'बेटी बचाओ बेटी पढाओ', पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी बनारसची मुलगी

'बेटी बचाओ बेटी पढाओ', पंतप्रधान मोदींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी बनारसची मुलगी

Monday February 08, 2016,

3 min Read

ज्या समाजात महिलांना मान असतो, त्या समाजाचाच विकास होतो हे वारंवार सिद्ध झालं आहे, मात्र काही ठिकाणी नेमके उलटे चित्र अद्यापही पहावयास मिळते. आता ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विशेषत: मागच्या काही वर्षात या दिशेने ठोस प्रयत्न होताना दिसत आहेत. मुलींना प्रत्येक क्षेत्रात सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. या मोहिमेचे मोठे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. मुलींना वाचवण्यासाठी त्यांनी देशभर अभियान सुरु केले आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर या अभियानला बळकटी देण्यास प्रयत्नशील आहे.

बनारसमधल्या या अभियानाचे नेतृत्व डॉ. क्षिप्रा धर यांच्याकडे आहे. बेटी बचाव हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव ध्येय आहे. आपले हे ध्येय गाठण्यासाठी डॉ. क्षिप्रा यांनी सर्वस्व ओतलंय. देशातली मुख्य शैक्षणिक संस्था आणि बनारसची शान म्हणून ओळखल्या जाणा-या बनारस हिंदू विद्यापीठ ( बीएचयू) मधून त्यांनी एमडीचे शिक्षण पूर्ण केलं. पण क्षिप्रा यांच्यासाठी डॉक्टरी हा केवळ व्यवसाय नाही तर समाज आणि विशेषत: मुलींची सेवा करण्याची चांगली संधी आहे.

image


क्षिप्रा धर यांनी डॉक्टर बनल्यावर कोणतीही सरकारी नोकरी न करता स्वत:चे हॉस्पिटल उघडण्याचे निश्चित केले. दीड वर्षापूर्वी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घडलेल्या एका घटनेनं त्यांचा जगण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. डॉ. क्षिप्रा यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले,

“ साधारण दीड वर्षांपूर्वी एक महिला आपल्या गर्भवती सूनेसह आपल्या हॉस्पिटलमध्ये आली होती. उपचारादरम्यान या सुनेनं एका सुंदर मुलीला जन्म दिला. परंतू मुलीला ओझं समजणा-या आजीला आपल्या नातीच्या जन्माचं काहीच कौतूक नव्हतं. या गोड मुलीला तिच्या आयुष्यात काहीच स्थान नव्हते. आनंदीत होण्याऐवजी ती महिला संतापाने बेभान झाली होती. या संतापाच्या भरात त्यांनी आपल्या सुनेबरोबरच मलाही भरपूर सुनावले.

त्या महिलेच्या बोलण्याने हॉस्पिटलचे चित्र बदलले. या घटनेनंतर डॉ. क्षिप्रा यांनी हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या सर्व मुलींचे उपचार मोफत करण्याचा निश्चय केला. मागच्या दीड वर्षांपासून अव्ययाहतपणे हे अभियान सुरु आहे. मोफत उपचार करण्याबरोबरच सहा मुलींच्या शिक्षणाचा खर्चही डॉ.क्षिप्रा करतात. आगामी काळात शाळा सुरु करण्याचाही डॉ. क्षिप्रा यांचा संकल्प आहे. ज्या शाळेत गरीब आणि असह्य मुली शिक्षण घेतील. आपल्या पायावर उभे राहण्यासाठी या शिक्षणाची त्यांना मदत होईल. डॉक्टर क्षिप्रा यांनी आपल्या कामामधून बनारसमधल्या नागरिकांसाठी एक उदाहरण ठेवले आहे. इतकेच नाही तर आता त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येणा-या रुग्णांची विचार करण्याची पद्धतही बदलू लागलीय. या हॉस्पिटलमध्ये आलेल्या लिलावती सांगतात,

“ आता मुलगा होऊ दे किंवा मुलगी काहीच फरक पडत नाही. मुलगी झाली तर क्षिप्रा मॅडमप्रमाणे तिला डॉक्टर बनवेल ”

जन्माला आल्याबरोबरच ‘नकोशा’ झालेल्या मुलींसाठी क्षिप्रा आता काम करत आहेत. अशा मुली ज्यांच्या जन्मानंतर आनंद नाही तर शोक व्यक्त केला जातो. आजवर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ९० सुदैवी मुली जन्माला आल्या आहेत. या सर्व मुलींवर मोफत उपचार करुन डॉ.क्षिप्रा यांनी या मुलींच्या परिवाराला अनोखी भेट दिली आहे.

डॉ. क्षिप्रा यांच्या या मोहिमेमध्ये त्यांचे पती मनोज श्रीवास्तव यांचीही भक्कम साथ आहे. आपल्या बायकोला प्रत्येक प्रसंगात खंबीर साथ देणारे मनोज श्रीवास्तव हे देखील डॉक्टर आहेत. आपल्या बायकोबद्दल अभिमानाने बोलताना ते थकत नाहीत. डॉ. मनोज सांगतात,

image


“ समाजात मागे पडत चालेल्या या अर्ध्या लोकसंख्येला केवळ आधाराची नाही तर त्यांच्या मजबूतीकरणाची आवश्यकता आहे. मुलींना वाचवण्यासाठी समाजामध्ये मोठे बदल आवश्यक आहेत. त्यांची बायको या बदलाचे प्रतीक म्हणून नावारुपाला आली आहे.”

image


बेटी बचाव मोहीमेमुळे डॉ. क्षिप्रा यांना नवी ओळख मिळाली आहे. शहरातल्या मुलींसाठी त्या आदर्श आहेत. डॉ. क्षिप्रा यांचे कार्यक्षेत्र मर्यादीत आहे. तरीही त्यांची इच्छाशक्ती अथांग आहे. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला झोकून देऊन त्या काम करत आहेत. मुलींना ओझं समजणा-या समाजातल्या वर्गात अंजन घालण्याचे काम त्यांचे हे काम करत आहे.

यासारख्याच सामाजिक हित जपणाऱ्या कथा वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

एक असे रुग्णालय, जेथे शुक्रवारी जन्माला येणा-या मुलींना औषधा व्यतिरिक्त मिळतात, सर्व सुविधा मोफत!

वृद्धांना ‘आभाळमाया’ देणाऱ्या डॉ अपर्णा देशमुख

जन्मानंतर केलेल्या विष प्रयोगाच्या ‘कृती’ ने रोखले २९ बालविवाह

आणखी काही प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी YourStory Marathi या facebook पेजला भेट द्या. लाईक करा.

मुळ लेखक – आशुतोष सिंह

अनुवाद – डी. ओंकार