आता बना क्रिएटिव्ह इकोसिस्टमचा भाग.. स्टोरीमिरर लाँच करतेय लेखकांची फळी.. 

0

भारतात कथा सांगण्याची परंपरा आहे. अगदी पुरातन मौखिक पौराणिक कथांपासून ते चित्रकथीतून सामाजिक जीवनाचा हिस्सा बनलेल्या या कथाकथनाची आधुनिक गणितं बदलतायत. एक ओरड नेहमी ऐकायला मिळत होती की नवी पिढी वाचत नाही आणि नवीन लेखक चांगले लिहित नाहीत. एका पाहणीनुसार हे खोटं ठरलंय. नवीन पिढी वाचतेय, खुप वाचतेय. अगदी जे मिळेल ते आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे ती लिहू लागली आहे. अश्या नव्या -जुन्या लेखकांची संख्या वाढत असताना हे लिखाण वाचकांपर्यंत पोहचण्याच्या प्रक्रियेत मात्र काहीही बदल झालेला नाही. तो अजूनही पारंपरिक पध्दतीनं चालवला जातोय. खासकरुन प्रादेशिक भाषांबाबत या परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी मिळतेय. पण ती परिपूर्ण नाही. ही क्रिएटिव्ह इकोसिस्टममधली पोकळी भरुन काढण्याचं काम 'स्टोरीमिरर' सारखी कंपनी करतेय. 

स्टोरीमिरर देवेंद्र विश्वास जैसवाल यांच्या संकल्पनेतून साकारलेला अनोखा उपक्रम आहे. देवेंद्र जैसवाल हे व्यवसायानं बँकर. बँकर म्हणून त्याचं करीयर अगदी उत्तम सुरु होतं. क्रेडीट, डेबीट आणि बॅलेन्सशीट या तीन घटकांभोवती रोजचं जीवन जगताना त्यांनी आपला एक छंद जपला. तो म्हणजे वाचनाचा. सोशल मीडियावर एक्टिव असल्यानं एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की नवीन पिढी चांगली लिहितेय. नव्या कल्पना आणि नव्या कथांना उधाण आलंय. पण ते छापण्याची प्रक्रिया अजूनही पारंपारिक असल्यानं हे नवीन लेखक जगासमोर येत नाहीत. “या लोकांना एका व्यासपीठाची गरज आहे. त्यांच्या कल्पना भन्नाट आहेत. व्यक्त होणाची आणि कथा सांगण्याच्या पध्दतीत नाविन्य आहे. हेच मला भावलं आणि या लेखकांना एक हक्काचं व्यासपीठ देण्यासाठीच 'स्टोरीमिरर'ची सुरुवात झाली. व्यावसायिक दृष्टीकोन आहेच पण त्याचबरोबर नवीन साहित्य, किंबहुना तरुण साहित्य तयार करण्याचा अभिमान त्या व्यावसायिक दृष्टीकोनापेक्षा जास्त मोठा आहे.” देवेंद्र सांगत होते. 

स्टोरीमिरर कसं काम करते :

देवेंद्र सांगतात, “ आम्हाला तुमच्या विचारांची गती समजते. ते जपले गेले पाहिजेत म्हणूनच आम्ही ते शेअर करतो.” स्टोरीमिररचं काम अगदी सोप्या पध्दतीनं चालतं. “या भारतात आणि जगभरात कथांचं महाजाळ आहे. तिथं नजर टाकावी तिथं गोष्ट दिसते. तिचं स्वत:चं असं अस्तित्व असतं. आम्ही लेखकांच्या या गोष्टींना व्यासपीठ मिळवून देतो. तुम्हाला आपली गोष्ट ऑनलाईन सबमीट करायची आहे. स्टोरीमिररची संपादकीय टीम त्यावर काम करते. त्यानंतर गोष्ट पब्लीश केली जाते. पण प्रकाशक म्हणून आमचं काम इथं संपत नाही तर सुरु होतं. त्या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही काम करतो. सोशल मीडिया, बुक स्टॉल आणि इतर ज्या काही गोष्टी उपलब्ध आहेत त्याचा वापर करुन लेखकाची कथा जगभरात पोचवली जाते.” देवेंद्र सांगत होते. 

मागच्या आठवड्यात स्टोरीमिररनं पहिली कादंबरी प्रकाशित केली. लेखक बिधु दत्ता राओत याची व्हिल्स ऑफ विश. राओत बँकर आहेत. त्याची ही कादंबरी सस्पेंस थ्रिलर आहे. ज्याचं प्रकाशन प्रसिध्द अभिनेत्री टिस्का चोप्रा यांच्या हस्ते करण्यात आलं.

“आम्ही लेखक लाँच करतोय फक्त पुस्तक नाही” देवेंद्र सांगतात, “सध्या लेखकांना हे व्यासपीठावर आणून जास्तीत जास्त साहित्य वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचं आमचं काम आहे. हे काम आम्ही सचोटीनं करतोय. या नव्या लेखकांना जास्तीत जास्त मानधन देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” 

सध्या स्टोरीमिररनं त्यांच्या प्रकाशनाबरोबर अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून ४०००० हजारांहून जास्त कथा, कविता आणि अन्य स्फुट लेखन प्रकाशित केल्या आहेत. हिंदी, इंग्रजी आणि ओडिया या तीन भाषांमध्ये ते उपलब्ध आहे. याद्वारे जगातलं सर्वात मोठं क्रिएटिव्ह इकोसिस्टम सुरु करण्याचा स्टोरीमिररचा प्रयत्न आहे. याद्वारे पुस्तकांव्यतिरिक्त इ बुक पब्लिशींगही हाती घेण्यात आलंय. ज्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत बारा नवीन लेखकांची पुस्तकं प्रकाशित करण्यासंदर्भात करार करण्यात आलेत. तर चाळीस अन्य लेखक हे करार करण्यासाठी तयार झालेत. यासर्वांना पुस्तक, इबुक आणि सोशल मीडिया अशा तिनही माध्यमातून जगभर पोचवण्याचा प्रयत्न स्टोरीमिररचा आहे. अगदी १५ वर्षांच्या छोट्या लेखकांपासून ते ७०  वर्षांच्या जोधपूरी लेखकापर्यंत सर्वांना हे नवं व्यासपीठ आपलं वाटतंय. यातून प्रकाशक म्हणून व्यवसायालाही भरभराट आली आहे. हे नव्यानं सांगायला नको.

यापुढे स्टोरीमिररचा विस्तार ३०  भारतीय भाषांमध्ये करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याद्वारे भारतातल्या प्रादेशिक भाषांमधून असेलेल्या लेखकांना इंग्रजी आणि जगभरातल्या इतर प्रमुख भाषांमध्ये अनुवादीत करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. स्टोरीमिररनं नव्या जुन्या लेखकांसाठी क्रिएटिव्ह बझ तयार केला आहे. यामुळं किएटिव्ह सर्वांनी एकत्र या असं नवीन ब्रीद स्टोरीमिररनं दिलंय. 

यासारख्या आणखी नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

नेटीझन्सचा नवा अड्डा.... नुक्कड कथा... 

नवीन लेखक आणि कलाकारांचा ऑनलाईन ‘बुकहंगामा’ 

विवेकी विचारांची पेरणी करुन भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले ‘अक्षरमित्र’