अंधांसाठी ‘उपासना’ : ब्रेल लिपीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे इंग्रजी मासिक! ‘ब्लॅक’ दूर करायला येते ‘व्हाइट प्रिंट’

0

इतरांचे दु:ख दूर करणे, इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे जेव्हा आमचे उद्दिष्ट बनते, तेव्हा उद्दिष्ट्यपूर्तीचा आनंद आमच्याएवढा अन्य कुणालाही होऊ शकत नाही, कारण या आनंदाला आध्यात्मिक झालर असते. उपासना नावाच्या एक महिला पत्रकार याच आनंदामध्ये सध्या मशगूल आहेत. तल्लीन आहेत. उपासना या अंधांसाठी एक मासिक काढतात. बातम्यांव्यतिरिक्त उपयुक्त ज्ञानात भर घालणारे अन्य साहित्य अंधांनाही वाचायला मिळावे, हा हेतू.

आधी त्या मुंबईतल्या एका जनसंपर्क संस्थेत होत्या. नोकरीत असताना अनेकदा अंधांसाठी आपण काही करावे, हा विचार त्यांच्या मनाला शिवून जायचा. त्यावर खल केल्यानंतर उपासना यांनी ब्रेल लिपीत एक लाइफस्टाइल मासिक प्रकाशित करण्याबाबत ठरवून टाकले. एका मित्राला उपासना यांनी सोबतीला घेतले. ‘एक से भले दो’, असा या उपक्रमाचा प्रारंभ झाला. मे २०१३ मध्ये उपासना यांनी ‘व्हाइट प्रिंट’ नावाने ६४ पानांचे एक इंग्रजी व लाइफस्टाइल या विषयाला वाहिलेले मासिक सुरू केले. अशा पद्धतीचे ब्रेल लिपीत प्रकाशित पहिलेच म्हणूनही या मासिकाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ब्लाइंड्सच्या सहकार्याने मासिकाचे प्रकाशन झाले. राजकारण, संगीत, चित्रपट, तंत्रशिक्षण, कला, खाद्यपदार्थ, पयर्टन अशा अनेक विषयांवर वाचनीय मजकूर व्हाइट प्रिंटमध्ये असतो. लघुकथाही असतात. प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्तही या मासिकातून लिहितात. रिडर्स सेक्शन म्हणून एक सदर यात वाचकांसाठी खास आहे. कथा, कविता, प्रवासवर्णन असे कुठलेही लिखाण या सदरासाठी वाचक पाठवू शकतात. उपासना सांगतात, ‘‘लोक नेहमी मला विचारतात, की अंधांसाठीचे सेवाकार्य हाती घेण्यामागचे नेमके कारण काय. निमित्त काय? तर माझे उत्तर असते कारण हेच की मला आतून वाटत होते आणि निमित्त म्हणजे केवळ हे मासिक जे मी अंधांसाठी काढते. अंधांसाठी काही करायचे हे तर खूप आधीपासून वाटायचे. पुढे या वर्गासाठी एकही नियतकालिक बाजारात उपलब्ध नाही हे लक्षात आले आणि मग ही उणीव मी भरून काढली. आता अंध बंधू-भगिनींशी मला संलग्न करणारे हेच एक निमित्त आहे ना. उगीच काहीतरी काय सांगत सुटावे. मनापासून मी काम केले. त्याचे चांगले परिणाम आता सर्वांसमोर आहे.’’

उपासना यांनी मुंबईतील जय हिंद कॉलेजातून ‘मास कम्युनिकेशन’ या विषयात पदवी संपादन केली आहे. नंतर कॅनडातील ओटाव्हा विद्यापीठातून कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.

कुठलाही व्यवसाय उभा करण्यात काही अडचणी येतातच. उपासना यांच्यासमोरही त्या आल्या. एखादी अडचण आली रे आली की लोक उपासना यांना सांगत, ‘तू ना हे मासिक बंद कर आणि गुपचूप नोकरी कर.’ पण अगदी गळ्यापर्यंत पाणी आले तरी मासिक सुरूच राहणार म्हणून ते सुरू करण्यापूर्वीच उपासना यांनी ठरवून झालेले होते.

