डोळे गेले, पण दृष्टी यशाच्या वाटेवरच... आशिष गोयल जगातले पहिले ‘ब्लाइंड ट्रेडर’

0

माणसाच्या आयुष्यात संकट केव्हा येईल काही सांगता येत नाही. एखादे संकट तर माणसाला इतके खचवून टाकते, की माणुस पुढे आयुष्यभर उभा राहू शकत नाही. नैराश्य, वैफल्य, अविश्वास अशा सगळ्याच नकारात्मक भावनांच्या जाळ्यात त्याचं डोकं आयुष्यभर गरगरत राहतं. इतर विचारच सुचत नाहीत. दुसरीकडे समाजात दुर्दम्य आत्मविश्वासाची काही उदाहरणेही बघायला मिळतात. संकटाचे रूपांतरही संधीत करण्याची किमया या लोकांच्या अंतरंगात असते. मुंबईचे आशिष गोयल हे असेच एक उत्तुंग व्यक्तिमत्व! आंतरिक बळाच्या जोरावर त्यांनी एका अशा संकटावर मात केली, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

आशिषनेही अगदी बालपणीच आपल्या आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने रंगवलेली होती. स्वत:च्या गुणवत्तेवरही त्याला भरवसा होता. आपले एकही स्वप्न असे नसेल, जे वास्तवाचे रूप घेऊ शकणार नाही. कतृत्वाच्या बळावर आपण प्रत्येक स्वप्नाला त्याने पूर्ण व्हावे म्हणून भाग पाडू, असा प्रचंड आत्मविश्वास होता. आणि वयाच्या नवव्या वर्षी त्याची दृष्टी कमकुवत होऊ लागली. अर्थात ही सुरवात होती. पण पुढे दोष वाढतच गेला. चित्र अधिकाधिक धुसर होत गेले… आणि बाविसाव्या वर्षी डोळ्यांसमोर अंधार पसरला. आप्तांच्या दृष्टीने सगळे संपलेले होते. पण आशिषच्या दृष्टीने आता संघर्षाची खरी सुरवात होती. तो हरला नाही, की खचला नाही. पाउले पुढेच पडत गेली. खुप शिकला. अंधाराला त्याने प्रगतीआड येऊ दिले नाही. अवघ्या जगाला उर्जा देईल, अशा यशाचा उजेड अर्जित केला.

आशिष गोयलचा जन्म मुंबईचा. कुटुंब तसे सधन संपन्न आणि शिकले-सवरलेले.

जन्म झाला तेव्हा आशिष चारचौघांसारखाच होता. लहानपणापासूनच अभ्यासात कमी आणि खेळण्या-हुंदडण्यातच तो जास्त रमे. पाच वर्षांचा होता तेव्हाच पोहणे शिकला. सायकल चालवणे शिकला. घोडेस्वारी शिकला. धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमध्येही रस घेऊ लागला. असा निशाणा साधायचा, की क्रीडाशिक्षक हैराण व्हायचे. क्रिकेट तर त्याचा जीव की प्राण. अख्खा दिवस क्रिकेटच खेळत राहावे, असे त्याला वाटे. टेनिसमधला चॅम्पियन बनण्याचे स्वप्न तो रंगवी. नऊ वर्षाचा झाला आणि हे सारे मागे पडले. आशिषला दुर्धर नेत्रविकार जडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही तर इलाज असेल, आपण वाटेल तेवढा खर्च करू, असेही आशिषच्या आई-वडिलांना बोलण्याची संधी डॉक्टरांनी दिली. डॉक्टर म्हणाले, ‘‘हळूहळू त्याला कमी दिसत जाईल आणि एक दिवस त्याची दृष्टी कायमची जाईल.’’ हे ऐकून आशिषच्या आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर एक क्षण अंधार पसरला. आशिषचे पुढे झालेही तसेच. टेनिस कोर्टवर त्याला आता चेंडू दिसेनासा झाला. पुस्तकांतल्या ओळी धुसर होत गेल्या. पुढे अगदी छातीशी उभे असलेले आई-बाबाही दिसेनासे झाले. जाड भिंगाचा चष्माही हरला. आशिष कायमचा कोर्टबाहेर पडला. रॅकेटही आता अडगळीत पडली. आशिष आता सवंगड्यांनाही दुरावला होता. चालतानाही त्याला आता आधाराची गरज भासू लागलेली होती. आई-बाबाच आता आशिषचे डोळे बनलेले होते. आशिषने शिक्षण सुरू ठेवले.

