पोश्टर गर्लमधली रुपाली थोरात तुमच्या आमच्यातलीच एक- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

0

पोश्टर बॉईज या सिनेमाच्या धमाकेदार यशानंतर दिग्दर्शक समीर पाटील पोश्टर गर्ल हा सिनेमा घेऊन येतोय. नवीन वर्षात व्हॅलेंटाईन्स डेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. अनिकेत विश्वासराव, दिलीप प्रभावळकर आणि ह्रषिकेश जोशी या पोश्टर ब़ॉईजनंतर आता या सिनेमातनं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पोश्टर गर्ल बनलीये.

आत्तापर्यंत सोनालीने विविध भुमिका सिनेमातनं साकारल्या आणि पोश्टर गर्लच्या निमित्ताने खूप वर्षांनी ती टायलट रोल करताना दिसणारे. ब्लॅक कॉमे़डी हा या सिनेमाचा आत्मा आहे, यापूर्वी पोश्टर बॉईज सिनेमातही तुम्हाला ब्लॅक कॉमेडी अनुभवायला मिळाली होती. ब्लॅक कॉमेडी ही अत्यंत आगळा वेगळा प्रयोग सोनाली पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातनं करतेय.

“सिनेमाचा विषय वेगळा आहे, त्याची मांडणी वेगळी आहे आणि त्यामुळेच ब्लॅक कॉमेडीचा बाज तुम्हाला यातनं पहायला मिळेल. मला हा प्रयोग करताना खरंच खूप मजा आली, सोबत माझे सहकलाकार. अनिकेत, ह्रषिकेश, सिद्धार्थ, जितेंद्र या सगळ्यांसोबत मी पहिल्यांदाच काम करतेय. त्यामुळे हा अनुभवही तेवढाच फ्रेश आणि नावीन्यपूर्ण होता.”

मल्टीस्टारकास्ट असलेला, दोन नायिका आणि एक नायक, एक नायिका आणि दोन नायक असलेल्या सिनेमांची सध्या मराठीत रेलचेल सुरु आहे. या सिनेमात मात्र सोनालीही एकमेव नायिका आहे आणि तिच्यासोबत एक नाही दोन नाही तर तीन तीन नायक पहायला मिळणारेत. “ पोश्टर गर्लमुळे खूप वर्षांनी मी सिनेमात टायटल रोल साकारतेय. याआधी केदार शिंदे दिग्दर्शित बकुळा नामदेव घोटाळे सिनेमात मी बकुळाची भूमिका साकारली होती.

सिनेमातल्या माझ्या भूमिकेचे नाव आहे रुपाली थोरात, जी अत्यंत सामान्य आहे पण ती पोश्टर गर्ल बनते. पोश्टर गर्ल पर्यंतचा तिचा हा प्रवास म्हणजेच हा सिनेमा आहे. पण या सगळ्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे ही रुपाली अत्यंत सर्वसामान्य मुलगी आहे अगदी तुमच्या आमच्यासारखीच. आज प्रत्येक मुलगी ही तिच्या आयुष्यात स्वतंत्र बनू इच्छिते, ती महत्वाकांक्षी आहे, नोकरी, व्यवसाय, शिक्षण या सगळ्याबाबतीत आजच्या मुली सतर्क असतात. रुपाली साकारताना मी या अशाच मुलींचे प्रतिनिधीत्व करतेय.”

नुकत्याच एका चॅनलच्या अवॉर्ड सोहळ्यात सोनालीचा हा पोश्टर गर्ल लूक उघड केला गेला. वर्ष सरत असतानाच या वर्षातल्या आपल्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सोनाली समाधानी आहे. “ यावर्षी क्लासमेट, मितवा, शटर सारखे माझे सिनेमे प्रदर्शित झाले आणि आता पोश्टर गर्ल हा सिनेमा, या प्रत्येक सिनेमांमधून मी खूप वेगवेगळ्या भूमिका साकारु शकले, खऱ्या अर्थाने माझ्यातल्या अभिनेत्रीला प्रोत्साहित करणारे हे वर्ष होते, पुढचे वर्ष ही माझ्यासाठी अशाच पद्धतीचे भरपूर काम देणारे असू दे हाच माझा प्रयत्न आणि नवीन वर्षाचा संकल्प असेल.”

अभिनेता हेमंत ढोमे याने पोश्टर गर्ल या सिनेमाचे लेखन केलेय. “ हेमंत हा माझा खूप चांगला मित्र आहेच त्यासोबत तो आपल्या सर्वांना एक चांगला अभिनेता म्हणूनही माहित आहे, पण या सिनेमातनं पहिल्यांदाच तो लेखक म्हणून सर्वांसमोर येतोय आणि मला खात्री आहे की हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो एक यशस्वी लेखक म्हणून ओळखला जाईल” असा विश्वासही सोनालीने यावेळी व्यक्त केला.