दोन जगांना जोडणारा सांधा...‘दाना नेटवर्क’

ग्राहक आणि उत्पादकांमधून मध्यस्थांची होणार गच्छंती

दोन जगांना जोडणारा सांधा...‘दाना नेटवर्क’

Saturday August 22, 2015,

5 min Read

दाना नेटवर्क. ऑरगॅनिक फार्मिंग, अर्थात सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून दोन भिन्न जगांना जोडणारा सांधा. उपभोक्ता अर्थात ग्राहक आणि उत्पादक अर्थात निर्माते. “शहरांमध्ये आपण बेजबाबदारपणे कोणत्याही गोष्टीचा कितीही वापर करतो. आपली हीच सवय बदलायला हवी. उपभोक्ते आणि उत्पादक या दोघांमधली दरी पूर्णपणे संपायला हवी. कारण दुर्दैवानं आज हे दोघेही एकमेकांना ओळखतच नाहीत”, दाना नेटवर्कच्या सहसंस्थापक सुजाथा रमणी म्हणतात.

सुजाथा रमणी, सहसंस्थापक, 'दाना नेटवर्क'

सुजाथा रमणी, सहसंस्थापक, 'दाना नेटवर्क'


हैद्राबादमध्ये प्रामुख्याने केंद्रित असलेल्या ‘ दाना नेटवर्क ’ मध्ये तसे दोन भागीदार. एक सुजाथा रमणी आणि दुसरे अशहर फरहान. ऑरगॅनिक फार्मिंगच्या संपूर्ण यंत्रणेतल्या प्रत्येक व्यक्तीला जोडण्यासाठी ‘दाना नेटवर्क’ने एक सॉफ्टवेअर बनवलंय. सुजाथा म्हणतात, “ हे सॉफ्टवेअर शेतकरी, सहकारी संस्था, किरकोळ विक्रेते (दुकानदार, ठेलेवाले) आणि ग्राहक अशा सर्वांनाच एकत्र आणतं ”. एखाद्या सोशल नेटवर्कपेक्षाही हे खरंतर ई-कॉमर्सचं एक माध्यम आहे. “याला एक उद्योगच म्हणा, जिथे येणारी प्रत्येक व्यक्ती ही फक्त आपल्याकडची माहितीच दुस-यांना देते असं नाही, तर प्रत्यक्ष उत्पादनांचीही इथे देवाण-घेवाण होते. शेतकरी त्यांचं धान्य विकू शकतात, कोणता शेतकरी काय पिकवतोय याची माहिती दुकानदारांना मिळते आणि ग्राहक या शेतीउत्पादनांची खरेदीही करू शकतात”, सुजाथा भरभरून सांगतात.

या सॉफ्टवेअरचा उद्देश हा प्रामुख्याने दोन गरजांची पूर्तता करणं हा आहे. पहिली म्हणजे शिक्षण किंवा भाषाज्ञानाची कोणतीही आडकाठी न येता ऑरगॅनिक फार्मिंग यंत्रणेतल्या प्रत्येक घटकाला दुस-याशी संवाद साधता आला पाहिजे. आणि दुसरी गरज म्हणजे या सर्व घटकांच्या हातात असणा-या साध्या ३ जी टेक्नोलॉजी मोबाईलमध्येही हे तंत्रज्ञान उपलब्ध झालं पाहिजे. सुजाथा मग समजावून सांगतात, “या सॉफ्टवेअरमध्ये वापरण्यात आलेली भाषा ही इंग्रजी आहे. पण यातल्या सर्व गोष्टी या चित्ररूपात आहेत. त्यामुळे कुणाला लिहिता-वाचता आलं नाही, तरी हे सॉफ्टवेअर वापरता येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने आकडे, नग, आकार किंवा वजन, किंमत, साठा, पैसे अशा गोष्टींचा समावेश आहे.” येत्या काही महिन्यांमध्ये हे सॉफ्टवेअर सहा दक्षिणी भाषांमध्ये भाषांतरित करण्याचाही त्यांचा मानस आहे.

हैद्राबाद, 'दाना नेटवर्क'ची सुरुवात

हैद्राबाद, 'दाना नेटवर्क'ची सुरुवात


खरंतर ग्रामीण भारतात इंटरनेट सुविधेचा म्हणावा तसा प्रसार अजून झालेला नाहीये. पण सुजाथा यांच्याकडे त्यावरही उत्तर आहे. त्या म्हणतात, “ इतर विकसनशील देशांच्या मानाने भारतात इंटरनेट स्वस्त आहे आणि ३ जी इंटरनेट सुविधा सहज उपलब्ध होऊ शकते. तुम्हाला गरज असते ती फक्त ५ ते ७ हजार रूपये किंमतीच्या एका स्मार्टफोनची. आज भारतात अनेक शेतकरी कुटुंबांकडे अशा प्रकारचे स्मार्टफोन आहेत.”

‘ दाना नेटवर्क ’ सुरु करण्यापूर्वी सुजाथा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होत्या. पण त्यांना फक्त तांत्रिक शिक्षणापर्यंतच स्वत:ला मर्यादित करून घ्यायचं नव्हतं. त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांनी हैद्राबादमध्ये ‘ गुड सीड्स ’ नावाचा उपक्रमही सुरु केला होता, जिथे सेंद्रिय शेती उत्पादनांची प्रत्यक्ष विक्री होत होती. त्या म्हणतात, “२०१२ पासून मी, माझे मित्र आणि भागीदार अशहर फरहान यांच्यासोबत ‘ दाना ’ ची सुरुवात केली. तेव्हापासून मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात परत आले. जे माझं पॅशन आहे, अर्थात ऑरगॅनिक फार्मिंग.”