निधी जमवणे, हेच मोठे आव्हान…

सर्व सोंगे घेता येतात, पैशाचे सोंग घेता येत नाही. मासिक नियमित चालवायचे तर सर्वांत महत्त्वाचा घटक होता पैसा. तो कसा, कोठून येणार? ‘व्हाइट प्रिंट’ हा अनुदानित व्यवसायही नाही, की शासनाला वा लोकांकडून दान-अनुदान मागायचे आणि चालवायचा. जाहिराती छापायच्या तर प्रिंट मिडियात बहुतांशी जाहिराती या फोटोच्या माध्यमातून असतात. आता अंधांसाठीच्या मासिकात फोटोयुक्त जाहिताती छापून काय साध्य होणार? तेव्हा उपासना यांनी मासिकासाठी ‘ऑडिओ जाहिराती’ मिळवण्याच्या शक्यता तपासून पाहिल्या.

कॉर्पोरेटकडून पाठिंबा

गेल्या काही महिन्यांपासून प्रकाशनाला कोकाकोला, रेमंड, टाटा समूह अशा बड्या कंपन्यांचे सहकार्य मिळते आहे. तथापि, जाहिरात द्यावी म्हणून कंपन्यांची समजूत काढताना आजही नाकीनऊ येतात. दरमहा वाइट प्रिंटच्या तीनशे प्रती आता छापल्या जातात. देशाच्या विविध भागांत विक्रीसाठी त्या पाठवल्या जातात. लांब-लांबवरून मासिकासाठी मागण्या येत आहेत. अगदी आडवळणाच्या गावावरून मागणी नोंदवली जाते, तेव्हा विशेष आनंद होतो, असे उपासना सांगतात. फोन, ई-मेल, पत्रांच्या माध्यमातून लोकांच्या प्रतिक्रियाही जाणून घ्यायला मिळताहेत. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद आमची जबाबदारी आणखीच वाढवतो. प्रकाशन अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रेरणा देतो. उत्तर भारतातून एकदा एका मुलीचा मला फोन आला आणि ती म्हणाली, की तिने मासिक एकाच दिवसात वाचून काढलेले आहे. आता ती नव्या मासिकाची वाट बघते आहे. हे ऐकून मला अत्यानंद झाला.

किंमत आणि मासिकाचा प्रसार

व्हाइट प्रिंटचे मूल्य ३० रुपये मात्र आहे. महसुलासाठी मासिकाचे संपूर्णपणे जाहिरातींवर अवलंबून राहणे अर्थातच स्वाभाविक आहे. सोशल मिडियानेही मासिकाच्या प्रचार-प्रसारात मोलाची भूमिका बजावलेली आहे. इतर विविध माध्यमांतूनही लोकांना मासिकाबद्दल सांगितले जात आहे, जेणेकरून जास्तीत जास्त जाहिराती मिळाव्यात व मासिकाचा प्रसार जोमात व्हावा.

ध्येय

उपासना सांगतात, ‘आमचे ध्येय फार मोठे आहे. आगामी काळात हे मासिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. केवळ भारत हीच मासिकाची कर्मभूमी नसेल तर अवघ्या जगात ते पोहोचवायचे आहे. आम्ही एक लहानसा संगीतमय चित्रपट ‘बी फॉर ब्रेल’ बनवलेला आहे. जो यू-ट्यूबच्या माध्यमातून ऐकायला मिळतो. ब्रेलचा प्रचार या चित्रपटाच्या माध्यमातूही होतोय. लोकांपर्यंत एखादी गोष्ट प्रभावीपणे पोहोचवायची तर संगीताहून मोठा पर्याय तुमच्यासमोर दुसरा नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. म्हणूनच आम्ही संगीताचा आधार घेतलाय. थोडक्यात आमचे नुसते ध्येयच मोठे नाही तर ध्येयासक्तीही अनंत आहे!’’