आशिष आता कॉलेजला आलेला होता. अडचणीही वाढलेल्या होत्या. मित्र भविष्याबद्दल बोलत. मी हे करेन, मी ते करेन. कुणी डॉक्टर. कुणी इंजिनिअर. आशिषला डोळ्यांनीच दगा दिल्याने तो यातले काहीही करू शकणार नव्हता. अर्थात त्याला खेळाडू व्हायचे होते, पण मैदानात आता फ्लड लाइट लावूनही त्याच्यालेखी काही उपयोग होणार नव्हता. आशिष बऱ्यापैकी एकटा पडलेला होता. आशिष देवाला आणि दैवाला उद्देशून ‘मीच का म्हणून, माझ्याच वाट्याला हे का म्हणून’ असे प्रश्न विचारायचा. रडायचा, पण हे सगळे अरण्यरुदन ठरायचे.

बालाजी तांबेंकडून बळ!

आशिषच्या अश्रूंना हसण्याचे बळ मिळाले ते बालाजी तांबेंकडून. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आशिषला गुरुमंत्र दिला. दृष्टी गमावलेल्या आशिषच्या दृष्टिकोनाला या गुरुमंत्राने दहा हत्तींचे बळ दिले. बालाजी तांबेंनी आशिषला सांगितले, ‘‘अरे समस्येकडे तू समस्येसारखाच बघशील तर कसे व्हायचे. समस्येवरील तोडग्याकडे बघ. मार्ग शोधण्याचा प्रयत्न कर. अशा प्रयत्नांनीच तुला यश मिळेल. तुझे फक्त एक इंद्रिय निकामी झालेले आहे. इतर इंद्रिये निरोगी आहेत. त्या सर्व इंद्रियांमध्ये शक्तीचा संचार होऊ दे. ती शक्ती वापर. आशेचा अंकुर फुलवायचा तर हीच युक्ती वापर!’’

आशिषच्या उन्मेषात आता आशेचे नवे तरंग उठू लागले. तांबेंच्या वचनांनी त्याच्या आयुष्याचे सोनेच केले. पुढे दिवसागणिक तो चमकत गेला. ‘काहीही दिसत नाही’ म्हणून रडत बसण्यापेक्षा आता ‘मला काहीतरी भव्यदिव्य असे मिळवायचे आहे’ म्हणून संकल्प सोडलेला अधिक उत्तम, अशी खुणगाठ त्याने मनाशी बांधली आणि तशा तयारीला लागला.

आशिषच्या एका बहिणीनेही त्याच्या अभ्यासात त्याला मोलाची मदत केली. ‘व्यवसाय’, ‘अर्थशास्त्र’, ‘व्यवस्थापन’ या विषयांत आशिषचा अभ्यास घेत, अभ्यासात मदत करत ही बहिणही या विषयांत पारंगत झाली. आशिषची दुसरी आणखी एक बहिण गरिमा. आशिष ज्या नेत्रविकाराला बळी पडला, गरिमाही त्याचीच बळी ठरली. गरिमानेही परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले. तिने लेखन-पत्रकारिताही केली. गरिमा आता आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि बालाजी तांबे यांच्या संस्थेत कार्यरत आहेत.

आशिषने पुढे मुंबईतील ‘नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज्’मध्ये प्रवेश घेतला. अभ्यासात स्वत:ला झोकून दिले. आश्चर्य म्हणते तो वर्गात दुसरा ठरला. आशिषचे कष्ट आणि त्याच्या चिकाटीचेच हे फळ होते. महाविद्यालयातील आशिषच्या एकूण कारकिर्दीबद्दल त्याला ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ हा मानाचा खिताब देण्यात आला.