अशहर फरहान, 'दाना नेटवर्क'चे सहसंस्थापक

अशहर फरहान, 'दाना नेटवर्क'चे सहसंस्थापक


आत्तापर्यंत जवळपास ३५ शेतकरी सहकारी संस्था ‘दाना नेटवर्क’ च्या या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. आणि ‘दाना’नं आपलं जाळं दक्षिण भारतातल्या प्रत्येक राज्यात पसरवलं आहे. नाशवंत शेती उत्पादनं हैद्राबाद आणि आसपासच्या भागातून मागवली जातात, तर दीर्घकाळ टिकणारी उत्पादनं बाहेरच्या राज्यांमधून उपलब्ध होतात. “येत्या काही महिन्यांमध्ये आम्हाला शेतकरी आणि शेतकरी संघांसोबत असलेला आमचा संपर्क अधिक वाढवायचा आहे. सध्या अशा १५० सदस्यांना आणि संघांना आम्ही सेवा पुरवत आहोत,” सुजाथा सांगतात.

‘दाना’ टीमच्या मते या उपक्रमासमोरचं सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते म्हणजे सेंद्रिय शेतीची उत्पादन क्षमता आणि किंमत. सुजाथा म्हणतात, “सेंद्रिय शेती उत्पादनं ही आरोग्यासाठी चांगली असतात हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण त्यांची किंमत जास्त असल्यामुळे ही उत्पादनं खरेदी करण्याची कुणाचीही इच्छा होत नाही. अगदी मध्यम वर्गाचीही. त्यामुळे आत्तापर्यंत ‘दाना नेटवर्क’मध्ये आम्ही आमचे स्वत:चे पैसे गुंतवले आणि ते नक्कीच सार्थकी लागले असं आम्हाला वाटतं. सध्या तरी लोकांनी सेंद्रिय शेती उत्पादनांची सवय लावावी, ती वापरावीत आणि त्याची खरी किंमत ओळखावी अशी आमची इच्छा आहे.” त्या सांगतात, “तुम्हाला आधी या उत्पादनांच्या वापरासाठी तशी परिस्थिती निर्माण करावी लागेल, मग त्याच्या वापराची लोकांना सवय लावावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही एका प्रॉफिटेबल मार्केट अर्थात फायदेशीर बाजारपेठेचा विचार करू शकता.”

सेंद्रिय शेती, भविष्याची गरज

सेंद्रिय शेती, भविष्याची गरज


सेंद्रीय शेती पद्धतीसमोर दुसरी महत्त्वाची समस्या आहे ती म्हणजे शेतक-यांमधला या उत्पादनाविषयीचा अविश्वास. एक म्हणजे शेतक-यांना या पद्धतीने केलेल्या शेतीतून येणा-या उत्पादनाची खात्री नसते. आणि दुसरं म्हणजे उत्पादन आलं जरी, तरी त्याला योग्य बाजारपेठ मिळेलच याची शाश्वती नसते. यावर ‘दाना’ करत असलेले प्रयत्न सुजाथा समजावून सांगतात, “आम्ही अशा शेतक-यांसोबत काम करतो, जे आधीपासूनच सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. कधीकधी आम्ही काही समाजसेवी संस्था अर्थात एनजीओंसोबत काम करतो, ज्या शेतक-यांना सेंद्रिय शेतीची माहिती समजावून सांगू शकतील. या घडीला तरी आम्ही दर महिन्याला आमच्याकडे नोंदवली जाणारी मागणी तातडीने पूर्ण करण्यावर भर देत आहोत. यामुळे शेतक-यांमध्ये सेंद्रिय शेतीचे फायदे आपसूकच रूजवले जातील.”

‘दाना नेटवर्क’ उपक्रमासमोरची ही आव्हानं फार अवघड किंवा अशक्य नसली तरी ती आव्हानं कशी पेलायची यावर ‘दाना’ टीम काम करतेय. सध्या सुजाथा आणि त्यांची टीम सेंद्रिय शेती उत्पादनांची किंमत कमी कशी करता येईल याचा विचार करतेय. कारण त्यानंतरच त्यांच्या टीमला या अभिनव उपक्रमासाठी एक मजबूत असा पाया रचता येणार आहे, आणि अर्थात काही प्रमाणात नफाही मिळवता येणार आहे. आपल्या नेटवर्कच्या मदतीने ‘दाना नेटवर्क’ टीमने उत्पादक आणि ग्राहक यांच्यातल्या मध्यस्थाला यशस्वीपणे बाजूला सारलं आहे. उत्पादनांची वाहतूक हा मात्र अद्याप टीमसमोरचा न सुटलेला प्रश्न आहे.

पण हे काहीही असलं, कितीही अडचणींचा सामना करावा लागला, तरी आपल्याला हेच करायचंय असं सुजाथा सांगतात. कारण समाजाच्या दीर्घकालीन फायद्याचा विचार केला, तर सेंद्रिय शेती हाच सर्वोत्तम उपाय दिसतोय. शेवटी सुजाथा समाधानाने एकच गोष्ट सांगतात, “आमच्या या भूमिकेला पाठिंबा देणा-या, या पद्धतीने विचार करणा-या व्यक्ती पाहिल्या की मनाला खूप आनंद होतो.” 

‘दाना नेटवर्क’ या समस्यांवर कसा तोडगा काढते, यावर आम्ही नक्कीच लक्ष ठेवून आहोत. ‘दाना नेटवर्क’विषयी अधिक माहिती ही त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.