्या सफाईसाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये त्यांनी आतापर्यंत साडेचारशे घरं सजवली आहेत. सध्या त्यांचा मासिक विकासदर ५५ टक्के एवढा आहे. आतापर्यंत त्यांनी ६,१०० वस्तू भाडेतत्वावर दिल्या आहेत.

या स्टार्टअपने सुरूवातीचं भांडवल उभारलं आणि व्यवसायवाढीकरता भांडवलाचा पुढचा टप्पा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. या महिना अखेरिला सिटीफर्निश पुण्यातही दाखल होत आहेत.

नीरव सांगतात, “उत्पादनांचं व्यवस्थापन आणि आर्थिक बाबी हाताळण्याकरता आम्ही आमचं तंत्रज्ञान विकसित करत आहोत. काही दिवसांमध्ये दिल्ली आणि बेंगळुरूमध्ये आम्ही मॉड्युलर आणि कमी जागा व्यापणारं फर्निचर आणणार आहोत”.

युअरस्टोरीचं मत

अर्बन लॅडर आणि पेपरफ्राय यांच्या फर्निचर स्टाईल्सना लोकांच्या पसंतीची मोठी पावती मिळाली. आपल्याकडे फर्निचर कुटुंबाच्या मालकीचं असतं. काही घरांमध्ये तर वारसा हक्काने फर्निचरसुद्धा हस्तांतरीत होत असतं. सूताराला बोलावून माप घेऊन आपल्याला हवं तसं फर्निचर बनवणारेही अजून खूप जण आहेत. पण हल्लीच्या मागणी तसा पुरवठा या अर्थनीतीनुसार भाडेतत्वावरही या गोष्टी घेण्याची क्रेझ वाढत आहे.

जागतिक पातळीवर संघटीत फर्निचरच्या बाजारपेठेत भारताचा आठवा क्रमांक लागतो. आपल्याकडे भाडेतत्वावर फर्निचर वापरणं तसं अजून रुळलं नसल्यामुळे हा गट असंघटीत आहे. पण पाश्चिमात्य जगात हा बऱ्यापैकी लोकप्रिय प्रकार आहे. त्यामुळे फर्निचर उद्योगात या क्षेत्राचा मोठा हिस्सा आहे. गेल्या वर्षभरात या क्षेत्रात फुर्लेन्को, व्हीलस्ट्रीट, रेन्टमोजो, इटाशी, स्मार्ट मुंबईकर आणि रेंटसेटगो हे काही स्टार्टअप आले आहेत. फुर्लेन्को तर सिटीफर्निशची थेट प्रतिस्पर्धी आहे. फुर्लेन्को तर बाजारातून गुंतवणुकीचा पुढचा हिस्सा याआधीच मिळवला आहे. फुर्लेन्कोकडे फर्निचर डिझाईनकरता त्यांची स्वतःची टीम आहे. त्यांच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ दिवाणखाना, स्वयंपाकघर किंवा बेडरुम करताही उत्पादन देतात. फुर्लेन्कोच्या उत्पादन, सेवा आणि व्यवस्थापनावर त्यांचे ग्राहक चांगलेच खूष असल्याने त्यांचे ग्राहक त्यांच्याशी बांधले गेले आहेत. आपला पाया घट्ट करण्याकरता या कंपनीने गुंतवणुकही चांगलीच दमदार केली आहे.

या क्षेत्रातली आणखी एक लोकप्रिय स्टार्टअप आहे रेन्टमोजो. या तगड्या गुंतवणूक असणाऱ्या स्टार्टअप्ससोबत सिटीफर्निशची स्पर्धा आहे. या स्पर्धेत नवे खेळाडूही सतत सामील होत आहेत. त्यात सिरीफर्निशला स्वतःला टिकवून ठेवायचं आहे.

आणखी काही स्टार्टअप्स संबंंधित कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. 

आता वाचा संबंधित कथा :

आता मनाजोगं फर्निचर भाड्याने घ्या, वापरा आणि गरज संपल्यास परत करा.. क्लिक करा 'जस्ट ऑन रेंट डॉट कॉम'वर

ʻवुडगीकस्टोअरʼ, दैनंदिन जीवनात गरजेच्या असलेल्या लाकडी कल्पक वस्तूंचे भांडार

लॉजिस्टिक्स व्यापारी आणि ग्राहक यांच्यातील दरी साधणारं 'सेंडइट'

लेखिका – सिंधू कश्यप 

अनुवाद – साधना तिप्पनाकजे