कॅम्पस इन्टरव्ह्यूमध्ये मात्र एका कार्पोरेट कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उमेदवार म्हणून समोर असलेल्या आशिषला सरकारी नोकरी बघ म्हणून सल्ला दिला. सरकारी नोकऱ्यांतून अपंगांसाठी आरक्षणही असते, असेही हा अधिकारी म्हणाला होता. आशिषला फार वाईट वाटले, पण तो खचला नाही. इथेही त्याला गुरुमंत्र आठवला. आशिषला पुढे आयएनजी वैश्य बँकेत संधी मिळाली. आशिषने इथे काही दिवस काम केले, पण तो इथे फारसा रमला नाही. अर्थात इथे त्याला काही अडचण होती असे नाही. पण मोठ्या यशाचे आता वेध लागलेले होते. आशिषने अखेर ही नोकरी सोडली.

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेस इकॉनॉमिकमध्ये तो दाखल झाला. जगप्रसिद्ध असलेल्या या संस्थेत प्रवेश मिळणे म्हणजे गंमत नाही. इथे प्रवेश मिळावा म्हणून भलेभले तरसतच राहातात. प्रचंड स्पर्धा प्रवेशासाठी असते.

‘एमबीए’नंतर आशिष यांना जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित बँकिंग आस्थापनांपैकी एक असलेल्या ‘जेपी मॉर्गन’च्या लंडन कार्यालयात नोकरी मिळाली. आशिष ‘जेपी मॉर्गन’मधील नोकरीच्या माध्यमातून जगातील पहिले अंध ट्रेडर बनले. हे देखील एक मोठे यश होते. आशिषचे नाव जगभर झाले.

आपण अंध आहोत, ही बाब आशिषने आपल्या प्रगतीच्या आड कधीही येऊ दिली नाही. व्यावसायिक कौशल्याच्या बळावर त्यांनी सर्वांनाच चकित केले. बॉसही त्यांच्यावर जाम खुश असत.

२०१० मध्ये आशिष यांना अपंग सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते आशिषना गौरवण्यात आले. अन्य कितीतरी संस्थांकडूनही आशिष यांचा गौरव झाला. अंधांसाठी एक खास अशी काठी बनवली जाते, पण अनेकांना तिचा नेमका वापर करता येत नाही. आशिष यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या काठीचा वापर मोठ्या कौशल्याने करतात. त्यांची बहिण गरिमा तर ही काठी वापरतही नाहीत. अनेकांना तर या एका कारणाने गरिमा यांच्या अंध असण्यावर शंका येते.

अंध, अपंगांना त्यांच्या उर्वरित अन्य अन् अतिरिक्त शक्तींचा प्रत्यय आणून देण्याचा शक्य तो प्रयत्न आशिष आणि गरिमा सध्या करताहेत. विज्ञान आणि प्रौद्योगिकी या क्षेत्रांत इतकी प्रगती झालेली आहे, की अंध-अपंगांना पूर्वीइतका त्रास आता राहिलेला नाही. आशिष स्क्रिन रिडिंग सॉफ्टवेअरच्या मदतीने आलेले ईमेलही सहज वाचू शकतात, हे विशेष! सगळ्या अहवालांचे तपशिलवार अध्ययन ते करतात. इतरांचे प्रेझेंटेशनही त्यांना नेमकेपणाने कळते. अब्जावधी रुपयांचे व्यवहार ते बघतात. कळस म्हणजे हे सगळे व्यवहार त्यांना तोंडपाठ असतात. सवड असेल तेव्हा इतर अंधांसह आशिष क्रिकेट खेळण्यात रमतात. टँगो वाजवतात. आपल्या मित्रांसमवेत क्लबमध्ये जातात. पार्टीही झोडतात!

लेखिका : पद्मावती भुवनेश्वर

अनुवाद : चंद्रकांत यादव

Related Stories